Tuesday, September 09, 2008

गणपतिबाप्पा मोरया


हा ब्लॉग लिहायला मी २००६ साली सुरुवात केली. त्या वर्षी गणेशोत्सवाच्या सुमारास मी एका मोठ्या आजारातून देवाच्या कृपेने बरे होण्याच्या मार्गावर होतो. अजून हिंडायफिरायला लागलो नव्हतो. घरात बसल्याबसल्याच गणरायाची विविध रूपे मनात आठवून त्यावर कोटी कोटी रूपे तुझी ही लेखमालिका मी लिहिली. मागील वर्षी गणपतीचा सण साजरा करण्यासाठी मी पुण्याला गेलो होतो. माझा मराठीभाषी संगणकसखा त्या वेळेस माझ्यासोबत नव्हता. एक इंग्रजीभाषी लॅपटॉप हाताशी आला, पण त्याला मराठी भाषा कशी शिकवायची याचे ज्ञान माझ्याकडे नव्हते. या घोळाची पूर्वकल्पना असल्यामुळे मी थोडी पूर्वतयारी करून पुण्याला गेलो होतो. त्या वेळेस गजाननाची कांही विशेष रूपे आणि त्याची कांही लोकप्रिय गाणी चित्ररूपाने दाखवण्याचा प्रयत्न मी याहूवर केला. ती चित्रे आता इथे देत आहे.

यंदा इथे मुंबईलाच राहणार असल्याने हा उत्सव आपल्या ब्लॉगवर कसा साजरा करावा याचा विचार करत होतो. तेवढ्यात आयत्या वेळी माझ्या संगणकाने अचानक मला दगा दिला. त्याच्या एका दुखण्यावर इलाज करून ते बरे होते आहे तोपर्यंत दुसरे उद्भवावे अशी मालिकाच लागली. या वर्षी मी संगणकाच्या समोर बसून राहण्याएवजी अन्य मार्गाने गणेशाची सेवा करावी अशीच कदाचित त्याची इच्छा असावी. त्यामुळे घरात चाललेल्या त्याच्या उत्सवाकडे अधिक लक्ष दिले, वृत्तपत्रात येणारे लेख व बातम्या तपशीलवार वाचून त्यातली कात्रणे काढून ठेवली. परिसरातल्या सार्वजनिक उत्सवातल्या सजवलेल्या प्रतिमांचे दर्शन घेणे आणि तिथले सांस्कृतिक कार्यक्रम पाहणे चालले आहे. या सर्वातून ज्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी नजरेत भरल्या त्यांची माहिती पुढील थोडे दिवस ब्लॉगवर देण्याचा मानस आहे. अर्थातच अखेर गणरायाला यातले जेवढे मान्य असेल तेवढेच मी प्रत्यक्षात प्रकाशित करू शकेन.

No comments: