Monday, September 22, 2008

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा - ४


आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथांच्या मालिकेतला हा लेख माझ्या संगणकात बिघाड झाल्याकारणामुळे देता आला नव्हता. त्यानंतर गणरायाचे आगमन झाले. आता पुन्हा हा विषय घेऊन ही मालिका पूर्ण करायची आहे.


दोन महायुध्दांच्या दरम्यान जगभरातले राजकीय वातावरण अस्थिरच राहिले. रशियात राज्यक्रांती होऊन कम्युनिस्टांनी सत्ता हातात घेतली. रशिया या मूळच्या देशासह त्याच्या झार सम्राटांनी वेळोवेळी जिंकून घेतलेला मध्य आणि उत्तर आशिया व पूर्व युरोप खंडामधला अतीविस्तृत भूभाग सोव्हिएट युनियन या नांवाने ओळखला जाऊ लागला. जगातील सर्व कामगारांना एकत्र आणण्याची घोषणा देऊन कम्युनिस्टांनी पश्चिमेकडे विस्तार करायला सुरुवात केली. पहिल्या महायुध्दातल्या पराभवाने आणि त्यानंतर झालेल्या तहामधल्या जाचक अटींनी दुखावलेला जर्मनी हिटलरच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभा राहिला आणि सैनिक सामर्थ्य वाढवून शेजारच्या लहान सहान राष्ट्रावर दमदाटी करू लागला. इटलीमध्ये मुसोलिनीचा उदय झाला आणि तो देशही दंड थोपटू लागला. घरात चाललेला समाजवादाचा लढा आणि जगभर पसरलेल्या साम्राज्यातल्या देशांचे स्वातंत्र्यलढे या दोन आघाड्या सांभाळतांना इंग्लंड, फ्रान्स आदि परंपरागत मुख्य राष्ट्रांमधली लोकशाही सरकारे मेटाकुटीला आली. यापासून दूर असलेल्या अमेरिकेने (य़ू.एस.ए.ने) औद्योगिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करीत आर्थिक महासत्ता बनण्यात यश मिळवले. पूर्वेला जपाननेही औद्योगिक, आर्थिक व सैनिकी या सर्वच आघाड्यांवर अभूतपूर्व अशी प्रगती करून आपला जम चांगला बसवला.चीनमधली राजेशाही नष्ट झाली पण तिथे लोकशाही रुजली नाही यामुळे अस्थिरता होती. अशा प्रकारे जगभर अशांत आणि संशयाचे वातावरण होते.


तशाही परिस्थितीत क्रीडाप्रेमी लोक विश्वबंधुत्वाचा नारा देऊन ऑलिंपिक खेळांचे आयोजन करीत राहिले. तोपर्यंत या खेळांना जागतिक महत्व प्राप्त झाले असल्यामुळे हे खेळ आपल्या देशात भरवणे हादेखील एक राजकीय पटावरला पराक्रम समजला जाऊ लागला होता. त्यामुळे ते खेळ भरत राहिले, पण राजकीय परिस्थितीची सांवलीही त्याच्या आयोजनावर पडतच राहिली.


१९२०, १९२४, १९२८, १९३२ आणि १९३६ साली अनुक्रमे बेल्जियम, फ्रान्स, नेदर्लँड, युनायटेड स्टेट्स आणि जर्मनीमध्ये हे खेळ झाले. त्यात तीस चाळीस देशांमधल्या दोन तीन हजारांच्या संख्येने खेळाडूंनी भाग घेतला. ही संख्या कमी जास्त होत राहिली. सर्व जागी शंभरावर स्पर्धा झाल्या. युनायटेड स्टेट्स फार दूर असल्यामुळे यापूर्वी सेंट लुईला झालेल्या ऑलिंपिक स्पर्धांची पुनरावृत्ती होऊन फक्त तेराशेहे खेळाडूच येऊ शकले. यापूर्वीच्या तीन्ही जागी य़ू.एस.ए ने पदकांच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावला होताच, स्वगृही झालेल्या स्पर्धातली बहुसंख्य बक्षिसे तिथल्या खेळाडूंनी मिळवली. त्यानंतर बर्लिन इथे झालेल्या स्पर्धात सर्वात जास्त खेळाडू आले तरी त्यांची संख्या चार हजारापर्यंत पोचली नाही. इथे मात्र जर्मनीच्या खेळाडूंनी य़ू.एस.ए वर मात करूत पहिला क्रमांक पटकावला. हिटलरच्या हडेलहप्पीचा परिणान खेळाडूंच्या आणि पंचांच्या कामगिरीवर पडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


त्यानंतर दुसरे महायुध्द सुरू झाले व त्यामुळे १९४० आणि १९४४ साली ऑलिंपिक स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. पण ऑलिंपिकचे असे वैशिष्ट्य आहे की या न होऊ शकलेल्या स्पर्धांचीसुध्दा क्रमांकानुसार नोंद ठेवली जाते. त्यामुळे १९१६ साली बर्लिन येथे न झालेली ६ वी तसेच १९४० व १९४४ साली न झालेल्या स्पर्धा १२ व १३ व्या धरल्या जातात. बर्लिन येथे झालेल्या ११ व्या ऑलिंपियाडनंतर १९४८ साली लंडन येथे एकदम १४ वे ऑलिंपियाड भरले.
. . .. . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: