Saturday, November 20, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ४)

माझ्या ओळखीतल्या एका बहुश्रुत गृहस्थांचे सामान्यज्ञान दांडगे आहे. पण अमेरिकेच्या प्रेसिडेंटपासून कोप-यावरल्या पानवाल्यापर्यंत कोणत्याही माणसाने केलेली कोणतीही कृती चुकीचीच आहे असे सांगून "त्याने असे करण्याऐवजी तसे का केले नाही?" असे विचारायचे आणि त्यांच्याशी वाद घातला तर बारकाव्यात कुठेतरी शब्दात पकडून बोलणा-याला निरुत्तर करायचे हा त्यांचा आवडता छंद आहे. त्यामुळे त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना सरळ उत्तर न देता टोलवत रहायचे असे मी ठरवले होते. माझ्याशी बोलतांना माझ्या मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचा विषय निघताच त्यांनी विचारले,"तुम्ही आपले ऑपरेशन इथेच कशाला करून घेतलेत?"
त्यांना कारणे सांगण्यात अर्थ नसल्यामुळे मी प्रतिप्रश्न केला, "मग मी ते कुठे करायला हवं होतं?"
"अहो ते मद्रासच्या एका डॉक्टरानं तिथं मोठे नेत्रालय उघडलं आहे ना, ते एकदम बेस्ट आहे म्हणतात."
"आपले राष्ट्रपती, पंतप्रधान वगैरे लोक तिथंच जातात, तेच ना?"
"हां, तुम्ही तिथंच का नाही गेलात?"
"त्यानं काय झालं असतं?"
"अहो तिथं लेजरनं ऑपरेशन करतात म्हणे."
"म्हणून काय झालं?"
"लेजर म्हणजे एकदम अद्भुत प्रकारचे किरण असतात. तुम्हाला ठाऊक नाही?"
"आहे ना. पण छान सरळ रेषेत कापली जाते म्हणून आता भाजी चिरायलासुध्दा लेजरगन वापरायची का?"
"अहो मी डोळ्याच्या ऑपरेशनबद्दल बोलतोय्."
"मोतीबिंदूचं ऑपरेशन म्हणजे त्यात काय काय करतात हो?"
"आधी डोळ्यात वाढलेला मोतीबिंदूचा खडा बाहेर काढतात आणि हल्ली त्या जागी एक कृत्रिम भिंग बसवतात." त्यांनी ऐकीव माहिती सांगितली, पण मला प्रत्यक्ष अनुभव होता.
त्यावर मी विचारले, "बरोबर. यात लेजरचा संबंध कुठे आला?"
ते किंचितसे गोंधळलेले पाहून मी सांगितले, "हे काम करण्यापूर्वी डोळ्यावरल्या आवरणाला एक बारीकशी भेग करायची असते. तेवढ्यापुरता लेजरचा उपयोग होतो."
"तेच तर महत्वाचे आहे ना?" त्यांनी लगेच मोका पाहून विचारले.
"असते ना, पण जुने खराब झालेले भिंग जपून बाहेर काढण्याची पुढची क्रिया जास्त महत्वाची असते आणि नवे भिंग व्यवस्थितपणे बसवणे सर्वात जास्त महत्वाचे असते."
"तुम्ही कसली लेन्स बसवून घेतलीत?" त्यांनी नवा विषय सुरू केला.
"ते सगळं डॉक्टरच ठरवतात."
"म्हणजे त्यांनी तुम्हाला विचारलं सुध्दा नाही का?"
"त्यात काँटॅक्ट लेन्ससारख्या निरनिराळ्या शेड्स, स्टाइल्स किंवा फॅशन्स नसतात. आपल्या डोळ्यात कोणत्या साइझची लेन्स फिट होईल ते डॉक्टरच ठरवतात आणि बसवतात. त्यात ते मला काय विचारणार आणि कसले ऑप्शन्स देणार?"
"म्हणजे तुम्ही साधीच लेन्स बसवलीत की काय?"
"मग फोडणीची बसवायला पाहिजे होती का?" मी वैतागून खवचटपणाने विचारले.
"फोडणीची नाही पण फोल्डेबल का नाही घेतलीत?"
"लेन्ससारखी लेन्स असते, तिला काय होल्डॉलसारखं गुंडाळून ठेवायचंय् की छत्रीसारखं मिटवून ठेवायचंय्? तिची घडी घालायची काय गरज आहे?"
"ते लेटेस्ट टेक्निक आहे. तुझ्या डॉक्टरला माहीत नसेल, नाहीतर तुला परवडणार नाही म्हणून तो बोलला नसेल."
"जाऊ दे. जी फिक्स्ड लेन्स आता माझ्या डोळ्यात बसवली आहे ती कुठे खुपत नाही, तिचा मला कसला त्रास नाही, तिनं मला सगळं काही छान स्पष्ट दिसतंय्. मला एवढं पुरेसं आहे. तुझ्या त्या भिंगाच्या भेंडोळ्यानं आणखी कसला फायदा होणार होता?"
"अहो, लेटेस्ट टेक्निकचा काही तरी लाभ असणारच ना? उगीच कोण कशाला ते डेव्हलप करेल?"
"?"
अखेर त्याने मला निरुत्तर केलेच!


. . . . . . . (क्रमशः)
--------------------------------------------------------------------------------------

No comments: