Monday, September 22, 2008

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा - २


वैश्विक शांती, समता, बंधुभाव वगैरे आदर्श उद्देश कोबर्टिनच्या मनात असले तरी सन १८९६ चे वातावरण त्याला मुळीसुध्दा पोषक नव्हते. इंग्लंड, फ्रान्स, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांना एटलांटिक महासागराचा किनारा लाभला होता आणि त्यांनी सामर्थ्यवान नौदलांची उभारणी केली होती. त्याच्या जोरावर त्यांनी आशिया व आफ्रिका खंडांचा बराचसा भाग जिंकून तिथे आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या. अमेरिका व ऑस्ट्रेलिया ही नव्याने सापडलेली खंडे तर त्यांनी पूर्णपणे काबीज करून आपसात वाटून घेतली होती. त्यातल्या कांही वसाहती फुटून बाहेर निघाल्या होत्या तर कांहींनी अंतर्गत स्वराज्य मिळवले होते. इटली व फ्रान्सने भूमध्य समुद्रापलीकडचा आफ्रिका खंडातला भाग व्यापला होता तर रशियाने त्याला सलग असलेला पॅसिफिक महासागरापर्यंतचा आशिया खंड गिळंकृत केला होता. हॉलंड आणि बेल्जियम या छोट्या राष्ट्रांनी देखील इंग्लंड व फ्रान्सच्या अनुमतीने आपापल्या वसाहती स्थापन केल्या होत्या. जर्मनीसारखी बलाढ्य राष्ट्रे हे करू शकले नव्हते याचे शल्य बाळगून होती. थोडक्यात सगळे जगच युरोपियन देशांच्या आधिपत्याखाली होते आणि त्या देशांचे एकमेकात आपसात फारसे पटत नव्हते. बाकीची राष्ट्रे तर गुलामगिरीत होती. जेंव्हा एकमेकांचा विश्वाससुध्दा कोणाला वाटत नव्हता तर बंधुभाव कसा असणार? अशा परिस्थितीतदेखील नाउमेद न होता खेळांच्या निमित्याने सर्वांना एका छपराखाली आणण्याचे प्रयत्न कोबर्टिन करत राहिला आणि त्याला त्यात य़श मिळाले.


स्पर्धा म्हंटले की त्यात चुरस आली, जिंकण्याहरण्यातून रागलोभ आले. मग त्या खेळाडूंना एकमेकाबद्दल प्रेम कसे वाटणार? यासाठी सुरुवातीपासून खास प्रयत्न करण्यात आले. कोबर्टिनने असे प्रतिपादन केले की ऑलिंपिक खेळात जिंकण्याहरण्यापेक्षा त्यात भाग घेणे अधिक महत्वाचे आहे."The most important thing in the Olympic Games is not to win but to take part, just as the most important thing in life is not the triumph but the struggle. The essential thing is not to have conquered but to have fought well."

कोबर्टिनचा हा संदेश आजपर्यंत शिरोधार्य मानण्यात येतो. याच कारणासाठी ऑलिँपिकमध्ये जिंकणा-या वीराला आयोजकांतर्फे फार मोठे बक्षिस दिले जात नाही. प्राचीन काळात तर फक्त ऑलिव्ह वृक्षाची फांदी देत असत. आता सोन्याचांदीचे व काँस्याचे बिल्ले दिले जातात. हे बिल्ले विकून त्यातून मोठा धनलाभ होण्याची शक्यता नसते. त्यामुळे ही स्पर्धा फक्त आपले श्रेष्ठत्व सिध्द करण्यापुरतीच मर्यादित असते. परवा परवापर्यंत कोठल्याही व्यावसायिक खेळाडूला ऑलिंपिक खेळात भाग घेण्याची परवानगी नव्हती. एकाद्या खेळाडूने खेळण्यासाठी पैसे घेतले असे सिध्द झाल्यास त्याचे पदक काढून घेण्यात येत असे. हे खेळ निव्वळ हौशी क्रीडापटूंसाठी होत होते. टेलीव्हिजनच्या प्रसारानंतर ऑलिंपिकसकट सर्व क्रीडाक्षेत्रात प्रचंड क्रांती झाली. त्यामुळे हे निर्बंध थोडे सैल करावे लागले.
(क्रमशः)

No comments: