Thursday, November 18, 2010

मोतीबिंदू ..... आणि .... भिंगाचे भेंडोळे (भाग ३)

एकवीसावे शतक आल्यानंतर सेवानिवृत्तीचा दिवस नजरेच्या टप्प्यात आला. पण त्यापूर्वी होत असलेल्या पदोन्नतींच्या सोबतीने कार्यक्षेत्र, अधिकार, जबाबदारी, कामाचा व्याप, त्यातली आव्हाने वगैरेंच्या कक्षा विस्तारत होत्या, आपले कर्तृत्व सिध्द करण्याच्या संधी समोर येत होत्या आणि त्यांचा उपयोग करून घेण्याचे माझे प्रयत्न चालले होते. आयुष्यातल्या अशा महत्वाच्या टप्प्यावरून वाटचाल करतांना सुदृढ शरीराची साथ आवश्यक होती. पण नेमक्या याच वेळी मला डाव्या डोळ्याने अंधुक दिसू लागले. मोतीबिंदूची सुरुवात झाल्यामुळे हा बदल झाल्याचे समजल्यावर त्यावर काही उपाय नाही हे लक्षात आले. डाव्या डोळ्याची दृष्टी हळू हळू मंद होत असली तरी उजव्या डोळ्याने पाहून मी काम करू शकत होतो. दोन अडीच वर्षांनंतर डाव्या डोळ्याची क्षमता निम्म्यावर आली आणि लेखन वाचन वगैरेसाठी ती त्याहूनही कमी झाली. शिवाय मोतीबिंदूने उजव्या डोळ्यातही मूळ धरून विस्ताराला सुरुवात केली. तो डोळाही अधू व्हायला लागला तर मात्र काम करणे कठीण होणार होते.

कृष्णा कामत भेटल्यानंतर दहा वर्षात माझ्या ओळखीतल्या आणखी काही लोकांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले होते. प्रत्यारोपण केलेल्या नव्या कृत्रिम भिंगाने त्यांना व्यवस्थित दिसत होते. एक दोन लोकांच्या बाबतीत मात्र काही गुंतागुंत झाल्यामुळे नव्या व्याधी उद्भवल्या होत्या. अशा एकाद्या अपवादांमुळे धोक्याची जाणीव होते आणि बहुतेक लोक अजूनही शस्त्रक्रियेमधला धोका न पत्करता मोतीबिंदू परिपक्व होण्याची वाट पहात असत. मला मात्र दोन्ही डोळ्यांमधली दृष्टी एकाच वेळी मंद झाली असती तर कामच करता आले नसते. पूर्वीच्या काळी यावर कसलाही उपायच नसायचा. आपले प्रारब्ध म्हणून ही गोष्ट मान्य करावी लागत असे. पण नव्या तंत्रज्ञानाने उपलब्ध केलेल्या सोयींमुळे परिस्थितीत बदल झाला होता. त्याचा उपयोग करून घेणे आता मला शक्य होते.

यावर मी स्वतः विचार केला, सर्व संबंधितांशी विचारविनिमय केला आणि सर्वतोपरी काळजी घेऊन डाव्या डोळ्याचे ऑपरेशन करून घेण्याचा निर्णय घेतला. शरीरात इतर कोणती व्याधी नसल्याने फिटनेसचा प्रश्न आला नाही. ऑपरेशनच्या आदल्या दिवशी मला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेसले आणि अँटीबायॉटिक्सचा कोर्स सुरू करून दिला. दुसरे दिवशी ऑपरेशन टेबलवर गेल्यावर आधी तुलनेने चांगल्या असलेल्या उजव्या डोळ्यावर पट्टी बांधली, डाव्या डोळ्याच्या आजूबाजूचा भाग बधीर केला आणि शस्त्रक्रिया सुरू झाली. सर्व वेळ मी संपूर्णपणे भानावर होतो. प्रत्यक्ष सूर्याकडे पहात आहे असे वाटण्यासारखा प्रकाशाचा प्रचंड लोळ डाव्या डोळ्यात उतरला आणि काय दिसते ते मला समजेनासे झाले. कुरकुर, खुळ्ळ असले आवाज कानावर पडत होते. काही मिनिटांनीच माझ्या उजव्या डोळ्यावरील पट्टी काढली आणि मला वॉर्डमध्ये पाठवून दिले. डावा डोळा मात्र बंद करून ठेवलेला होता. दर तासातासाने नर्स येऊन तो उघडायची आणि त्यात औषध घालून पुन्हा झाकून ठेवायची असे रात्री झोपेपर्यंत चालले. दुसरे दिवशी सकाळी डॉक्टरांनी तो डोळा तपासला आणि घरी जायची परवानगी दिली. त्याबरोबर वीस दिवस रजा घेण्याची शिफारसही केली.

माझ्या घरातल्यांना ही एक प्रकारची पर्वणीच वाटली असेल, कारण त्यापूर्वी कित्येक वर्षात सलग वीस दिवस मी घरी राहू शकलो नव्हतो. घरी गेल्यावरसुध्दा दोन प्रकारचे टेलीफोन आणि इंटरनेट यांनी मी जगाशी संपर्क साधून होतो, शिवाय घरापासून माझे ऑफीस हाकेच्या अंतरावर असल्यामुळे माझे सहकारी केंव्हाही घरी येऊन मला भेटू शकत होते. त्यामुळे घरी आल्यानंतर दुसरे दिवशीच मी माझ्या अखत्यारीतल्या कामाच्या तांत्रिक बाबतीत लक्ष घालायला सुरुवात केली आणि माझ्याविना कोणताही खोळंबा होणार नाही याची काळजी घेतली. माझ्या गैरहजेरीत घडणा-या घडामोडींची माहिती मला मिळत राहिल्यामुळे त्यात खंड पडला नाही.

आता चोवीस तास मी घरी उपलब्ध असल्याची खात्री असल्यामुळे अनेक आप्तेष्ट मला भेटायला येऊन गेले. त्यांच्याबरोबर निवांतपणे गप्पा मारता आल्या. त्यातून जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. नवीन घटना, वेगवेगळे अनुभव कानावर आले, या पाहुण्यांचे आदरातिथ्य करण्याच्या निमित्याने चांगले चुंगले खायची चंगळ झाली, रिकाम्या वेळात माझी आवडती गाणी ऐकायला मिळाली, शरीराला भरपूर विश्रांती मिळाली आणि वीस दिवसांनी नवी दृष्टी घेऊन नव्या जोमाने कामाला लागलो. नको त्या वेळी येऊन दगा देणा-या मोतीबिंदूबद्दल मनात जी घृणा निर्माण झाली होती त्यातला कडवटपणा जरासा कमी झाला.


. . . . . . . (क्रमशः)

No comments: