Saturday, September 20, 2008

ऑलिँपिकराजाची कहाणी


आटपाट नगर होतं, ते ग्रीस या देशात होतं, त्याचं नांव एलिस असं होतं. एलिस नगराजवळ ऑलिंपोस पर्वत होता. त्याच्या पायथ्याला मोकळी जागा होती. तिथे अनेक खांब असलेला एक आखाडा बांधला होता. त्या जागेला ऑलिंपिया म्हणत. एलिस या गांवाला राजा नव्हता. तिथले सुजाण नागरिक शहाण्यासारखे वागत. भांडण तंटा झालाच तर पंचांकडे जात. अनुभवी पंच त्याचा निवाडा करीत. ग्रीस या देशात तेंव्हा अशीच बरीच नगरे होती. कधी कधी ती एकमेकांशी भांडत. त्यांच्यात लढाया होत. पण लढाई संपली की पुन्हा गुण्यागोविंदाने नांदत.

ग्राक लोकांचे अनेक देव होते. झीयस हा त्यातलाच एक. या देवाला सारे लोक भजत. त्याची पूजाअर्चा करीत. दर चार वर्षातून एकदा त्याचा उत्सव साजरा करीत. त्या दिवशी ते काय करीत? सारे पुरुष ऑलिंपियामध्ये जमत. स्त्रियांना तिथे यायची बंदी होती. लहान मुलींना आणणे धोक्याचे होते. त्यामुळे फक्त पुरुष तेवढे जमत. सारे झियस देवाची पूजा करीत. सर्वांच्या भल्यासाठी त्याची प्रार्थना करीत. त्याचे भजन सामूहिकपणे गात. त्याला बकरे आणि डुकरे या जनावरांचे बळी देत. प्रसाद म्हणून त्यावर तांव मारीत. प्रसादाबरोबर तीर्थ आलेच. खाऊन पिऊन आणि गाणी गात सारे धमाल करीत.

त्या समारंभातच एक धांवण्याची शर्यत लागे. एलिसमधले तसेच बाहेरून आलेले धांवक त्यात भाग घेत. कांही खेळाडू दूरदेशातून सुध्दा तिथे येत. शर्यत जिंकणा-याला बक्षिस देत. पूर्वी कांशाची तिवई मिळत असे. कालांतराने ऑलिव्ह वृक्षाची फांदी देऊ लागले. या मानाच्या पानांना खराच मोठा मन असे. विजेते लोक त्याला शिरोधार्य मानून डोक्याला बांधीत. त्यांची मिरवणूक निघे. गाजत वाजत ते आपल्या घांवी परतत. तिथे त्यांचा सत्कार होई. ऑलिव्हच्या फांद्याचे रोपटे लावून त्याचा वृक्ष बने. त्याचा खूप आदर होई. त्यापासून इतरांना स्फूर्ती मिळे.

तरुण मुले त्या विजयी वीराकडे जात. त्याला ऑलिंपिकचा वसा विचारीत. तो म्हणे, "पहा हं, चुकाल माताल, घेतला वसा टाकून द्याल."मुले सांगत, "आम्ही चुकणार नाही, मातणार नाही. घेतला वसा टाकणार नाही. मनापासून हे व्रत करू."मग तो व्रत सांगे, "या व्रताला काय करावं? रोज नियमितपणे व्यायाम करावा, भरपूर पौष्टिक अन्न खावं, कसरतीमध्ये घाम गाळून ते अंगात जिरवावं. एकमेकांच्याबरोबर शर्यती लावाव्यात. त्यात जिद्दीने धांवावं. पायातली शक्ती आणि छातीतला दम वाढवत न्यावा. कसलेही व्यसन बाळगू नये. असे दोन तीन वर्षे करावे. चौथ्या वर्षी ऑलिंपिकला जावे. महिनाभर तिथल्या मैदानात सराव करावा. त्या दिवसात रोज चीजचा फराळ करावा, महिनाभर व्रतस्थ रहावे, गुरुजन सांगतील त्या सूचनांचे पालन करावे. उत्सवाच्या दिवशी झीयसचे नांव घेऊन बेभान होऊन धांवावे. ज्याच्यावर झीयसदेव प्रसन्न होईल तो विजय़ी वीर बनेल. सगळे त्याचे कौतुक करतील. कवी त्याच्यावर कविता लिहितील, चित्रकार त्याची चित्रे काढतील, मूर्तीकार त्याचे पुतळे बनवतील. अशा प्रकारे तो प्रसिध्दी पावेल. ज्यांचा पहिला क्रमांक येणार नाहीत्यांनी निराश न होता पुन्हा प्रयत्न करत रहावे."

या व्रताची सुरुवात कधी झाली? असे म्हणतात की झीयसदेवाचा पुत्र हेराक्लेस याने ऑलिंपियाचे क्रीडांगण आणि झीयसचे मंदिर बांधून याची सुरुवात केली. त्यानंतर शतकानुशतके हजारो माणसे हे व्रत घेत असत. या आख्यायिकेची कोठे नोंद नाही. पण सत्तावीसशे वर्षापूर्वी होमर नांवाचा कवी होऊन गेला. त्याने महाकाव्ये लिहिली. त्यात एका उत्सवाचा उल्लेख आहे. ही स्पर्धा इसवी सनापूर्वी ७७६ वर्षापूर्वी झाली. त्यात १७० मीटर धांवण्याची शर्यत झाली. त्यात कोरोइबोस नांवाच्या एका आचा-याने पहिला नंबर पटकावला. कांही वर्षांनी वेगवेगळी अंतरे धांवण्याच्या वेगवेगळ्या स्पर्धा होऊ लागल्या. धांवण्याबरोबरच घोडदौडीच्या, रथांच्या शर्यती सुरू झाल्या. कुस्ती, भालाफेक, थाळीफेक वगैरे अनेक खेळांना त्यात सामील करून या स्पर्धांची कक्षा वाढत गेली. हे खेळ खूप लोकप्रिय होत गेले. दूरवर असलेल्या बाहेरच्या देशातून खेळाडू या क्रीडांसाठी ग्रीसमध्ये येऊ लागले.

पुढे रोमन साम्राज्य उदयाला आले. रोमन राजांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यामुळे झीयससारख्या जुन्या दैवतांची पूजा करण्याला बंदी आली आणि हे खेळ हजार वर्षे चालल्यानंतर बंद पडले. अशी ही ऑलिंपिक या खेळांच्या राजाची साठा उत्तरांची सुरस कहाणी पांचा उत्तरी सुफळ संपूर्ण!

No comments: