Sunday, May 10, 2009

ग्रँड युरोप - भाग १८ : माउंट टिटलिस


दि.२३-०४-२००७ आठवा दिवस : माउंट टिटलिस
आज माउंट टिटलिस या आल्प्सच्या बर्फाच्छादित शिखराची चढाई करायची असल्याने सगळ्यांनाच त्या दृष्टीने तयार व्हायला सांगितलेले होते. मुंबईहून निघतांनाच आम्ही त्या तयारीने आलो होतो. इतके दिवस बॅगेत पडून राहिलेले खास कपडे बाहेर काढायची वेळ आता आली होती. पहायला गेलो तर यापूर्वीसुद्धा काश्मीर व सिक्कीमच्या सफरीमध्ये आम्ही तेथील बर्फाळ प्रदेशात गेलो होतो, त्यामुळे त्याचा थोडा संमिश्र प्रकारचा पूर्वानुभव होता. चहू बाजूला नजरेचे पांग फेडणारे पांढरे शुभ्र बर्फ, ताज्या हिमवर्षावानंतर जमा झालेल्या भुसभुशीत बर्फात खेळण्याचा एक आगळाच अनुभव वगैरे जमेच्या बाजू होत्या, तर पायापासून मस्तकापर्यंत अंगांगात होत असणा-या शारीरिक वेदना सहनशक्तीच्या सीमा शोधत होत्या. असे असले तरी कांही काळानंतर सोसलेल्या यातनांचा भार हलका होतो व सुखद स्मृती तेवढ्या शिल्लक राहतात. त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा हा अनुभव घेण्यास उत्सुक झालो होतो.

माणसाचे मन खरेच फार विचित्र असते. निसर्गातील ऊन, पाऊस, थंडी, वारा यापासून शरीराचा बचाव करण्यासाठी तो दगड विटांची घरे बांधतो, त्याच्या आंतल्या जमीनीवर गालिचा बिछवून आणि खिडक्यांना पडदे लावून अधिक संरक्षण मिळवतो, हिंवाळ्यात हीटर आणि उन्हाळ्यात कूलर लावून तपमानावर नियंत्रण ठेवतो. पण हे सगळे करीत असतांना त्याचे वेडे मन वेगळाच ध्यास घेऊन बसते. समुद्राच्या पाण्यात यथेच्छ डुंबून त्याच्या लाटा अंगावर घ्याव्यात, किना-यावरच्या वाळूत निवांत लोळावे, भन्नाट
सुटलेल्या वा-यात तरंगावे, मुसळधार पावसात चिंब भिजावे आणि बर्फाच्या गालिच्यावर नाचावे बागडावे असा कसला तरी ध्यास घेऊन तो आपल्या वातावरण सुनियंत्रित केलेल्या घराबाहेर पडतो आणि परिणामाची पर्वा न करता दूर कुठे तरी पुन्हा निसर्गाच्या सान्निध्यात जातो. मनाची लीला खरेच अगम्य आहे!

पूर्वीच्या अनुभवावरून शहाणपण शिकण्यासाठी आणि यावेळी अधिक काळजी घेण्यासाठी मी आमच्या ग्रुपमधल्याच डॉक्टरांना आरोग्य विषयक सल्ला विचारला. वयोमानानुसार संवयीची झालेली आपली नित्यनेमाची औषधे न विसरता नियमितपणे घेणे, वेळोवेळी भरपूर खाऊनपिऊन आपल्या कॅलरीज कमावीत राहणे व कुवतीच्या बाहेर श्रम न करणे ही त्रिसूत्री त्यांनी सांगितली. पुरेसे म्हणण्यापेक्षाही भरपूर कपडे आमच्याकडे होतेच. सकाळी निघतांना अंगात आधी थर्मलवेअर घालून त्यावर शर्टपँट चढवली. ल्यूसर्नच्या वातावरणात तेवढ्यानेच उकडायला लागले. त्यामुळे बंद गळ्याचा स्वेटर, ओव्हरकोट, हातमोजे, कानटोपी वगैरे गोष्टी पिशवीतच ठेवाव्या लागल्या. औषधाचा साठा, खाण्यापिण्याच्या वस्तू वगैरे बरोबर घेतल्या. शिवाय केसरीकडून सगळ्या लोकांना कापराच्या वड्या देण्यात आल्या. समुद्रसपाटीपासून उंच जातांना हवा विरळ होत जाते, त्यामुळे श्वसनाला त्रास झाला तर ही वडी नाकाला लावायची. त्यामधून प्राणवायूचा पुरवठा होतो म्हणे.

असा सगळा जामानिमा करून आम्ही ल्यूसर्नहून निघून एंजलबर्गपर्यंत बसने गेलो. तेथून पुढचा प्रवास केबलकारने करायचा होता. पर्वताच्या पायथ्यापासून वर जाणारा चढ मर्यादेच्या पलीकडे असल्यामुळे व त्यावर सतत भरपूर बर्फ पडत असल्याने इथे रस्ता बांधणे शक्यच नाही. त्यामुळे केबल कार आणि आणीबाणीच्या सहाय्यासाठी हेलिकॉप्टर एवढीच वाहतूकीची साधने इथे उपलब्ध आहेत. रोटेअर नांवाची स्वतःभोवती फिरत फिरत जाणारी आगळीच केबल कार या ठिकाणी ठेवली आहे. त्यामुळे रिव्हॉल्व्हिंग
रेस्टॉरेंटमध्ये बसल्याप्रमाणे एका जागेहून चारी बाजूचे दृष्य पहायला मिळते. मात्र इथे बसायची सोय नाही. जो आधार सांपडेल त्याला धरून उभेच रहावे लागते, कारण ती ब-याच वेगाने वर खाली जात असते तसेच गोल फिरत असते.

माथ्यावर पोचल्यावर एक प्रशस्त दालन आहे. तेथून बाहेर पडले की जिकडे तिकडे चोहीकडे बर्फच बर्फ. त्यातच थोडी सपाट जागा आणि थोडा उतार बनवला आहे. उतारावर हाताने धरून चालण्यासाठी दोरखंड बांधले आहेत। एका बाजूला कठडा बनवला आहे। तेथून दूरवरचे दृष्य पहायला मिळते। काश्मीर व सिक्कीममध्ये पाहिलेल्या बर्फाच्छादित जागा सपाट किंवा सखल होत्या। त्या ठिकाणी तेथील डोंगरांच्या माथ्यावर जाण्यासाठी शेरपा तेनजिंगप्रमाणे गिर्यारोहण करणेच आवश्यक होते. इथे मात्र कांही कष्ट न घेता यंत्रांच्या सहाय्याने आम्ही अलगदपणे थेट शिखरावर पोचलो होतो व सर्व दिशांना पसरलेल्या बर्फाने झांकलेल्या टेकड्यांच्या लहान मोठ्या रांगा पाहू शकत होतो. एका टोपलीवजा स्लेजमध्ये बसून थोडे घसरत जाण्याची सोयसुद्धा आहे.

आम्ही गेलो तेंव्हा वर वर थोडा ताजा भुसभुशीत बर्फही होता आणि त्याखाली कांही जागी घट्ट जमलेला कांचेसारखा सुळसुळीत बर्फाचा थर होता. हा अतिशय खतरनाक असतो, त्यावरून केंव्हा आणि कोणत्या ठिकाणी घसराल याचा नेम नसतो. आम्ही कांही गिर्यारोहणायाठी लागणारे तळाला खिळे असलेले खास प्रकारचे बूट आणले नव्हते. एवढे महाग बूट दोन दिवसासाठी कोण घेणार? इतर प्रवासांत त्याचे उगाचच ओझे होणार. आम्ही आपले साधेच किंवा स्पोर्टस शूज आणले होते आणि त्यामुळे सारखे पाय घसरत
होते. प्रत्येकाने कुठे तरी तोल सावरता न आल्याने एक तरी आपटी खाल्लीच. असे होणार याची कल्पना असल्यामुळे लगेच आपण होऊन खाली बसून पडण्याचा धक्का कमी करणे एवढेच शक्य होते. मी तर एका उतारावर पाय घसरल्यानंतर बर्फावर बसकण मारूनच घसरत खाली जाणे पसंत केले. पुन्हा पुन्हा कशाला पडायचे? अशा वेळी कपड्यांची पर्वा कोण करतोय्? पण अशा पडण्या उठण्यामध्ये सुद्धा एक मजा येते. पण जवळच्याच मोठ्या उतारावर स्कीइंग करणारा एक खेळाडू पडून जायबंदी झाला होता. हॅलिकॉप्टरमध्ये घालून त्याला हॉस्पिटलात न्यावे लागले. त्या हॅलिकॉप्टरने उतरतांना व पुन्हा उड्डाण करतांना जो झंझावात त्या ठिकाणी निर्माण झाला त्यावरून अशा बर्फाच्छादित पर्वतावर चढाई करतांना उठलेल्या वादळांची जी वर्णने नुसती वाचली होती ती कशी असत असतील याची चुणुक पहायला मिळाली. मर्यादित वेळेचे बंधन असल्यामुळे आम्हाला फारसे दमायलाही झाले नाही. पण बरीच हौस पुरी झाली.
. . . . . . . (क्रमशः)

No comments: