Friday, October 24, 2008

आजीचे घड्याळ - भाग १२ घड्याळ


"पंचांग जसं अजूनपर्यंत थोडं तरी आपल्या वापरात आहे तसं घटिकापात्र मात्र राहिलेलं नाही. ते कधीच नामशेष झालं. असं कां झालं असेल?" माझ्या मित्राने विचारले.
मी म्हंटले,"ते तर आता पुराणवस्तुसंग्रहालयातसुद्धा शोधावे लागेल. घड्याळाच्या मुकाबल्यात त्याचा टिकाव लागण्याची शक्यताच नव्हती. भारतातच नव्हे तर जगभर पुरातनकालातली वेळ मोजण्याची साधने आता कालबाह्य झाली आहेत."
"असं कशामुळे झालं?"
"पहिली गोष्ट अशी आहे की आपण नेहमी 'किती वाजले' ते घड्याळात पाहतो. घटिकापात्रात ते पाहण्याची सोय नाही. ते पाण्यात ठेवल्यानंतर घटकाभराने भरून बुडले म्हणजे 'एक घटिका झाली' असे समजायचे. त्याआधी किती वेळ झाला ते कळणार नाही आणि घटिकापात्र बुडून गेल्याला किती वेळ झाला ते तर नाहीच नाही. यामुळे ते वेळ 'दाखवणारे' साधन नव्हते. त्या काळात तशा साधनाची गरजही नव्हती. आज आपण अमूक गोष्ट इतक्या वाजता झाली किंवा होणार आहे असे म्हणतो. पौराणिक किंवा ऐतिहासिक वाङ्मयात तसे उल्लेख दिसत नाहीत. तासाप्रमाणे घटिका 'वाजत' नव्हत्या. सूर्योदयानंतर इतक्या घटिकांनी अमका ग्रह तमक्या राशीत जाईल असे सांगण्यासाठी तिचा उपयोग होत असे. एक छोटासा ठराविक कालावधी मोजण्याएवढाच तिचा उपयोग होता. 'हरिनामाचा गजर करणे' किंवा 'औषधी पाण्यात उकळत ठेवणे' अशी कामे करण्यात लागणारा वेळ त्याने मोजता येत असेल. फार तर मरणासन्न माणसाच्या शेवटच्या घटका मोजून ठेवत असतील. अर्थातच ज्योतिषी लोक आपली निरीक्षणे करण्यासाठी सूर्योदय झाल्याबरोबर घटिका पात्र पाण्यात ठेऊन कालमापन करीत असतील आणि त्याकडे लक्ष ठेऊन दरवेळी घटिका संपताच ते पुन्हा पुन्हा रिकामे करून ठेवत असतील आणि किती घटिका सरल्या ते मोजत असतील. पण हे काम थोडे किचकटच होते आणि विशिष्ट कामासाठी विशेषज्ञ लोकच त्याचा उपयोग करू शकत असणार. सर्वसामान्य माणसाला अशा प्रकारे वेळ मोजण्याची गरज पडत नसेल."
"त्या काळांत इतर देशात कोणती परिस्थिती होती?"
"त्या काळात जगभर साधारणपणे हीच परिस्थिती होती. घटिकापात्राप्रमाणेच थोडा वेळ मोजणारी साधनेच सगळीकडे उपयोगात असायची. त्यात कुठे मेणबत्तीच्या जळण्यावरून वेळ ठरवीत तर कुठे उदबत्तीच्या संपण्यावरून. थेंब थेंब टपकणा-या पाण्याचासुद्धा त्यासाठी वापर केला गेला. कांच तयार करून त्याला आकार देण्याच्या तंत्राचा विकास झाल्यानंतर सुप्रसिद्ध 'अवरग्लास' आले. ही वाळूची घड्याळेसुद्धा घटिकापात्राप्रमाणेच ठराविक कालावधी मोजण्यासाठी उपयोगी पडत. सामुदायिक प्रार्थना आणि प्रवचने वगैरेमध्ये किती वेळ गेला हे त्यावरून ते पहात असत आणि वाटल्यास ते आटपते घेत असत. सनडायल्सवरून मात्र सूर्य माध्यान्हीवर येण्याची वेळ तेवढी नेमकी कळत होती. अजून माध्यान्ह व्हायला किती वेळ आहे किंवा तो होऊन किती वेळ झाला हे इतर वेळी सांवलीच्या लांबीवरून समजायचे. पण ते पाहण्यासाठी स्वच्छ ऊन तर पडायला पाहिजे!"
"आपल्या घटिकापात्राचा आणखी कशा प्रकाराने उपयोग करता आला असता कां?"
"इतर घड्याळांची रचना पाहिल्यावर असे वाटते की घटिकापात्रातही कांही सुधारणा करता आल्या असत्या. दोन, चार किंवा दहा घटिका पाण्यावर तरंगणारी वेगवेगळी पात्रे बनवता आली असती किंवा त्या पात्रांवर बाहेरून आडव्या रेघा कोरून ते पाण्यात कुठपर्यंत बुडले ते पाहून त्यावरून वेळ ठरवता आली असती. ते पात्र हळू हळू पाण्यात खाली जात असतांना होणारी त्याची हालचाल टिपता आली असती. त्याठी एक दोरा बांधून त्याच्या दुस-या टोकाला सरकणारा किंवा फिरणारा कांटा जोडता आला असता. अशा कांही कल्पना सांगता येतील. त्यातल्या कांहींचा उपयोग करून घेतला गेलासुद्धा असेल. किंवा मुळात कुणाला त्याची गरजच वाटली नसेल. आता त्याबद्दल विशेष माहिती नाही."
"तास मिनिटाची वेळ काट्याने दाखवणारी घड्याळे कशी अस्तित्वात आली?"
"फिरणा-या चाकाचा शोध लागल्यानंतर गाडी, जाते, रहाट, चरखा अशा प्रकारच्या अनेक यंत्रांत त्याचा उपयोग होता होता त्याचा अधिकाधिक विकास होतच होता. दांते असलेली चक्रे (गियर) एकमेकांना जोडून त्यांना वेगवेगळ्या वेगाने फिरवणा-या यंत्रांचा विकास झाल्यानंतर त्यांच्या योगाने फिरणारे तास व मिनिटे दाखवणारे कांटे बनवण्याची कल्पना कोणाला तरी सुचली. अशा प्रकारचे पहिले घड्याळ सुमारे सातशे वर्षांपूर्वी बनवले गेले. ते कांटे फिरवण्यासाठी एका दोरीला टांगलेल्या वजनाचा उपयोग होत होता. पण अशा प्रकारे गुरुत्वाकर्षणाने खाली पडणारी वस्तू एका वेगाने खाली पडत नाही. तिचा वेग सतत वाढत जातो. त्यावर उपाय म्हणून त्याचे खाली पडणे थांबवणारे दुसरे एक छोटे चाक त्यालाच जोडले. हे 'नियंत्रक चाक' ठराविक कालावधीने मुख्य चाकाला आळीपाळीने खीळ घालत असे आणि ढील देत असे. या प्रत्येक वेळी उडणा-या खटक्यामुळे घड्याळाची 'टिकटिक' सुरू झाली. या टिकटिक करणा-या कांट्यांच्या घड्याळांना एक नाविण्यपूर्ण शोभेची वस्तू म्हणून अमीर उमरावांमध्ये मान्यता मिळाली आणि ती प्रतिष्ठितांचे दिवाणखाने सजवू लागली. त्यामुळे आपोआपच त्यावर कलाकुसर केली जाऊ लागली. आकर्षकता वाढवण्यासाठी दर अर्ध्यातासाला टोले वाजवणारी घंटा कोणीतरी जोडली. एका डोकेबाज संशोधकाने टोल्यांऐवजी कुकू अशी शीळ घालणा-या शिट्या त्याला जोडून दिल्या. जर्मनीच्या ब्लॅक फॉरेस्ट विभागात अशी कुकू क्लॉक तयार करण्याचा ग्रामोद्योगच सुरू होऊन भरभराटीला आला."
"पुढे काय झालं?"
"गॅलीलिओ या सुप्रसिद्ध शास्त्रज्ञाने लंबकाची हलण्याची गती स्थिर असते हा शोध लावल्यावर त्याच्या या गुणाचा उपयोग घड्याळाचे नियमन करकण्यासाठी केला जाऊ लागला आणि अचूक वेळ दाखवणारी लंबकाची घड्याळे प्रचारात आली. या सुमारास औद्योगिक क्रांतीला वेग आल्याने कारखाने सुरू झाले व एका नव्या संस्कृतीची सुरुवात झाल्यामुळे वेळेचे महत्व अचाट वाढले. सर्वसामान्य लोकांना वेळ कळावी यासाठी गांवोगांवी क्लॉकटॉवर्स बांधण्यात आले. त्याची उंच इमारत गांवात कोठूनही दिसत असे व त्याच्या माथ्यावर बसवलेल्या घड्याळाचे कांटे पाहता येत असत. दर अर्ध्या तासानंतर वाजणारे त्याच्या घंटेचे टोल किती वाजले याची जाणीव करून देत असत. अशा त-हेने घड्याळे 'वाजू' लागली. याच्याच घरात ठेवण्याजोग्या छोट्या आवृत्या निघाल्या आणि घरोघर पोचल्या. सुरुवातीला ही घड्याळेसुद्धा गुरुत्वाकर्षणाच्या जोराने खाली पडणा-या वजनांवरच चालत. कांही काळाने त्याऐवजी स्प्रिंगचा उपयोर करता येऊ लागला."
"आता तर त्याचीसुद्धा गरज नसते. घड्याळे ऑटोमॅटिक झाली आहेत."
"आकाराने छोट्या पण शक्तीशाली बॅटरीसेल्सचा शोध लागल्यानंतर किल्ली फिरवण्याचीही गरज उरली नाही. इलेक्ट्रॉनिक्समधील विकासानंतर फिरणारी चांकेसुद्धा कालबाह्य झाली. त्यामुळे घड्याळांच्या रचनेत आता खूपच सुटसुटीतपणा आला आहे. त्यातही आता असंख्य मार्ग उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आजीच्या घड्याळाची कोणाला आठवण राहिलेली नाही. पण त्याचे महत्व मात्र कधीही संपणार नाही. ज्या घड्याळाला प्रत्यक्ष सूर्य ऊर्जा पुरवतो, ज्याचे नियंत्रण पृथ्वी करते आणि चंद्र, मंगळ, गुरू वगैरे ज्याचे कांटे तारकांच्या पडद्यावर फिरत असतात, ते निसर्गाचे घड्याळ यावत्चंद्रदिवाकरौ चालतच राहणार आहे. "
"आम्हालाही या निमित्ताने खूप माहिती मिळाली." मित्राने कबूली दिली.

. . . . . . . . . . . . . . .(समाप्त)

2 comments:

Mandar Joglekar said...

Namaskar,

Please do post your blogs on www.MyVishwa.com too. That way larger audience will get benefited.

Thank you
..Mandar M. Joglekar
President & CEO MyVishwa
MyVishwa - "We Create Time"
http://www.MyVishwa.com

Anand Ghare said...

The link given in your comment does not click.