Thursday, October 23, 2008

आजीचे घड्याळ - भाग ११ पंचांग की कॅलेंडर ?

"आपलं इतकं सर्वगुणसंपन्न असं पंचांग सोडून देऊन आपल्या लोकांनी इंग्रजी कॅलेंडरचा स्वीकार कां केला?" मिस्टरांनी विचारले.
मी उत्तर दिले,"मला तर भारतीय संस्कृतीचं प्रेम नाही, आपल्या पूर्वजांबद्दल आदर नाही, मी परकीयांचा धार्जिणा आहे असं तुम्ही राष्ट्रनिष्ठ लोक मला म्हणता. तेंव्हा खरं तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायला हवं."
ते निरुत्तर होऊन एकमेकांकडे पहायला लागले. मग मीच विचारले, "आपण भाद्रपद शुद्ध त्रयोदशीला सूर्योदयानंतर पंचवीस घटकांनी पुण्याला जाणा-या गाडीने जाऊ असं तुम्ही बोलता का?"
"तसं बोललं तर ते कुणाला समजणार?"
"बरं, पंचवीस सप्टेंबरला दुपारी चारच्या बसने पुण्याला जाऊ असं म्हणता ना?"
"हो."
"अनंत चतुर्दशीला गणपती विसर्जनाची मिरवणूक पहायला पुण्याला जाऊ असंही म्हणत असाल. म्हणजे तुम्ही पंचांग सोडलेले नाही."
"हो. कारण त्यातली अनंत चतुर्दशी सगळ्यांना माहीत असते."
मी म्हंटले,"अगदी बरोबर! आपलं बोलणं ऐकणा-याला कळावं हा बोलणा-याचा मुख्य उद्देश असतो. आपलं पंचांग बनवतांना ते अधिकाधिक परिपूर्ण व्हावं यासाठी त्यात भरपूर माहिती घातली गेली. सामान्य माणसाला तिचा रोजच्या जीवनात उपयोग होईल अशी अपेक्षाही नव्हती आणि त्याला ती रोजच्यारोज वापरण्याची गरजही नव्हती. पंचांगाचं हे मूळ स्वरूप आजसुद्धा तसेच राहिले आहे. संस्कृतऐवजी मराठी भाषा आली, इंग्रजी तारखांचा त्यात समावेश झाला आणि सूर्योदय व चंद्रोदयाची वेळ कलाक मिनिटांमध्य़े देतात एवढे बदल झाले असले तरी एकूण स्वरूप पूर्वीसारखेच राहिले. तिथी व नक्षत्रांच्या वेळा कलाक मिनिटांत दिल्या तरी तिथींमधले क्षय वृद्धी वगैरे टाळता येणार नाहीत. सूर्योदयाची वेळ गांवोगांवी वेगळी राहणार. त्यातही वेगवेगळ्या पंचांगकर्त्यांची मते वेगळी असतात. उत्तर भारतात विक्रम संवत पाळतात तर दक्षिणेत शालीवाहन शक, उत्तरेतला महिना पौर्णिमेनंतर सुरू होतो तर दक्षिणेतला अमावास्येनंतर, उत्तरेमध्ये नववर्ष कार्तिकापासून सुरू होतं तर दक्षिणेमध्ये चैत्रमासापासून. एका तिथीचा अर्थ वेगवेगळा लागू शकतो. असे असंख्य फरक असल्यामुळे पंचांग वापरणे आता सोयिस्कर राहिलेले नाही. "
"पण म्हणून परकीयांच्या कॅलेंडरला त्याची जागा द्यायची कां?"
" इंग्रजांच्या राज्यापाठोपाठ तिकडल्या औद्योगिक क्रांतीचे वारे भारतात आले. त्यामुळे वेळेनुसार काम करणारी ऑफिसे, कारखाने, शाळा, कॉलेजे सुरू झाली. कामाचे आणि सुटीचे दिवस आणि वार ठरले, हक्काची व किरकोळ रजा यांचे नियम झाले. वेळापत्रकानुसार धांवणा-या आगगाड्या सुरू झाल्या. या नव्या वातावरणात तारीख आणि वेळ यांना अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. फक्त वार आणि तारीख या दोनच गोष्टी आठवड्याच्या कोष्टकात दाखवणारी कॅलेंडरे फारच सुटसुटीत होती. खिशात ठेवता येण्याजोगी छोटी, टेबलावर ठेवण्यासाठी थोडी मोठी आणि भिंतीवर टांगण्यासाठी मोठ्या अक्षरातली अशा त्याच्या विविध आवृत्या निघाल्या. त्यांच्याबरोबर रंगीबेरंगी चित्रे येऊ लागली. त्यात देवदेवतांची सुंदर चित्रे असतात तशाच नटनट्यांच्या मोहक हंस-या छब्या असतात. निसर्गरम्य ठिकाणांची छायाचित्रे असतात तशाच प्रसिद्ध चित्रकारांच्या कलाकृती असतात. अशा प्रकारे कळायला अत्यंत सोपे आणि दिसायला आकर्षक असे कॅलेंडर लोकप्रिय झाले नाही तरच नवल!

पण "पंचांगाची जागा कॅलेंडरने घेतली" असे म्हणता येणार नाही. नव्या जीवनशैलीमुळे रोजच्या जीवनात तारखेचा उल्लेख येऊ लागला होता. त्यामुळे ती सुलभपणे समजणा-या साधनाची आवश्यकता निर्माण झाली होती. ती जागा कॅलेंडरने काबीज केली. कॅलेंडरमधील महिना व तारखेबरोबरच त्या दिवसाची तिथी, नक्षत्र, संकष्टीच्या रात्री चंद्रोदयाची वेळ वगैरे माहिती देणारी नव्या प्रकारची कॅलेंडरे अलीकडच्या काळात बाजारात आली आणि त्यांनी प्रकाशनाचे जागतिक उच्चांक प्रस्थापित केले. एका अर्थाने पाहता कॅलेंडरला पंचांग जोडल्यामुळे ते अधिक लोकप्रिय झाले असे म्हणता येईल."
"किंवा पंचांग एका नव्या स्वरूपात पुन्हा लोकांच्या समोर आले आहे असेही म्हणता येईल."
"हो. कारण आपले सणवार बहुतकरून निसर्गाबरोबर जोडलेले आहेत आणि त्यामधील अनेक उत्सवात चंद्राला महत्व आहे. कोजागिरीला शरदाचे चांदणे हवे आणि नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती यायलाच हवी. हे सण इतर दिवशी येऊन चालणार नाही. नवरात्रीत गरबा खेळण्यासाठी शुक्लपक्षातील चांदण्या रात्री हव्यात, तर दिव्याची अमावास्या किंवा दीपावलीचा दीपोत्सव साजरा करण्यासाठी अमावास्येचा अंधार हवा. महात्मा गांधींचा 'बर्थ डे' आपण तारखेने पाळू शकतो. पण राम, कृष्ण, हनुमान, दत्त, गौतमबुद्ध, महावीर, गुरु नानक यांच्या 'जयंत्या' कोणत्या तारखेला साज-या करणार? या सगळ्या उत्सवांचे आपल्या जीवनात इतके महत्व आहे की त्यांच्याविना आपण राहूच शकत नाही.

याच कारणामुळे मुसलमान शासकांनी आणलेले हिजरी कॅलेंडर इथे लोकप्रिय होऊ शकले नाही. त्यांची कालगणनेची पद्धत संपूर्णपणे चंद्राच्या दर्शनावर आधारलेली असल्यामुळे त्यांच्या बारा महिन्यांचे वर्ष आपल्यासारखेच ३५४ दिवसात संपते. पण अधिक महिन्याची पद्धत नसल्यामुळे दर सहा वर्षात ऋतु बदलत जातो. ते आपल्या सणांना चालणार नाही. चैत्रगौर ऑगस्ट महिन्यात आली तर आंब्याची डाळ आणि पन्ह्यासाठी कैरी कशी मिळणार? त्याशिवाय आपल्या कृषीप्रधान संस्कृतीमध्ये पिकांची पेरणी, कापणी वगैरे गोष्टी वेळेवर व्हायला हव्यात. त्यासाठी महिने आणि ऋतु यांत ताळमेळ असायला पाहिजे. त्यामुळे रोजच्या व्यवहारासाठी इंग्रजी कॅलेंडरचा स्वीकार केला असला तरी पंचांगावर आधारलेली पद्धतीसुद्धा प्रचारात राहिली आहे आणि राहणार आहे.


. . . . . . . . .. .. . . . . . . . . (क्रमशः)

No comments: