Tuesday, October 21, 2008

आजीचे घड्याळ - भाग ८ कालगणना


"आपल्या थोर पूर्वजांनी एवढं मोठं ज्योतिषशास्त्र कशासाठी निर्माण करून ठेवलं आहे?" हा एक बिनतोड सवाल अमोलच्या बाबांनी केला होता. त्या शास्त्राची प्रचंड व्याप्ती पाहता ती कांही सहजासहजी गंमत म्हणून करता येण्याजोगी गोष्ट नाही हे स्पष्ट आहे. परंपरागत भारतीय ज्योतिषशास्त्र 'खगोल' आणि 'होरा' या दोन्ही अंगांना धरून विकसित झालेले असल्यामुळे त्याचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे. ग्रहांच्या भ्रमणाची गति प्रत्यक्षात सुपरसॉनिक विमानापेक्षासुद्धा जास्त असली तरी ते ग्रह आपल्यापासून फार दूर असल्यामुळे आभाळात ती अत्यंत धीमी दिसते. साध्या डोळ्यांना ती जाणवू शकत नाही. त्यांच्या सूक्ष्म हालचाली वर्षानुवर्षे टिपून त्यांची कोष्टके व सूत्रे बनवणे हे अत्यंत जिकीरीचे काम आहे. ते करण्यासाठी असामान्य बुद्धीमत्ता आणि कमालीची चिकाटी या दोन्ही गुणांची मोठ्या प्रमाणात गरज लागते. ते एकट्या दुकट्याचे काम नाही. अनेक विद्वानांनी त्यांच्या पूर्वीच्या लोकांनी केलेल्या निरीक्षणांचे
विश्लेषण करून त्यात स्वतःच्या कार्याची भर घालीत ते शास्त्र नांवारूपाला आणलेले आहे. हा सगळा खटाटोप कोणत्या उद्देशाने केला असेल आणि त्यातून काय साध्य झाले असेल हा प्रश्न साहजीकच उपस्थित होतो.


ते समजून घेण्यासाठी क्षणभर आपण प्राचीन काळात जाऊ. त्या वेळी छापखाने नव्हते, त्यामुळे घरोघरी पंचांगे, कॅलेंडरे किंवा दैनंदिनी नसत. कांट्यांची घड्याळेसुद्धा नव्हती. पण तेंव्हासुद्धा माणसांना आजच्याइतकीच तीक्ष्ण स्मरणशक्ती होती. होऊन गेलेल्या किरकोळ गोष्टी थोडे दिवस, तर महत्वाच्या गोष्टी जन्मभर त्यांच्या लक्षात रहात. पण त्या कधी आणि केंव्हा घडल्या हे कशाच्या संदर्भात स्मरणात ठेवायचे किंवा त्या गोष्टी कशा दुस-याला सांगायच्या हा एक प्रश्न होता. त्यासाठी त्याच काळात घडलेल्या दुस-या एकाद्या घटनेचा आधार घ्यावा लागत असे.
"आपल्या काळ्या मांजरीला पिल्लं झाली होती ना, त्याच दिवशी महाद्या आपल्याकडे आला होता." अशा प्रकाराने तो कधी आला होता ते सांगायचे. मोठा कालावधी असेल तर "गांवातल्या नदीला महापूर येऊन शंकराच्या देवळांतल्या पिंडीपर्यंत पाणी आलं होतं तेंव्हा आमचा गणप्या रांगायला लागला होता." असे सांगून त्यावरून त्याचे वय ठरायचे. माझ्या लहानपणी खेड्यातल्या अशिक्षित लोकांचे अशा प्रकारचे संवाद मी ऐकलेले आहेत. त्या काळातल्या अशिक्षित लोकांना जानेवारी, फेब्रूवारी किंवा आश्विन, कार्तिक या शब्दामधून काळाचा पूर्ण अंदाज लागत नसे कारण ते त्यांच्या रोजच्या जीवनात उपयोगात येणारे शब्द नव्हते। मग ज्या काळात हे शब्दसुद्धा अस्तित्वात नव्हते तेंव्हा लोक काय करीत असतील?


प्राचीन काळातील लोक अशाच प्रकारच्या समकालीन घटनांचा आधार घेत असतील. पण अशा घटना किती लोकांना ठाऊक असतील? आणि किती काळ त्यांच्या लक्षात राहतील? 'काळ्या मांजरीला पिले झाली' ही गोष्ट त्या घरातल्या आणि जवळच्या शेजा-यांना तेवढी माहीत असणार आणि फार फार तर ती पिले मोठी होईपर्यंत दीड दोन महिने ती त्यांच्या स्मरणात राहील. इतर लोकांना त्या गोष्टीचा पत्तादेखील लागणार नाही. नदीला कधीतरी आलेला महापूर त्या गांवात त्या काळात रहात असलेल्या लोकांना कळला असणार आणि कदाचित तो त्यांच्या जन्मभर लक्षात राहील, पण बाहेरच्या लोकांना त्यातून कोणता बोध होणार? यामुळे अशा प्रकारच्या घटनांच्या संदर्भाचा उपयोग खूप मर्यादित असतो.


घरात व गांवात घडणा-या घटना थोड्या लोकांच्या लक्षात रहातील. पण निसर्गात होणारे मोठे बदल त्यापेक्षा अधिक विस्तृत भागातील सर्वच लोकांच्या लक्षात येतात. दिवस किंवा रात्र, सकाळ- दुपार- संध्याकाळ या सगळ्यांना समजणा-या घटना आहेत. एकादी गोष्ट केंव्हा झाली हे सांगण्याचा तो उत्तम मार्ग आजसुद्धा आपल्या बोलण्यात वारंवार येतो. नेहमीच घड्याळाकडे पाहून "इतक्या वाजता अमकी गोष्ट झाली" असे कांही आपण बोलत नाही. "तेंव्हा नुकतंच उजाडलं होतं " किंवा "भर दुपारी असं असं झालं बघा." असेही सांगतो. त्याचप्रमाणे उन्हाळा, पावसाळा आणि थंडी हे ढोबळ ऋतु तेंव्हा घडणा-या वातावरणातील बदलांमुळे लगेच लक्षात येतात आणि राहतात. त्यांचाही उपयोग काळाच्या संदर्भासाठी सर्रास होतो. पण या गोष्टी पुनःपुन्हा होत असतात. सकाळ, दुपार वगैरे रोज होतात आणि उन्हाळा पावसाळा तीन चार महिन्यांच्या अंतराने दरवर्षी येतात. त्यांच्या मधल्या आणि पलीकडच्या कालखंडांचा संदर्भ कसा द्यायचा?


आपल्या वातावरणात, निसर्गात होत असलेले बदल जसे सर्वांच्या लक्षात सहजपणे येत होते तसेच आकाशात दिसणारे बदलसुद्धा समजत होते. जमीनीवर दिसणा-या बदलांपेक्षा हे बदल जास्त वक्तशीर आणि भरोशाचे आहेत हे त्यातल्या जाणकारांच्या लक्षात आले असणार. दिवस आणि ऋतु यांना जोडणारा एक दुवा हवा होता. चंद्राच्या कलांच्या रूपात हा दुवा निसर्गात सापडला. चंद्राचा आकार रोज बदलत असतो. अमावास्येच्या दिवशी तो दिसतच नाही, त्यानंतर कलेकलेने वाढत जात पौर्णिमेला पूर्ण गोलाकार होतो, मग पुन्हा कलेकलेने घटत जाऊन अमावास्येला अदृष्य होतो. हे चक्र फिरत राहते. याच्या आधारावर महिना ठरला.


पण एक महिना दुस-या महिन्यापासून वेगळा कसा ओळखायचा? त्यासाठी चंद्राच्या आजूबाजूला असलेल्या ता-यांचे सहाय्य झाले. रोज चंद्र आदल्या दिवसाच्या मानाने उशीराने उगवतो हे तर लक्षात आलेच, त्याशिवाय त्याच्या आजूबाजूला असणारे तारे रोज वेगळे असतात हेही कळले. यावरून या ता-यांची सत्तावीस भागात विभागणी करून सत्तावीस नक्षत्रे निर्माण केली आणि रोज चंद्र एका नक्षत्रातून दुस-या नक्षत्रात जातो अशी कल्पना केली. अशा प्रकारे सत्तावीस दिवसानंतर तो पुन्हा पहिल्या नक्षत्रात आलेला असतो पण प्रत्येक २९-३० दिवसांनी येणा-या अमावास्येपर्यंत दोन किंवा तीन घरे पुढे जातो. त्यामुळे पुढला महिना तो वेगळ्या नक्षत्रापासून सुरू करतो. अशा प्रकाराने तिथी व नक्षत्र हे दोन्ही एकत्र पाहिल्यास प्रत्येक महिन्यात वेगळा संच दिसतो. पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो त्याचे नाव त्या महिन्याला दिले. 'अश्विनी'पासून 'आश्विन',' कृत्तिके'पासून 'कार्तिक' वगैरे महिन्यांची नांवे अशी ठरली.


विद्वानांचे जसे चंद्राकडे लक्षपूर्वक पाहणे चालले होते तसेच सूर्याचे निरीक्षणसुद्धा होत होते. रोज सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी अर्घ्य देण्यासाठी त्याचे दर्शन ते करीतच असत. त्यामुळे सूर्योदयापूर्वी मंद होत मावळणा-या आणि सूर्यास्तानंतर प्रकाशमान होत उगवणा-या चांदण्यांना पाहून कोणत्या राशीमधून व नक्षत्रातून सूर्याचे भ्रमण चालले आहे याचा अंदाज त्यांना येत असे. निसर्गात होणारे बदल हे त्याच्याबरोबर निगडित आहेत. मृग नक्षत्रात सूर्य गेल्यावर पावसाळा सुरू होतो आणि हस्त नक्षत्रातून बाहेर पडल्यानंतर सर्वसाधारणपणे पाऊस संपतो. मकर राशीत सूर्य गेल्यावर दिवस लहानाचा मोठा होऊ लागतो. मेष, ऋषभ, मिथुन राशीत दिवसाचा काळ मोठा असल्यामुळे उकाडा होतो. कर्क राशीत सूर्य गेल्यावर दिवस लहान व रात्र मोठी होत जाते आणि वृश्चिक व धनु राशीत ती जास्त मोठी होऊन कडाक्याची थंडी पडते. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लक्षात आल्या. पण अमावास्या पौर्णिमा यांच्यावर आधारलेले बारा महिने होऊन गेले तरी सूर्य अजून सुरुवातीच्या जागेपर्यंत पोचत नाही. त्यासाठी आणखी १०-११ दिवस लागतात, तोपर्यंत चंद्र आपल्या तेराव्या महिन्यात पुढे गेलेला असतो. यामुळे सूर्याचा
भ्रमणकाळ हा चंद्राच्या भ्रमणकाळाच्या पटीत नाही हे त्यांनी पाहिले.चंद्राच्या कलांमधील दैनंदिन बदलावर आधारलेला महिना आणि सूर्याच्या राशींमधील भ्रमणावर आधारभूत वर्ष या दोन्ही गोष्टींची अफलातून सांगड प्राचीन काळातील विद्वानांनी घातली. दरवर्षी होणारा १०-११ दिवसांचा फरक तीन वर्षात अधिक महिना आणून त्यांनी भरून काढला. 'अश्विनी'पासून 'आश्विन',' कृत्तिके'पासून 'कार्तिक' अशी महिन्यांची नांवे ठरतात. मग या अधिक महिन्याचे नांव कसे ठरवायचे? 'अधिक' नांवाचे नक्षत्र तर नसते ना? त्यासाठी त्यांनी अशी कल्पना काढली की ज्या महिन्यापूर्वी अधिक महिना येईल त्याचेच नांव त्या महिन्याला द्यायचे आणि त्याला अधिक हे विशेषण जोडायचे. हा महिना कधी येणार हे कसे ठरवायचे? सूर्य आणि चंद्र यांची सांगड घालायची ते दर अमावास्येला एकत्र येतात, पण वेगवेगळ्या राशीत. मात्र जर सूर्य एका राशीत अमावास्येलाच येऊन पोचला असेल तर चंद्र त्यानंतर बारा राशीत फिरून आला तरी सूर्य अजून त्याच राशीत असतो. यानंतर येणारा महिना अधिक ठरवतात.
"सूर्यचंद्रांच्या राशींमधून होणा-या भ्रमणावर आधारलेली एक सुंदर व परिपूर्ण अशी कालगणनेची पद्धत आपल्या पूर्वजांनी विकसित केली. आणि तिच्या आधाराने इतर ग्रहांच्या भ्रमणाचा अभ्यास करण्याची सोय करून घेतली हा या शास्त्राचा मुख्य उद्देश होता." असे मी थोडक्यात सांगितले.

. . . . . . . . . .. . . (क्रमशः)

No comments: