Thursday, October 16, 2008

आजीचे घड्याळ - भाग २ भूतकालनिवेदन

त्या गृहस्थाने माझ्यासमोर धरलेली कुंडली थोडी पाहून होताच मी डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला आणि खर्जाच्या आवाजात बोलायला सुरुवात केली। "रात्रीचा पहिला प्रहर आहे। सगळीकडे अंधार पसरला आहे"
" अहो काका, तो बघा बाहेर अजून उजेड दिसतो आहे." अमोल उद्गारला.
"मी या जन्मकुंडलीमध्ये पाहून त्या मुलाच्या जन्मकाळातली स्थिती सांगतो आहे. मध्ये बोलून माझी एकाग्रता भंग करू नकोस. चंद्र अजून मावळायचा आहे. पण आकाशात ढगांची गर्दी असल्यामुळे फारसे चांदणे दिसत नाही. अधून मधून विजा चमकून एकादी पावसाची सर येते आहे. ढगांच्या गडगडाटाशिवाय दुसरेही कांही आवाज ऐकू येत आहेत. झांजा आणि टाळ्या वाजवून बरेच लोक आरत्या करताहेत. त्यात मोठ्या घंटांचा आवाज नाही. याअर्थी त्या आरत्या देवळात नसून घरोघरी चालल्या आहेत. सगळीकडे आरास केलेली दिसते आहे. हो, हा गणेशोत्सवच साजरा होत आहे. कांही जागी गौरींचे मुखवटेसुद्धा दिसत आहेत. इथपर्यंत बरोबर आहे ना?"

दोघांनीही थोड्या आश्चर्यानेच होकारार्थी माना डोलावल्या. मी पुढे सांगायला लागलो,"उत्सव सुरू आहे, पण त्यात नेहमीचा उत्साह दिसत नाही. सगळे लोक कसल्या तरी भीतीच्या दाट छायेत वावरत आहेत. या मुलाच्या घरातील वातावरण तंग आहे. जवळची कोणी व्यक्ती भूमीगत झालेली आहे किंवा बंधनात अडकली आहे. त्यामुळे इतर लोकांची अवस्था 'तोंड बांधून बुक्याचा मार' अशागत झाली आहे. मुलाच्या जन्माचा आनंद गाजावाजाने साजरा करायच्या मनस्थितीत यावेळी कोणीही नाही."
जसजसे मी एक एक वाक्य हळू हळू बोलत होतो आणि त्या दोघांचे चेहेरे पहात होतो, ते पांढरे पडत चाललेले दिसत होते. त्यांना पाहून अमोलही कावराबावरा होत होता. भूतकाळातून हलकेच मी वर्तमानकाळात येऊन सांगितले, "हा मुलगा आता पंचविशीला आला असला तरी अजून मार्गी लागलेला दिसत नाही. नेहमी धरसोड करण्याची त्याची वृत्ती आहे. कुठल्याही गोष्टीत तो उत्साहाने भाग घेत नाही. त्याच्या मनात कसली हौस, ऊर्मी, महत्वाकांक्षा नाही. कोणतेही काम करतांना त्याला आत्मविश्वास वाटत नाही. त्यामुळे सगळ्यांना त्याच्या भविष्याची काळजी वाटते."
आता त्यांच्या डोळ्याची बुबुळे बाहेर येतील का काय असे मला वाटायला लागले। बाईंनी तोंडाने "राम राम राम राम" असे पुटपुटत दोन्ही हांतांनी कान पकडायला आणि दोन्ही गालांवर हलक्याशा थपडा मारून घ्यायला सुरुवात केली. नवससायास किंवा उपासतापास न करणा-या, सोवळेओवळे न पाळणा-या आणि कसलेही खाणे किंवा पिणे वर्ज्य न मानणा-या माझ्यासारख्या सोम्यागोम्याला दैवी शक्ती प्राप्त होणे तर निव्वळ अशक्य! "कुठल्याशा भूतपिशाच्चाने माझ्यात संचार केला की काय!" अशी शंका त्यांना येऊ लागली असणार. मी पुन्हा डोळे मिटले. एक दीर्घ श्वास घेऊन जागेवरून उठलो. त्या सद्गृहस्थाच्या खांद्यावर थोपटून त्याला म्हंटले, "रिलॅक्स. माझ्यात कसला संचार वगैरे झालेला नाही. मी फक्त थोडासा अभिनय करीत होतो. "
" पण तुम्हाला इतकी तंतोतंत बरोबर माहिती कुठून मिळाली?" त्यांनी मला आश्चर्याने विचारले.
" अहो या कुंडलीमधून!"
"म्हणजे तुम्ही विज्ञानवादी लोकसुद्धा कुंडलीत सगळं असतं हे मानताच ना! गुरूमहाराजांनीसुद्धा कुंडली पाहून त्यावेळी असं असं झालं असणार म्हणून बरोबर सांगितलं होतं."
" त्याबरोबर अमक्या स्थानी राहू होता आणि तमक्या ग्रहाची महादशा चालू होती म्हणून तसं घडलं हेसुद्धा त्यांनी सांगितले असणार."
" म्हणजे काय, ते एक शास्त्रच आहे ना? तसं होणारच . "
" अहो, पृथ्वीवर राहणा-या माणसांनी केलेल्या कृत्यांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली त्याबद्दल आपण आकाशातल्या ग्रहांना उगाच कशाला दोष द्यायचा?"
" त्यांनी नाही केलं तर मग ते आणखी कशामुळे होणार?"
"जगांत घडणा-या प्रत्येक गोष्टीमागे नुसतं एकच कारण नसतं, तर कारणपरंपरा असते. त्यातली कांही कारणे आपल्याला समजतात, कांही कधीच समजत नाहीत। आपण आपला त्यांचा शोध घेत रहायचं ?"
" ते जाऊ दे। पण तुम्हाला सुद्धा कुंडलीमधले ग्रह पाहूनच ही माहिती मिळाली ना? मग त्यांचा तिच्याशी काय संबंध आहे ते आता तुम्हीच आम्हाला सांगा."
"कांहीसुद्धा संबंध नाही। तुम्ही जरी माझ्यापासून लपवून ठेवली असली तरी त्या मुलाच्या जन्माची वेळ तेवढी मला या कुंडलीतल्या ग्रहांच्या जागांवरून मिळाली. त्या वेळी वर्षा ऋतु होता, गौरीगणपतीचा उत्सव सुरू होता, देशात आणीबाणीची परिस्थिती होती आणि त्याचा तुमच्या परिवारावर जबर आघात झाला होता हे सगळं माझ्या सामान्यज्ञानावरून ओघानं आलं. अशा परिस्थितीत आणि वातावरणात वाढलेल्या मुलावर त्याचा काय परिणाम झाला असेल यावर मी मानसशास्त्राच्या आधाराने अंदाजाने खडे मारत राहिलो आणि ते नेमके लागत गेले एवढेच!"
"पण तुम्हाला त्या मुलाच्या जन्माची वेळ तरी कुंडलीवरून कशी समजली?"
"ते मात्र सरळ सरळ विज्ञान आहे. ही जन्मकुंडली म्हणजे आभाळाचा एक नकाशा आहे आणि त्या मुलाच्या जन्माच्या वेळी कोणते ग्रह आकाशाच्या कोणत्या भागात होते ते त्यात दाखवलेले आहे. आता मी अमोलबरोबर खेळत होतो तेंव्हा भारताच्या नकाशावर या खुणा केल्या आहेत. मुंबईहून पुण्याला जाणारी दख्खनची राणी त्या वेळी कोठे धावत असेल आणि कोलकात्याहून मुंबईकडे येणारे विमान कोठे उडत असेल ते खुणा करून या नकाशात दाखवले आहे. या कुंडलीचे स्वरूप अगदी तसेच आहे. आणखी तासाभरात डेक्कन क्वीन पुण्याला पोचेल आणि विमान मुंबईला. म्हणजे त्यांच्या जागा बदलतील. त्याचप्रमाणे हे ग्रह आपल्या कक्षेत फिरत असतांना एका राशीतून दुस-या राशीत जात असतात. आपल्याला त्यांच्या गती माहीत असतील तर त्यांच्या स्थानावरून वेळेचा हिशोब करता येतो."
"तो कसा?" अजून त्यांना माझे सांगणे समजले नव्हते.
मी म्हंटले,"मी दुसरे एक उदाहरण देतो. समजा मी स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी 'चार दिवस सासूचे' ही मालिका पहात पहात जेवण केलं असं सांगितलं तर त्याचाच अर्थ मी पंधरा ऑगस्टला रात्री आठनंतर जेवायला बसलो असा होतो ना? कारण पंधरा ऑगस्टला आपला स्वातंत्र्यदिन असतो आणि रात्री आठ वाजता ई टीव्हीवर 'चार दिवस सासूचे' ही मालिका सुरू होते. त्याचप्रमाणे कोणता ग्रह कोणत्या वेळी कोणत्या राशीमध्ये असायला हवा हे त्यांचा अभ्यास करणा-यांना ठाऊक असते. ते कुठे आहेत हे पाहून त्यांना ती वेळ गणिताने काढता येते."
. . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: