Thursday, December 23, 2010

मन - भाग ५

सुखस्वप्ने पहात रहावे असे सर्वांनाच वाटते, पण ते संपल्यानंतर काय ? सावज हातात सापडल्यानंतर शिकारीतली मजा खलास होते, मुक्कामाला पोचल्यानंतर प्रवासातली गंमत संपते त्याचप्रमाणे स्वप्नपूर्ती झाल्यानंतर त्याचे काही वाटेनासे होते. एकादी गोष्ट विनासायास हाती लागली तर तिचे काहीच मोल वाटत नाही. हा मनाचा विचित्रपणा वाटेल पण तसेच असते. शेवट गोड असो किंवा नसो गोष्ट संपून जाते. तसे होण्यापेक्षा स्वप्न अर्धेच रहावे असे एका कवीला वाटते. या गाण्यात ते सांगतात,

स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केव्हा ।
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा ।।

रेखाकृती सुखाच्या चित्ती चितारलेल्या ।
साशंक कल्पनांनी सहजी विरून गेल्या ।
कधि सोशिला उन्हाळा कधि लाभला विसावा ।।

नैराश्य कृष्णमेघी, आशा कधी बुडावी ।
विरहात चिंब भिजुनी प्रीती फुलोनि यावी ।
काट्याविना न हाती केव्हा गुलाब यावा ।।

सिद्धीस कार्य जाता, येते सुखास जडता ।
जडतेत चेतनेला उरतो न कोणि त्राता ।
अतृप्त भावनांनी जीवात जीव यावा ।।

मनाला जाळणारी चिंता, व्याकुळ करणारी काळजी नेहमीच अनाठायी असते असेही नाही. अनेक वेळा मनातल्या शंका कुशंका ख-या ठरतात. एवढेच नव्हे तर कथेला अकल्पितपणे कलाटणी मिळते. सगळे काही मनाजोगे होत असते, पुढे मिळणा-या सुखाची कल्पना करून मनात मांडे खात असलेल्या माणसाच्या पुढ्यात नियती वेगळेच ताट वाढून ठेवते. त्याचे मन आक्रोश करते,

कधी बहर, कधी शिशिर, परंतू दोन्ही एक बहाणे ।
डोळ्यांमधले आसू पुसती ओठांवरले गाणे ।।

बहर धुंद वेलीवर यावा ।
हळुच लाजरा पक्षी गावा ।
आणि अचानक गळुन पडावी,
विखरुन सगळी पाने ।।

भान विसरुनी मिठी जुळावी ।
पहाट कधि झाली न कळावी ।
भिन्न दिशांना झुरत फिरावे,
नंतर दोन दिवाणे ।।

हळुच फुलाच्या बिलगुनि गाली ।
नाजुक गाणी कुणी गायिली ।
आता उरली आर्त विराणी.
सूरच केविलवाणे ।।

जुळली हृदये, सूरहि जुळले ।
तुझे नि माझे गीत तरळले ।
व्याकुळ डोळे कातरवेळ.
स्मरुन आता जाणे ।।

काही दुर्दैवी व्यक्तींच्या बाबतीत तर करायला गेले एक आणि झाले भलतेच असे होत राहते. महाभारतातल्या सत्यवतीची कथा असेच काही सांगून जाते. सामान्य कोळ्याची देखणी पोर मत्स्यगंधा साम्राज्ञी होण्याचे स्वप्न पहाते आणि ते पूर्ण होतेसुध्दा. पण त्यानंतर मात्र सगळे विस्कळत जाते. एकामागोमाग एक एकापेक्षा एक अनपेक्षित घडना घडत जातात आणि तिला त्या पहाव्या लागतात. अखेरीस उद्वेगाने ती म्हणते,

अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा ।
धर्म न्याय नीति सारा खेळ कल्पनेचा ।।

ध्यास एक हृदयी धरुनी स्वप्न रंगवावे ।
वीज त्यावरी तो पडुनी शिल्प कोसळावे !
सर्वनाश एकच दिसतो नियम या जगाचा ।।

दैव ज्यास लोभे त्याला लाभ वैभवाचा ।
दैव कोप येता भाळी सर्वनाश त्याचा ।
वाहणे प्रवाहावरति धर्म एक साचा ।।

याहूनही जास्त हृदयविदारक अनुभव आल्यामुळे अत्यंत निरोशेने ग्रस्त झालेले एक मन आक्रंदन करते,

लळा-जिव्हाळा शब्दच खोटे, मासा माशा खाई ।
कुणी कुणाचे नाही राजा, कुणी कुणाचे नाही ।।

पिसे, तनसडी, काड्या जमवी, चिमणी बांधी कोटे ।
दाणा, दाणा आणून जगवी, जीव कोवळे छोटे ।
बळावता बळ पंखामधले, पिल्लू उडूनी जाई ।।

रक्तहि जेथे सूड साधते, तेथे कसली माया ?
कोण कुणाची बहीण, भाऊ, पती, पुत्र वा जाया ।
सांगायाची नाती सगळी, जो तो अपुले पाही ।।

माणुस करतो प्रेम स्वतःवर, विसरुन जातो देवा ।
कोण ओळखी उपकाराते, प्रेमा अन्‌ सद्भावा ।
कोण कुणाचा कशास होतो या जगती उतराई ।।

आशा निराशा हे मनाचे विभिन्न भाव आहेत. आशा, अभिलाशा, अपेक्षा वगैरेंचा निरनिराळ्या प्रकारचा आविष्कार पहिल्या चार भागांमध्ये दिसला, तसेच निराशा, वैफल्य वगैरे भावांची निर्मितीदेखील मनातच होत असते. स्वतःच्या वैयक्तिक आयुष्यातील दुःखांचा अनुभव सर्वसामान्य लोकांना येतो, पण महान लोक सगळ्या जगाची चिंता वहातात. एका विशिष्ट दुःखाकडे न पहाता एकंदरीत समाजाच्या कष्टांवर बोट ठेवतात. आजचेच जग वाईट आहे असातला भाग नाही. कित्येक दशकांपूर्वी कवीवर्य भा.रा.तांबे यांनी लिहिले आहे,

कळा ज्या लागल्या जीवा, मला की ईश्वरा ठाव्या !
कुणाला काय हो त्याचे ? कुणाला काय सांगाव्या ?

उरी या हात ठेवोनी, उरीचा शूल का जाई ?
समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही ।।

जनांच्या कोरड्या गप्पा, असे सारे जगद्बंधू !
हमामा गर्जनेचा हो, न नेत्री एकही बिंदू ।।

नदीला पूर हा लोटे, न सेतू ना कुठे नावा ।
भुतांची झुंज ही मागे, धडाडे चौकडे दावा ।।

नदी लंघोनि जे गेले, तयांची हाक ये कानी ।
इथे हे ओढती मागे, मला बांधोनि पाशांनी ।।

कशी साहू पुढे मागे, जिवाला ओढ जी लागे ?
तटातट्‌ काळजाचे हे तुटाया लागती धागे ।।

पुढे जाऊ ? वळू मागे ? करू मी काय रे देवा ?
खडे मारी कुणी, कुणी, हसे कोणी, करी हेवा !

मनासारखे चालले आहे असा कधीकधी भास होत असतो. निदान इतरांना तसेच वाटत असते. सगळे काही व्यवस्थित असतांनादेखील हा माणूस सुखी का नाही असा प्रश्न त्याला पडतो, त्याला त्याचे सुख दुखते आहे असे समजतो. अशा माणसाची व्यथा वेगळीच असते. त्याचे दुखणे त्याला मनातून सतत टोचत असते पण ते व्यक्त करायची सोय नसते. सांगून ते कोणाला कळणारच नाही, ऐकणारा त्याची टिंगल करेल, त्याला मूर्खात काढेल, त्यामुळे त्याला होत असलेल्या त्रासात आणखी भर पडेल याची त्याला जवळ जवळ खात्री असते. त्याचे मन स्वतःलाच सांगते,

काटा रुते कुणाला आक्रंदतात कोणी ।
मज फूलही रुतावे हा दैवयोग आहे !

सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची ?
चिरदाह वेदनेचा मज शाप हाच आहे !

काही करु पहातो रुजतो अनर्थ तेथे
माझे अबोलणेही विपरीत होत आहे !

हा स्नेह, वंचना की, काहीच आकळेना ।
आयुष्य ओघळोनी मी रिक्तहस्त आहे !

कदाचित अशा विचाराने म्हणा किंवा दुस-या कोणाची टीका सहन करून घ्यायची त्याच्या मनाची तयारी नसल्यामुळे असेल पण एकादा माणूस नेहमीच आपले ओठ घट्ट मिटून ठेवतो. कदाचित स्वभावानेच तो पक्का आतल्या गाठीचा असेल, आपल्या सुखातही कोणी वाटेकरी नको आणि दुःखातही नको अशी त्याच्या मनाची वृत्ती असेल. आणखीही काही कारणे असतील, तीसुध्दा तो कोणालाही सांगत नाही. कोणालाही काहीही सांगायला तो तयार नसतो. त्याला काही विचारायला कोणी गेला तर तो निर्धाराने म्हणतो,

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाही ।
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही ।।

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे ।
पण पाकळी तयाची, कधी फुलणार नाही ।।

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गूज ।
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही ।।

मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला ।
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही ।।

दूर बंदरात उभे एक गलबत रूपेरी ।
त्याचा कोष किना-यास कधी लाभणार नाही ।।

तुझ्या कृपाकटाक्षाने झालो वणव्याचा धनी ।
त्याच्या निखा-यात कधी तुला जाळणार नाही ।।

. . . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: