Wednesday, October 01, 2008

अमेरिकेची नवी वाट

पूर्वी माझ्या माहितीतले जे लोक अमेरिकेला जात असत ते सगळेजण आधी न्यूयॉर्कला जाऊन तिथून पुढे शिकागो, बोस्टन, फ्लॉरिडा वगैरेकडे कुठे कुठे जात. मला अमेरिकेच्या भूगोलाची माहिती नसल्यामुळे त्याचा कांही संदर्भ लागत नसे. अमेरिकेला जायचे म्हणजे न्यूयॉर्कला जाऊन स्वातंत्र्यदेवीचे दर्शन घेऊनच पुढे जायचे अशी माझी भाबडी समजूत होती. न्यूयॉर्कला जाण्यासाठीसुद्धा दोन टप्प्यात प्रवास करावा लागे. आधी मुंबईहून लंडन, फ्रँकफूर्ट यासरख्या युरोपातल्या एका शहराला जाऊन, तिथे थोडी विश्रांती
घेऊन पुढे जाणारे विमान पकडावे लागत असे. सिलिकॉन खोर्‍याचा विकास सुरू झाल्यानंतर भारतीयांचे लोंढे तिकडे जाऊ लागले ते मात्र हाँगकाँग, शांघाई, टोकियो वगैरे चिनी जपानी शहरांना जाऊन तिकडून'एले'ला जातात अशी नवी माहिती मिळाली. थेट न्यूयोर्कला जायचे माझे तिकीट निघाले तेंव्हा आपण पश्चिमेकडून जाणार असेच मला वाटले होते. नकाशात मुंबई आणि न्यूयॉर्कला जोडणारी सरळ रेषा काढली तर ती अरबस्तान आणि उतर आफ्रिकेतल्या सहाराच्या वाळवंटावरून जाते. त्यामुळे आपले विमानही कदाचित युरोपला बाजूला ठेऊन सरळ आफ्रिकेवेरून अमेरिकेला जाईल असे वाटले.

मुम्बईच्या विमानतळावरून उडणारी सगळीच विमाने आधी जुहूच्या दिशेने झेप घेतात. समुद्रावर चार पांच मैल गेल्यानंतर डावीकडे वळून हैद्राबाद, बंगळूरूकडे किंवा उजवीकडे वळून दिल्ली, कोलकात्याकडे जातात हे मी अनेक वेळा पाहिले होते. या वेळेस आपले विमान कोठेही न वळता सरळ पश्चिमेकडे पुढे जात राहील अशी माझी अपेक्षा होती. पण उड्डाणानंतर लगेच उजवीकडे वळून ते उत्तरेकडे बडोद्याच्या दिशेने जमीनीच्या वरून उडू लागलेले पाहून आपण चुकीच्या नंबराच्या विमानात बसलो की काय अशी शंका क्षणभर मनात चमकून गेली. आता हे विमान आपल्याला ज्या देशात घेऊन जाईल तिथे जाणे भागच होते. पण मॉनिटरवर न्यूयॉर्क हेच गन्तव्य स्थान दिसत असलेले पाहून जीव भांड्यात पडला आणि ते तिथे कोणच्या मार्गाने जाणार आहे याच्या कुतूहलाने मनात जन्म घेतला.

उत्तर दिशेला दहा बारा अंशाचा कोन करून आमच्या विमानाचे 'झेपावे उत्तरेकडे' सरळ रेषेत चालले होते. गुजरात आणि राजस्थानला पार करून ते पाकिस्तावर आले, तिथून अफगाणिस्तानावरून उडत जात असतांना कोणा तालिबान्याच्या तोफेचा गोळा तर तिथपर्यंत चुकून येणार नाही ना याची काळजी वाटली. पण रमजानच्या महिन्यात रात्रीचा इफ्तार खाऊन ते सारे गाढ झोपी गेलेले असणार! अफगाणिस्तानावरून आमचे विमान कझाकस्तान, उझ्बेकिस्तान वगैरे देशांवरून जात होते. ताश्कंदचा एक अपवाद सोडला तर तिकडचे कोणतेही ठिकाण ओळखीचे वाटत नव्हते. पृथ्वीवरचा इकडचा भाग मी यापूर्वी कधी नकाशातदेखील पाहिलेला नव्हता. आणखी वर (म्हणजे उत्तरेकडे) गेल्यावर उरल पर्वतांच्या रांगा (मॉनिटरवर) दिसू लागल्या. बाहेर अंधार गुडुप असल्यामुळे खिडकीतून कांहीच दिसण्यासरखे नव्हते.
मॉस्कोलासुद्धा दूर पश्चिमेकडे सोडून आमचे उडाण उत्तर दिशेने वर वर चालले होते . थोड्या वेळाने इस्टोनिया, लाटव्हिया वगैरे देश बाजूला सोडून आणि फिनलंड, स्वीडन यांना मागे टाकून आम्ही नॉर्वेच्या पूर्व टोकाला स्पर्श केला. भारतापासून इथपर्यंत आम्ही जमीनीवरूनच उडत होतो. नॉर्वे ओलांडल्यानंतर पहिल्यांदा एक समुद्र आला. ऍटलांटिक महासागर जिथे आर्क्टिक महासागराला मिळत असेल तो हा भाग असावा. आपण आपल्या आयुष्यात कधीही उत्तर ध्रुवाच्या इतक्या जवळ येऊ असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. खिडकीबाहेर एक गम्मतशीर दृष्य दिसत होते. खाली सगळा अंधार होता पण आमच्या बाजूला क्षितिजापलीकडे थोडा अंधुक उजेड दिसत होता. तो बहुधा उत्तर ध्रुवाच्या पलीकडे ज्या भागात दिवस होता तिकडून आकाशात परावर्तित होत असावा.

आमचे विमान नाकासमोर सरळ रेषेत उडत असले तरी नकाशात मात्र ते डावीकडे वळत वळत आधी उत्तरेऐवजी वायव्येकडे, त्यानंतर पश्चिमेकडे, नैर्हुत्येकडे करीत चक्क दक्षिण दिशेने उडू लागले. वाटेत ग्रीनलँडचा बर्फाच्छादित भागही येऊन गेला आणि आम्ही उत्तरेच्या बाजूने कॅनडात प्रवेश केला. यापूर्वी एकदा मी पूर्वेच्या बाजूने कॅनडात येऊन नायगारापर्यंत म्हणजे यूएसएच्या सीमेपर्यंत आलो होतो. या वेळी ती (विमानातून) ओलांडून स्टेट्समध्ये दाखल झालो. नव्या देशात आल्याचा आनंद होताच, एक नवी वाट
पाहिल्याचा बोनस मिळाला.

No comments: