Monday, May 25, 2009

ग्रँड युरोप - भाग २९ : सुंदर नगरी पॅरिस


दि.२८-०४-२००७ तेरावा दिवस : सुंदर नगरी पॅरिस

"पॅरिस हे जगातील सर्वात सुंदर शहर आहे" असे मी फार पूर्वीपासून ऐकत आलो आहे. म्हणजे कोण हे ठरवतो, कशावरून ठरवतो, त्याचे निकष काय असतात असले प्रश्न डोक्यात यायला लागण्याच्या वयात येण्यापूर्वीपासून ही गोष्ट माझ्या मनात घर करून राहिलेली आहे. त्या शहराबद्दलच्या अधिक मनोरंजक गोष्टी नंतर हळूहळू समजत गेल्या. पॅरिस ही अनेक कलांची पंढरी आहे. त्यामळे त्या शहराची वारी करण्याची इच्छा सगळ्या कलाकारांच्या मनात असते. माझ्या अंगात कसल्याही कलागुणांचा अंश नसला तरी थोडीशी कलासक्ती असल्यामुळे किंवा निव्वळ कुतूहलापोटी कां होईना, पण ते शहर प्रत्यक्ष डोळ्यांनी पहाण्याची अनावर इच्छा माझ्यासुद्धा मनात कधीची जन्माला आलेली होती. पण आतापर्यंत ती पूर्ण करणे शक्य न झाल्यामुळे ते राहून गेले होते. युरोपच्या या सहलीच्या तेराव्या दिवशी बेल्जियम देशांतून निघून फ्रान्सला जाण्यासाठी त्यामुळेच मी खूप उत्सुक होतो.

पहायला गेल्यास पॅरिस हे शहर खूप प्राचीन आहे असे म्हणतात. ख्रिस्तपूर्व चार हजार वर्षापूर्वीसुद्धा येथील सीन नदीवरील नावाडी, व्यापारी आणि मच्छीमार वगैरेंची वस्ती या ठिकाणी होती. आपल्या मुंबईला पूर्वीपासून कोळी लोकांची वस्ती होती तशीच इथेही होती. रोमन सम्राटांनी जेंव्हा युरोपचा मोठा भाग काबीज केला तेंव्हा या ठिकाणी त्यांनी आपली एक मोठी छावणी स्थापन केली. त्या काळात 'ल्युतेतिया' या नांवाने ती ओळखली जात असे. एस्टेरिक्सच्या कॉमिक्स वाचणा-यांना हे नांव परिचयाचे वाटेल. पुढे रोमन साम्राज्याचा अंत झाल्यावर ठिकठिकाणी नवे राज्यकर्ते उदयास आले. या भागातील स्थानिक राजांनी या गांवाला पुन्हा पूर्वीचे नांव देऊन इथून आपला राज्यकारभार चालवायला सुरुवात केली. फ्रान्स हे एकसंध राष्ट्र आणि पॅरिस ही त्याची राजधानी हे दोन्ही सुमारे हजार वर्षांपूर्वी नांवारूपाला आले.

त्यानंतरच्या काळांत त्याची भरभराट होत गेली. कलाकारांच्या कलागुणांना या शहरात चांगला वाव मिळाला. त्यामुळे अनेक कलाप्रेमी इथे आकर्षिले गेले. त्यांचे प्रयत्न आणि कौशल्य यातून सुंदर इमारती उभ्या राहिल्या, विद्यापीठे आणि वस्तुसंग्रहालये उघडली गेली. हे राजधानीचे ठिकाण असल्यामुळे नंतरच्या कालखंडात स्थानिक महत्वाच्या अनेक घटनाही येथे घडून गेल्या असणार. फ्रेंच राज्यक्रांती ही आंतरराष्ट्रीय महत्वाची घटना इथे अठराव्या शतकाच्या अखेरीस घडली, ती सर्व जगाला हादरवून टाकणारी ठरली. तत्कालिन राजा व राणी यासकट सगळ्या शासकवर्गाची त्यात सरसकट कत्तल करण्यात आली. एका झटक्यात शिर धडावेगळे करणारे गिलोटिन नांवाचे जीवघेणे यंत्र त्या हत्याकांडासाठी खास बनवून वापरण्यात आले. विक्षुब्ध झालेल्या जमावाला उन्मादाने विध्वंसक कृत्ये करणे शक्य असले तरी राज्यशकट चालवण्याचे विधायक काम करण्यासाठी त्याचा उपयोग होत नाही. त्यामुळे क्रांतीनंतरचा कांही काळ अनागोंदी कारभाराचा गेला. त्यानंतर हळूहळू तिथे लोकशाही स्थापन होऊन स्थिरावली.

अधून मधून युद्धे होत राहिली असली तरी शांततेच्या काळात पॅरिसचा खूपच चांगल्या त-हेने विकास होत गेला. कलेचे माहेरघर म्हणून त्याने ख्याती मिळवली आणि ती अद्याप टिकून आहे. नगररचना असो वा वास्तुशिल्प, पुरातन शैलीची चित्रकला असो वा मॉडर्न आर्ट, पारंपरिक नृत्यकला असो वा जलद बीट्सवरील आधुनिक डान्स, या सगळ्यात पॅरिस अग्रगण्य राहिले. कपड्यांच्या बाबतीत तर ती सर्व जगातील फॅशनची राजधानी आहे असे समजले जाते. सौंदर्यप्रसाधनांचे ते आगर आहे. उत्तमोत्तम अत्तर पाहिजे असेल तर ते इथेच मिळेल. अशा रीतीने पॅरिस हे एकाच वेळी ऐतिहासिक तसेच अत्याधुनिक शहर म्हणून प्रसिद्ध आहे. याच कारणामुळे संपूर्ण जगातून लक्षावधी पर्यटक पॅरिस पहायला येतात.

इंग्रजी आणि फ्रेंच या दोन्ही भाषा रोमन लिपीमध्येच लिहिल्या जात असल्या तरी लिहिलेल्या शब्दांचे उच्चार वेगवेगळ्या प्रकारे करतात. आधी फ्रेंच शब्द वाचणे आपल्याला कठीण आणि त्यांचे उच्चार समजून घेऊन ते लक्षात ठेवणे तर जवळ जवळ अशक्यप्राय गोष्ट आहे. त्यासाठी फ्रेंच भाषा विधीवत शिकायलाच हवी. ते केलेले नसल्यामुळे पॅरिसमधील जागांना इंग्रजीमध्ये दिलेल्या नांवांचा इंग्रजी भाषेनुसार उच्चार लिहिणे मला भाग पडत आहे. एक साधे उदाहरण घ्यायचे झाल्यास पॅरिस शहराला तेथील लोक 'पारी' म्हणतात तर लंडन शहराला 'लान्द्रे'. पण मला तसा उल्लेख करता येणार नाही.

पॅरिसला पोचल्यानंतर आधी आम्ही बसमधूनच तेथील मुख्य भागाचा एक फेरफटका मारला. अतिशय नीटनेटके सरळ रेषेत जाणारे लांबरुंद प्रशस्त असे रस्ते, त्याच्या दुतर्फा रांगेने लावलेली झाडे, प्रमाणबद्ध आकाराच्या सुंदर इमारती, त्यावर केलेले कलात्मक कोरीव काम, कमानी, घुमट, खांब वगैरेंची रेलचेल, कलात्मक चबूतरे आणि त्यावर स्थापलेल्या वेगवेगळ्या शिल्पकृतींची सजावट, अधून मधून दिसणारे राजवाडे, चर्च, संग्रहालये यांच्या सुप्रसिद्ध वास्तू, कारंजे आणि पुतळ्यांनी शोभिवंत केलेले प्रचंड आकाराचे चौक वगैरे सा-याचा एकत्र परिणाम होऊन या शहराला सुंदर शहर असे कां म्हणतात ते आपल्याला सहज समजते.

. . . . . . . (क्रमशः)

No comments: