Tuesday, May 19, 2009

ग्रँड युरोप - भाग २५ : मदुरोडॅमचे मिनि हॉलंड


दि.२६-०४-२००७ : मदुरोडॅमचे मिनि हॉलंड


जर्मनीमधील कोलोन शहराहून निघाल्यावर जर्मनीची सीमा उल्लंघून आम्ही नेदरलँडमध्ये शिरलो. ज्याप्रमाणे इंग्लंड हा युनायटेड किंग्डमचा एक भाग असला तरी तो देश इंग्लंड म्हणूनच जास्त प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे हॉलंड हा नेदरलंडचा एक भाग असूनही आपण त्या देशालाच हॉलंड या नांवाने ओळखत आलो आहे. हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असा देश आहे याचे मुख्य कारण म्हणजे याचा अर्ध्याहून अधिक भाग समुद्रसपाटीपेक्षाही खालील पातळीवर आहे.

समुद्राच्या पाण्याला रोज भरती आणि ओहोटी येत असते व त्यावेळी भरती ओहोटीच्या जोरानुसार त्याच्या पाण्याची पातळी वर किंवा खाली जात असते. त्याची सरासरी काढून त्याचा मध्यबिंदू ही त्या जागेची समुद्राची पातळी आहे असे ठरवले जाते आणि जमीनीवरील कोठल्याही जागेची उंची या पातळीच्या तुलनेने किती आहे याच्या आंकड्यात दर्शवली जाते. हॉलंडमधील बहुतेक भाग अत्यंत समतल असून तिची उंची या पातळीच्या तुलनेत थोडीशी कमी आहे. याचा अर्थ प्रत्यक्षात तो भाग पाण्याखाली असतो असा नाही. अनेक उपाय करून तो कोरडा ठेवण्यात आला आहे. पण जर कां हे सर्व कृत्रिम उपाय निष्फळ ठरले तर हॉलंडचा बराचसा भाग भरतीच्या वेळी पाण्याने भरेल आणि ओहोटीच्या वेळी त्यावरील पाणी ओसरेल. -हाईन ही युरोपातील मोठी नदी इथेच अनेक मुखाने समुद्राला मिळते. त्यामुळे तिच्या मुखाजवळील प्रदेशात गोड्या पाण्याचेही अनेक प्रवाह निर्माण झालेले आहेत.

शेकडो वर्षांपूर्वी कोणाला तरी या भागात येऊन वसाहत करावी असे वाटले असेल त्या वेळी त्यांनी समुद्रकिना-यावरील उंचवट्यांवर जाऊन रहायला सुरुवात केली. हळूहळू त्यांच्या आजूबाजूला भर घालून कांही कृत्रिम उंचवटे तयार केले. भरतीच्या वेळी ती बेटे असतील तर ओहोटीच्या वेळी जमीनीला जोडलेली असतील. आणखी एक पाऊल पुढे टाकून समुद्राच्या व नदीच्या उथळ पाण्यात बांध घातले आणि ही बेटे एकमेकांना जोडली. त्यामुळे त्यांच्यामधला सखल भाग समुद्रसपाटीच्या खाली असला तरी भरतीच्या पाण्याला तिथपर्यंत पोचायला मार्ग उरला नाही. तो भाग लागवडीखाली आणता आला.

असे असले तरी नद्यांमधून वहात येणारे पाणी समुद्राला मिळाले नाही तर ते तेथे सांचेल व मोठमोठी तळी तयार होतील. त्याचा निचरा करण्यासाठी वेगवेगळे उपाय योजले गेले. त्यांच्या पात्रांत जागोजागी बंधारे घालून त्यांचे वेगवेगळे भाग बनवले. कांही जागी बंधा-यांवर स्लुईस गेट नांवाच्या झडपा बसवल्या. या झडपा फक्त आंतून बाहेरच्या बाजूला उघडतात. त्यामुळे ओहोटीच्या काळात आंतील पाण्याचा दाब अधिक असल्यामुळे ते दरवाजे उघडून आंतील भागातील पाणी समुद्रात वाहू देतात, तर भरतीच्या वेळी समुद्रामधील पाण्याची उंची व त्यातून निर्माण होणारा दाब जास्त असल्याने तो दाब या दरवाज्यांना घट्ट मिटवून ठेवतो. त्या वेळेस बाहेरील पाणी आंत येऊ शकत नाही. आपल्या हृदयातील झडपा अशाच प्रकारे कार्य करून शरीरातील रक्ताभिसण सुरू ठेवतात.

मध्ययुगीन काळात पवनचक्क्यांचा शोध लागल्यानंतर या भागात मोठ्या संख्येने पवनचक्क्या उभारल्या गेल्या. त्यांना जोडलेले पंप खालील पातळीवरील नद्या व तलावांमधील पाणी उचलून वरील पातळीवरील समुद्रात ते सोडू लागले. असा प्रकारे पंचमहाभूतांमधील वायू या एका महाभूताच्या मदतीने जल या दुस-या महाभूतावर विजय मिळवला. वाफेच्या तसेच डिझेल इंजिनांचा शोध लागल्यानंतर त्यांचा उपयोग मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. सागराबरोबर चाललेली ही लढाई अजून सुरूच आहे आणि अशीच चालू राहणार.

इतका खटाटोप करून जमीन संपादन करण्यामागे तसेच महत्वाचे कारण असणारच. नद्यांमधून वहात येणा-या गाळाने तेथील जमीन अतिशय सुपीक बनलेली आहे. त्यामुळे दाट लोकसंख्या झाली असूनसुद्धा हॉलंडमधून शेतीमालाची आणि विशेषतः दूधदुभत्याची प्रचंड निर्यात केली जाते इतके उत्पन्न तेथील जमीनीतून निघत आहे.

अॅमस्टरडॅम या नेदरलंडच्या राजधानीच्या शहराजवळच द हेग या शहरी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. त्याच शहरात मदुरोडॅम नांवाची एक अत्यंत सुंदर अशी एका काल्पनिक शहराची प्रतिकृती बनवली आहे. ही कोणत्याही प्रत्यक्षातील शहराची प्रतिकृती नाही, तर हॉलंडमधील एक नमूनेदार शहर कसे असावे याचे एक पंचवीसांश आकाराचे दर्शन येथे घडते. प्राचीन काळातील चर्च, हॉस्पिटल, शाळा, सरकारी ऑफीसे, मोठ्या खाजगी कंपन्यांची ऑफीसे इत्यादी तेथील प्रत्यक्षातील महत्वाच्या इमारतींच्या हुबेहूब प्रतिकृती आहेतच. त्याशिवाय विमानतळ, रेल्वे स्टेशन, गोदी, नदी, त्यावरील पूल, बागबगीचे, क्रीडांगणे आदि सगळ्या गोष्टींच्या प्रतिकृती आहेत. अगदी मोकळ्या कुरणात चरणारी छोटीछोटी गुरेसुद्धा दाखवली आहेत. रस्त्यांच्या कडेने, इमारतींच्या आसपास आणि मोकळ्या जागेवर हजारोंच्या संख्येने छोटी छोटी झाडे लावून शहराचा अप्रतिम देखावा निर्माण केला आहे. यातील रस्त्यांवरून वेगवेगळ्या मॉडेल्सच्या मोटारी धांवत असतात आणि पाण्यातील जहाजे आणि स्पीडबोट्स वेगवेगळ्या वेगाने चालत असतात. तेलवाहू आणि खनिज पदार्थांची वाहतूक करणारी वेगळ्या पद्धतीची जहाजेसुद्धा इकडून तिकडे फिरत असतांना दिसतात. फक्त विमाने तेवढी आकाशात न उडता जमीनीवरूनच विमानतळाच्या घिरट्या घालीत असतात. अशा प्रकारे ही सगळी फक्त हुबेहूब दिसणारी स्थिर मॉडेल्स नसून चालती फिरती इवली इवली यंत्रे आहेत.

हॉलंडमध्ये आगबोटींना नदीतून समुद्रात किंवा समुद्रातून नदीत प्रवेश करण्यासाठी खास रचनेच्या दुहेरी गेटांमधून जावे लागते. इथे नदीची पातळी समुद्रसपाटीहून खाली असते यामुळे या दोन्हीमधील पाण्याच्या पातळ्या वेगळ्या राखण्यासाठी एक विशेष व्यवस्था केलेली आहे. या रचनेची प्रतिकृतीसुद्धा मदुरोडॅममध्ये पहावयास मिळते. ठराविक वेळानंतर एक आगबोट नदीतून आणि दुसरी बोट समुद्रातून अशा दोन बोटी या दुहेरी दरवाजांपाशी येतात. एक एक दरवाजा उघडून त्या मधील जागेत येतात. त्या वेळेस दुसरे दोन दरवाजे बंद राहून नदी आणि समुद्र यांना वेगळे ठेवतात. त्यानंतर पहिले दोन दरवाजे पूर्णपणे बंद होऊन दुसरे दोन दरवाजे उघडतात व त्यातून या आगबोटी आपापल्या मार्गाने पुढे जातात. हे सगळे आपोआप घडत असलेले पहायला प्रेक्षकांची गर्दी होते आणि सर्व प्रेक्षक चांगलेच प्रभावित झालेले दिसतात. एका मोठ्या बागेएवढ्या जागेत हे सगळे विश्व मांडलेले आहे. ते पहाण्यासाठी दिलेला तासाभराचा वेळ केंव्हा संपला ते कळलेसुद्धा नाही. एक अविस्मणीय अशी जागा पहाण्याचे समाधान इथे मिळाले.
. . . . . . (क्रमशः)

No comments: