ग्रीसमधील ऑलिंपिया इथे हजार बाराशेहे वर्षे नेमाने चाललेले खेळ इसवी सनाच्या चौथ्या शतकात बंद पडले. पण त्याच्या आठवणींचे संदर्भ जुन्या ग्रीक वाङ्मयातून येत राहिल्याने शिल्लक राहिले. एकोणीसाव्या शतकात थोडे स्थैर्य आल्यानंतर पुन्हा एकदा अशा प्रकारच्या क्रीडामहोत्सवाचे आयोजन करावे असे विचार सुजाण लोकांच्या मनात येऊ लागले. अर्थातच ग्रीकमध्ये हा विचार पुढे आलाच, तसा इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी आदी इतर अनेक युरोपियन राष्ट्रात तसा विचार होऊ लागला. यातल्या कांही देशात स्थानिक पातळीवर खेळांच्या स्पर्धा सुरूदेखील झाल्या.
फ्रान्समधील पीय़रे ला कोबर्टिन या गृहस्थाने पुढाकार घेऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळांचे आयोजन केले पाहिजे असा नवा विचार मांडला. प्राचीन ग्रीसमध्येसुध्दा नगरांनगरांमध्ये लढाया चाललेल्या असत पण ऑलिंपिकचे खेळ करण्यासाठी युध्दविराम करून सर्वत्र शांतता होत असे असा इतिहास आहे. त्यावरून बोध घेऊन सर्व जगात बंधुभाव व शांतता प्रस्थापित करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेऊन हे खेळ खेळले जावेत असे प्रतिपादन केले. त्याला त्याच्या देशात म्हणजे फ्रान्समध्ये फारसा पाठिंबा मिळाला नाही. पण त्याने धीर न सोडता इंग्लंड, अमेरिका वगैरे देशातील जनतेला आवाहन करून त्याचा सातत्याने पाठपुरावा केला. त्याला फळ आले आणि सन १८९४ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समिती नांवाची संस्था स्थापन झाली.
पॅरिसमध्ये सन १९०० मध्ये पहिली स्पर्धा सुरू करावी असा विचार आधी होता. पण उत्साही कार्यकर्त्यांनी विशेषतः कोबर्टिन याने सन १८९६ मध्येच सुरुवात करावी आणि या खेळांची जननी असलेल्या ग्रीसमध्येच ती करावी असा आग्रह धरला. त्या वेळेस ही जबाबदारी घेण्यास ग्रीसचा राजाच तयार नव्हता. कोणाही यजमानाला पाहुण्यांचा सोय करावी लागणारच. यावर होणारा अवाढव्य खर्च कसा परवडणार याची त्याला चिंता होती. एका धनाढ्याने यासाठी स्वखर्चाने अथेन्स इथे भव्य स्टेडियम बांधून देण्याची घोषणा केली, इतर उदार हात पुढे आले आणि ठरल्याप्रमाणे १९९६ साली आधुनिक ऑलिंपिक क्रीडामहोत्सवाचा शुभारंभ झाला. खुद्द ग्रीसच्या सम्राटाच्या हस्तेच दि.५ एप्रिल १८९६ रोजी पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धेचे उद्घाटन झाले.
प्राचीन काळातील ग्रीक ऑलिंपिक खेळात धांवणे, भालाफेक यासारख्या मैदानी क्रीडांचा समावेश होता तसेच मुष्टीयुध्द, कुस्ती वगैरे मर्दानी वैयक्तिक खेळ खेळले जात. नव्या ऑलिंपिकची सुरुवातही तिथूनच झाली आणि तीही फक्त पुरुषांपासून. पण वीसाव्या शतकातल्या महिला मागे कशा राहतील? सन १०१२ ला स्वीडन देशात झालेल्या स्पर्धात महिलांच्या स्पर्धांना समाविष्ट करण्यात आले. टेबल टेनिस, बॅडमिंटन यासारखे नव्या युगातले खेळ आले, फुटबॉल, हॉकीसारखे सांघिक खेळ सुरू झाले, पोहणे आणि सूर मारणे यांमधील कौशल्याला सामील करून घेतले गेले. अशा प्रकारे ऑलिंपिक खेळांचा पसारा वाढतच गेला.
दुस-या महायुध्दापूर्वी ऑलिंपिक खेळ फक्त युरोप किंवा अमेरिकेत होत असत. त्यानंतर ऑस्ट्रेलियात झाले तसेच जपान, कोरिया आणि आता चीन या अतिपूर्व आशियाई देशांनीसुध्दा या स्पर्धा भरवल्या आहेत. चीनमध्ये यासाठी अतिभव्य असे पक्ष्याच्या घरट्याच्या आकाराचे अद्ययावत नवे स्टेडियम उभारले आहे. या वर्षीचे खेळ आतापर्यंत झालेल्या सर्व ऑलिंपिक स्पर्धांपेक्षा अधिक सुव्यवस्थितपणे झाले अशी प्रशंसा सर्वांकडून चीनने मिळवली आहे.
2 comments:
Atishay upukt mahiti ahe, tyasathi dhanyavad, pan yat years chi tafavat ahe ki typing mistake ahe te jara bhaghav .
नेमका कोणता अंक चुकला आहे ते समजल्यास तपासासाठी बरे पडेल.
Post a Comment