सात आठ वर्षापूर्वीच्या काळातली ही गोष्ट आहे. एका जवळच्या परिचिताला भेटायला मी त्याच्या घरी गेलो होतो, त्या वेळेस तो घरी नव्हता. त्याच्या शाळकरी मुलाने म्हणजे अमोलने दरवाजा उघडला।
"आई व बाबा थोड्याच वेळात येणार आहेत। तोंवर थोडा वेळ बसा." असे मला सांगितले, प्यायला पाणी दिले आणि तो पुन्हा आपल्या अभ्यासाला लागला. मी पाहिले की त्या वेळी तो भूगोलाचा गृहपाठ करीत होता. भारताच्या एका को-या नकाशावर कोळशाच्या खाणी, लोखंडाचे कारखाने, कुठलीशी नदी आणि तिच्यावर बांधलेल्या धरणाची जागा वगैरे खुणा करून दाखवत होता. तो गृहपाठ संपल्यावर त्याने वह्यापुस्तके नीट जागेवर ठेवली आणि तो माझ्यासमोर येऊन बसला.
मी त्याला विचारले,"तुला भूगोल विषय आवडतो का रे?"
तो म्हणाला,"हो. कुठल्या जागी काय आहे याची खूप माहिती त्यातून आपल्याला मिळते."
"तुझ्याकडे अजून एखादा कोरा नकाशा आहे कां?"
"आहेत ना। नेहमीच ते लागतात ना? म्हणून मी भरपूर नकाशे आणून ठेवले आहेत."
"एक घेऊन येशील? आईबाबा येईपर्यंत आपण एक खेळ खेळू."
तो एक नकाशा घेऊन आला. मी त्याला एका गांवाचे नांव सांगायचे, त्याने ते गांव नकाशात दाखवायचे. मग त्याने एक जागा विचारायची ती मी त्याला दाखवायची असे थोडा वेळ खेळून झाले. त्यानंतर मी त्याला विचारले,"तू नुकताच कोठल्या गांवाला जाऊन आलास?"
तो म्हणाला,"मागल्या महिन्यात आम्ही सगळे डेक्कन क्वीनने पुण्याला गेलो होतो. इतकी मजा आली!" मी म्हंटले,"अरे वा! मग आता आज पुण्याला जायला निघालेली दख्खनची राणी या वेळी कुठपर्यंत गेली असेल ते दाखव."
त्याने मनाशी थोडा विचार केला आणि खंडाळ्याच्या घाटाची जागा नकाशात दाखवली आणि मला म्हणाला,"आता तुम्ही लेटेस्ट कुठे गेला होता ते दाखवा."
"मी परवाच संध्याकाळच्या विमानाने कलकत्याहून परत आलो. या वेळेपर्यंत ते विमान नागपूरच्या आसपास इथे कुठे तरी उडत असणार." असे सांगत मी नकाशावर खूण केली. एवढ्यात त्याचे आईबाबा परत आले. आल्या आल्या वडिलांनी सांगितले, "आम्ही आमच्या गुरूंकडे गेलो होतो. एका मुलाबद्दल त्यांच्याकडून थोडं मार्गदर्शन घ्यायचं होतं. तुम्हाला फार वेळ थांबावं लागलं कां? कंटाळा आला नाही ना?" मी म्हंटलं "नाही हो. मी अमोलबरोबर मजेत खेळत बसलो होतो. त्या निमित्ताने माझ्या भूगोलाची उजळणी झाली."
तेवढ्यात आई उद्गारली,"आमचे गुरूमहाराज मोठे सिद्धपुरुष आहेत हो! कुंडली पाहून माणसाच्या भूत, भविष्य, वर्तमानाचं त्रिकाल ज्ञान त्यांना समजतं."
मी सहजपणाने म्हंटले,"खरंच? त्या कुंडलीत कुठकुठली भुतं दिसताहेत ते मी जरा पाहू कां ?"
यावर ते गृहस्थ जाम भडकले। "अहो, हे कुठल्याही सोम्यागोम्याचं काम नाही बरं कां! त्यासाठी घोर तपश्चर्या करावी लागते तेंव्हा कुठं सिद्धी प्राप्त होते. "
" आमचे गुरू महाराज त्यासाठी हिमालयात जाऊन फक्त दुर्वा खाऊन आणि गोमूत्र पिऊन राहिले होते. माहीत आहे?" त्यांच्या सौ।ने दुजोरा दिला.
हिमालयाच्या बर्फात त्यांना या गोष्टी तरी कोठून मिळणार होत्या म्हणा! तेवढ्यावर न थांबता त्यांनी मला गंभीर परिणामांचा इशारासुद्धा दिला,"तुम्ही इथं जी कांही मुक्ताफळं उधळलीत ती त्यांना अंतर्ज्ञानाने कळल्याशिवाय राहणार नाहीत। अहो, आकाशातले सगळे ग्रह त्यांना आधीन आहेत बरं! त्यातला एकादा जरी त्यांनी तुमच्या राशीला लावून दिला तर तुमची धडगत नाही हो।"
आता मलासुद्धा हे सगळे निमूटपणे ऐकून घेणे शक्य नव्हते. या लोकांच्या डोक्यात थोडा तरी उजेड पाडणे अत्यंत आवश्यक होते. मी म्हंटले,"अहो मी तुमच्या आदरणीय गुरूमहाराजांच्याबद्दल अवाक्षरसुद्धा बोललेलो नाही. फक्त भूतकाळात होऊन गेलेल्या घटना या कुंडलीमध्ये दिसतात कां? तेवढे मला पहायचे आहे. तुम्हाला तर त्या माहीत आहेतच. त्यामुळे मला कांही दिसलंच तर ते बरोबर की चूक ते तुम्हालाही लगेच समजेल. मी त्यावर वाद घालणार नाही. मी कांही भविष्य सांगणार नाही आहे. त्यामुळे त्यातल्या ख-याखोट्याचा प्रश्नच येत नाही. मग हा प्रयोग करून पहायला काय हरकत आहे?"
मी जास्तच आग्रह धरल्यावर त्या व्यक्तीच्या कुंडलीमधील त्याचे नांव, गांव, जन्मतारीख इत्यादी सर्व तपशील व्यवस्थितपणे झांकून फक्त कुंडलीची चौकट त्यांनी माझ्यासमोर धरली. त्यातले त्रिकोन चौकोनात मांडलेले १ ते १२ आंकडे आणि कुठेकुठे लिहिलेली र चं मं असली अक्षरे यातून मला काडीचाही बोध होणे शक्यच नाही याची त्यांना दोनशे टक्के खात्री होती.
. . . . . . . . . (क्रमशः)
मी जास्तच आग्रह धरल्यावर त्या व्यक्तीच्या कुंडलीमधील त्याचे नांव, गांव, जन्मतारीख इत्यादी सर्व तपशील व्यवस्थितपणे झांकून फक्त कुंडलीची चौकट त्यांनी माझ्यासमोर धरली. त्यातले त्रिकोन चौकोनात मांडलेले १ ते १२ आंकडे आणि कुठेकुठे लिहिलेली र चं मं असली अक्षरे यातून मला काडीचाही बोध होणे शक्यच नाही याची त्यांना दोनशे टक्के खात्री होती.
. . . . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment