Monday, October 20, 2008

आजीचे घड्याळ - भाग ७ ग्रहदशा


बराच वेळ आमचे बोलणे ऐकत असलेले अमोलचे बाबा म्हणाले,"तुमच्या कुंडलीत भरपूर चांगले उच्चीचे ग्रह असणार, त्यामुळे तुमचं सगळं आयुष्य सुतासारखं सरळ गेलं, सगळ्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत गेल्या, पाहिजे ते आपसूक मिळत गेलं, कुठल्या ग्रहांच्या कोपाचा तुम्हाला प्रत्यक्ष अनुभव अजून आलाच नसेल, म्हणून तुम्ही असे बोलताहात. अहो ज्याचं जळतं ना, त्यालाच ते कळतं."
"एकदा साडेसातीचा चांगला फटका बसला म्हणजे घाबरून त्यांची कशी भंबेरी उडते बघा!" झणझणीत फोडणी पडली.
मी म्हंटले,"मी फार सुखात आहे अशी तुमची कल्पना झाली असणे शक्य आहे, कारण मी आपली रडगाणी सहसा कोणापुढे गात नाही. पण 'सुख थोडे दुःख भारी दुनिया ही भलीबुरी।' या सत्य़ाचा कटु अनुभव मला आल्याशिवाय राहील कां? निराशा, अपमान, फसवणूक, द्वेष, मत्सर, निंदा, कागाळ्या, विरोध या सगळ्या गोष्टींचा पुरेपूर त्रास इतरांसारखा माझ्या वाटणीला देखील येणारच. त्यांचं प्रमाण कदाचित कमीअधिक असेलही. कुठलंही चांगलं काम हांतात घेतल्यावर मलासुद्धा त्यात अनंत अडचणी
येतात. संकटांच्या परंपरांना तर एकामागोमाग एक यायची जणु संवयच असते. 'याला जीवन ऐसे नांव' आहे. पण या सगळ्या कटकटी आपल्या जगातल्या परिस्थितीमधून, आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या वागण्यातून निर्माण होतात, अधिकांश वेळा त्यात कुठे ना कुठे आपली चूक असते. त्यावर सगळ्या बाजूंनी नीट विचार केला, प्रामाणिकपणे विश्लेषण करून मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न केला तर त्यावर उपाय सापडतो. आपली चूक सुधारता येते, निदान तिची पुनरावृत्ती टाळता येते. जी गोष्ट अपेक्षेनुसार घडणे शक्यच नसेल तिचा नाद वेळीच सोडून देता येतो. आपल्या समस्यांचे ओझे आकाशांतल्या ग्रहांच्या खांद्यावर टाकण्याचा सोपा मार्ग माझ्याकडे नसल्यामुळे कदाचित मी असे प्रयत्न जास्त वेळा केले असतील. त्यामुळे माझा पुढला मार्ग थोडा सुकर झाला किंवा कांही संभाव्य संकटांची चाहूल मला आधी लागून ती टाळता आली असण्याची किंवा त्यापासून होणा-या त्रासाची तीव्रता कमी करता आल्याची शक्यता आहे. त्यामळे माझ्या आयुष्यातले कांही गुंते सुटून ते तुम्हाला वाटते तसे थोडे सरळ झालेही असेल. "जे मिळालं ते मी माझ्या कर्तृत्वाने मिळवलं आणि जे गमावलं ते मात्र दुर्दैवामुळे." असा अहंकार मी बाळगत नाही आणि "मला जे कांही मिळालं ते सगळं केवळ कुणा ना कुणाच्या कृपेमुळे" असा खोटा विनयसुद्धा दाखवत नाही. कारण जे कांही थोडे फार प्रयत्न मी केले असतील त्याचं श्रेय त्यांनासुद्धा कुठेतरी मिळायला पाहिजेच ना! "असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी" असे म्हणत स्वस्थ बसलो असतो तर तेवढेसुद्धा मिळण्याची शक्यता नव्हती. पण या सगळ्यांचा आकाशातल्या ग्रहांबरोबर कांही संबंध आहे असे मला तरी कुठे दिसलेले नाही."
"म्हणजे आपला व त्यांचा कांही एक संबंध नाही असं तुम्हाला वाटतं का ?" एक वेगळी तात्विक चर्चा सुरू झाली.
मी म्हंटले,"संबंध कसा नसेल? सूर्यापासून आपल्याला प्रकाश मिळतो, ऊर्जा मिळते, त्यावर वनस्पती वाढतात आणि त्यातून अन्न मिळतं, तो समुद्रातलं पाणी उचलून ढगांमार्फत ते आपल्यापर्यंत पोचवतो. अशा असंख्य गोष्टी सांगता येतील. माणसाच्या जीवनाचा कोणताही पैलू पाहिला तर त्यावर सूर्यनारायणाचा ठसा कुठे ना कुठे दिसतो. चंद्राकडे नुसतं पाहून मन उल्हसित होतं, रात्रीच्या अंधारात तो थोडा उजेड देतो, समुद्रात लाटा निर्माण करतो अशा कितीतरी चांगल्या गोष्टी सांगता येतील. गुरु, शुक्र वगैरे ग्रहसुद्धा पहातांना मनाला आनंद वाटतो, रात्रीच्या काळोखात ते दिशा आणि वेळ या दोन बाबतीत आपल्याला मार्गदर्शन करतात. आपण तर या ग्रहांना कांहीही देऊ शकत नाही. अशी निरपेक्ष मदत करणारे आपले हे मित्र आपल्याला विनाकारण पीडा देतील असे मला वाटत नाही. ज्यांच्यापासून आपल्याला धोका असतो त्याच गोष्टींची भीती वाटते. कुठलाही ग्रह आपल्याला त्रास देईल हे मला पटतच नाही. राग, द्वेष, सूडबुद्धी असल्या नकारात्मक क्षुद्र मानवी भावना मी त्या विशालकाय गोलकांना चिकटवू शकत नाही. त्यामुळे त्यांची भीती बाळगण्याचे मला कांही कारण दिसत नाही."
"म्हणजे आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवलेलं हे एवढं मोठं ज्योतिषशास्त्र सगळं खोटं आहे कां?" त्यांनी विचारले.
"या लोकांना कुठे आपल्या पूर्वजांचा अभिमान आहे?" सौ.नी आपले नेहमीचे ठेवणीतले शस्त्र पाजळले.
मी म्हंटले, "आधी मी यांच्या प्रश्नाला उत्तर देतो. मला माझ्या पूर्वजांबद्दल मनापासून असीम आदरभाव व डोळस अभिमान वाटतो. पण यासंबंधी एक गोष्ट आठवते.
एकदा एक मित्र दुस-या मित्राला म्हणाला,"माझे आजोबा अत्यंत प्रसिद्ध प्रकांड पंडित होते. त्यांना जगातल्या सगळ्या विषयांचं प्रचंड ज्ञान होतं."
तो मित्र म्हणाला,"पण तुला तर कशातलं कांहीच माहीत नाही. हे असं कसं झालं?"
"काय करणार? माझ्या बाबांनी मला कांहीच शिकवलं नाही."
"म्हणजे तुझी त्यात कांहीच चूक नाही?"
"कांहीच नाही. माझ्या वडिलांनी मला शिकवलंच नाही तर मला ते कसं येणार?"
"याचा अर्थ तुझे वडील मूर्ख होते."
"तोंड सांभाळून बोल. तू माझ्या वडिलांबद्दल बोलतो आहेस."
"मग त्यांनी तुला कांहीच कां शिकवलं नाही?"
"कदाचित त्यांच्या वडिलांनी त्यांना कांही शिकवलं नसेल."
"याचा अर्थ तुझे आजोबा महामूर्ख होते. स्वतः पंडित असून आपल्या मुलाला कसलेही ज्ञान दिले नाही! असले कसले ते पंडित?"
"मग कदाचित ते मोठे पंडित नसतील."
"तसंही नाही. खरोखरच ते मोठे गाढ विद्वान असतील. पण जाणकार लोकांनी ते सांगावं यात खरी मजा आहे. आज तू हे सांगणं मला शहाणपणाचं वाटत नाही."
आपल्या देशात असंच घडत आहे. आपण आपल्या प्राचीन पूर्वजांच्या महानपणाचे ढोल जितक्या जोरात बडवू, आपल्याच मधल्या पिढींतल्या पूर्वजांच्या नाकर्तेपणाचा तितकाच मोठा प्रतिध्वनी त्यातून निघेल. तेंव्हा नुसताच महान पूर्वजांचा पोकळ जयजयकार करण्यापेक्षा त्यांनी केलेलं कार्य स्वतः समजून घेतल्यानंतर त्या माणसानं त्याबद्दल बोलावं असं मला वाटतं. मला ते जितकं समजलं आहे, त्याबद्दल मला त्यांचा सार्थ अभिमान वाटतो."
"आतां तुमचा प्रश्न, त्यांनी सांगितलेल्या गोष्टी खोट्या आहेत असे म्हणायचे का? कुठलीही गोष्ट व्यवस्थितपणे समजून न घेता मी त्यावर माझे मत देत नाही. त्या लोकांनी खरोखर नेमकं काय सांगितलं, ते कुठल्या संदर्भात, कोणत्या हेतूने आणि कशाच्या आधारावर सांगितलं असेल हे मला स्वतःला समजल्याशिवाय मी त्यावर बोलणे योग्य नाही. मला ते कधी समजेल असे वाटत नाही. कारण आपण कांही आपल्या पूर्वजांना प्रत्यक्ष भेटू शकत नाही की त्यांच्या हस्ताक्षरातले लिखाण वाचू शकत नाही.
आजकालच्या लोकांपैकीच एकानं "त्यांनी असं म्हंटलं होतं." असं सांगितलं आणि "त्यांनी तसं म्हंटलं होतं" असं दुस-यानं सांगितलं तर ती त्यांची मते झाली. त्यातलं आपल्या बुद्धीला काय पटतं तेच पहावं लागेल आणि कांहीही सांगितलं तरी तो त्या लोकांच्या म्हणण्यावर अभिप्राय होईल. शिवाय फक्त 'खरं' किंवा 'खोटं' एवढाच निकष धरला तर जगातील सर्व साहित्यिकांना 'खोटारडे' म्हणता येईल कारण त्यांनी लिहिलेल्या एकूण एक कादंब-या व नाटके यातले प्रसंग, संवाद वगैरे गोष्टी काल्पनिकच असतात. पण आपण त्यांच्या कल्पनाविलासाचं कौतुक करतो. त्यांना ज्ञानपीठ किंवा नोबेल पुरस्कार देऊन त्यांचा आदर करतो. त्यांचे लेखन अक्षरशः खरे की खोटे यावर वाद घालत नाही. तेंव्हा हा पूर्वजांच्या नांवाने भावनांना स्पर्श करण्याचा खेळ आपण करू नये यातच शहाणपण आहे."
"पण त्यांनी एवढं मोठं शास्त्र निर्माण करून ठेवलं आहे हे तर तुम्हाला मान्य आहे."
"हो. ते आपल्यासमोर आलेले आहे. मला त्या लोकांच्या या महत्कार्याचं खरोखर नवल वाटतं आणि अभिमानसुद्धा वाटतो."
"मग त्यांनी हे एवढं मोठं काम कशासाठी केलं असेल?"
"हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नावर मी वर्षानुवर्षं विचार केला आहे. त्या विचारमंथनातून मला जेवढं उमगलं ते सांगतो."
. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: