Saturday, May 16, 2009

ग्रँड युरोप - भाग २२ : स्विट्झर्लंडमधील इतर गंमती


दि.२२ ते २४-०४-२००७ : स्विट्झर्लंडमधील इतर गंमती


माझ्या लहानपणी घरातल्या बोलण्यात स्विट्झर्लंडचा उल्लेख कधी आलाच तर तो हमखास मनगटावरील घड्याळाच्या संदर्भात येत असे. घरातली व घरी येणारी जाणारी बहुतेक मोठी मंडळी कुठल्या तरी स्विस बनावटीचेच रिस्ट वॉच वापरीत असत. त्या काळात भारतात तर ती बनत नव्हतीच, पण इतर देशातूनसुद्धा कमीच येत असावीत. कॉलेजात जायला लागल्यावर मला पहिले घड्याळ मिळाले ते स्विस होते आणि लग्न झाल्यावर मी सर्वात आधी पत्नीला घड्याळ घेऊन दिले ते ही स्विसच होते. ही घड्याळे
स्प्रिंगवर चालणारी असत आणि रोज उठून त्याची चावी फिरवावी लागत असे. कधी त्याचा नॉब झिजून जाई तर कधी त्याच्या कांचेला धक्का लागून तडा जात असे. पण तेवढी दुरुस्ती केल्यावर ती व्यवस्थित वेळेनुसार चालत असत. त्या काळात कामानिमित्ताने थोड्या दिवसासाठी परदेशी जाऊन येणारे लोक जाण्यापूर्वी आपल्या मनगटावरचे स्विस घड्याळ घरी काढून ठेवीत आणि परत येतांना नवे कोरे घड्याळ हातात बांधून आणीत असत. यामुळे त्यावर आयातशुल्क भरावे लागत नसल्याने ते स्वस्तात पडे.

नंतरच्या काळात एचएमटी कंपनीने सिटीझन की जनता घड्याळे आणली ती देशभक्तीच्या लाटेवर बसून बाजारात उतरली. त्यामुळे अत्यंत साधी मोठी गोल तबकडी असलेली ही घड्याळे ज्याच्या त्याच्या मनगटावर दिसू लागली. कालांतराने त्यांची अधिक आकर्षक मॉडेल्सची तसेच स्वयंचलित घड्याळेसुद्धा मिळू लागली. माझी पहिली परदेशवारी झाली तोपर्यंत भारतात या सुधारणा होऊन गेलेल्या होत्या. त्याशिवाय कॅसियोच्या डिजिटल घड्याळांचा महापूर लोटला होता. लहान मुलांच्या खेळातल्या शोभेच्या
घड्याळांच्या किंमतीत मिळणारी ही चालणारी घड्याळे फोर्टमधल्या रस्त्यांच्या फुटपाथवर सर्रास विकली जात. त्यामुळे स्विस घड्याळांचे महात्म्य बरेच घटले होते. त्यानंतरच्या काळात तर टायटनसारख्या कंपन्यांनी अनेक सुंदर घड्याळे बाजारात आणून सगळे चित्र पालटवले. कधी हौसेने विकत घेतलेली तर कधी भेट मिळालेली घड्याळे घरात जमा होत गेली. वेळ दाखवण्याच्या साधनांमध्ये अलीकडे मोबाईल फोनची भरही पडली आहे.

या सगळ्या कारणांमुळे आणखीन एक घड्याळ विकत घेऊन त्यात भर घालण्याची मला तरी मुळीच इच्छा नव्हती. पण आमच्या ग्रुपमधल्या कांहीजणांना स्विट्झर्लंडमधून रिस्टवॉच न्यावे असे वाटत होते. आमचे फिरणे मुख्यतः डोंगरमाथ्यावर होत असल्याने त्यासाठी मुद्दाम वेळ काढून बाजाराकडे वाट वाकडी करायला हवी होती . तसेच माझ्यासकट सगळ्यांना स्विस चॉकलेट्स हवीच होती. म्हणून एका संध्याकाळी आमची गाडी ल्यूसर्नच्या मुख्य बाजाराकडे वळवली गेली. बुचरर या स्विस कंपनीची घड्याळे सध्या खूप प्रसिद्ध आहेत म्हणे. त्यांचे तिथले शोरूम तर जबरदस्त होते. त-हेत-हेची असंख्य घड्याळे तिथे उपलब्ध होती. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्या दिवशी त्यांनी एक स्कीम काढली होती. त्याप्रमाणे आमच्या मार्गदर्शकाने प्रत्येकाला एक कूपन दिले. या कूपनधारकांना त्याच्या बदल्यात एक स्टेनलेस स्टीलचा चमचा भेट दिला जात होता. त्यामुळे गरज असो वा नसो, सगळेच जण दुकानात शिरले. त्यातील कांही लोकांनी घड्याळे खरेदी केली. फुकटचे चमचे मात्र दुस-या मजल्यावरील कटलरीच्या विभागात ठेवलेले असल्याने जरा शोधावे लागले, पण बहुधा कोणी ते सोडले नसावेत. आपली खरेदी आटोपून आम्ही बसची वाट पहात थांबलो होतो तेंव्हा तर एक चिनी माणूस कूपन्सचा गठ्ठाच हातात धरून तिथे उभा होता आणि रस्त्याने येणारा जाणारा जो कोणी चिनी दिसेल त्याला बोलावून ती वाटत होता.

आपल्याकडील ऊष्ण हवामानात टिकण्याच्या दृष्टीने जराशी कडक चॉकलेटे बनवली जातात. त्यामुळे आपण ती चघळत खातो. स्विस चॉकलेटे मात्र जिभेवर ठेवताक्षणी विरघळू लागतात, त्यातली मजा 'कुछ और' असते. परदेशाहून परत येतांना तिकडची चॉकलेट आणायची आणि घरातल्या तसेच ओळखीतल्या बाळगोपाळांना ती वाटायची असा पायंडाच आमच्या घरी आता पडला आहे. या वेळेस तर आम्ही चॉकलेट्सच्या देशालाच जाणार असल्याने ती आणणे हे तीर्थक्षेत्राला गेल्यावर तिथला प्रसाद आणण्याइतके आवश्यक होते. स्विट्झर्लंडमध्ये फिरत असतांना जागोजागी रस्त्याच्या बाजूला खास राखीव कुरणात चरत असलेल्या गायी दिसत होत्या आणि चॉकलेटांची आठवण करून देत होत्या. त्यामुळे वडूजला पोचताच आमच्या खरेदीचा शुभारंभ झाला आणि ल्यूसर्नला बूचररच्या दुकानातून एक धांवता फेरफटका मारून झाल्यावर लगेच चॉकलेट्सच्या शोधार्थ बाहेर पडलो.

जवळच्याच एका दुकानातला खूप मोठा भाग चॉकलेटांनी भरला होता. आपला मिठाईवाला त्याच्याकडील पेढे बर्फी वगैरेचे नमूने चाखून पहायला देतो आणि त्यातून आपल्याला ज्याची चंव आवडेल ती मिठाई आपण खरेदी करतो, तशी पद्धत चॉकलेटच्या बाबतीत नाही. सगळी चॉकलेटे वेगवेगळ्या आकर्षक वेष्टनांमध्ये व्यवस्थित गुंडाळून ठेवलेली असतात. त्यावर लिहिलेल्या भाषेतील वजन आणि किंमत याहून अधिक कांही सुद्धा समजत नाही. त्यामुळे तेवढाच मजकूर वाचून आणि पुड्याच्या बाहेरचे चित्र पाहून अंदाजाने त्यातले कांही पुडे घेतले, इतर लोकांचे पाहून आणखीन कांही घेतले. आमच्या हातांतील चॉकलेटे पाहून एका सहप्रवाशाने विचारले, "कांहो, ही चॉकलेटे चंवीला फार चांगली असतात कां?" हा प्रश्न त्याने भाबडेपणाने विचारला होता कां खंवचटपणाने ते समजून घ्यायला मला वेळ नव्हता. मी शांतपणे उत्तर दिले,"खरं सांगू कां? ते मलाही माहीत नाही. आणि अगदी खरं सांगायचं झालं तर मला तरी कुठे ही चॉकलेटं स्वतः खायची आहेत?"

"वेष असावा बावळा, अंतरी असाव्या नाना कळा" हे लहानपणी ऐकलेले संतवचन जरा जास्तच गंभीरपणाने घेतल्याने मोठेपणी ऐकलेल्या "एक नूर आदमी दस नूर कपडा" या उर्दू भाषेतल्या सत्याविष्काराचा मनावर फारसा प्रभाव पडला नाही. कपड्यांच्या भपक्याला महत्व नसलेल्या संस्थेत नोकरी मिळाली. नव्याने नोकरीला लागल्यावर कांही मुले चार दिवस तिथे टाय वगैरे लावून येत, पण एकदा रुळल्यावर तो टाय जो बासनात जाऊन पडे, तो मेहुण्याच्या लग्नात बायकोने बांधायला लावलाच तर पुन्हा बाहेर निघत असे. माझी कपडे खरेदी ही मुख्यतः टिकाऊपणा, मळखाऊ रंग किंमत अशा निकषांवर होत असे. तीन चार आवडत्या रंगांपलीकडे कधी ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे श्रीनगर किंवा
दार्जिलिंगला गेल्यावर तिथला पोषाख घालून पहायची इच्छा मनात झाली नाही. मी आयुष्यात इतर अनेक उपद्व्याप केले असले तरी कधीही फॅन्सी ड्रेसच्या स्पर्धेत भाग घेतला नाही की कुठल्या पौराणिक किंवा ऐतिहासिक नाटकात भूमिका केली नाही. त्यामुळे माझ्या शरीराला चित्रविचित्र कपड्यांचा स्पर्श कधीच झाला नव्हता.

पण पहिल्या इनिंग्जमध्ये सरळ बॅटीने प्रत्येक चेंडू गोलंदाजाकडे साभार परत पाठवणारा एकादा फलंदाज दुस-या डांवात आडवी तिडवी बॅट फिरवून टोले मारू लागतो तसे कांहीसे माझ्या बाबतीत झाले आणि कधी जीन पँट आणि आडव्या पट्ट्यापट्ट्याचे टीशर्ट तर कधी लखनवी कुर्ता आणि चुडीदार पाजामा असले कपडे आता आयुष्याच्या दुस-या इनिंग्जमध्ये माझ्या अंगावर चढू लागले. युरोपच्या शिखरावर गेल्यावर तिकडच्या सनईवादकाचा पारंपरिक पोषाख घालून आपल्या त्या सोंगाचे छायाचित्रसुद्धा काढून घेतले. ते
पाहिल्यावर आमच्या एका मित्राला अमरीश पुरीची आठवण झाली. ते ऐकून मलाही 'हाः हाः हाः" करीत "मोगँबो खुष हुवा" म्हणावेसे वाटले!
. . . . . . (क्रमशः)

No comments: