Saturday, October 30, 2010

नव(ल)रात्री - भाग ४

परदेशभ्रमणाचा थोडा अनुभव माझ्या गाठीशी होता. पुढे अॅटलांटाला जाण्यासाठी आम्हाला कोणत्या गेटवर विमान मिळणार आहे हे विमानतळावरील फलकावर पाहून घेतले आणि कॉरीडॉरमधील पाट्या वाचून त्यात दाखवलेल्या खुणांनुसार डाव्या उजव्या बाजूला वळत आणि एस्केलेटर्सने वर खाली चढत उतरत आमचे गेट गाठले. विमान गेटवर लागायला बराच अवकाश होता. मुंबईतल्या ऑक्टोबर हीटमधून थेट अमेरिकेतल्या फॉल सीझनमध्ये आल्याने तपमानात पंचवीस तीस अंशांचा फरक पडला होता. त्याने सर्वांग गारठून गेले होते. थंडीचा विचार करून गरम कपड्यांची गाठोडी आणली होती आणि एक एक करून ते कपडे अंगावर चढवलेही होते. तरीही नाकातोंडामधून आत जाणारी थंड हवा तिचा हिसका दाखवत होती. त्यावर इलाज म्हणून गरम गरम चहा घेतला. आधी थोडी चंव घेऊन पहावी या विचाराने घेतलेला तिथला स्मॉल पेला, आमच्या नेहमीच्या कपाच्या दुप्पट आकाराचा होता. तो घशात रिचवल्यानंतर अंगात पुरेशी ऊब आली. ठरल्यावेळी आमचे विमान आले आणि त्यात बसून आम्ही अॅटलांटाला जाऊन पोचलो.

हे विमान लहानसे होते, तराही अर्धवटच भरले होते. त्यातलेही अर्ध्याङून अधिक उतारू अॅटलांटाला न उतरता पुढे चालले गेले. आमच्यासोबत वीस पंचवीस लोक तिथे उतरले असतील. स्टॉलवरून काही खरेदी करण्यासाठी आम्ही दोन तीन मिनिटे थांबलो तेवढ्यात ते लोक कुठे अदृष्य झाले ते कळलेही नाही. आमचे सामान घेण्यासाठी बॅगेजची पाटी वाचून त्यात दाखवलेल्या बाणाच्या दिशेने चालत राहिलो. तो एक लांबच लांब कॉरीडॉर होता आणि चालण्याचे कष्ट टाळायचे असल्यास सरकत्या पट्ट्यावर उभे राहून पुढे जायची सोय होती. पाचसहा मिनिटे पुढे जाऊनसुध्दा आमचे ठिकाण येण्याची लक्षणे दिसत नव्हती. कोणाला विचारावे म्हंटले तर नजरेच्या टप्प्यात कोणी नव्हते. आम्हा दोघांच्या आजूबाजूला, मागेपुढे कोणीही त्या मार्गाने जात नव्हते. पुढे चालत राहिल्यानंतर एक ठिकाण आले. त्या जागी थोडी माणसे नजरेला पडली. "सामान घेऊन विमानतळाबाहेर पडण्यासाठी ट्रेनने जायचे असते" असे त्यांनी सांगितले. "ट्रेनचे स्टेशन कुठे आहे?" हे विचारल्यावर बोटाने एक जागा दाखवली.

लिफ्टचा दरवाजा असावा असे काहीतरी तिथे होते आणि त्याच्या समोर चारपाच उतारू उभे होते. दोन तीन मिनिटातच आतल्या बाजूने हलकासा खडखडाट ऐकू आला आणि तो दरवाजा उघडला. पलीकडे एक अगदी पिटुकला प्लॅटफॉर्म होता आणि आगगाडीचा एकच डबा उभा होता. पटापट सगळे जण त्यात चढले, दरवाजे बंद झाले आणि त्या डब्याने वेग घेतला. हे लिफ्टमध्ये चढल्यासारखेच वाटत होते, फक्त ती उभ्या रेषेत वरखाली न करता आडव्या रेषेत धांवत होती. अॅटलांटाचा विमानतळ इतका विस्तीर्ण आहे की त्याचे ए, बी, सी, डी वगैरे विभाग आहेत आणि त्या सर्व विभागांना बाहेरून जाण्यायेण्याच्या वाटेशी जोडणारी शटल सर्व्हिस आहे. इथे असे काही असेल याची मी कल्पनाही केली नव्हती. सामान उतरवून घेण्याच्या जागी जाऊन पोचलो तो आम्हाला घेण्यासाठी आलेले अजय आणि किरणराव पट्ट्याजवळच उभे होते आणि आमच्या बॅगाही पट्ट्यावर फिरत होत्या. आपले सामान उतरवून घेतल्यावर त्यांच्याबरोबर गाडीत जाऊन बसलो. कोणता माणूस कोणते सामान घेऊन बाहेर जात आहे याची चौकशी करणारा कोणीच इसम तिथल्या दरवाज्यावर नव्हता.

अॅटलांटाचा विमानतळ शहराच्या दक्षिण टोकाला आहे, तर अजय रहात असलेले अल्फारेटा गाव अॅटलांटाच्या उत्तरेला पंचवीस तीस मैलांवर आहे. आधीचे निदान पंधरावीस मैलतरी आम्ही अॅटलांटा शहराच्या भरवस्तीमधून जात होतो. पण वाटेत एकही चौक लागला नाही की ट्रॅफिक सिग्नल नाही. कुठे जमीनीखालून तर कुठे जमीनीवरून सरळसोट रस्त्यावरून आमची कार सुसाट वेगाने धांवत होती. वाटेत जागोजागी उजव्या बाजूला फाटे फुटले होते. शहरातल्या आपल्या इच्छित स्थळी जाणारे लोक आधीपासून आपली गाडी उजवीकडील लेनमध्ये आणत होते आणि वळण घेऊन हमरस्त्याच्या बाहेर पडत होते. हा हमरस्ता अॅटलांटापासून पन्नास साठ मैल दूर गेल्यानंतर एका राष्ट्रीय महामार्गाला मिळतो. वाटेत लागणा-या शहरांना जोडणारे एक्झिट्स होते. नऊ की दहा नंबराच्या एक्झिटमधून आम्ही एक्झिट केले आणि अल्फारेटा शहरातल्या अजयच्या घराकडे गेलो. या गावातल्या रस्त्यांवर मात्र जागोजागी ट्रॅफिक सिग्नल होते आणि रस्त्यात दुसरे वाहन असो वा नसो, लाल दिवा दिसताच लोक आपली गाडी थांबवून तो हिरवा होण्याची वाट पहात होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी हे नवनवे अनुभव घेत आम्ही घरी जाऊन पोचलो.

जेट लॅगचे निमित्य करून दोन दिवस झोपून काढले आणि चौथ्या दिवशी आम्ही पर्यटनासाठी निघालो. आम्ही उभयता आणि किरणराव व विद्याताई अशा चार लोकांचे नायगराचा धबधबा, वॉशिंग्टन डीसी आणि इतर काही ठिकाणे पहाण्यासाठी तीन दिवसांच्या एका लघुसहलीचे रिझर्वेशन केलेले होते. ती न्यूयॉर्कहून सुरू होऊन तिथेच संपणार होती. न्यूयॉर्कला जाणेयेणे आपल्या आपण करायचे होते. आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला एकदा आल्याने त्या मार्गावरले तज्ज्ञ झालो होतो. नेहमीची सरावाची वाट असावी अशा आविर्भावात आम्ही अॅटलांटाहून निघालो आणि नेवार्कला सुखरूप जाऊन पोचलो. तो शनिवारचा दिवस असल्याने सौरभला सुटी होती. आम्हाला नेण्यासाठी विमानतळावर तो आला होताच. तिथल्या महामार्गावरून तो आम्हाला पर्सीपेन्नी या त्याच्या गावाला घेऊन गेला. खूप रुंद आणि सरळसोट रस्ते, त्यावरून कुठेही न थांबणारी वाहतुकीची रांग, एक्झिटवरून बाहेर पडणे वगैरे आता ओळखीचे झाले होते.

रविवारी सगळे मिळून बसने न्यूयॉर्कला गेलो. अर्थातच सर्वात आधी स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचे दर्शन घेतले. "जयोस्तुते श्रीमहन्मंगले शिवास्पदे शुभदे, स्वतंत्रते भगवती त्वामहम् यशोयुताम् वंदे।" हे स्फूर्तीदायक गीत लहानपणापासून म्हणत आलो असलो तरी स्वतंत्रता ही एक मनाला जाणवणारी आणि बुध्दीला आकलन होणारी संकल्पना होती. स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पाहून ती दृष्य स्वरूपात नजरेसमोर आली. स्वातंत्र्यमातेच्या या मूर्तीचा भव्य आकार, तिची मुद्रा, तिच्या चेहे-यावर असलेले भाव या सर्वांमधून तिचे स्वरूप प्रकट होत होते. आदिशक्तीचे हे आगळे रूपसुध्दा नवरात्रातच पहायला मिळाले.

त्यानंतर तीन दिवस अनेक प्रेक्षणीय स्थळे पाहून दसरा येईपर्यंत आम्ही नेवार्कमार्गे अॅटलांटाला परत आलो. या सफरीबद्दल मी पूर्वीच विस्तारपूर्वर लिहिलेले आहे. रोममध्ये असतांना रोमन व्हा अशा अर्थाचे एक सुभाषित आहे. थोड्या वेगळ्या अर्थाने गंगा गये गंगादास, जमना गये जमनादास असे हिंदीत म्हणतात. अमेरिकेत गेल्यानंतरसुध्दा घरात आम्ही मराठीच राहिलो होतो, पण चिनी लोकांनी चालवलेल्या अमेरिकन यात्रा कंपनीबरोबर जातांना समझोता करावाच लागला. ज्या हॉटेलांमध्ये आमची झोपायची व्यवस्था झाली होती त्यातल्या खोल्या इतर सुखसोयींनी युक्त असल्या तरी त्यांमध्ये आंघोळीची सोय नसायची. विमानात असते तशा प्रकारचे एक छोटेसे टॉयलेट रूमला जोडलेले असले तरी त्यात टब किंवा शॉवरसाठी जागाच नसायची. पहाटेच्या वेळी तपमान शून्याच्या जवळपास असायचे आणि बदलण्यासाठीसुध्दा अंगावरचे कपडे काढणे जिवावर येत असे. त्यामुळे बाथरूमचे नसणे आमच्या पथ्यावरच पडत असे. त्या वर्षीच्या नवरात्रातले दोन दिवस पारोसेच राहिलो. जेवणासाठी आमची बस एकाद्या केएफसी किंवा मॅकडीच्या दुकानासमोर उभी रहात असे. आपल्याकडे मिळतात तसले उकडलेल्या बटाट्याचे व्हेजी बर्गर तिथे नसायचे. नवरात्र चालले असल्याची जाणीव बाजूला ठेवून नाइलाजाने थोडा मांसाहार करणे भाग पडत होते. गोडबोले की आठवले नावाचे एक तरुण जोडपे आमच्याबरोबर सहलीला आले होते. त्यांनी काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे वगैरे सुक्या मेव्याची मोठी पुडकी आणि खूप सफरचंदे आणली होती. शिवाय मिळतील तिथे केळी, संत्री, मोसंबी वगैरे ते घेत होते. ते मात्र शुध्द शाकाहारी राहिलेच, कदाचित त्यांना तीन दिवस उपवाससुध्दा घडला असेल. रक्तामधली साखर, कोलेस्टेरॉल वगैरे वाढण्याच्या भीतीने आम्ही तसे करू शकत नव्हतो आणि ते कमी होण्याच्या भीतीने उपाशीही राहू शकत नव्हतो. त्यामुळे जो काही पापसंचय होत होता त्याला इलाज नव्हता. हे नव(ल)रात्र नेहमीपेक्षा खूपच आगळे वेगळे असल्यामुळे कायम लक्षात राहील.

No comments: