Friday, September 26, 2008

गानहिरा


हिराबाई बडोदेकर हे सुप्रसिद्ध नांव माझ्या अगदी लहानपणापासून कधीकधी कानावर पडत होते, वाचनात
होते, पण शास्त्रीय संगीताची साधी तोंडओळखसुद्धा झालेली नसल्यामुळे त्या एक श्रेष्ठ गायिका होत्या यापलीकडे मला हिराबाईंची कांहीच माहिती नव्हती. त्यांच्या जन्मशताब्दीचा सांगतासमारोह म्हणता येईल असा एक सुरेख व सुरेल कार्यक्रम पहायला व ऐकायला मिळाला होता त्यात मला ठाऊक नसलेली थोडी माहिती मिळाली. त्याच्या आधारावर त्यानंतर आलेल्या २९ मे रोजी त्यांच्या जन्मदिनानिमित्य चार ओळी लिहाव्यात असे वाटल्याने लिहिलेला लेख पडून राहिला होता. तो आज सादर करीत आहे.


किराणा घराण्याचे अध्वर्यू पै.उस्ताद अब्दुल करीमखान यांच्या त्या कन्यका. त्यांचे घरातले नांव चंपूताई असे होते पण सार्वजनिक जीवनात त्या हिराबाई बडोदेकर या नांवाने वावरल्या. संगीतज्ञ व गायक पं.सुरेशबाबू माने हे त्यांचे ज्येष्ठ बंधू व प्रख्यात गायिका सरस्वती राणे या त्यांच्या कनिष्ठ भगिनी होत्या. त्यांच्या मातोश्री ताराबाई या अब्दुल करीमखाँ यांच्यापासून फारकत झाल्यानंतर आपल्या मुलांसह पुण्याला स्थाईक झाल्या. उस्ताद अब्दुल करीमखान यांनी स्वतः हिराबाईंना कधीच संगीताची तालीम दिली नाही. पण त्यांचे गायन व इतर विद्यार्थ्यांना शिकवणे ऐकून हिराबाईंनी एकलव्याच्या निष्ठेने त्यातील बरेच काही ग्रहण केले. आपल्या शास्त्रीय संगीताच्या रीतसर शिक्षणाची सुरुवात त्यांनी वडील बंधू सुरेशबाबू यांच्याकडून केली आणि त्यानंतर लवकरच उस्ताद अब्दुल वहीदखान यांच्याकडे त्या शिकायला लागल्या. मधुर आवाज, कुशाग्र बुद्धीमत्ता व अद्वितीय ग्रहणशक्ती यांचे वरदान लाभलेल्या हिराबाई लहान वयातच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात पारंगत झाल्या. त्यांच्या मातोश्री ताराबाई यांनी त्यांना जीवनामध्ये पुढे आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्या काळात कुलीन स्त्रिया सार्वजनिक जागी गायन करीत नसत. जात्यावरल्या ओव्या, देवाची भजने, हदगा किंवा मंगळागौर यासारख्या उत्सवात म्हणायची स्त्रीगीते एवढीच त्यांच्या गायनाची मर्यादा होती. दहा लोकांसमोर गाणारी बाई म्हणजे नायकीण असेच समीकरण रूढ होते. त्या नायकिणी उभे राहूनच हावभाव करीत गायच्या व प्रेक्षकांचेही त्यांच्या गायनापेक्षा अदाकारीकडेच अधिक लक्ष असायचे. अशा काळात हिराबाईनी सर्रास संगीत मैफलींमध्ये जाऊन व बसून गायला सुरुवात केली, एवढेच नव्हे तर तिकीट लावून स्वतःच्या गायनाचे प्रयोग केले व शुद्ध शास्त्रीय संगीत ऐकवून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या गाण्याच्या ध्वनिमुद्रिका निघाल्या व त्या अफाट लोकप्रिय झाल्या. त्या काळात मराठी संगीत नाटकात स्त्रियांच्या भूमिका पुरुष नट करीत होते व बालगंधर्व यशाच्या शिखरावर होते. स्वतःची नाट्यसंस्था सुरू करून त्यांच्यासमोर प्रतिस्पर्धी म्हणून हिराबाई रंगमंचावर उभ्या
राहिल्या आणि त्यांनी या क्षेत्रातही आपली जागा निर्माण केली. प्रख्यात लेखक ना.सी.फडके व मामा
वरेरकरांनी त्यांची मध्यवर्ती भूमिका असलेली नाटके खास त्यांच्यासाठी लिहिली. ललित व संत मीराबाई
यासारख्या कांही चित्रपटांतसुद्धा हिराबाईंनी भूमिका केल्या तसेच कांही मधुर भावगीते मराठी रसिकांना दिली. या सगळ्या खटाटोपामागे त्यांच्या मातोश्री ताराबाईंचा व वडील बंधूंचा सक्रिय पाठिंबा हिराबाईंना मिळाला व त्याला स्वतःच्या प्रयत्नांची जोड देऊन त्यांनी संगीत, नाट्य, चित्रपट या कलाक्षेत्राचे दरवाजे घरंदाज मुलींसाठी खुले करून दिले. त्यांच्या कलेला व कर्तृत्वाला भरपूर वाव मिळेल असे नवे मार्ग तयार त्यांना करून दिले. हे यश गांठण्यापूर्वी त्यांना किती वेळा उपहास, विरोध, मानहानी वगैरेचा सामना करावा लागला असेल व खंबीरपणे त्याला तोंड देऊन त्या ठामपणे उभ्या राहिल्या असतील याची आज कल्पना करता येणार नाही.


हे सगळे ऐकतांनाच किती अद्भुत वाटते ना? हिराबाईंच्या शतकमहोत्सवाच्या निमित्याने त्यांचेवर एक विस्तृत चित्रफीत बनवली आहे. त्यातील निवडक भागांचे दर्शन व त्यासोबत आजच्या कांही गायकांचे गायन अशा स्वरूपाचा 'गानहिरा' हा कार्यक्रम पुण्याच्या स्वरानंद प्रतिष्ठान या संस्थेने सादर केला. यात हिराबाईंच्या जीवनातील महत्वाच्या घटनांची माहिती होती. अनेक प्रसंगी थोरा मोठ्या लोकांसोबत काढलेली त्यांची दुर्मिळ छायाचित्रे होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान, खुद्द राष्ट्रपती अशा मंडळींचा त्यात समावेष होता. तसेच कांही दिग्गज व्यक्तींच्या मुलाखती होत्या. त्यात पु.ल.देशपांडे, भीमसेन जोशी, सुधीर फडके, वसंतराव देशपांडे, माणिक वर्मा, प्रभा अत्रे, ज्योत्स्ना भोळे वगैरे प्रभृतींनी हीराबाईंच्या गायनकलेबद्दल तसेच शालीन वागणुकीबद्दल भरभरून सांगितले होते. खुद्द बालगंधर्वांनी हिराबाईंच्या नाट्यगीतांचे कौतुक केले होते. पद्मभूषण हा सन्मान त्यांना लाभला होता तो स्वीकारीत असतांनाचा क्षण होता. हिराबाईंच्या शास्त्रीय गायनाची थोडी झलक दाखवणारे व त्यांच्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे नमूने त्यात समाविष्ट केलेले होतेच.


मधुर आवाज, उत्तम तयारी आणि प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा यांचा संयोग करून त्या आपले गाणे रंगवीत असत. त्यांचा तार सप्तकातील 'सा'चा नाद हुबेहूब तानपुरा छेडल्याइतका स्पष्ट व कणखर येत असे. त्यामुळे त्यांचे श्रोते त्या दिव्य षड्जाची आतुरतेने वाट पहात असत असे म्हणतात. त्यांच्या गाण्याइतकेच त्यांचे बोलणे मृदु होते व वागणे शालीनतेचे होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व लोकांवर त्यांनी आपली छाप पाडलेली होती असे दिसते. त्यांच्या आठवणी सांगतांना असे सांगितले गेले की त्या जशा उत्कृष्ट गायिका होत्या तशाच पाककुशल होत्या. बडे गुलाम अलीखान यासारखे मोठे कलाकार जेंव्हा पुण्याला यायचे तेंव्हा त्यांचा मुक्काम हिराबाईंच्या घरी असायचा व त्या त्यांच्यासाठी खास लज्जतदार खाना बनवून देत असत.


हिराबाई बडोदेकर या श्रेष्ठ गायिका तर होत्याच, त्याशिवाय अनेक रंगांनी रंगलेले बहुरंगी, सोज्ज्वळ तसेच प्रभावी व्यक्तिमत्व त्यांना लाभले होते आणि विरोधाला न जुमानता नवे रस्ते निर्माण करून त्यावरून वाटचाल करण्याची धडाडी त्यांच्यात होती. आज शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात सहजपणे वावरणा-या महिलांच्या मार्गाचा पाया हिराबाईसारखींनी घातला होता हे कित्येकांना ठाऊक नसेल.

No comments: