Sunday, October 19, 2008

आजीचे घड्याळ - भाग ६ रात्रीची पाठशाळा


मला अशा हल्ल्याची अपेक्षा होतीच. मी अत्यंत शांतपणे उत्तर दिले,"मला क्षमा करा. पहिली गोष्ट, मी कांही कोणी शोध लावणारा शास्त्रज्ञ नाही. विज्ञानाचा साधा विद्यार्थी आहे. दुसरी म्हणजे मघाशी तुमच्या मिस्टरांनी सांगितलं होतं तसं आपल्या महान पूर्वजांनी निर्माण केलेल्या खगोलशास्त्रातलं गमभन मी अमोलला सोपी उदाहरणे देऊन समजावून सांगतो आहे. त्यात कांहीच नवीन नाही. आपली सूर्यमालिका आणि त्यातल्या ग्रहांच्या कक्षा वगैरे गोष्टी या मुलांच्या शालेय अभ्यासक्रमात असतात. मी सुद्धा त्याच्या वयाचा असतांनाच त्या शिकलो आहे. शाळेत शिकत असतांना कदाचित तुमच्या कानांवर पण पडल्या असतील।"
बाई मनातून किंचित वरमल्या होत्या, पण फणका-याने म्हणाल्या," छे! छे! हे असले तारे बीरे शिकायला मी कांही नाईटस्कूलला नव्हते गेले!"
"हे मात्र तुम्ही बरोबर सांगितलं हं! मी या गोष्टी खरं तर रात्रीच्या शाळेतच व्यवस्थितपणे शिकलो. आमची ही शाळा एखाद्या कोंदट खोलीत न भरता विशाल आकाशाच्या छपराखाली भरत असे. अत्रि, कपिल वगैरे सात महर्षी तिथे आचार्यपदावर आहेत. देवांचे गुरु बृहस्पती आणि दानवांचे गुरु शुक्राचार्यदेखील रोज थोडा तरी वेळ एक फेरी मारून जातात."
माझे हे अलंकारिक बोलणे बाईंच्या डोक्यावरून जात होते. ते समजण्याएवढी प्रगल्भता त्यांच्याकडे नव्हती. त्यांनी आश्चर्याने विचारलं,"खरंच! अशी शाळा कुठे होती?"
"अहो, मानवजात निर्माण होण्यापूर्वीपासून ती शाळा चालू आहे आणि अजूनसुद्धा ती रोज रात्री भरते. तिच्या शाखा जगभर सगळीकडे पसरल्या आहेत." मी त्यांना अधिकच बुचकळ्यात पाडले.
पण अधिक ताणून न धरता सांगायला सुरुवात केली,"अहो, आकाशातले ग्रह आणि तारे पहात पहातच मला खूप शिकायला मिळालं. आधी एक मजेदार गोष्ट सांगतो."
"सांगा काका." असे म्हणत अमोल सरसावून बसला.
मी सुरुवात केली,"माझ्या लहानपणी आम्ही सगळे एकत्र कुटुंबात रहात होतो. आमचा मोठा वाडा होता, त्याच्या माळवदावर सिमेंटची गच्ची केलेली होती. उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही रोज रात्री गच्चीवर पथा-या पसरून मोकळ्या हवेत झोपत असू. बहुतेक वर्षी घरोघरच्या माहेरवाशिणी आपल्या मुलांना घेऊन सुटीत आलेल्या असत. त्यामुळे खूप मुले जमत असू. रात्री अंथरुणावर बसून नाहीतर पडल्यापडल्या गाण्याच्या भेंड्या, नकला, कोडी, जोक्स, इकडल्या तिकडल्या भागाची माहिती, मजेदार अनुभव वगैरे सांगणं, चिडवाचिडवी वगैरे होई. त्यातून मनोरंजन आणि माहिती या दोन्हींचा लाभ देणारी ही 'मस्तीकी पाठशाला' छान चालत असे. एकदा अशी हाहाहीही करता करता त्यात किती वेळ गेला ते कुणाला कळलंच नाही.
माझ्या वडिलांनी सांगितलं,"मुलांनो झोपा आता. रात्रीचे बारा वाजले आहेत."
एक मुलगा कांही तरी निमित्य काढून खाली जाऊन घड्याळ पाहून आला. खरंच रात्रीचे बारा वाजलेले होते. त्याने दुस-या मुलाच्या कानात सांगितलं, त्यानं तिस-याच्या, अशी खुसपुस सुरू झाली. अखेर एका मुलानं धीर करून विचारलं, "इथं कुणाच्या मनगटावर घड्याळ नाही, उशाशी गजराचं घड्याळ नाही, भिंतीवरच्या घड्याळाचा तर प्रश्नच येत नाही. मग रात्रीचे बारा वाजले ते तुम्हाला कसं कळलं
माझ्या वडिलांनी विचारलं, "तुम्हाला ती 'आजीचे घड्याळ' कविता माहीत आहे?"
"मला येते, मला येते." असे करीत सगळ्या मुलांनी कोरसमध्ये गायला सुरुवात केली,
"आजीच्या जवळी घड्याळ कसले आहे चमत्कारिक
देई ठेवुन ते कुठे अजूनही नाही कुणा ठाऊक ।। .......

"कविता संपल्यावर माझे वडील म्हणाले, "तुमची आजी आपलं घड्याळ मला देऊन गेली आहे."
ते ऐकल्यावर सगळी मुलं खडबडून उठली आणि "कुठं आहे? आम्हाला दाखवा ना!" असे म्हणत मागे लागली.
थोडा भाव खाऊन झाल्यावर त्यांनी सांगायला सुरुवात केली," ते आपल्या डोक्यावर अनुराधा नक्षत्र दिसतं आहे ना, ते सूर्यास्ताच्या वेळी उगवलं, आता मध्यानरात्रीला डोक्यावर आलं आणि पहाटे सूर्योदय होण्यापूर्वी अस्ताला जाईल. त्याच्यावरून मला वेळ कळली."
"म्हणजे या चांदण्या रात्रभर एका जागी नसतात कां?" कुणीतरी विचारले.
"अरे हा हाताचा पंजा आपण झोपायला आलो तेंव्हा खाली दिसत होता. आता बघ किती वर आला आहे." हस्त नक्षत्राकडे बोट दाखवीत दुस-याने उत्तर दिले.
"ही अनुराधा अशी रोज रात्री बारा वाजता आभाळाच्या डोक्यावर चढून बसते कां?" आणखी कोणी आपले डोके लढवीत विचारले.
माझ्या वडिलांनी सांगितले,"नाही. तिला घाई असते म्हणून ती रोज चार चार मिनिटे लवकर येते. एक दोन दिवसातला हा फरक आपल्याला जाणवणार नाही, पण ती आठवड्यानंतर पाहिलंस तर ती अर्धा तास आधी माथ्यावर आलेली दिसेल, महिन्याभराने दोन तास आधी आणि तीन महिन्यांनी ती उगवतांनाच आकाशाच्या माथ्यावर चमकू लागेल. बाकीचे सारे तारेसुद्धा असेच करतील."
" म्हणजे हे तारे पण घड्याळ पाहून आकाशात चालतात की काय?" कोणी शंका काढली.
"अरे आपली घड्याळं कधी पुढे जातील, कधी मागे पडतील, किल्ली संपल्यावर ती बंदसुद्धा पडतील, पण हे एकूण एक सगळे तारे युगानुयुगे अगदी वक्तशीरपणे आपल्या ठरलेल्या वेळा पाळतात आणि एकाच संथ गतीने चालत आले आहेत. त्यात कधी कुणी खाडा केला नाही, दांडी मारली नाही, आळस केला नाही की आगाऊपणा करून पुढे जायचा प्रयत्न केला नाही."
"त्यात हे जे मंगळ, गुरु वगैरे ग्रह आहेत तेसुद्धा असेच वेळापत्रक पाळतात का?"
"ते सुद्धा रोज आपल्या आजूबाजूच्या तारकांबरोबर चार मिनिटे आधी आकाशात येतात, पण त्यांची गति किंचित धीमी असते. त्यामुळे ते अगदी हळूहळू मागे पडत जातात. त्यामळेच ते एका राशीतून पुढच्या राशीत जात असतात. पण चंद्र मात्र जरा वेगाने चालतो. तो पठ्ठा रोज नक्षत्र बदलतो. आता खूप रात्र झाली आहे. सगळेजण झोपा." असे सांगून त्यांनी चर्चेचा समारोप केला.

दुसरे दिवशी पंचांगात चंद्राचे नक्षत्र कसे पहायचे इतर ग्रहांची स्थाने कशी पहायची वगैरे गोष्टी आम्ही त्यांच्याकडून शिकून घेतल्या. त्यानंतर रात्रीच्या वेळी आकाशातल्या तारकांचे निरीक्षण करायचा नादच मला लागला. जसजशी त्यांची अधिकाधिक ओळख होत गेलीतसतशी मनातली भीती पार निघून गेली. त्यामुळे पुढे आयुष्यभरात मला कधीही कोठल्या ग्रहाची भीती वाटली नाही।"

. . . . . . . . .(क्रमशः)


No comments: