Thursday, May 14, 2009

ग्रँड युरोप - भाग २० : अद्भुत आल्प्स


सलग दुसरे दिवशी पुन्हा आल्प्स पर्वतावर चढाई करायची होती. आदले दिवशी माउंट टिटलिसच्या माथ्यावरील बर्फात खेळलो होतो. दुसरे दिवशी आल्प्समधील कांही निसर्गनिर्मित तर कांही मानवनिर्मित चमत्कार पहायचे होते. ल्यूसर्नहून निघाल्यानंतर सर्वात आधी ट्रमेलबॅशला गेलो. इथला चमत्कार तर पूर्वी कधी ऐकलासुद्धा नव्हता किंवा अशी कांही जागा अस्तित्वात असेल याची कल्पनासुद्धा मनात आली नव्हती. वास्तव हे कधी कधी कल्पनेच्याही पलीकडे असते असे म्हणतात ते यासाठीच!

पावसाळ्यात मुंबईहून पुण्याला किंवा कोणत्याही डोंगराळ प्रदेशातून जातांना डोंगरावरून खळाळत खाली येणारे पाण्याचे हजारो ओघळ आपल्याला दिसतात. एकमेकात मिसळून त्यांचे आधी छोटे प्रवाह निर्माण होतात, ते वाट मिळेल तसे वळणा वळणाने वहात आणि कडयाकपा-यावरून कोसळत खाली येत असतात. पाऊस थांबल्यावर यातले बरेचसे आटून जातात, पण वरच्या बाजूला कपारीत साठलेले पाणी त्यातील कांही झ-यातून नंतरही खाली येत राहते. सखल भागात आल्यावर ते एकत्र येऊन त्याचा बारमहा
वाहणारा प्रवाह दिसायला लागल्यावर त्याला नदी हे नांव मिळते. जमीनीवर पडलेल्या पावसाचे पाणीही ओढ्या नाल्यांतून वहात त्यात येऊन मिसळते. अशा लहान लहान नद्या मिळून त्यातून मोठी नदी बनते. ही नदी वाहता वाहता वाटेत येणारी दगड माती वाहून नेते, त्यामुळे जमीनीमध्ये घळ पडून तिचे पात्र बनते. वाटेत एखादा उंचवटा आला तर ती त्याला वळसा घालून पुढे जाते. तिच्या मार्गात मातीचा ढिगारा आला तर त्यामधून ती आपली वाट लवकर खोदून काढते पण कठिण पत्थर असेल तर तो मात्र
खूपच हळू हळू झिजतो. एखादा उभा कडाच वाटेत आला तर ती त्यावरून खाली झेप घेते आणि त्या ठिकाणी धबधबा निर्माण होतो.

पण या गोष्टी नदीच्या जन्माआधीच झाल्या तर? आपण तशी कल्पनाही करू शकत नाही ना? नेमका हाच चमत्कार लोटरब्रूनन या स्विट्झर्लंडमधील गांवाजवळच्या पहाडात घडला आहे. ईगर, युंगफ्राउ आणि मुंच या तीन बर्फाच्छादित पर्वतशिखरांवरील हिमनद्यांमधील बर्फ वितळून जे पाणी बनते त्यातला कांही भाग त्या डोंगरांच्या खडकांमधील भेगांतून आंत झिरपत जातो. त्या पाण्याने या डोंगरांना आंतून पोखरून विविध आकाराच्या पोकळ्या त्यात आंतल्या बाजूला निर्माण करून ठेवल्या आहेत. मानवाच्या कवटीच्या आत जशा सायनस कॅव्हिटीज असतात तशा प्रकारची पण त्यापेक्षा शेकडो पटीने मोठी अशी ही वेडीवांकडी अनंत विवरे आहेत. बर्फ वितळून निघालेले पाणी या गुफांमधून कधी उड्या मारीत तर कधी अचाट वळणे घेत खळाळत वहात असते. एकापाठोपाठ एक अशा एकंदर दहा धबधब्यांवरून खाली कोसळत अखेरीस ते पायथ्याशी असलेल्या प्रवाहातून वाहू लागते. यामधील वरच्या अंगाचे पहिले पांच धबधबे गुहांच्या आंत दडलेले आहेत तर खालच्या बाजूचे पांच धबधबे बाहेरून दिसू शकतात. दर
सेकंदाला शंभर घनफुटांहून अधिक या वेगाने हे पाणी वहात असल्यामुळे त्यातून मोठा आवाज निघतो व तो त्या पोकळ्यांमध्ये घुमून अधिक घनगंभीर बनतो. 'ट्रमेलबॅश' या शब्दाचा अर्थ 'पडघमांचा ध्वनी' असा आहे व या जागेचे नांव या आवाजावरून पडले असणार.

हे दहा धबधबे पहाण्यासाठी या महाबिकट जागी प्रत्यक्ष जाऊन पोचायला तर हवे. इथे माणसाने आपले कसब पणाला लावून ते काम सोयिस्कर केले आहे. या डोंगराच्या जवळ जवळ मध्यापर्यंत म्हणजे ज्या ठिकाणी हे पाणी एका गुहेतून बाहेर झेप घेते तिथपर्यंत जाणारी एक वाट आहे. तेथून वरचे पांच धबधबे पाहता येण्यासाठी कुठे घळीतून तर कुठे गुहेतून तिथपर्यंत जाणारे पाय-या पाय-यांचे जिने बनवले आहेत. ते अतिशय निसरडे असल्यामुळे कठड्याला घट्ट धरून त्यावरून जरा जपूनच चालावे लागते। त्यात सात जागी अशा प्रकाराने झरोके बनवले आहेत की त्यातून समोर किंवा खाली फेसाळणारे पाणी दिसते पण ते पाणी त्यांतून जिन्यावर येत नाही. आपल्या मार्गानेच ते खाली वहात जाते. यातील कांही भगदाडे नैसर्गिक वाटतात तर कांही कृत्रिम. सूर्यप्रकाशाचा किरण तिथपर्यंत पोचणेच शक्य नाही म्हणून या सगळ्या जागी विजेचे दिवे लावून थोडा उजेड केला आहे. नाही तर त्या गाभा-यातले पाणी डोळ्यांना दिसणार कसे? खालचे पांच बाह्य धबधबे पहाण्यासाठी प्रवाहाच्या बाजूबाजूने खाली उतरण्याचा जिनासुद्धा आहे. पण आधीच जवळजवळ दहा मजल्याइतकी चढउतार झालेली असल्यामुळे आमची दमछाक झाली होती आणि पुन्हा तेवढी चढउतार करायला पुरेसा वेळही नव्हता. त्यामुळे "असे बाहेरचे धबधबे तर आपण खूप पाहिले आहेत, त्यातला -हाईन नदीवरचा विशाल धबधबा नुकताच पाहिला आहे" असे म्हणत त्या जागेचा निरोप घेतला.

तेथून आम्ही लोटरब्रूनन या रेल्वे स्टेशनवर आलो. इथून युंगफ्राऊ या शिखरावर जाण्यासाठी ट्रेनने जावे लागते. ट्रेन म्हंटल्यावर निदान दहा पंधरा डब्यांची झुकझुक गाडी आपल्या डोळ्यासमोर येते. इथे मात्र एका गाडीला दोन किंवा तीन एवढेच डबे असतात पण खूप गाड्या असतात. आम्ही स्टेशनात पोचल्यावर लगेच एक गाडी आली. पण अचानक आलेली आमच्या ग्रुपमधली सत्तर माणसे सामावून घेण्याइतकी जागा त्यात नसते. त्यामुळे तिच्या नंतर सुटणा-या गाडीचे आरक्षण आमच्यासाठी केले होते, आम्हाला
त्याच गाडीने जाणे आवश्यक होते. इथे रेल्वेमार्गाला मोठा चढाव आहे आणि बर्फामुळे रूळ गुळगुळीत होतात, यामुळे साध्या रुळाने काम भागत नाही. दोन रुळाच्या मधोमध एक दांतेरी पट्टा (रॅक) असतो व रेल्वेच्या चाकांमध्ये एक दांतेरी चाक (कॉग व्हील) असते. त्यांचे दाते गाडीला पुढे खेचण्याचे काम करतात. युंगफ्राऊपर्यंतचे अंतर जास्त नसले तरी त्यासाठी वाटेत क्लीन या जागी आगगाडी बदलावी लागते. पहिल्या टप्प्यात आपण समुद्रसपाटीपासून अडीच हजार फुटावरून सहा हजार फुटावर जातो तर दुस-या
टप्प्यात त्याहूनही कमी अंतर कापीत अकरा हजार फुटावर जाऊन पोचतो. यामुळे या दोन्ही गाड्यांच्या रचनांमध्ये कांही तांत्रिक फरक असावा असे वाटले. या रेल्वेची सुरुवात शंभर वर्षापूर्वी होऊन गेली असे लिहिलेला एक फलक तिथे आहे. अजूनही त्यात नव्या सुधारणा करण्याचे काम सुरूच आहे.

हा रेल्वेमार्ग अपेक्षेप्रमाणे वळणावळणाचा होता. कांही ठिकाणी इंग्रजीतील यू आकाराची वळणे होती. मधल्या दरीच्या पलीकडच्या रुळावरून आपल्याच मार्गावरील पुढील गाडी आपल्या उलट दिशेने आणि विरुद्ध बाजूने येणारी गाडी आपल्या गाडीच्याच दिशेने येतांना पाहून गंमत वाटली. कांही भागात मोठ्या मुश्किलीने एकेरी मार्ग बनवलेला होता. त्यामुळे समोरून येणा-या गाडीच्या क्रॉसिंगसाठी अधून मधून थांबावे लागत होते. चढ इतका जबरदस्त होता की डब्यातल्या डब्यात इकडून तिकडे जाणे कठीण होते. सीटला हाताने घट्ट धरून एक एक पाऊल जपून टाकावे लागत होते. बाहेरील दृष्ये मात्र अवर्णनीय होती. या मनमोहक प्रवासाच्या अखेरीस युंगफ्राऊ या युरोपातील सर्वोच्च शिखराचे दर्शन घडले आणि स्तिमित झालो.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: