Friday, October 17, 2008

आजीचे घड्याळ - भाग ४ राशीचक्र


त्या पतिपत्नींच्या बोलण्यावरून एक गोष्ट माझ्या लक्षात आली. त्यांचे कोरडे ठणठणीत घडे जन्मभरासाठी पालथे घालून ठेवलेले होते. ते कांही दहा मिनिटांच्या चर्चेने सरळ होणार नव्हते. तेंव्हा त्यावर आणखी पाणी ओतण्यात कांही अर्थ नव्हता. मग मी ही नसती उठाठेव कशाला करायची? पण छोट्या अमोलच्या डोळ्यात मला जिज्ञासेची चमक दिसत होती. हा एक आशेचा किरण होता। त्याच्याकडे पहात मी म्हंटले, "ते राहूकेतू कोणाच्या राशीला कां, कसे आणि कधी लागतील ते समजण्यासाठी आधी रास म्हणजे काय ते तर माहीत असायला हवं ना!"
अमोल म्हणाला, "खरंच काका, कुणाची रास सिंह आहे कां मकर आहे हे कोण ठरवतं ?"
"अरे, तुला एवढंसुद्धा माहीत नाही कां? कुंडली मांडणारे ज्योतिषीच ते सगळं ठरवतात" आईने पोराला अज्ञानाचा घोट पाजला.
"तुमचे ज्योतिषी त्यांच्या मनाला येईल तशी वाटेल ती रास सांगतात कां? ते मुलाच्या जन्माची तारीख वेळ वगैरे कांही विचारत नाहीत?" मी खंवचटपणाने विचारलं.
"फक्त तेवढी थोडीशी माहिती त्यांना लागते, पण मग रासबीस तेच ठरवतात."
"म्हणजे तुमच्याच हातातले घड्याळ पाहून तुम्हाला त्यातली वेळ सांगण्याचा प्रकार झाला हा! खरं तर मुलाचा जन्म ज्या क्षणी होतो तो क्षण त्याची रास ठरवतो. म्हणजे त्या क्षणी आकाशात ग्रहांची जी स्थिती असते त्यावरून ती ठरते. ज्योतिषाने ठरवण्यासारखं त्याच्या हातात कांही नसतं."
"पण रास म्हणजे काय? ती आपल्या आप कशी ठरते?" अमोलने मुळात हात घातला.
मी म्हंटले, "रास हा आकाशाचा एक भाग असतो असं मघाशी मी सांगितलं . आपल्या पृथ्वीच्या नकाशात अक्षांश रेखांश दाखवलेले असतात. प्रत्यक्षात जमीनीवर किंवा समुद्रावर अशा रेघा मारलेल्या नसतात, पण नकाशात त्यांच्या आधाराने कोणतीही नेमकी जागा शोधायला त्यांचा चांगला उपयोग होतो. तू पाहिले असतील ना ?"
"हो. अक्षांशाच्या आडव्या सरळ रेखा असतात आणि रेखांशाच्या उभ्या वक्र रेषा असतात." अमोल म्हणाला. छोकरा हुषार होता.
"आकाशातील जागा ठरवण्यासाठीसुद्धा त्याचे असेच काल्पनिक भाग पाडले आहेत. बारकाईने अभ्यास करणारे लोक त्याचे अंश, कला, विकलापर्यंत सूक्ष्म निरीक्षण करून किचकट गणिते मांडतात। पण सर्वसाधारण माणसांसाठी आकाशाची विभागणी फक्त बारा राशीमध्ये केली आहे. त्यातील प्रत्येक रास तीस अंशाएवढी असते. राशींच्या सीमा रेखांशासारख्या वक्र असतात. त्यातलासुद्धा उत्तर आणि दक्षिणेकडला बराचसा भाग सोडून देऊन फक्त मधला कांही भाग महत्वाचा आहे."
"पण सगळं आभाळ एकसारखं दिसतं. ते भाग ओळखायचे कसे?" अमोलने रास्त प्रश्न विचारला.
मी म्हंटले,"तुझं निरीक्षण अगदी बरोबर आहे. तेजस्वी सूर्यापुढे आपल्याला दिवसा कोणतेही तारे दिसत नाहीत. त्यामुळे सर्व आकाश एकसारखं दिसतं, पण रात्री मात्र वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या चांदण्या दिसतात. या ता-यांच्या समूहातूनच वेगवेगळ्या आकारांचा भास होतो. प्रत्येक राशीचे नांव त्या भागात दिसणा-या तारकापुंजाच्या अशा आकारावरून दिले गेले आहे. हे सारे तारे पूर्वेकडून पश्चिमेकडे जातांना दिसतात, पण त्यांचे एकमेकांपासून असलेले अंतर कधी तसूभरसुद्धा बदलत नाही. त्यामुळे त्यांच्या पुंजांचे आकार अगदी जसेच्या तसे दिसतात. मीन रास पू्र्वेच्या क्षितिजावर असो किंवा पश्चिमेच्या किंवा माथ्यावर असो ती तशीच दिसणार. त्यामुळे थोडी संवय झाली की रात्रीच्या वेळी मात्र राशी ओळखायला येतात."
"पण त्या अशा फिरत कां असतात?"
"खरं म्हंटलं तर त्या राशींमध्ये दिसणारे सर्व तारे आपापल्या जागेवर स्थिर आहेत, आपल्या सूर्यासारखे. दिवसासुद्धा ते आपापल्या जागेवर असतात, पण सूर्याच्या प्रकाशाने आपल्या वातावरणात इतका उजेड असतो की ता-यांचा मंद प्रकाश आपल्या डोळ्यांना जाणवत नाही. आपली पृथ्वीच स्वतःभोवती दिवसातून एक गिरकी घेते. आपल्या आजूबाजूची जमीन, घरे, डोंगर वगैरे सारे कांही तितक्याच वेगाने फिरत असल्यामुळे आपल्याला ते स्थिर वाटतात आणि आकाशातले सूर्य, चंद्र, ग्रह, तारे पूर्व दिशेकडून पश्चिमेकडे जात आहेत असे वाटते. त्यात पुन्हा आपल्याला एका वेळेस फक्त जमीनीच्या वरील अर्धेच आकाश दिसू शकते. उरलेला अर्धा भाग जमीनीच्या मागे दडलेला असतो. जसजशी पृथ्वी फिरते तसतसा पूर्वेकडील भाग दिसू लागतो आणि पश्चिमेकडील भाग दिसेनासा होत जातो."
"त्यात राशी कशा प्रकारे दिसतात?"
"प्रत्येक राशीची रुंदी तीस अंश इतकी असते. पृथ्वीला तीस अंश फिरायला दोन तास लागतात. त्यामुळे एका राशीचा उदय सुरू झाल्यानंतर ती पूर्णपणे वर यायला दोन तास लागतात. त्याच काळात पश्चिमेकडील क्षितिजावरील राशीचा अस्त होत असतो. म्हणजे सहा राशींएवढा आकाशाचा भाग कोणत्याही वेळी दिसत असला तरी त्यात मधल्या पांच राशी पूर्णपणे दिसतात आणि पूर्व व पश्चिम क्षितिजांवरील दोन राशी अंशतः दिसतात. आपण जर सूर्यास्तापासून दुसरे दिवशीच्या सूर्योदयापर्यंत रात्रभर सतत आकाश पहात राहिलो तर सूर्याच्या आजूबाजूचा थोडा भाग सोडून इतर सर्व राशी पाहू शकतो."
"या राशींमध्ये ग्रह कसे जातात?"
"राशींचा आकार ज्या ता-यांमुळे ओळखला जातो ते तर पृथ्वीपासून खूप खूप दूर आहेत. आज आपल्याला दिसणारे त्यांचे प्रकाशकिरण कित्येक वर्षांपूर्वी, कदाचित आपण जन्मण्यापूर्वी तिथून निघाले असतील. आभाळामध्ये या सर्व ता-यांची एक पार्श्वभूमी बनली आहे. आपल्या सूर्यमालिकेमधील ग्रह आपल्याला या पार्श्वभूमीवर दिसतात. या खोलीच्या भिंतींवर लावलेली चित्रे, टांगलेले कॅलेंडर, दरवाजे, खिडक्या, हा टेलीव्हिजन, ही शोकेस या सगळ्यांच्या बॅकग्राउंडवर आपण एकमेकांना दिसत आहोत. समज मी आपलं एक बोट असं नाकासमोर धरलं आणि त्याच्याकडे पाहिलं तर मला माझं बोट दिसेल तसेच मागच्या भिंतीवरील कॅलेंडरसुद्धा दिसेल. मी ते थोडंसं फिरवलं तर मला बोटाच्या पलीकडे या खोलीतला टेलीव्हिजन सेट दिसेल. आणखी वळवलं तर बोटापलीकडे खिडकी आणि खिडकीतून दिसणारी समोरची बिल्डिंग दिसेल. माझं बोट माझ्याजवळच असेल पण मला ते केंव्हा कॅलेंडरबरोबर, टीव्हीबरोबर नाहीतर
खिडकीसोबत दिसेल. त्याचप्रमाणे मी या खोलीत मधोमध ठेवलेल्या टीपॉयवरच्या फ्लॉवरपॉटकडे पाहिले तर त्याच्या मागच्या भिंतीवरचे कॅलेंडर, किंवा टीव्ही किंवा खिडकी असे जे असेल ते दिसेल. त्याच्याकडे पहात मी त्याच्याभोवती फिरलो तर मला वेगवेगळ्या कोनातून पलीकडे असलेल्या वेगवेगळ्या गोष्टी त्याच्या पाठीमागे दिसतील. म्हणजे माझे बोट माझ्याभोवती फिरले काय किंवा मी फ्लॉवरपॉटच्या भोवती फिरलो काय दोन्ही वेळा मला वेगवेगळ्या पार्श्वभूमीवर ते दिसतील. ग्रहांकडे पाहतांना अगदी असंच होतं. पृथ्वी सूर्याभोवती प्रदक्षिणा घालतांना बुध आणि शुक्र या सूर्याच्या जवळ असलेल्या ग्रहांना सुद्धा प्रदक्षिणा घालते आणि मंगळ, गुरु आणि शनी हे पृथ्वीच्या पलीकडे असलेले ग्रह सूर्याभोवती फिरतांना पृथ्वीला सुद्धा प्रदक्षिणा घालीत असतात. चंद्र तर खास पृथ्वीभोवती फिरत असतो. यामुळे आपल्याला हे सर्व ग्रह नेहमी कुठल्या ना कुठल्या राशींचा भाग असलेल्या ता-यांच्या सोबतीत दिसतात. ते ज्या तारकासमूहाबरोबर दिसतात त्या राशीत ते आहेत असे आपल्याला वाटते. ते सर्व ग्रह, उपग्रह आणि स्वतः पृथ्वी सतत गतिमान असल्यामुळे ते राशींमधून भ्रमाण करतांना दिसतात. हे करतांना एका राशीमधून निघून दुस-या राशीत प्रवेश करतात, तिच्या एका टोकांपासून दुस-या टोकापर्यंत प्रवास करतांना त्या राशीत त्यांचे वास्तव्य असते, त्यानंतर ते दुस-या राशीतून तिस-या राशीत जातात. हे भ्रमण सतत चाललेले असते. कोणत्याही माणसाच्या जन्माच्या वेळेस ग्रहांच्या जागांची जी परिस्थिती असते त्यावरून त्याची रास ठरवतात.


. . . . .. . . . . . . . . . .. (क्रमशः)

2 comments:

अनिकेत भानु said...

छान लिहीताय...

Anand Ghare said...

आभारी आहे....