Friday, October 17, 2008

आजीचे घड्याळ - भाग ३ कुंडलीचा अर्थ


मी दिलेल्या या उदाहरणाने त्या सद्गृहस्थांचे समाधान झाले नाही। त्यावर ते म्हणाले, "असली सोपी उदाहरणे राहू देत। तुम्ही या कुंडलीवरून पंचवीस वर्षापूर्वीची जन्मवेळ इतक्या पटकन कशी काढली तेच आम्हाला सांगा।"

मी सांगू लागलो,"ठीक आहे. तेही सांगणे फारसे अवघड नाही. पण त्यासाठी आधी तुम्हाला या कुंडलीचा ढोबळ अर्थ समजून घ्यावा सागेल. मघाशी मी सांगितलंच की कुंडली हा एका विशिष्ट वेळी आभाळातील ग्रहांची स्थिती दाखवणारा साधा नकाशा आहे. म्हणजे या मुलाचा जन्म ज्या वेळी झाला त्या वेळी कोणता ग्रह कुठल्या राशीमध्ये होता ते यांत दाखवले आहे. भूगोलातील नकाशा कसा काढायचा याचे कांही प्रमाणित नियम आहेत। कोणताही नकाशा आपल्यासमोर उभा धरला तर उत्तर दिशा नेहमी वरच्या बाजूला, दक्षिण दिशा खालच्या बाजूला, पूर्व आपल्या उजवीकडे आणि पश्चिम डावीकडे दिसते. मुंबई, दिल्ली, कोलकाता वगैरे गांवे त्यात वेगवेगळ्या दिशांना विखुरलेली दिसतात. कुंडली बनवण्यासाठी वेगळे नियम आहेत. यात आकाशगोलाचे बारा समान भाग करून त्या भागांना बारा राशी अशी नांवे दिली आहेत आणि त्या बारा भागांची एक सलग साखळी बनवलेली असते, कारण बाराव्या मीन राशीला लागून पुन्हा तिच्यापुढे पहिली मेष रास येते. हेच भाग एका आयताकृती आकृतीमध्ये विशिष्ट त-हेने बसवतात. त्यातील प्रत्येक जागी कोणती रास आहे ती इथे अंकाद्वारे दाखवतात. उदाहरणार्थ मेष, वृषभ, मिथुन या राशी १, २, ३ अशा रीतीने दाखवतात. आकाशात या राशी ज्या क्रमाने दिसतात त्याच क्रमाने त्या कुंडलीत देतात. त्याच क्रमाने ग्रहांचे या राशीमधून भ्रमण सुरू असते. त्याशिवाय पूर्ण राशीचक्र आकाशात सतत फिरत असते. एक एक रास क्रमाने पूर्वेला उगवते आणि पश्चिमेकडे सरकत जाऊन अखेर अस्त पावते. म्हणजे आता ज्या ठिकाणी मेष रास दिसते त्या जागी दोन तासानंतर वृषभ रास येईल, तिच्या जागी मिथुन वगैरे. यामुळे यातील प्रत्येक चौकोन व त्रिकोणातील आंकडे दर दोन तासांनी बदलत जातात, तसेच त्या राशीत असलेले ग्रह त्यांच्याबरोबरच आपल्या जागा बदलत जातात. नकाशातील मुंबई, कोलकाता वगैरे गांवे मात्र आपापल्या जागी स्थिर असतात आणि त्यांच्या आधाराने आपण विमान किंवा आगगाडी कशी जाते हे दाखवतो. पण कुंडलीमधल्या राशीच दर दोन तासांनी आपल्या जागा बदलतात आणि त्याशिवाय ग्रह एका राशीमधून दुस-या राशींमध्ये जात असतात हा त्या दोन्हीमधला फरक आहे. त्यामुळे कुंडलीमध्ये दिलेली स्थिती ही गतिमान असून ती फक्त एका विशिष्ट वेळेपुरती असते.


आता ही कुंडली पहा। या कुंडलीमधील वरचा चौकोन लग्नरास दाखवतो। याचा अर्थ पूर्वेच्या क्षितिजावर जिथे सूर्य रोज उगवतो तिथे त्या वेळी अमूक रास होती. त्याच्या खालील चौकोनात पश्चिमेच्या क्षितिजावरील रास दिसते. उजवीकडच्या बाजूला दिसणा-या सगळ्या राशी त्या वेळी आभाळात होत्या आणि डावीकडच्या राशी मावळलेल्या होत्या. या कुंडलीत सूर्य डावीकडे पहिल्याच घरात दिसतो, म्हणजे तो तासा दोन तासापूर्वीच अस्ताला गेला होता. त्यामुळे रात्रीच्या आरत्यांची वेळ झाली होती. चंद्र उजवीकडे दुस-या घरात दिसतो. त्याला मावळायला अजून चार पाच तास अवकाश होता. मात्र प्रत्येक अमावास्येच्या दिवशी सूर्य व चंद्र एकाच राशीत असतात. सूर्यप्रकाशाने उजळलेला चंद्राचा अर्धा भाग पृथ्वीच्या विरुद्ध दिशेला असतो. चंद्राच्या पृथ्वीकडील बाजूवर सूर्यप्रकाश न पडल्याने काळोख असतो. त्यामुळेच अमावास्येच्या दिवशी आपल्याला चंद्र दिसत नाही. त्यानंतर दररोज पन्नास मिनिटे मागे पडत जाऊन आता चंद्र सूर्याच्या पाच सहा तास मागे होता. याचा अर्थ त्या दिवशी शुद्धपक्षातील षष्ठी किंवा सप्तमी तिथी होती. वेळ समजली आणि तिथी समजली. त्या वेळी सूर्य सिंह राशीत होता याचा अर्थ भाद्रपद महिना सुरू होता. म्हणजे गणपती आणि गौरीचे उत्सव सुरू होते. अशा रीतीने सूर्य व चंद्र यावरून महिना, तिथी आणि वेळ लगेच समजली."

"पण तुम्हाला वर्ष कसं समजलं?"

"त्यासाठी गुरू आणि शनी या दूरच्या ग्रहांचा उपयोग होतो. गुरू आपल्या कक्षेतील भ्रमण बारा वर्षात पूर्ण करतो. त्यामुळे तो एका राशीत एक वर्षभर राहतो आणि दर बारा वर्षांनी पुन्हा सुरुवातीच्या राशीत परत येतो. या कुंडलीमध्ये गुरू ग्रह त्या दिवसाच्या मानाने एक घर मागे होता। त्या अर्थी तो १ , १३ आणि २५ वर्षापूर्वी त्या जागी होता. शनी तेंव्हाच्या मानाने १० घरे मागे होता. त्याला तर एक रास ओलांडून जायला तब्बल अडीच वर्षे लागतात. त्यामुळे तोसुद्धा कुंडलीत दाखवलेल्या जागी २५ वर्षापूर्वी होता. या दोन्ही गोष्टी पाहिल्यावर २५ वर्षापूर्वीचा काळ निश्चित होतो. कुंडली म्हणजे काय हे माहीत असेल तर एवढी माहिती कळायला कितीसा वेळ लागला?"

"पहा, शास्त्रज्ञ लोकसुद्धा राशी आणि ग्रहांना मानतात!" बाईंनी अजब निष्कर्ष काढला।



(क्रमशः)

No comments: