Tuesday, December 21, 2010

मन (भाग ४)

आपली विवेकबुध्दी, तारतम्य, वास्तवाचे भान, संयमी वृत्ती वगैरे गोष्टी जागृत असतांना मनावर अंकुश ठेवतात. मनाला बुध्दीचा थोडा धाक असल्यामुळे ते जरासे सांभाळूनच विचार करत असते. पण निद्रावस्थेत जाताच स्वप्नांमध्ये ते मन स्वैर भरारी मारू शकते. वास्तवाचे दडपण नसल्यामुळे स्वप्नाच्या जगात आपले मन स्वच्छंदपणे मुक्त विहार करू शकते. लहानपणी सिंड्रेला आणि स्नोव्हाइट यांच्यासारख्या परीकथांमध्ये रमलेले बालमन यौवनाच्या उंबरठ्यावर पोचल्यानंतर स्वतःला त्या नायिका समजून त्या कथांमध्ये स्वतःला पाहू लागते. अशा सर्व परीकथांमध्ये अखेरीस श्वेत अश्वावर आरूढ होऊन एक उमदा राजकुमार दौडत येतो आणि खलनायकाचा पाडाव करून त्या नायिकांना आपल्या बरोबर घेऊन जातो. अखेरीस ते दोघे चिरकाल सुखाने राहू लागतात असा सुखांत केलेले असतो. असाच एकादा राजकुमार निदान आपल्या स्वप्नात तरी अवतरावा असे या मुग्धेला वाटते.

परीकथेतिल राजकुमारा,
स्वप्नी माझ्या येशिल का ?
भाव दाटले मनी अनामिक ।
साद तयांना देशिल का ?

या डोळ्यांचे गूढ इषारे ।
शब्दांवाचुन जाणुन सारे ।
'राणी अपुली' मला म्हणोनी ।
तुझियासंगे नेशिल का ?

मूर्त मनोरम मनी रेखिली ।
दिवसा रात्री नित्य देखिली ।
त्या रूपाची साक्ष जिवाला ।
प्रत्यक्षातुन देशिल का ?

लाजुन डोळे लवविन खाली ।
नवख्या गाली येइल लाली ।
फुलापरी ही तनू कापरी ।
हृदयापाशी घेशील का ?

लाजबावरी मिटुन पापणी ।
साठवीन ते चित्र लोचनी ।
नवरंगी त्या चित्रामधले ।
स्वप्नच माझे होशील का ?

अशाच दुस-या एका स्वप्नाळू मुलीलासुध्दा मनामधून असेच काहीतरी वाटत असते. तिच्या स्वप्नातल्या जगात सारे काही सुंदर असते. निसर्ग आपल्या सौंदर्याने मस्त वातावरणनिर्मिती करत असतो. अशा त्या स्वप्नामधल्या गावात तिचा मनाजोगता जोडीदार मिळाला तर तिच्या आनंदाला किती बहर येईल? याचे सुखस्वप्न ती पहात राहते.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा ।
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?

जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले ।
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले ।
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा ।।

घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी ।
लागुन ओढ वेडी खग येति कोटरासी ।
एक एक चांदणीने नभदीप पाजळावा ।।

स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे ।
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे ।
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा ।।

वरील दोन्ही गाण्यामधल्या नवयुवतीला अजून प्रत्यक्ष जीवनात कोणी साजेसा साजण भेटलाच नसावा. त्यामुळे त्या एक गूढ आणि रम्य असे स्वप्नरंजन करत आहेत. पण एकाद्या मुलीला असा साजण डोळ्यासमोर दिसतो आहे पण तो तिच्यापाशी येत नाही. कदाचित त्याला तिची ओढ वाटत नसेल किंवा काही व्यावहारिक अडचणी असतील. अशा वेळी ती तरुणी त्याला निदान स्वप्नात तरी भेटण्याची इच्छा अशी व्यक्त करते.

स्वप्नात साजणा येशील का ?
चित्रात रंग हे भरशील का ?

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चिंब भिजावे ।
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का ?

ही धूंद प्रीतीची बाग, प्रणयाला आली जाग ।
रोमांचित गोरे अंग, विळख्यात रेशमी धरशील का ?

प्रतिमेचे चुंबन घेता, जणू स्वर्गच येई हाता ।
मधुमिलन होता होता, देहात भरून तू उरशील का ?

या मुलीचे लग्न आता ठरले आहे, मुहूर्ताला अक्षता टाकायचा अवकाश आहे. पण मधल्या काळातला दुरावा तिला असह्य वाटत आहे. लोकलाजेनुसार तिला आपल्या भावी वरापासून दूर रहावे लागत असल्यामुळे ती त्याला स्वप्नातच भेटत राहते आणि भेटल्यानंतर काय काय घडेल याची सुखस्वप्ने पहाण्याचा छंद तिला लागतो.

स्वप्नांत रंगले मी, चित्रात दंगले मी ।
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी ।।

हे वेड प्रेमिकांचे गीतात गाइले मी ।
हे गीत भावनेचे डोळ्यात पाहिले मी ।।

या वृक्षवल्लरींना ही ओढ मीलनाची ।
पाहून जाणिली मी भाषा मुकेपणाची ।
माझ्या प्रियापुढे का, लाजून राहिले मी ।।

एकांत हा क्षणाचा, भासे मुहूर्तवेळा ।
या नील मंडपात, जमला निसर्गमेळा ।
मिळवून शब्द सूर, हे हार गुंफिले मी ।।

घेशील का सख्या, तू हातात हात माझा ?
हळव्या स्वयंवराला, साक्षी वसंत राजा ।
या जन्मसोबतीला सर्वस्व वाहिले मी ।।

दोघांचे मीलन झाल्यानंतर त्यांना पुढचे दिसायला लागते. ज्या मुख्य कारणासाठी निसर्गाने हे स्त्रीपुरुषांमधले आकर्षण निर्माण केले आहे त्याची पूर्ती होण्याला प्रत्यक्षात अवधी लागत असला तरी मनोवेगाने ती क्षणात करता येण्याजोगे स्थान म्हणजे स्वप्नच !

काल पाहिले मी स्वप्न गडे ।

नयनी मोहरली ग आशा ।
बाळ चिमुकले खुदकन हसले ।
मीही हसले, हसली आशा ।
काल पाहिले मी स्वप्न गडे ।।

भाग्यवतीचे भाग्य उजळले ।
कुणीतरी ग मला छेडिले ।
आणि लाजले, हळूच वदले ।
रंग सावळा तो कृष्ण गडे ।।

इवली जिवणी इवले डोळे ।
भुरुभुरु उडती केसहि कुरळे ।
रुणुझुणु रुणुझुणु वाजति वाळे ।
स्वप्नि ऐकते तो नाद गडे ।।

अशा प्रकारे मनात उठणा-या वेगवेगळ्या इच्छा, आकांक्षा, भावना वगैरेंची पूर्ती स्वप्नात होत असते अशी रूढ कवी कल्पना आहे. निदान असे गृहीत धरून कवीलोकांनी जागेपणीच अनेक प्रेमगीते लिहिली आहेत. मला स्वतःला मात्र अशा सुखद स्वप्नांचा अनुभव तसा कमीच येतो. कधी तो आलाही असला तरी जाग येताच मी ते सगळे विसरून जातो, त्यामुळे तो लक्षात रहात नाही. मला प्रत्यक्षात अप्राप्य वाटणारी कोणतीही गोष्ट कधी स्वप्नात मिळाली असे आठवत नाही. उलट काही वेळा मी स्वप्नातून खडबडून जागा होतो तेंव्हा मी किंचाळत उठलो असे बाजूचे लोक सांगतात. अर्थातच मी स्वप्नात काहीतरी वाईट किंवा भयावह पाहिले असते. कधी कधी मला स्वतःलासुध्दा असे वाटते की आपण एका अशक्यप्राय अशा कठीण परिस्थितीत सापडलो आहोत असे काहीतरी स्वप्नात दिसले असावे आणि जागा झाल्यानंतर कसलाच प्रॉब्लेम नसल्याचे पाहून मी समाधानाचा सुस्कारा सोडतो. अशा दुःस्वप्नांना इंग्रजीत 'नाइटमेअर' असे वेगळे नाव दिले आहे. चांगले आशादायक असे 'ड्रीम' आणि भीतीदायक ते 'नाइटमेअर'!

"मनी वसे ते स्वप्नी दिसे" अशी म्हण आहे. काही अंशाने ती खरी आहे. कारण एकादा विचार, एकादी कल्पना मनात आली तरच ती स्वप्नात येऊ शकेल. दक्षिण अमेरिकेतल्या कुठल्याशा जंगलातली झोपडी आंध्रप्रदेशात जन्म घालवलेल्या मुलाला स्वप्नात दिसली अशा भाकडकथांवर माझा काडीएवढा विश्वास बसत नाही. माणसाला पुनर्जन्म असतो आणि पूर्वीच्या जन्मातले मन किंवा त्याचा अंश तो या जन्मात आपल्याबरोबर घेऊन येतो असल्या गोष्टी शास्त्रीय कसोटीवर सिध्द झालेल्या नाहीत. या जन्मातच जे काही पाहिले, ऐकले, वाचले, अनुभवले त्याच्या अनुषंगाने मनात विचारांचे तरंग उठत असतात आणि ही क्रिया स्वप्नातदेखील चालत राहते, किंबहुना स्वप्नामध्ये तिला वास्तवाचा निर्बंध रहात नाही.

"मन चिंती ते वैरी न चिंती" अशी आणखी एक म्हण आहे. सध्याच्या परिस्थितीतून पुढे कसे अधिकाधिक चांगले घडेल याची सुखस्वप्ने जसे मन पहात असते, त्याचप्रमाणे अपेक्षित किंवा अनपेक्षित कारणांमुळे कोणते धोके उद्भवू शकतात याचा विचारसुध्दा मनच करत असते. निसर्गाने सजीवांना दिलेले हे एक वरदान आहे. धोक्याची कल्पना असल्यामुळे त्यापासून बचाव करण्याची तयारी ते करू शकतात. पण अनेक वेळा हा धोका अकारण दिसतो आणि त्यामुळे मनाला मात्र घोर लागतो. नाइटमेअर्स अशा प्रकारच्या विचारांमुळेच दिसतात. जास्त काळजीपूर्वक वागायचा प्रयत्न करणा-या लोकांना दुःस्वप्ने जास्त प्रमाणात दिसत असावीत आणि बिंदास वृत्तीचे लोक सुखस्वप्ने पहात मजेत राहात असावेत असा माझा अंदाज आहे.

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: