Saturday, September 27, 2008

देदीप्यमान भारतीय स्त्रीरत्ने -२


सावित्रीबाई फुले (१८३१-१८९७)

साता-याजवळच्या नायगांव येथे जन्मलेल्या सावित्रीबाई थोर समाजसुधारक होत्या. या कार्यात त्यांना त्यांचे पति महात्मा ज्योतीराव फुले यांचेकडून प्रोत्साहन मिळाले. ब्रिटीश राजवटीमध्ये स्त्रियांच्या हक्कासाठी झटणारी ती पहिली स्त्री होती. पुणे येथे सुरू झालेल्या महिलांच्या पहिल्या विद्यालयामधील पहिली शिक्षिका होण्याचा मान त्यांना मिळाला. स्त्रियांचे शिक्षण व पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये होणा-या जाचापासून तिची मुक्तता करणे, विधवांचे विवाह आणि अस्पृष्यतानिवारण ही त्यांनी आपल्या जीवनाची उद्दिष्टे ठरवली. सन १८५२ मध्ये त्यांनी अस्पृष्य मुलींच्या शिक्षणासाठी शाळा उघडली. १९६८ साली त्यांनी अस्पृष्यांना आपल्या विहिरीमधून पाणी भरण्यासाठी आमंत्रित केले. १९७३ मध्ये एका विधवेच्या मुलाला दत्तक घेऊन त्यांनी समाजासाठी एक उदाहरण घालून दिले. ज्या काळांत स्त्रियांचे कार्यक्षेत्र चूल आणि मूल एवढ्यापुरतेच मर्यादित होते, त्या काळांत त्यांचे चौफेर कार्य इतर महिलांच्या तुलनेने ठळकपणे उठून दिसण्यासारखे होते. पुण्याच्या सनातनी लोकांनी त्यांच्या या तत्कालिन रूढीविरुध्द जाणा-या "अघोरी" कामगिरीवर जळजळीत टीकास्त्र सोडले व त्याला कडाडून विरोध केला. तरीही सत्यशोधक समाजाची सक्रिय सदस्य राहून त्या अस्पृष्य व महिलांच्या मुक्तीसाठी झटत राहिल्या.


श्री आनंदमयी माँ (१८९६-१९८२)

त्यांचा जन्म खेवरा येथील एका सनातनी ब्राम्हण कुटुंबामध्ये झाला. तत्कालीन रूढीनुसार त्यांच्या वयाच्या १३वे वर्षी रमणी चक्रवर्ती यांचेबरोबर त्यांचा विवाह झाला. लवकरच त्यांच्या पतीला आपल्या पत्नीच्या अद्भुत व्यक्तिमत्वाची व अध्यात्माच्या ओढीची जाणीव झाली. जसजशी त्याची आध्यात्मिक उन्नति होत गेली, तसतसे त्यांच्या पतीने त्यांचे शिष्यत्व स्वीकारले. कुठलेही शिक्षण घेतलेले नसतांना सुध्दा विविध प्रश्नांना त्यांनी दिलेली उत्तरे ऐकून ऐकणारे थक्क होऊन जात. त्या हठयोगाच्या आसनामध्ये प्रवीण होत्या. कुणाकडून न शिकता त्यांनी अनेक मंत्र निर्माण केले. त्या श्वास रोखून दीर्घ काळ समाधिस्थ रहात असे म्हणतात. त्यांनी जागोजागी आश्रम, सेवाभावी संस्था व इस्पितळे उभारली.


मदर तेरेसा (१९१०-१९९७)

युगोस्लाव्हियात रहाणा-या अल्बेनियन दांपत्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्यांचे नांव अग्नेस गोंझा बोयाझ्यू असे होते. (कठिण शब्दाच्या उच्चारातील चूकभूल माफ करावी.) कोलकात्याच्या सेंट मेरीज हायस्कूवमध्ये अध्यापन करण्यासाठी त्या १९२९ मध्ये भारतात आल्या. १९५० साली त्यांना गरीबातील गरीबांची काळजी घेण्याचा एक प्रकारचा दैवी आदेश मिळाला व त्यानुसार त्यांनी कोतकोत्यालाच मिशनरीज ऑफ चॅरिटीज या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा विस्तार होऊन ती आता जगभर पसरली आहे. समाजाने दुर्लक्षिलेल्या दुःखीकष्टी दरिद्री लोकांबद्दल त्यांनी दाखवलेली अनुकंपा व त्यांना दिलेले प्रेम यामुळे त्यांना विश्वभर अनन्य आदर प्राप्त झाला व त्या पूजनीय ठरल्या. १९७९ साली मिळालेल्या नोबेल पारितोषिकासह त्यांना अनेक बक्षिसे मिळाली. १९८० साली त्यांचा भारतरत्न हा सर्वोच्च बहुनाम देण्यात आला. १९ ऑक्टोबर २००३ रोजी पोप जॉन पॉल द्वितीय यांनी त्यांचे बीटिफिकेशन केले. यामुळे कॅथॉलिक संतपद प्राप्त होण्याच्या दिशेने त्यांचे एक पाऊल पुढे पडले. आता त्यांना ब्लेस्ड मदर ऑफ कोलकाता म्हंटले जाते.

No comments: