Friday, September 19, 2008

चीन, चिनी आणि चायनीज - ४


चिनी लोक पूर्वीपासूनच कष्टाळू आणि उद्योगी समजले जात आहेत. चित्रविचित्र आकृत्यांनी सजवलेले चिनी मातीचे मोठाले रांजण आणि तबकड्या जगातल्या बहुतेक पुराणवस्तूसंग्रहालयात आढळतात. रेशीम हा तर तेथला प्रसिध्द उद्योग होता. रेशमाची निर्यात ज्या मार्गाने चीनबाहेर होत असे ते रस्ते 'सिल्क रूट' याच नांवाने ओळखले जात. कागद तयार करण्याची प्रक्रिया प्रथम चीनमध्ये विकसित झाली आणि नंतर जगभर पसरली. व्यास, वाल्मिकी किंवा सॉक्रेटिस, प्लूटो यांच्या बरोबरीने कॉन्फ्यूशिअस या चिनी तत्ववेत्त्याचे नांव आदराने घेतले जाते. ह्यूएनत्संग या इतिहासकालीन चिनी पर्यटकाने केलेल्या नोंदी प्रसिध्द आहेत. प्राचीन काळात चीन हा देश समृध्द मानला जात होता. मध्ययुगात तो थोडा वेगळा पडला होता आणि कम्युनिस्ट क्रांतीनंतर त्याने सोव्हिएट युनियन सोडून अन्य जगाशी फारसे संबंधच ठेवले नव्हते. त्यामुळे त्याने स्वतःभोवती घातलेल्या बांबूच्या पडद्याआड काय चालले आहे ते गुलदस्त्यात राहिले होते.
चिनी वंशाचे लोक पूर्वीपासूनच इतरत्र पसरले आहेत. पूर्व आशिया खंडातल्या सगळ्याच देशात ते मोठ्या संख्येने राहतात. सिंगापूरमध्ये ते बहुसंख्येने आहेत. चिनी वंशाच्या लोकांनी आपल्या पाककौशल्याचा जगभर प्रसार केला आणि सर्व प्रमुख शहरात चिनी जेवण मिळते हे मागील भागात पाहिलेच. त्यामुळे चिनी माणूस म्हंटला की तो खानसामा किंवा बावर्ची असेल असे कांही लोकांना वाटणे शक्य आहे. इतर कांही उद्योगातसुध्दा त्यांनी आपला जम बसवलेला आहे. कोलकात्याच्या बाजारात मिळणा-या वेताच्या आणि चामड्याच्या वस्तू बहुधा चायनाटाउनमधल्या असतात. कां ते कोणास ठाऊक, पण अनेक जागी चिनी दंतवैद्य असतात. इतर कांही दुखण्यांवरसुध्दा एकादे खास चिनी औषध अकशीर इलाज समजले जाते. त्यात वाघ, सिंह, गेंडा, हत्ती यासारख्या वन्य प्राण्यांचे रक्त, मांस, हाडे, चामडी वगैरेचा अंश असल्यामुळे ती प्रभावी ठरतात असा समज पसरवला गेला आहे. आजकाल कोणीही हौस म्हणून यातल्या कोणत्याही प्राण्याचे मुंडके आपल्या दिवाणखान्यात लावून ठेऊ शकत नाही तरीही या वन्य पशूंच्या देहाला चिनी औषधी बनवण्यासाठी मोठी किंमत मिळते या कारणामुळे जगभरातल्या अरण्यांत या बिचा-या वन्य प्राण्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली जात आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी चिनी लोकांच्या मार्शल आर्ट्समधील मारामारीतल्या चमत्कारावर आधारलेल्या इंग्रजी चित्रपटांची एक लाट आली होती. त्यानंतर जुडो, कराटे, कुंगफू, ताकिआंदो वगैरे चिनी, जपानी व कोरियन प्रकार बरेच प्रसिध्दीच्या प्रकाशझोतात आले होते.
आजच्या चीनमधल्या लोकांनी मात्र असल्या परंपरागत क्षेत्रावर विसंबून न राहता आधुनिक यंत्रयुगातली नवनवीव क्षेत्रे पादाक्रांत करण्याचा चंग बांधला आहे असे दिसते. इसवी सन एकोणीसशे पन्नासच्या सुमारास भारतातही फारशी यंत्रसामुग्री तयार होत नव्हती आणि चीनमध्येही होत नव्हती. इंग्लंड, अमेरिका, जर्मनी, स्विट्झरलंड यासारख्या प्रगत देशांतून आयात केलेल्या उत्कृष्ट दर्जाच्या यंत्रसामुग्रीवर भारताचे औद्योगीकरण सुरू झाले. चीनला सर्व यंत्रे कम्युनिस्ट देशांकडून जशी मिळतील तशी घ्यावी लागली. पुढे कांही भारतीय उद्योगसमूबांनी कांही यंत्रे परदेशी कंपन्यांच्या सहाय्याने इथेच बनवायला सुरुवात केली तर चीनने स्वतः त्यातले तंत्रज्ञान विकसित करण्यावर भर दिला आणि त्यात ते अधिकाधिक प्राविण्य संपादित करत गेले. लघुउद्योगाला प्रोत्साहन आणि मोठ्या कारखान्यांवर अंकुश ठेवण्याच्या आपल्या धोरणामुळे या क्षेत्रात होणा-या प्रगतीवर विपरीत परिणाम झाला. कालांतराने लुधियाना, बटाला, राजकोट यासारख्या गांवातल्या लहान कारखान्यांमध्ये प्राथमिक स्वरूपाची साधीसुधी यंत्रे मोठ्या प्रमाणावर बनून भारतात आणि मागासलेल्या देशात ती खपू लागली. मात्र मोठ्या कारखान्यांची व्हावी तेवढी वाढ झाली नाही. आता युरोप अमेरिकेत कष्ट करू इच्छिणारा मजूरवर्ग जवळजवळ नाहीसा झाल्यामुळे तिकडचा यंत्रोद्योग उतरंडीला लागला आहे. पण भारतीय उद्योग त्याची जागा घेऊ शकला नाही. ते काम चीनने यशस्वी रीत्या केले आहे. त्यामुळे पहिल्या पिढीतली जी परदेशी यंत्रे जुनी झाली त्यांच्या जागी कांही काळ भारतीय बनावटीची यंत्रे येत होती, पण आता अधिकाधिक जागी चिनी बनावटीची नवी यंत्रे दिसू लागली आहेत. अशा प्रकारची यंत्रे इथेसुध्दा तयार होऊ शकतात, पण चिनी यंत्रे जास्त आधुनिक असूनही स्वस्तात मिळतात. त्यामुळे ती घेतली जातात.
मुक्त अर्थव्यवस्था आणि जागतीकीकरणाचा जास्तीत जास्त लाभ पूर्व आशियातील देशांनी करून घेतला आहे. या नव्या धोरणाचे वारे वहायला लागताच सोनी, नॅशनल पॅनासॉनिक, होंडा, सुझुकी आदि जपानी कंपन्या आणि एलजी, सॅमसुंग, ह्युएंदाई सारख्या कोरियन कंपन्यांनी मोटारी, टीव्ही, रेफ्रिजरेटर वगैरेचे वाढते मार्केट काबीज केले. यासारखी कोणतीही मोठी चिनी कंपनी दिसत नाही पण या जपानी व कोरियन यंत्रांचे अनेक भाग चीनमध्ये बनतात असे समजते. सामान्य माणसाच्या रोजच्या जीवनात लागणा-या अगणित वस्तू तर अमाप संख्येने चीनमध्ये तयार होतात आणि भारतातल्या शहरातल्याच नव्हे तर खेड्यापाड्यातल्या बाजारातसुध्दा त्यांचा महापूर येऊ लागला आहे. दिवे मिचकावणारी आणि वेगवेगळे आवाज काढणारी अतिशय आकर्षक अशी स्वयंचलित चिनी खेळणी अगदी स्वस्तात मिळतात. डासांना मारण्याची चिनी रॅकेट घराघरात पोचली आहे. महागातले टॉर्च आणि बॅटरी सेल्स यासारख्या वस्तूंच्या चिनी डुप्लिकेट अर्ध्यापेक्षा कसी भावात मिळतात. कुठलेच ब्रँडनेम नसलेल्या या वस्तू इतक्या मोठ्या प्रमाणात कशा इकडे येतात, खेड्यात भरणा-या आठवड्याच्या बाजारापर्यंत त्यांचे वितरण कोण करतो आणि या साखळीतल्या सर्वांचे कमिशन कापल्यावर मूळ चिनी उत्पादकाला त्यातून किती किंमत मिळते आणि ती त्याला कशी परवडते या सगळ्याच गोष्टींचे मला गूढ वाटते. एका बाजूने ग्राहकाला त्याचा फायदा होत असला तरी त्या वस्तूंचे उत्पादन करणारा भारतीय उद्योग संकटात सापडला आहे. सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात भारतीय तंत्रज्ञांनी बरीच आघाडी मारल्याचे आज दिसत असले तरी चीन हा या क्षेत्रातला जबरदस्त प्रतिस्पर्धी होऊ पहात आहे. लार्सन अँड टूब्रो, विप्रो, इन्फोसिस यासारख्या भारतीय कंपन्यांनी आता चीनमध्ये शाखा उघडल्या आहेत आणि आपले कांही काम ते आता तिकडे वळवीत आहेत.
उद्योगाच्या क्षेत्रातच नव्हे तर शिक्षणाच्या क्षेत्रातसुध्दा चीनने हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. भारतातल्या मेडिकल कॉलेजमधल्या अव्वाच्या सव्वा झालेल्या कॅपिटेशन फी पेक्षा चीनमध्ये कमी खर्च येतो या कारणाने कांही भारतीय विद्यार्थी आता चीनमध्ये शिक्षणासाठी जाऊ लागले आहेत असे ऐकले. भाषेचा आणि जेवणाचा प्रॉब्लेम असूनसुध्दा चीनमध्ये शिक्षण घेणे ते पसंत करतात. व्यापारी वर्गाला अजून चीनबद्दल पूर्ण विश्वास वाटत नाही, पण तरीही जगभरातील मोठ्या कंपन्यांनी आपली जाळी चीनमध्ये पसरवायला सुरुवात तर केली आहे. रस्तेबांधणी, नगररचना आदि बाबतीत चीनने आश्चर्यजनक प्रगती केली आहे. आता तिथली प्रमुख शहरे युरोपमधील शहरासारखी दिसू लागली आहेत. त्यामुळेच आता मुंबईचे शांघाय करण्याच्या गोष्टी बोलल्या जात आहेत.
क्रीडाक्षेत्रात चीनने केलेल्या प्रगतीने सर्व जग अचंभित झाले आहे. अगदी शून्यापासून सुरुवात करून आज चीन हा देश पहिल्या क्रमांकावर जाऊन पोचला आहे. बीजिंग येथे सध्या चाललेल्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धेत एकाग्रता, चापल्य किंवा शरीरसौष्ठव लागणा-या एकूण एक क्रीडाप्रकारात स्त्रिया किंवा पुरुष, वैयक्तिक किंवा सांघिक अशा सर्व गटात चीनचे स्पर्धक एकामागोमाग एक विजय मिळवत आहेत असे रोजच्या रोज पहायला मिळते. हे यश खेळाडूंवर जोर जबरदस्ती करून किंवा बंदुकीच्या धांकाने मिळत नसते. त्यासाठी काय करायला हवे त्याचा सखोल विचार करून त्याला पोषक असे वातावरण तयार करावे लागते, खेळाडूंना अधिकाधिक यश मिळवण्यासाठी प्रवृत्त करावे लागते, तसेच त्यासाठी लागणारी उत्कृष्ट दर्जाची साधनसामुग्री द्यावी लागते. आजच्या युगात खेळातील कौशल्यातदेखील तंत्रज्ञानाचा मोठा उपयोग होतो. चीनने केलेल्या सर्वांगीण प्रगतीमुळे सर्व प्रकारची आधुनिक उपकरणे वापरून खेळाचा दर्जा वाढवण्यात चीनने एवढे यश मिळवले आहे.
ऑलिंपिक क्रीडास्पर्धांचा उद्घाटन समारंभ टीव्हीवर पाहतांनाच डोळ्याचे पारणे फेडणारा वाटत होता, प्रत्यक्षात तो केवढा भव्य वाटला असेल याची कल्पना करवत नाही. हजारोंच्या संख्येने त्यात भाग घेणारी लहान मुले आणि नवयुवक यांनी सादर केलेले कार्यक्रम फारच सुनियोजित होते. त्यातली कल्पकता, कौशल्य तसेच शिस्तबध्दता वाखाणण्याजोगी होती. दिव्यांची रोषणाई आणि आतिशबाजी अप्रतिम अशी होती. अवाढव्य आकाराचे कागद जमीनीवर अंथरून सर्व खेळाडूंच्या पायाचे ठसे त्यावर घेण्याची कल्पना अफलातून होती. हा एवढा मोठा कार्यक्रम सुव्यवस्थितपणे बसवून कुठेही कसलेही गालबोट न लागता सादर करण्यामागे प्रचंड नियोजन केले गेले असेल आणि व्यवस्थापन कौशल्याचा कस त्यात लागला असेल यात शंका नाही. यापूर्वी कधीही झाला नव्हता एवढा भव्य सोहळा घडवून आणून चीनच्या लोकांनी "हम भी किसीसे कम नही" असेच जगाला दाखवून दिले आहे.
. . . . .. .. . . . . . . . (समाप्त)

No comments: