Sunday, September 28, 2008

देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने -३


राधाबाई बनारसे (१९१०-१९८३) -

लंडनच्या आजी या नांवाने लोकप्रिय व्यक्ती . यांची जीवनकथा ही एक अलीकडच्या काळातील एक अद्भुत गोष्ट आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एका आडगांवी जन्मलेल्या या अशिक्षित बाई स्वतःच्या कर्तृत्वाने कोट्याधीश बनल्या आणि ते सुध्दा भारतात नव्हे तर चक्क इंग्रजांच्या देशांत, युनायटेड किंग्डममध्ये.
श्री.तुळशीराम देहेणकर यांचेबरोबर बालवयातच त्यांचे पहिले लग्न झाले व त्यांच्यापासून त्यांना पांच कन्यारत्ने झाल्या पण पुत्ररत्न कांही झाले नाही. पहिल्या नव-याच्या निधनानंतर वयाच्या पस्तीस वर्षाच्या असतांना त्यांना लंडनहून परतलेल्या त्यांच्याहून वीस वर्षांनी मोठ्या सीतारामपंत बनारसे यांच्याबरोबर दुसरे लग्न लावणे भाग पडले. मुलींच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी हे पाऊल उचलले खरे, पण हा दुसरा नवरा मुलींना मायदेशीच सोडून देऊन फक्त एकट्या राधाबाईंनाच आपल्याबरोबर लंडनला घेऊन गेला. बनारसे कुटुंबाचा तेथे प्रवासीनिवास व खाणावळीचा किफायतशीर व्यवसाय होता. त्यात काबाडकष्ट करणा-या एखाद्या मोलकरणीची भूमिकाच त्यांच्या वाट्याला आली. या काळांत त्यांनी त्या व्यवसायाचे सारे बारकावे शिकून घेतले व आपल्या प्रेमळ वागणुकीने तिथेच त्यांना आजी हे नांव पडले. त्यातच वृध्द पतीचे निधन झाल्यानंतर तर त्यांच्या सावत्र मुलांनी त्यांना भारतात परत पाठवून द्यायचीच व्यवस्था केली. परंतु त्या प्रस्तावाला ठामपणे नकार देऊन त्या आपले किडूकमिडूक घेऊन घराबाहेर पडल्या व जिथली बोलीभाषासुध्दा धड बोलता येत नव्हती अशा परदेशांत जवळ कसलेही भांडवल नसतांना त्यांनी स्वतःच्या पायावर उभे रहायची धडपड सुरू केली. सर्वप्रथम १९५३ साली त्यांनी एका इस्टेट एजंटकडून एक घर उधारीवर भाड्याने घेतले. तोपर्यंत तिच्या दोन मुलींना लंडनला आणण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. त्यांना घेऊन त्या २५, हूप लेन इथे राहू लागल्या व त्यांनी खाणावळ सुरू केली. लवकरच त्यांच्या हातच्या चवदार अन्नाची ख्याती पसरली व त्याच्या अपार काबाडकष्टांना नशीबाने साथ दिल्याने त्यांच्या ग्राहकांची गर्दी वाढतच गेली. पुढील तीन वर्षात त्यांनी लंडनच्या वुडस्टॉक रोड आणि डॉलिस रोड या ठिकाणी दोन घरे विकत घेतली. आणखी कांही वर्षात त्याच्याकडे १२ इमारती व मोटारगाड्यांचा ताफा इतकी संपत्ती जमा झाली आणि लंडनमधील सुपरटॅक्स भरणा-या कोट्याधीशांमध्ये त्यांची गणना होऊ लागली. लंडनला गेलेल्या अनेक नामवंत भारतीयांनी त्यांची आवर्जून भेट घेतली व त्यांच्या कामाची वाहवा केली आहे. आजच्या संगणकयुगांत अनेक आप्रवासी भारतीय स्त्रीपुरुष परदेशात मोठमोठी सन्माननीय पदे भूषवीत आहेत. तरीसुध्दा पन्नास वर्षापूर्वी एका अशिक्षित खेडवळ मराठमोळा महिलेने परदेशात जाऊन केलेला हा पराक्रम थक्क करणारा आहे.


इंदिरा गांधी (१९१७ - १९८४)

भारताच्या या पहिल्या पंतप्रधानांचे जीवन बरेच वादग्रस्त ठरले होते. त्यातील निर्विवादपणे उल्लेखनीय अशा मोजक्या चांगल्या गोष्टी इथे देत आहे. "श्रीमती गांधी या भारताच्या राष्ट्रीय हितसंबंधासाठी एकाग्र दृष्टीने व कुशलतेने अविरत झटणारे एक सशक्त व्यक्तिमत्व होऊन गेल्या" असे त्यांचे वर्णन अमेरिकेचे तत्कालिन सुरक्षाविषयक सल्लागार हेन्री किसिंजर यांनी केले आहे. लोकसभेत मोरारजी देसाई यांचा ३५५ विरुध्द १६९ असा दणदणीत पराभव करून त्या भारताच्या पहिल्या पंतप्रधानपदी विराजमान झाल्या. त्यांनी भारताच्या राष्ट्रीय अणुशक्ती संशोधन कार्यक्रमाला चालना देऊन त्याचा वेग वाढवला आणि १९७४ साली राजस्थानाच्या निर्जन वाळवंटातील पोखरण या ठिकाणी स्मितहास्य करणारा बुध्द या सांकेतिक नांवाने पहिला भूगर्भीय नाभिकीय प्रयोग यशस्वी रीत्या घडवून आणला. त्यांच्या ताठर भूमिकेपुढे नमून पाकिस्तानचे पंतप्रधान झुल्फिकार अली भुट्टो यांनी भारताच्या अटीवर द्विपक्षी तहावर सह्या केल्या. त्या करतांना शेवटची कांही कलमे त्यांना स्वहस्ताक्षरामध्ये लिहावी लागली असे म्हणतात. सन १९६० मध्ये त्यांनी कांही नाविण्यपूर्ण कृषीविषयक कार्यक्रम सुरू करून त्यांना भरभक्कम शासकीय पाठबळ दिले व त्या योगे भारतातील दीर्घकालीन जुने अन्नाचे दुर्भिक्ष्य संपून तो स्वयंपूर्ण बनला इतकेच नव्हे तर गहू, तांदूळ, कापूस आणि दूध आदिमध्ये इथे गरजेपेक्षा अधिक उत्पादन होऊ लागले, अन्नधान्याची निर्यात सुरू झाली व व्यावसायिक पिके निघू लागली. हा बदल हरित क्रांती या नांवाने सुप्रसिध्द आहे. २६ जून १९७५ रोजी त्यांनी कुप्रसिध्द राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली व दोन अडीच वर्षांनी लोकाग्रहाच्या दडपणाखाली ती उठवली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत दारुण पराभव होऊनसुध्दा पुढील निवडणुकीत विजय मिळवून त्या पुन्हा एकदा देशाच्या पंतप्रधान झाल्या. पण दुर्दैवाने ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांच्या सरकारी निवासस्थानी त्यांच्याच सुरक्षादलातील शिपायाच्या गोळीला बळी पडून त्याची प्राणज्योत मालवली.


शकुंतला देवी (जन्म १९३९)

अत्यंत गुंतागुंतीची किचकट गणिते कुठल्याही यांत्रिक उपकरणाचे सहाय्य न घेता मनातल्या मनात हिशोब करून सोडवण्याच्या त्यांच्या अद्वितीय कौशल्यामुळे शकुंतला देवी मानवी संगणक समजल्या जातात. त्यांच्या या अद्भुत सामर्थ्याची गिनेस बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये नोंद केली गेली आहे. १९७७ साली त्यांनी एका २०१ अंकी संख्येचे २३वे मूळ मनातल्या मनात आकडेमोड करून काढून दाखवले. १८ जून १९८० रोजी त्यांनी लंडन येथील इंपीरियल कॉलेजच्या कॉम्प्यूटर डिपार्टमेंटने काढलेल्या ७,६८६,३६९,७७४,८७० व २,४६५,०९९,७४५,७७९ अशा दोन प्रत्येकी १३ आंकड्यांच्या रँडम नंबर्सचा गुणाकार करून १८,९४७,६६८,१७७,९९५,४२६,४६२,७७३,७३० असे अगदी बरोबर उत्तर फक्त २८ सेकंदात दिले. या पराक्रमाचा उल्लेख १९९५ सालच्या गिनेस बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये केला आहे. एक सुजाण गणिततज्ञ म्हणून त्या प्रसिध्द आहेतच, आपल्या या अद्भुत टॅलेंटचा सदुपयोग त्या अवघड गणिते सोडण्याव्यतिरिक्त ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातही करतात.

No comments: