दिवाळीचा तिसरा दिवस पाडवा म्हणजे 'बडा खाना', 'ग्रँड फीस्ट' किंवा 'मेजवानी'चा दिवस। त्या काळात प्रचलित असलेल्या पक्वानांचे वर्गीकरण केले तर श्रीखंड आणि बासुंदी हे सर्वोत्कृष्ट श्रेणीतले पदार्थ, साखरभात, पुरणपोळी, बेसनाचे लाडू वगैरे उत्कृष्ट श्रेणीत आणि लग्नाच्या जेवणात हमखास असणारे जिलबी आणि बुंदीचे लाडू ही लोकमान्य पक्वान्ने असत. पुरणाचे 'कडबू' आणि 'हुग्गी' या नांवाची गव्हाची खीर हे आमच्या भागातले कानडी पध्दतीचे प्रकार याच श्रेणीत मोडत. शेवयाची खीर, शिरा यासारखे पदार्थ बनवण्यासाठी सणासुदीची वाट पहायची गरज नसायची. सहज केंव्हाही मनात आले की ते पटकन केले जात असत. ते लोकमान्य असले तरी ते मेजवानीत असलेच तर दुय्यम स्थानावर असत. त्याशिवाय खास उपवासाचे, फराळाचे, बाळंतिणीला किंवा लहान मुलांना पौष्टिक म्हणून देण्याचे असे निरनिराळे असंख्य गोडाधोडाचे पदार्त असले तरी ते मोठ्या मेजवानीत सहसा केले जात नसत. पेढे, बर्फी वगैरे मिठाया जेवणात वाढल्या जात नसत. फ्रूट सॅलड, कस्टर्ड, आइस्क्रीम वगैरे नाविन्यपूर्ण पदार्थ हौस म्हणून कधी तरी केले जात. बंगाली चमचम, सोंदेश किंवा उत्तर भारतातल्या हलवायांच्या विविध मिठाया अजून घरी तयार केल्या जात नव्हत्या आणि त्या गांवातल्या बाजारातही मिळत नव्हत्या.
पाडव्याच्या मेजवानीत श्रीखंडपुरीचा बेत हे जवळ जवळ ठरूनच गेले होते। इतक्या माणसांसाठी पोटभर श्रीखंड बनवणे हेसुध्दा एक आव्हानच असे. त्या काळात चितळे, वारणा किंवा अमूलचे श्रीखंडाचे डबे आणून ते फ्रीजमध्ये ठेवायची सोय नव्हती. जितके श्रीखंड करायचे असेल त्याच्या तीन चारपट दूध आदल्या दिवशी आणून ते तापवायचे, त्याला चिनी मातीच्या बरणीत किंवा मातीच्या मडक्यात विरजण लावून ठेवायचे, दही जमताच त्याला पंच्यात बांधून खुंटीला टांगून ठेवायचे आणि अखेर ते पंच्यातले चक्क्याचे गोळे एकत्र करून त्यात पिठीसाखर, वेलदोड्याची पूड, केशर वगैरे चांगले मिसळायचे, जायफळ उगाळून त्याची पेस्ट त्याला लावायची, त्यावर चारोळ्यांचे दाणे पसरायचे वगैरे सारे सोपस्कार केल्यानंतर ते श्रीखंड बनायचे. या सर्व प्रक्रियांमध्ये वेळेला अनन्यसाधारण महत्व असते. त्यातली कोणतीही कृती वेळेवर केली नाही तर घोटाळा होण्याची शक्यता असते. सगळी अवधाने सांभाळून अखेर ज्या वेळी ते पानात वाढले जाईल त्या वेळी त्या श्रीखंडाला नेमका हवा तितकाच आंबटपणा आणि गोडवा आला म्हणजे मिळवली.
कोठल्याही सणासुदीला नैवेद्यासाठी शेवयाची खीर आणि पुरण असायलाच हवे अशी प्रथा त्या काळी होती। श्रीखंड हे मुख्य पक्वान्न झाले. नैवेद्याच्या ताटात एकादा लाडू, मोदक किंवा शि-याची मूद ठेऊन 'पंच'पक्वान्नाचा आंकडा साधला जात असे. जेवणावळीसाठी केळीची पाने आणून, त्यांना बरोबर सारख्या आकारात कापून ती मांडली जात. शक्यतो प्रत्येक पानाभोवती कमानीची रांगोळी काढली जाई. यात आपापली कला दाखवण्याची चुरस असे. अगदीच वेळ कमी पडला तर उरलेल्या पानांभोवती रांगोळी घालण्याच्या यंत्राने पट्टे ओढत. त्यात फुले आणि वेलबुट्ट्यांची नक्षी निघत असे.
पानांत कोणते अन्नपदार्थ कोणत्या क्रमाने आणि कोणत्या जागेवर वाढायचे याचे नियम ठरलेले होते। केळीच्या पानाच्या डाव्या भागात सर्वात वर मीठ आणि लिंबाची फोड ठेवायची. त्यानंतर अनुक्रमाने कुटलेली सुकी चटणी, वाटलेली ओली चटणी, कोशिंबीर, भरीत, चटका वगैरे दुय्यम तोंडी लावणी असत. अखेरीस तळलेले सांडगे, पापड्या, कुरडया, भजी वगैरे कुरकुरीत पदार्थाने डावी बाजू सजत असे. उजव्या बाजूला ईशान्य दिशेला आमटीचा द्रोण ठेवलेला असे. भोपळा किंवा वांग्याच्या भाजीतल्या मोठ्या फोडींचा उपयोग द्रोणाला आधार देण्यासाठी करून कांही लोक या नावडत्या भाज्या खाणे टाळत. बटाट्याची सुकी भाजी हवीच, जोडीला फ्लॉवरचा रस्सा किंवा एकादी सैलशी पालेभाजीही असे. आग्नेय बाजूला भाताची पांढरी शुभ्र मूद अलगद हाताने ठेवून तिच्यावर पिवळ्या धम्मक वरणाने 'आइसिंग'सारखी सजावट करीत. त्यावर पळीभर तूप वाढले की पहिले वाढणे संपले.
'वदनी कवळ घेता .....' श्रीहरीचे नांव घेऊन 'यन्तुनदयो वर्षन्तु पर्जन्याः सुपिप्पलाओषधयो भवन्तु। .......' अशी प्रार्थना करायची आणि नमःपार्वतीपते हरहरमहादेव श्रीगुरुदेवदत्त असा सामूहिक जयजयकार करून जेवणाला सुरुवात होत असे। त्यातसुध्दा पहिल्या घासात खीर संपवायची, त्यानंतर लिंबाची फोड वरणभातावर पिळायची, त्यावर द्रोणातली आमटी ओतून भात कालवून घ्यायचा हा जेवण सुरू करण्याचा अलिखित क्रम ठरलेला असायचा. त्यानंतर हवा तो पदार्थ खायला मोकळीक होत असे. तोंपर्यंत भात वरण आणि तूप वाढायला येत असे. पुढे श्रीखंडपुरी येणार हे ठाऊक असल्यामुळे सहसा कोणी तो घेत नसे. 'पांढ-या' भाताच्या पाठोपाठ 'काळा' किंवा मसालेभात येई तो मात्र आवडीने घेऊन खाल्ला जात असे. बटाटा, वांगी, तोंडली वगैरेंच्या फोडी घातलेला मराठी मसालेभात व्यवस्थित रीतीने केला तर फ्राइड राईस, पुलाव किंवा बिर्याणीपेक्षाही अधिक चविष्ट लागतो असे माझे मत आहे.
भातप्रकरण शक्यतों झटपट आवरून गाडी श्रीखंडपुरीच्या मुख्य रुळांवर येत असे। त्या सुमारास श्लोक म्हणणे सुरू होत असे. समर्थांचे मनाचे श्लोक हा मुख्य स्टॉक असला तरी वामन पंडित आणि मोरोपंतांच्या रचनांना प्राधान्य मिळे. संस्कृत श्लोक म्हंटले तर जास्तच चांगले, पण त्यात रामरक्षेतले सर्वांना तोंडपाठ असलेले श्लोक टाळले जात. शहरातून आलेले पाहुणे टाळाटाळ करायचा प्रयत्न करीत, पण त्यांना जास्तच आग्रह होत असे. अखेर थोड्याफार प्रॉम्प्टिंगच्या सहाय्याने ते आग्रहाला मान देत. सगळ्यांनाच श्रीखंडाचा भरपूर आग्रह होत असे. त्या काळातल्या जीवनशैलीमुळे मधुमेह, रक्तदाब वगैरे विकारांचे प्रमाण फारसे नसे आणि नियमितपणे वैद्यकीय तपासण्या करण्याची सोय व पध्दत नसल्यामुळे कोणाला हा रोग जडला असल्याचे तो विकोप्याला जाण्याच्या आधी समजतही नसे. त्यामुळे घरातली एकादी आजारी व्यक्ती सोडल्यास इतर कोणाचेच कसलेही पथ्य नसे. वेळ पडल्यास नेहमीच्या जेवणाच्या दुप्पट तिप्पट आहार सेवन करण्याची क्षमता सगळ्यांकडे असे. त्याचा अशा प्रसंगी पुरेपूर उपयोग करून घेतला जात असे. निदान तासभर तरी रंगलेली पाडव्याच्या मेजवानीची पंगत ताकभाताने संपे तेंव्हा सर्व मंडळी तृप्त होऊन "अन्नदाता, पाककर्ता, भोजनकर्ता सुखी भव। " असा आशीर्वाद देऊन पानावरून उठत.
. . . . . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment