भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वताची अभेद्य अशी नैसर्गिक तटबंदी लाभली आहे. आजवरच्या इतिहासात कोठलाही शत्रू तिला पार करून भारतापर्यंत येऊन पोचू शकला नव्हता. जी कांही आक्रमणे झाली ती वायव्येकडच्या ज्या खैबरखिंडीतूनच झाली होती, ती तर आता पाकिस्तानात आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच पाकिस्तानशी सख्य नसल्यामुळे पाकिस्तानच्या सरहदीकडेच लक्ष ठेवावे लागले होते आणि आपला बहुतेक सारा फौजफाटा त्या सीमेवरच तैनात होता. चीनच्या सीमेवर हिमालय पर्वताच्या रांगा आणि निबिड जंगल यामुळे अत्यंत प्रतिकूल अशी भौगोलिक परिस्थिती होती. ब्रिटीशांना कधी तिथे सैन्य पाठवण्याची गरज पडली नसावी, त्यामुळे त्यांच्या काळात तिकडे दुर्लक्षच झालेले होते. सीमेपर्यंत पोचायला धड रस्तेसुध्दा बांधले गेले नव्हते. पं.नेहरूंच्या काळात राजकीय मंचावर "हिंदीचीनी भाईभाई" चा घोष चालला होता. साम्यवादी क्रांतीनंतर चिनी समाजव्यवस्थेत आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यात तिथले राज्यकर्ते गुंतलेले होते. या खंडप्राय देशाच्या कान्याकोप-यापर्यंत क्रांतीचे लोण पोचवणे कर्मकठिण होते. या सर्व त-हेने विचार करता चीनच्या बाजूने भारतावर अकस्मात आक्रमण होऊ शकेल असे कुणालाही स्वप्नातदेखील वाटत नव्हते. या गाफीलपणाचाच फायदा घेऊन चीनने सन १९६२ मध्ये अचानकपणे हल्ला चढवला.
भारतीय जनतेच्या मनाला पहिल्या क्षणाला बसलेला आश्चर्याचा धक्का ओसरताच त्याची जागा संतापाने घेतली. भाईभाई करत गळ्यात गळा घालताघालताच पाठीत खंजीर खुपसण्याच्या या विश्वासघातकी कृत्यामुळे चीन हा क्षणार्धात देशाचा शत्रू बनला. ज्या चिनी लोकांबद्दल कालपर्यंत कुतूहलमिश्रित कौतुक वाटत होते त्यांना दुष्ट, क्रूर, पाताळयंत्री, माणुसकीला काळिमा वगैरे विशेषणांची लाखोली वाहिली जाऊ लागली. ब्रिटीशांच्या जमान्यातच कोलकात्याला येऊन स्थाइक झालेल्या चिनी लोकांनी तिथे एक चायना टाउन बनवले होते. पण तेवढा अपवाद सोडला तर भारतातल्या इतर शहरातल्या लोकांनी चिनी माणूस कधी पाहिला देखील नसावा. मित्र म्हणूनही त्याच्याबद्दल फारशी माहिती नव्हती त्यामुळे तो एक अमूर्त असा शत्रू बनला. त्याचा निषेध तरी कसा करायचा? त्या काळात चीनबरोबर फारसा व्यापार होत नव्हता. त्यामुळे त्यावर बहिष्कार तरी कसा घालणार आणि चिनी वस्तूंची होळी पेटवण्यासाठी काय जाळणार? कागदावर माओ आणि चौ यांची चित्रे काढून आणि कापडांच्या बुजगावण्यावर त्यांची नांवे लिहून त्यांचे जागोजागी दहन करण्यात आले.
चिनी लोकांवर राग काढणे कठीण असल्याची कसर सरकारवर चिडून व्यक्त करण्यात आली. नेभळट, बावळट, पुळचट, अदूरदर्शी, मूर्ख वगैरे शेलक्या विशेषणांनी सरकारची संभावना करण्यात आली. त्या काळात देशापुढे कॉंग्रेसला आणि कॉंग्रेसपुढे पं.नेहरूजींना पर्यायच नव्हता. त्यांची जागा घेऊ शकणारे दुसरे कोणी नजरेसमोर नसल्यामुळे ते वाचले पण संरक्षणमंत्री कृष्णमेनन यांना जावे लागले. महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री माननीय यशवंतराव चव्हाण यांना त्यांच्या जागी केंद्र सरकारमध्ये बोलावून घेतले गेले. हिमालयाच्या संरक्षणासाठी सह्याद्री धांवून गेला अशा शब्दांत त्या घटनेचे वर्णन केले गेले. चीनने केलेल्या आक्रमणाच्या प्रतिकारासाठी तांतडीने उपाययोजना करण्यात आल्या. सैन्याची कुमक आणि त्याला लागणारी शस्त्रास्त्रे, दारूगोळा, अन्नधान्य, कपडेलत्ते, औषधपाणी वगैरेंची रसद सरहदीकडे रवाना करण्यात आली. पण सीमाभागातली दळणवळणाची साधने अत्यंत तुटपुंजी असल्यामुळे ती तिथपर्यंत पोचण्यात अनंत अडचणी होत्या. त्यामुळे जेथपर्यंत रस्ते होते तेथपर्यंत जाऊन त्या ठिकाणची ठाणी मजबूत करणे एवढेच ताबडतोब करण्यासारखे होते.
दुर्गम भागातल्या या दळणवळणाच्या अडचणी चिनी सैन्यापुढेही होत्याच. पण त्यांनी कित्येक महिने आधीपासून गुपचुपपणे तयारी करून पुरेसा साठा त्यांच्या भागात करून ठेवला असणार. सगळी तयारी झाल्यानंतर त्यांनी मोठ्या संख्येने सीमेवरील अनेक आघाड्यांवर एकदम हल्ला चढवला आणि मिळतील तेवढी छोटी छोटी भारतीय ठाणी उध्वस्त करीत ते धीमेधीमे पुढे चाल करीत राहिले. दोन्ही सैन्यांची अमोरसमोर येऊन हातघाईची लढाई अशी झालीच नाही. कांही दिवसांनी चिन्यांनी आपण होऊन युध्दविराम जाहीर केला. त्यांच्या सैन्यावर प्रतिहल्ला चढवून तिला सीमेपलीकडे हाकलून देण्याएवढी लष्करी शक्ती आपल्या सैन्याकडे त्या वेळेस नव्हती आणि भौगोलिक परिस्थिती अतिशय प्रतिकूल असल्यामुळे असले धाडस करण्यात कांही अर्थ नव्हता. त्यामुळे झाली तेवढी मानहानी पत्करून ती लढाई तिथेच थांबवणे भाग पडले.
हळूहळू या युध्दाचे तपशील पुढे येत गेले. ज्या भागात चिनी सैन्याने चढाई केली होती तो सगळा अत्यंत विरळ लोकवस्ती असलेला जवळजवळ निर्जन असा प्रदेश होता. त्या दुर्गम भागाचा बाह्य जगाशी कसला संबंधच नव्हता. त्या भागात कशाचेच उत्पादन होत नव्हते, त्यामुळे तिथून कुठलाही माल बाहेर जात नव्हता की बाहेरचा माल विकत घेणारे कोणी ग्राहक तिथे रहात नव्हते. सीमेवरचा असा थोडासा ओसाड भाग जिंकून घेतल्याने चीनला त्याचा कांहीही आर्थिक फायदा झाला नाही की भारताच्या इतर भागांचे त्यामुळे कांही नुकसान झाले नाही. दोन्ही देशांतल्या सामान्य माणसाला त्याच्या रोजच्या जीवनात कांहीच फरक पडत नव्हता. चीनने घुसवलेले सैनिकसुध्दा अशा बर्फाच्छादित प्रदेशात अन्नपाण्यावाचून किती दिवस आणि कसे राहतील आणि अशा बिकट जागी नुसते बसून राहण्यासाठी किती काळ रसद पुरवता येईल या गोष्टींना मर्यादा येतातच. त्यामुळे कालांतराने तेही मायदेशी माघारी गेले. या लढाईत दोन्ही बाजूचे कित्येक लढवय्ये मारले गेले. हे भरून न येण्याजोगे नुकसान करून चीनने काय मिळवले हे एक अगम्य कोडे आहे. कदाचित राजकारणाच्या पटावर त्याचा घसघशीत लाभ चीनला त्या काळात मिळाला असेल.
कागदावर काढलेल्या नकाशावर रेघा मारून सीमा दाखवणे सोपे असले तरी दुर्गम भागात प्रत्यक्षात त्या कोठे आहेत ते ठरवणेसुध्दा कठीण असते. ज्या ठिकाणी माणूस पोंचूच शकत नाही तिथला सर्व्हे करून, तिथे खुणा कशा करणार किंवा तिथे कुंपण कसे घालणार? "उत्तुंग आमुची उत्तरसीमा इंचइंच लढवू" वगैरे गाण्यात छान वाटते. प्रत्यक्षात तो इंच कोठपासून मोजायचा तो बिंदूच सापडत नाही. खाजगी मालमत्तेमध्येसुध्दा जेवढ्या प्रदेशात माणसांचा वावर असतो तेथपर्यंतच तो आपला मालकी हक्क बजावू शकतो. त्यापलीकडे असलेल्या 'नो मॅन्स लँड' मध्ये जेंव्हा तो स्वतः जाऊन राहू शकत नाही, त्या वेळी दुसरा कोणी तेथे येणार नाही तेवढे त्याला काळजीपूर्वकरीत्या पहात रहावे लागते. चीन आणि भारत यांच्या सीमा हिंदुस्थानचे ब्रिटीश सरकार आणि तिबेट यांच्यात झालेल्या तहात ठरल्याप्रमाणे तयार केलेल्या नकाशाप्रमाणे ठरतात. आजचा चीन ते मान्य करायला तयार नाही. त्यामुळे सीमेवरचा कांही भाग दोन्ही देश आपापल्या नकाशात दाखवतात. प्रत्यक्षात त्यातल्या कांही भागात कोणीच वस्ती करू शकत नाही. आज तो कोणाच्या ताब्यात आहे ते नक्की सांगता येणार नाही. अशा जागेवर फक्त जंगलचा कायदा चालतो. त्यातल्या त्यात थोडे सौम्य हवामान असलेल्या मोक्याच्या जागी राहुट्या बांधून कांही सैनिकांच्या तुकड्या तिथे मुक्काम ठोकतात आणि आजूबाजूचे निरीक्षण करीत असतात. शत्रूने देशाच्या आंतपर्यंत शिरू नये याची खबरदारी घेण्यासाठी हे जरूरीचे असते.
या सगळ्या गोष्टींची जाणीव हळूहळू होत गेली, सीमेवरील भागात रस्तेबांधणी आणि विकासाची कामे झाली, त्या भागातली गस्त वाढली आणि १९६२ च्या युध्दात झालेल्या मानहानीचे शल्य मनातून फिकट होत गेले, तसतशी चिनी लोकांबद्दल मनात बसलेली आढी सौम्य होत गेली. त्यानंतर जन्माला आलेल्या नव्या पिढीच्या मनात त्या युध्दाची आठवणदेखील असणार नाही. त्यामुळे ती अधिक मोकळेपणाने विचार करू शकते.
. . .. . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment