Tuesday, September 23, 2008

आधुनिक ऑलिँपिक खेळांची कथा - ५


दुस-या महायुध्दानंतर साम्राज्यशाही नष्ट होऊन आशिया आणि आफ्रिका खंडातले बहुतेक सारे देश स्वतंत्र झाले. त्यामुळे अनेक नवी राष्ट्रे निर्माण झाली. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीसुध्दा 'इंडिया'चा संघ युनियन जॅकखाली ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेत होता. तो कदाचित अपवाद असेल. स्वातंत्र्याच्या आधीच त्यातून बर्मा (आताचा मायनामार) आणि सिलोन (श्रीलंका) वेगळे झाले, भारताच्या स्वातंत्र्याबरोबर पाकिस्तान जन्माला आले आणि त्यातून कालांतराने बांगलादेश वेगळा निघाला. नेपाळ व भूतान यांनीही ऑलिम्पिकमध्ये हजेरी लावायला सुरुवात केली. म्हणजे आपल्या इथेच एकाचे सात झाले. यू.एस.एस.आर.ची सोळा शकले झाली, कित्येक अरब शेख आणि महासागरातल्या छोट्या बेटांनी आपापल्या जागा बनवल्या. अशा रीतीने ऑलिम्पिक क्रीडामहोत्सवात भाग घेणा-या संघांची संख्या वाढत गेली.
महायुध्दानंतर लगेच यू.एस.ए आणि यू.एस.एस.आर. या दोन महासत्तांमध्ये जगाचे धृवीकरण झाले. पं.नेहरूंनी नॉनअलाइन्ड देशांचा तिसरा गट स्थापन करण्याचा प्रयत्न केला, पण तो फारसा समर्थ बनला नाही. धृवीकरण झालेल्या देशांमध्ये शीतयुध्द सुरू होऊन बराच काळ ते चालले. त्याचा परिणाम ऑलिम्पिक खेळांवरही झाला. कधी एका गटाने त्यावर बहिष्कार टाकला तर कधी दुसरा गट त्यापासून दूर राहिला. त्यामुळे कांही वर्षी खेळाडूंची उपस्थिती किंचितशी घटली. तरीसुध्दा याच काळात विमानवाहतूकीत प्रचंड प्रगती होऊन दूरचा प्रवास सुरक्षित, सोपा आणि स्वस्त झाला यामुळे दरवर्षी खेळाडूंची संख्या वाढत गेली. १९४८ साली लंडनला ५९ देशातून ४१०४ खेळाडू आले होते. त्यांची संख्या वाढत वाढत आता या वर्षी बीजिंग इथे २०४ संघातून ११०२८ इतकी झाली आहे. क्रीडास्पर्धांची संख्यासुध्दा १३६ वरून दुपटीपेक्षा जास्त ३०२ इतकी झाली.


पहिली अनेक वर्षे यू.एस.ए आणि यू.एस.एस.आर. या दोन महासत्तांमध्ये ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अधिकाधिक पदके जिंकण्याची चुरस होती. कधी यातला एक संघ पुढे असे तर कधी दुसरा. जेंव्हा एका गटाने बहिष्कार टाकला तेंव्हा यातला जो संघ उपस्थित असे त्याची चंगळ होत असे. तो निर्विवादपणे इतर सगळ्या देशांना मागे टाकून पहिल्या क्रमांकावर येत असे. यू.एस.एस.आर.चे विघटन झाले आणि चीनने या स्पर्धेत प्रवेश केला त्यानंतर रंग पालटला. या वर्षी चीनने यू.एस.ए आणि रशिया या दोघांनाही मागे टाकून अव्वल नंबर पटकावला आहे.


मधल्या काळात टेलिव्हिजनच्या प्रसारणात झालेल्या क्रांतीमुळे ऑलिम्पिकचे खेळ पाहणे तरी आता घराघरात पोचले आहे. यामुळे त्याला अमाप प्रसिध्दी मिळते आणि त्याबरोबरच त्याला व्यवसायाचे परिमाण प्राप्त झाले आहे. अर्थातच आता तो संपूर्णपणे हौशी खेळाडूंचा खेळ राहिलेला नाही.


ऑलिम्पिकबद्दल अजून खूप कांही लिहिण्यासारखे आहे. पण आता या वर्षीच्या मेळाव्याचे सूप वाजून ती जुनी झाल्यामुळे आता चार वर्षे तरी कोणाला या विषयात रस वाटणार नाही. तेंव्हा ही मालिका इथेच आटोपती घेतलेली बरी.
. . . . .. . . . (समाप्त)

No comments: