Tuesday, December 28, 2010

तेथे कर माझे जुळती - ६ अण्णाकाका गोखले



लहान मूल (म्हणजे त्याचे मन, बुध्दी, विचार वगैरे) ओल्या मातीच्या गोळ्यासारखे असते. त्याला जो आकार दिला जाईल तो घेऊन ते मोठे होत जाते असे म्हणतात. माणसाच्या घडण्याची ही प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत असते आणि त्याच्या मातापित्यांच्या साथीने इतर अनेक लोकांचाही त्याला हातभार लागत असतो. हा सजीव गोळा संवेदनाक्षम असल्यामुळे त्याला या घडण्याची थोडी थोडी जाणीव होत असते आणि त्याला घडवणा-या बोटांचा स्पर्श त्याच्या चिरकाल लक्षात राहतो. माझ्या व्यक्तीमत्वाच्या घटावर ज्यांच्या बोटांचे ठसे खोलवर उमटलेले आहेत अशा एका व्यक्तीची ओळख या भागात करून देणार आहे. त्यांचे नाव आहे श्री.सदाशिव कृष्ण गोखले, म्हणजे माझ्या वडिलांचे मावस भाऊ आणि आमचे अण्णाकाका !

माझे सख्खे काका माझ्या जन्मापूर्वीच अकाली निवर्तले होते आणि माझ्या वडिलांचे चुलत, आते, मामे वगैरेंमधले जे बंधू हयात होते ते दूर पुण्यामुंबईकडे रहात असत. त्या काळात दळणवळणाच्या सोयी अत्यंत तुटपुंज्या असल्यामुळे आमचा त्यांच्याबरोबर संपर्क राहिला नव्हता. माझ्या लहानपणी तरी त्यातले कोणी कधी जमखंडीला येऊन गेल्याचे मला आठवत नाही. आम्हीही कधी त्यातल्या कोणाकडे गेलो नाही. त्यामुळे अण्णाकाका हे आमचे एकच जवळचे काका होते. तसे गावातल्या सगळ्याच वडीलधारी लोकांना आम्ही काका म्हणत असू, पण ते आपले फक्त म्हणण्यापुरतेच ! आमच्या अण्णाकाकांनी मात्र आम्हाला इतकी भरभरून माया, इतके प्रेम दिले की दुसरे कोणी काका नसल्याची आम्हाला कधीच उणीव भासली नाही.

अण्णाकाका माझ्या वडिलांपेक्षा पंधरा वीस वर्षांनी वयाने लहान होते. माझे आई, वडील आणि आत्या यांनी त्यांना अगदी लहानपणापासून पाहिले होते, खेळवलेसुध्दा असेल. त्यांच्या लाघवी स्वभावामुळे त्या सर्वांना ते अत्यंत प्रिय होतेच, आम्हा लहान मुलांना त्यांचे जास्तच आकर्षण वाटत असे. अण्णाकाकांची एक मोठी बहीण, आमच्या अंबूआत्या जमखंडीलाच रहायच्या. त्यांना भेटण्यासाठी किंवा आणखी काही कामानिमित्य ते जमखंडीला आले की आमच्या घरी यायचेच आणि थोरांपासून लहान मुलांपर्यंत सगळ्यांशी मनमोकळ्या गप्पागोष्टी करत सर्वांची इतक्या आपुलकीने विचारपूस करत की ते मुद्दाम आम्हाला भेटण्यासाठी विजापूरहून जमखंडीला आले आहेत असेच मला वाटत असे.

माझ्या आधीच्या पिढीमधले थोडेच लोक कॉलेजात जात असत आणि गेलेच तर ते संस्कृत किंवा इंग्रजी अशा विषयात 'बी.ए.' करत असत. अण्णाकाकांनी मात्र विज्ञानशाखेची पदवी घेतली होती. माझ्या नात्यातले किंवा ओळखीतले ते पहिलेच सायन्स ग्रॅज्युएट होते. त्यानंतर शिक्षणशास्त्राचा अभ्यास करून ते त्या क्षेत्राकडे वळले होते आणि विजापूरच्या एका विद्यालयात अध्यापनाचे काम ते करत होते. कोणतीही गोष्ट समजावून सांगण्याची विलक्षण हातोटी त्यांनी साधली होती. विषयांवरील प्रभुत्व, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेण्याची तयारी आणि त्या तिथल्या तिथे सोडवण्याचे त्यांचे कौशल्य, हंसतमुख आणि उमदे व्यक्तीमत्व, सर्वांबरोबर आपुलकीचे वागणे, विनोदबुध्दी या सर्वांमुळे अल्पावधीतच ते त्यांच्या विद्यार्थ्यांच्या गळ्यातले ताईत बनले होते. त्यांचे जे विद्यार्थी शालेय शिक्षण संपवून कॉलेजला गेलेले आणि नोकरी व्यवसायाला लागलेले होते त्यांच्या मनात सुध्दा या गोखले सरांच्यासाठी एक आदराचे अढळ स्थान तयार झाले होते.

मी अगदी लहान असतांना बराच अशक्त होतो, नेहमी आजारी पडत असे, वयाच्या मानाने उंची आणि वजन कमी असायचे, हातापायात त्राण नसायचे, दृष्टी अधू होती, त्यात बुजरा स्वभाव आणि मुलखाचा मुखदुर्बळही होतो. या सगळ्यामुळे देवाच्या कारखान्यातला एक 'डिफेक्टिव्ह पीस' चुकून पृथ्वीवर आला आहे असे कोणालाही वाटणे शक्य होते. माझ्या मनाच्या एका कोप-यात 'अग्ली डकलिंगने' घरटे बनवले होते. त्या काळामध्ये एकदा अण्णाकाका आमच्या घरी आले असतांना त्यांनी माझी बौध्दिक चाचणी घेतली आणि त्यावरून माझा बुध्द्यांक (आय क्यू) काढला होता. त्यांनी मला कसे काय बोलके केले, कोणते प्रश्न विचारले आणि मी काय उत्तरे दिली यातले काहीही मला आठवत नाही. 'इंटेलेक्चुअल कोशंट' या शब्दाचा अर्थ समजण्याचे माझे वय नव्हतेच. त्यामुळे तो आकडाही मला कळला नाही. खरे तर मला यातले काहीच कालपरवापर्यंत माहीत नव्हते. पण आमच्या घरी 'बुध्द्यांक' हा शब्दच टिंगल करण्याचा एक विषय झाला होता आणि 'दीड शहाणा' म्हणतात तसा त्याचा उपयोग होत होता असे अंधुकपणे आठवते.

अण्णाकाकांना मात्र त्यांच्या विद्येवर आणि शास्त्रीय पध्दतीने केलेल्या चाचणीतून निघालेल्या निकषावर पूर्ण विश्वास होता. मी चौथीत गेल्यानंतर स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसावे अशी त्यांनी शिफारस केली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी सरकारने ज्या नव्या योजना सुरू केल्या होत्या त्यातच शाळकरी मुलांना शिष्यवृत्ती देणे सुरू केले होते. पण ही बातमी आमच्या गावापर्यंत पोचलीच नव्हती. माझ्या आधी आमच्या गावातून कोणी या परीक्षेचा फॉर्मसुध्दा भरला नव्हता. जमखंडीला या परीक्षेचे केंद्र नसल्यामुळे त्यासाठी विजापूरला जाणे आवश्यक होते. आठ नऊ वर्षाच्या मुलाला त्या काळात कोणी एवढे महत्व देत नसत. मात्र अण्णाकाकाचे घर विजापूरला असल्यामुळे माझी राहण्याखाण्याची चांगली सोय होणार होती, त्याची काही काळजी नव्हती हे पाहून त्यांच्या शब्दाचा मान राखण्यासाठी मला त्या परीक्षेला बसवले गेले. मी मात्र प्रवासाला जाण्याच्या कल्पनेने बेहद्द खूष झालो होतो.

जमखंडी आणि विजापूर या गावांच्या मधून कृष्णामाई संथ वाहते आणि त्या काळात जमखंडीच्या जवळपास कोठेही त्या नदीवर पूल नव्हता. जमगी नावाच्या नदीकाठच्या एका गावापर्यंत एका वाहनातून किंवा पायी चालत जायचे, तिथे होडीत बसून नदी पार करायची आणि पलीकडे दुस-या वाहनात बसून पुढे विजापूरपर्यंतचा प्रवास करायचा असे करावे लागे. एका मोठ्या भावाच्या सोबतीने मला विजापूरला पाठवले. मी पहिल्यांदाच जमखंडीच्या पंचक्रोशीच्या बाहेर पाऊल टाकले असल्यामुळे मला या सगळ्यातच गंमत वाटत होती आणि शरीराला होत असलेला त्रास जाणवत नव्हता. आम्हाला उतरवून घेण्यासाठी अण्णाकाका बस स्टँडवर आले होते. त्यांना पाहूनच माझा सारा शीण नाहीसा झाला.

माझ्या शाळामास्तरांना या परीक्षेबद्दल काहीच माहिती नसल्यामुळे त्यासाठी वेगळी तयारी करून घेण्याचा प्रश्नच नव्हता. अशी काही तयारी करायची असते किंवा करता येते हेच मुळात कुणाला माहीत नव्हते. नाही म्हणायला दौतीत टाक बुडवून त्याने पाटको-या कागदावर चार पाच ओळी लिहून पाहिल्या. एवढीच वेगळी तयारी केली, कारण तोपर्यंत शाळेत सगळे लिहिणे पाटीवरच होत असे. या स्कॉलरशिपच्या परीक्षेत 'पेपर' असतात एवढे ऐकले होते आणि 'पेपर' म्हणजे 'कागद' एवढा त्याचा अर्थ लागला होता. शाळेतल्या अभ्यासक्रमातल्या विषयांची मात्र माझी पूर्ण तयारी होती आणि चौकसपणामुळे थोडे फार सामान्यज्ञान गोळा झाले होते. एवढ्या तयारीनिशी मी परीक्षेला बसायला गेलो होतो.

आदल्या दिवशी अण्णाकाकांनी मला दहा वीस प्रश्न विचारले आणि त्यावरून मी नक्की पास होईन असे सांगून धीर दिला. शिवाय लेखी परीक्षा कशी द्यायची असते याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. ते स्वतः मला परीक्षेच्या केंद्रात घेऊन गेले आणि पेपर सुटल्यानंतर घ्यायला आले. माझ्या आयुष्यातली पहिलीच लेखी परीक्षा एका नवख्या गावात आणि अनोळखी वातावरणात मी दिली. अण्णाकाका माझ्या पाठीशी होते म्हणूनच मला ते शक्य झाले. परीक्षेची गडबड आटोपल्यानंतर त्यांनी आम्हाला विजापूरचे दर्शन घडवून आणले. प्रसिध्द गोलघुमट, जामा मसजिद, इब्राहिम रोजा, मुलुख मैदान तोफ, तासबावडी वगैरे सर्व प्रेक्षणीय स्थळे दाखवली. उपली बुरुज तर त्यांच्या घराजवळच होता. आम्हाला दाखवण्यासाठी तेसुध्दा रोज आमच्याबरोबर त्यावर चढउतर करायचे. अण्णाकाकांच्या सहवासात त्यांच्या घरी घालवलेले ते तीन चार दिवस मला अपूर्वाईचे वाटले. माझ्या मनातले बदकाचे वेडे कुरुप पिल्लू तेवढे दिवस गाढ झोपी गेले होते. विजापूरच्या त्या ट्रिपमध्ये मला जितका आनंद मिळाला तेवढा ती परीक्षा पास झाल्याचे कळल्यानंतरसुध्दा झाला नाही.

सातवीत असतांना मी पुढच्या शिष्यवृत्ती परीक्षेला बसलो आणि त्या निमित्यांने पुन्हा एकदा तीन चार दिवस अण्णाकाकांकडे रहायला मिळाले. चौथीतल्या पहिल्या अनुभवाची ही सुधारलेली पुनरावृत्ती होती. त्यानंतर शालांत परीक्षा दिल्यानंतर पुन्हा एकदा अण्णाकाकांच्या घरी जाऊन रहायचा योग आला. त्या काळातल्या शिक्षणपध्दतीमध्ये छोट्या गावातील बहुतेक मुलांचा गणित हा विषय कच्चा रहात असे आणि सायन्स कॉलेजमधल्या पहिल्या वर्षातला गणिताचा इंग्रजी माध्यमातला कठीण अभ्यास त्यांना पेलवत नसे. आपल्या विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात आल्यानंतर अण्णाकाकांनी त्यासाठी क्लासेस सुरू केले. मुख्य इंग्रजी माध्यमात गणिताचे पाठ देतांना त्याचे स्पष्टीकरण ते मराठी व कानडी भाषेत देऊन ते सर्वांना सहज समजेल असे व्यवस्थितपणे सांगत असत. त्यामुळे सायन्स कॉलेजला जाऊ इच्छिणा-या मुलांची त्या विषयाची चांगली पूर्वतयारी होत असे. या क्लासेसचा उपयोग करून घेण्यासाठी त्यांनी मला बोलावून घेतले. मी तर एका पायावर तयार होतो आणि त्या संधीचा पूर्ण लाभ घेतला.
शालांत परीक्षेला येईपर्यंत मला थोडे फार समजायला लागले होते आणि आता कॉलेजशिक्षणासाठी घर सोडून जायचे म्हणजे न समजून चालण्यासारखे नव्हते. त्या काळामध्ये घरी असतांनासुध्दा माझे सर्वांगीण शिक्षण चालले होते. विजापूरला अण्णाकाकांकडे गेल्यानंतर रोज क्लासमध्ये बसून गणित शिकत असे आणि त्यानंतर बाकीच्या वेळात सुध्दा सारखे काही ना काही पदरात पडतच असायचे. जमखंडीच्या मानाने विजापूर हे मोठे शहर होते. उत्तरेला सोलापूर व दक्षिणेला हुबळी धारवाड या महानगरांशी थेट संपर्क असल्यामुळे सगळ्या नव्या वस्तू आणि कल्पना तिथे लगेच येऊन पोचायच्या. अण्णाकाका कॉलेजशिक्षणासाठी पुण्याला राहिलेले असल्यामुळे त्यांच्या बोलण्याच्या भाषेत शुध्दपणा आणि वागण्यात सफाई आली होती हे मी जमखंडीला असतांनाच पाहिले होते. आता त्यांच्या सहवासात राहतांना ते शिकून घ्यायची संधी होती. त्यांच्या सौ.ना आम्ही 'मामी' म्हणतो, त्या बहुधा मुंबईच्या होत्या आणि माझ्या नात्यातल्या आधीच्या पिढीमधल्या काकू, आत्या वगैरे सर्वांच्या तुलनेमध्ये आधुनिक होत्या. अण्णाकाकांचे विजापूरचे त्या वेळचे घर आकाराने जमखंडीच्या आमच्या वाड्याएवढे मोठे नसले तरी ते छानसे सजवलेले असायचे. घरातल्या सगळ्या वस्तू मांडून ठेवल्यासारख्या दिसायच्या. 'कोणतीही वस्तू कामासाठी बाहेर काढली की काम झाल्यावर आपल्या जागी ठेवायची'. 'घराबाहेर पडतांना नीटनेटके कपडे अंगावर चढवायचे'. 'कुणाशीही बोलतांना अदबशीरपणे बोलायचे', 'एकादी गोष्ट पटली नाही तरी ते सौम्य शब्दात व्यक्त करायचे' अशा अनेक अगदी छोट्या छोट्या गोष्टी रोजच्या जीवनातच माझ्या लक्षात येत होत्या किंवा माझ्या नकळत मला शिकवल्या जात होत्या. आज कोणालाही यात काहीच वेगळे वाटणार नाही, पण शेणाने सारवलेल्या जमीनीवर उभी उसलेली ग्रामीण राहणी आणि घासून पुसून चकाचक बनवलेल्या लादीवर विकसित झालेले शहरी जीवन यांच्या वातावरणातला फरक समजून घेणे आणि स्वतःला तसे वळण लावायचा प्रयत्न करणे माझ्या दृष्टीने महत्वाचे होते. पुढील आयुष्यात मला त्याचा खूप फायदा झाला.

आमच्या घरातले वातावरण जरा जास्तच सनातनी होते. नाटक सिनेमा पाहणे म्हणजे काहीतरी भयंकर पाप करण्यासारखे होते. शाळा सोडेपर्यंत मी 'रामभक्त हनुमान' किंवा 'यल्लम्मा देवी' असले मोजून दोन किंवा तीन चित्रपट (ते सुध्दा फक्त धार्मिक) पाहिले असतील. आमच्या घरात सिनेमातली गाणी किंवा कोणतीही प्रेमगीते ऐकणे वर्ज्य होते, रेडिओच नसल्यामुळे त्याची सोयही नव्हती, गायची तर कुणाचीच बिशाद नव्हती. विजापूरला असतांना अण्णाकाकांनी मला दोन आठवड्यात दोन सिनेमे दाखवले, 'कोहिनूर' आणि 'घूँघट'. मामी स्वतःच 'सारी सारी रात तेरी याद सताये' वगैरेसारखी गाणी सहज गुणगुणत असत. त्यामुळे मलाही कानावर पडलेल्या नव्या गाण्यांच्या उडत्या चाली गुणगुणाव्याशा वाटू लागल्या आणि हळू हळू जमू लागल्या. त्यांच्या घरी अर्नाळकरांच्या रहस्यकथांनी एक कपाट भरले होते. मी त्यातली निदान दोन तरी पुस्तके रोज वाचून संपवत असे आणि ते सुध्दा अगदी राजरोसपणे ! सरांनी गणिताच्या क्लासमध्ये सांगितलेले होमवर्क पूर्ण केले की अन्य वाचन करायला मी मोकळा असे. ज्या दिवशी अण्णाकाकांना मोकळा वेळ असे तेंव्हा ते संध्याकाळी मला फिरायला आपल्याबरोबर नेत असत आणि आम्ही गावातून एक मोठा फेरफटका मारून येत असू. वाटेत ते खूप मनोरंजक गोष्टी सांगत असत. त्यांचे अनेक माजी शिष्य वाटेत भेटत असत आणि त्यांची आपुलकीने विचारपूस करणे, खबरबात घेणे वगैरे होत असे. विजापूरच्या नकाशात पाहून तिथले सारे मुख्य रस्ते एकदा समजून घेतल्यानंतर मी एकटाही फिरायला बाहेर पडून आणि मैल दीड मैल रपेट करून परत येऊ लागलो. उपली बुरुजासारखी मोठी खूण घराजवळ असल्यामुळे कुठे रस्ता चुकून हरवण्याची भीती नव्हती. आणि जरी वाट चुकलीच तरी घर शोधणे अवघड नव्हते. अशा रीतीने त्यांच्या घरी राहण्यात सगळ्याच दृष्टीने मजाच मजा होती. या काळात माझ्या मनातला अग्ली डकलिंग पार नाहीसा झाला आणि उंच भरारी घेण्यासाठी माझ्या मनाची तयारी झाली.

अण्णाकाकांचे मला आवडलेले वैशिष्ट्य म्हणजे ते स्वातंत्र्य देत असत पण त्यांचे सगळीकडे बारीक लक्ष असे आणि काही वावगे दिसले तर ते ती गोष्ट स्पष्टपणे पण न ओरडता किंवा न दुखवता दाखवून देत असत. त्यांना कधी आवाज चढवून बोलतांना मी पाहिले नाही, पण त्यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट इतर लोक ऐकत असत. किंवा ती ऐकायलाच हवी असे त्यांना मनातूनच वाटावे अशा पध्दतीने ते सांगत असत. मी पूर्वी ऐकलेल्या, वाचलेल्या किंवा पोपटपंची करून इतरांना सांगितलेल्या काही चांगल्या गोष्टी अण्णाकाकांच्याकडून ऐकतांना मला जास्त समजल्या किंवा उमगल्या असाव्यात. १९७१ सालच्या उन्हाळ्यातल्या सुटीतला तो अनुभव मला मनापासून इतका आवडला होता की दिवाळीची सुटी होताच मी हॉस्टेलमधल्या इतर मुलांप्रमाणे अधीर होऊन घराकडे धाव ठोकली नाही. काही तरी निमित्य काढून आधी विजापूरला गेलो. त्या अगांतुकपणाचा मला एक अनपेक्षित असा फायदा झाला. गणिताच्या क्लासला येणारा अण्णाकाकांचा एक विद्यार्थी तिथे भेटला. त्याला त्याच वर्षी सुरू झालेली नॅशनल स्कॉलरशिप मिळाल्याचे त्याच्याकडून समजले. मला तर त्याच परीक्षेत त्याच्यापेक्षा जास्त मार्क मिळाले होते. या गोष्टीचा छडा लावल्यावर मलाही ती शिष्यवृत्ती मिळाली. काटकसर करून राहिल्यास महिन्याचा सर्व खर्च भागण्यासाठी ती पुरेशी होती. त्यामुळे माझ्या पुढील शिक्षणाला तिचा मुख्य आधार मिळाला आणि ते पूर्ण करण्यात खूप मदत झाली.

माझे शिक्षण अर्धवट असतांनाच आमचे दादा (माझे वडील) गेले आणि आमचे जमखंडीचे घरच विस्कटले. त्यापुढे जमखंडीलाच जायचे कारण न उरल्यामुळे वाटेत विजापूरला मुक्काम करण्याची संधी मिळत नव्हती. लग्न करून स्थिरस्थावर झाल्यानंतर मुद्दाम त्या भागाचा धावता दौरा काढला आणि त्यातले दोन दिवस विजापूरसाठी राखून ठेवले. मधल्या काळात अण्णाकाकांनी विजापूरच्या नव्या भागात स्वतःचा बंगला बांधला होता आणि ते दत्तभक्त असल्यामुळे त्याला 'गुरुकृपा' असे नाव दिले होते. पूर्वीचा अनुभव आणि निरीक्षण यांच्या आधारावर त्यांनी खूप छान आणि सोयिस्कर असे घर बांधले होते. नेहमीप्रमाणेच त्यांच्या घरी गेल्यानंतर आमचे मनःपूर्वक आणि भरपूर आदरातिथ्य झाले. विजापूर हे ऐतिहासिक शहर अलका आणि उदय यांना दाखवायलाचे होते. या कामासाठी अण्णाकाकांना तसदी द्यावी असे मला वाटले नाही आणि आम्ही शहर पहायला निघालो. "मला विजापूर शहराची बरीच माहिती आहे", "टांगेवाला सगळीकडे फिरवून आणेल" वगैरे मी अण्णाकाकांना सांगून पाहिले. पण तरीसुध्दा एक एक करत ते स्वतः सर्व ठिकाणी आमच्याबरोबर आले आणि तेसुध्दा त्यांच्या सायकलवरून ! प्रत्येक गोष्ट जेवढी चांगली करता येणे शक्य असेल तशी करायची असा त्यांचा स्वभाव होता आणि त्यांच्याइतका चांगला मार्गदर्शक मिळणे अशक्य होते. यामुळे त्यात आमचा फायदाच झाला. पण ते येणार हे आधीच ओळखून सर्वांनी एकत्र फिरण्याची व्यवस्था मी करायला हवी होती ही रुखरुख मात्र मनाला लागून राहिली.

भावना, कर्तव्य वगैरे बाबतीतल्या रूढ विचारांच्या पलीकडे जाऊन योग्य वा अयोग्य याचा निर्णय घेण्याची पुरेपूर क्षमता मला अण्णाकाकांमध्ये दिसली. याची दोन उदाहरणे आठवतात. दादांच्या शेवटच्या आजारात त्यांना सोलापूरच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. सर्व वैद्यकीय तपासण्या झाल्यानंतर त्यांना झालेला असाध्य रोग अखेरच्या टप्प्याला जाऊन पोचला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उपचार चालले असतांनाच ते कोमामध्ये गेले. यावर कोणताच इलाज शक्य नसल्यामुळे त्यांना रुग्णालयातून घेऊन जाण्याची सूचना डॉक्टरांनी दिली. त्यावेळी मी विद्यार्थीदशेतच होतो. माझी आई, मोठे बहीणभाऊ आणि इतर सारेच आप्त त्या धक्क्याने हादरले होते. काय करावे याबद्दल कोणालाच काही सुचत नव्हते. दादांना वाडिया हॉस्पिटलमधून बाहेर नेल्यावर त्यांना एकाद्या खाजगी शुश्रुषाकेंद्रात नेऊन ठेवावे असे वाटणे त्यावेळी साहजीक होते आणि त्या दृष्टीने चौकशी आणि तयारी सुरू केली होती. अर्थातच ते खूप खर्चिक होते. त्या काळात आमची सांपत्तिक परिस्थिती ओढाताणीचीच होती, तरीही भावनेच्या भरात कशीबशी पैशाची व्यवस्था करावी लागली असती. त्यावेळी भेटायला आलेल्या अण्णाकाकांनी सांगितले, "दुस-या इस्पितळात नेऊन ते बरे होण्याची शक्यता असेल तर ते करायलाच पाहिजे. यात काही दुमत नाही. पण आज कोणताही खाजगी डॉक्टरसुध्दा आपल्याला तशी आशा दाखवायला तयार नाही. त्यांच्या आयुष्यातले आता शेवटचे जितके दिवस शिल्लक असतील ते कुठल्या तरी अनोळखी खोलीत एकट्याने पडून राहण्यापेक्षा ते आपल्या मुलाबाळांमध्ये घालवतील तर त्यांना आणि तुम्हा सर्वांना बरे वाटेल. त्यांची जेवढी सेवा शुश्रुषा आपण मनोभावे करू शकू तशी पगारदार नर्स करणार नाही. तेंव्हा माझ्या मते त्यांना घरी घेऊन जाणेच योग्य होईल."

शालांत परीक्षेचे पेपर तपासण्यासाठी अण्णाकाकांना एकदा बंगळूरला जाऊन काही दिवस तिथे मुक्काम करावा लागला. माझा भाऊ धनंजय तिथेच रहात होता आणि त्याचे घरही चांगले प्रशस्त होते. अण्णाकाकांनी त्याच्याकडेच रहावे अशी त्याची इच्छा असणे साहजीकच आहे. तशी विनंती त्याने केली आणि ती मान्य होईल अशी त्याची अपेक्षा होती. पण अण्णाकाकांनी वेगळा ऑब्जेक्टिव्ह विचार केला. धनंजयकडे जाऊन राहण्याची आणि घरच्या अन्नाची उत्तम व्यवस्था झाली असती, तसेच त्याच्या कुटुंबातल्या लोकांचा सहवास मिळाला असता, त्यांना खूप आनंद झाला असता हे सगळे प्लस पॉइंट असले तरी पेपर तपासण्याचे जे काम करण्यासाठी ते तिथे गेले होते ती जागा दूर होती आणि रोज तिकडे जाण्यायेण्याची दगदग करून ते काम करतांना कदाचित त्या कामाला पुरेसा न्याय देता आला नसता. त्यामुळे जवळच असलेल्या एका कामचलाऊ निवासालयात त्यांनी राहण्याचे ठरवले. पुढे ऑफीसच्या कामासाठी मला जेंव्हा निरनिराळ्या शहरांना जावे लागत होते तेंव्हा मला त्यांचे लॉजिक समजले आणि त्या शहरात असलेल्या नातेवाइकांकडे उतरण्याऐवजी मी कामाच्या दृष्टीने सोयिस्कर अशा जागी राहू लागलो आणि कामातून वेळ मिळाला तर त्यांना भेटायचा प्रयत्न केला.

अण्णाकाकांच्या मुलीच्या म्हणजे पद्माच्या लग्नाच्या वेळचा एक मजेदार प्रसंग आठवतो. हॉलच्या कुठल्याशा कोप-यात बसून लग्नाला आलेल्या इतर नातेवाइकांबरोबर गप्पागोष्टी करण्यात मी मग्न होतो. "आनंदा कुठे आहे? त्याला अण्णामामांनी बोलावलं आहे." असे कोणीतरी ओरडून सांगत होते. ते माझे काका असले तरी त्यांच्या भाचरांची संख्या जास्त असल्यामुळे त्यांच्या परिवारात ते 'अण्णामामा' म्हणूनच ओळखले जातात. त्या ठिकाणी माझ्याहून ज्येष्ठ आणि अनुभवी अशी अनेक मंडळी होती आणि तरुण उत्साही व्हॉलंटीअर्सची मोठी फौज कोणतेही काम करण्यासाठी तत्पर होती. त्यामुळे माझी कशासाठी गरज पडली असेल ते मला समजेना. माझ्याकडे कोणती विशिष्ट जबाबदारीही दिलेली नव्हती. मी धावत पळत आत गेलो आणि अण्णाकाकांच्यासमोर जाऊन हजर झालो. तिथे गेल्यावर समजले की कोणाला तरी नेकटाय बांधायची होती आणि ते काम मी व्यवस्थित करू शकेन असा विश्वास त्यांना वाटला होता. आता मात्र ही माझ्या कसोटीची वेळ होती. मी स्वतः गरजेनुसार कधी गळ्यात टाय बांधली असली तरी ती परफेक्ट होईल इकडे लक्ष दिले नव्हते. आता मात्र त्यात चूक करून चालले नसते. देवाचे नाव घेऊन ती टाय हातात घेतली आणि सर्व लक्ष एकवटून तिच्या गाठीचा सामोशासारखा त्रिकोण कसाबसा तयार केला. लग्न समारंभ आणि जेवणखाण वगैरे संपल्यानंतर कार्यालयातून हळूच पळ काढायचा आणि मुंबईला परत जाण्यापूर्वी इतर एक दोन लोकांकडे जाऊन यायचे असा माझा विचार होता. अण्णाकाकांचा निरोप घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तर म्हणाले, "एवढ्यात कुठे चाललास? सगळ्यांच्या भेटी तर इथे झाल्या आहेत ना!" त्यांचा मुद्दा बिनतोड होता. मुकाट्याने हातातली बॅग खाली ठेवली. मुलीला साश्रु नयनांनी निरोप देऊन झाल्यानंतर त्यांनी सर्व पाहुणे मंडळींना हॉलमध्ये बोलावले. आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या नावाने भेटवस्तूचे वेगळे पॅकेट त्यांनी तयार करून ठेवले होते आणि प्रोटोकॉलनुसार त्या सर्वांची त्यांनी एक यादी बनवलेली होती. अण्णाकाकांनी एकेका कुटुंबाचे नाव घेऊन बोलावताच त्यांनी पुढे यायचे आणि आपल्या भेटवस्तू स्वीकारायच्या. लग्नसमारंभाचा हा शेवटचा भाग अशा प्रकारे अत्यंत सुनियोजित पध्दतीने केलेला मी पहिल्यांदाच पाहिला. त्यानंतर जेंव्हा मला आवश्यकता पडली तेंव्हा तेंव्हा मीसुध्दा तसे करण्याचा थोडा प्रयत्नही केला.

त्यानंतर फक्त एकदाच विश्वासच्या लग्नाच्या निमित्ताने माझे विजापूरला जाणे झाले, तेसुध्दा धावत पळत ! त्यावेळी त्यांच्याकडे रहाण्यासाठी सवड नव्हती. लग्नाच्या आदल्या रात्री सारे कार्यक्रम संपल्यानंतर कार्यालयात नुकतीच निजानीज झाली होती. मध्यरात्रीच्या सुमाराला मला कसलीशी चाहूल लागून जाग आली. डोळे अर्धवट उघडून पाहिले तर अण्णाकाका त्या खोलीत कोण कोण झोपले आहेत हे पहायला आले होते. ते खास त्यांच्या घरचे कार्य नसले तरीसुध्दा लग्नाला आलेल्या सर्वांना अंथरूण पांघरूण वगैरे नीट मिळाले आहे याची खात्री करून घेतल्यानंतर ते आपल्या जागेवर जाऊन झोपले.

पुढे अण्णाकाकांनीही विजापूर सोडले आणि ते आकुर्डीला स्थायिक झाले. कामाच्या आणि संसाराच्या व्यापात मी इतका गुंतत गेलो होतो की कारणाशिवाय कोणाकडे जाणे मला अशक्यच होऊन गेले होते. त्यामुळे अण्णाकाकांची भेट एकाद्या लग्नसमारंभातच झाली तर होत असे आणि त्यावेळी जुन्या आठवणींना उजाळा मिळत असे. हळू हळू अशा भेटीही कमी होत गेल्या. त्यांच्या नातीच्या विवाहाला अगदी नक्की जायचे आमचे ठरले होते, पण आयत्या वेळी तब्येतीने असा दगा दिला की मला थेट हॉस्पिटलात दाखल व्हावे लागले. त्यानंतर त्यांच्या भेटीचा योग आला नाही. या वर्षी पुण्याला झालेल्या कौटुंबिक संमेलनाच्या वेळी अण्णाकाकांना तिथे 'गेस्ट ऑफ ऑनर' म्हणून बोलवायचे असा आमचा विचार होता, त्या दृष्टीने थोडी विचारणा केली, पण प्रकृतीअस्वास्थ्यामुळे ते आजकाल कुठेच जात नाहीत असे समजले. त्यावेळी हवामानही फारसे अनुकूल नव्हतेच. तेंव्हा मात्र पुढच्या पुण्याच्या दौ-यात आकुर्डीला जाऊन त्यांना भेटून यायचे असे मनोमनी ठरवले आणि त्यांचा टेलीफोन नंबर डायरीत लिहून घेतला.

मनात तीव्र इच्छा असली तर अचानक मार्ग सापडतो असे म्हणतात, अगदी तसेच झाले. अकस्मात काही कामानिमित्य मला चिंचवडला जाण्याचा योग आला. तिथले काम लवकर आटोपले तसा तिथूनच फोन लावून मी अण्णाकाकांना भेटायला येणार असल्याचे कळवले. त्यांचा आकुर्डीचा सविस्तर पत्ता लिहून घेतला, तिथे कसे पोचायचे ते समजण्यासाठी आजूबाजूच्या खाणाखुणा विचारून घेतल्या आणि त्याप्रमाणे त्यांच्या घरी जाऊन पोचलो. अनेक वर्षांनंतर त्यांना नमस्कार करतांना मनात जे समाधान वाटत होते ते शब्दात सांगता येणार नाही. वयोमानानुसार त्यांचे शारीरिक स्वास्थ्य नाजुक झाले असले तरी स्मरणशक्ती चांगली तल्लख दिसली. आमच्या परिवारातल्या प्रत्येकजणाची त्यांनी अत्यंत आपुलकीने नावानिशी चौकशी केली. बोलण्यामध्ये गेल्या पाच दशकातल्या आठवणी निघाल्या. त्यात एकदा धनंजयला नाराज करावे लागल्याचे त्यांनी सांगितले आणि मला अद्यापपर्यंत माहीत नसलेला माझ्या बौध्दिक चाचणीचा किस्सा त्यांनी सांगितला. जवळ जवळ साठ वर्षांपूर्वीची ती इतकी किरकोळ गोष्ट त्यांनी अजून लक्षात ठेवली होती याचे मला नवल वाटले.

पुण्याला झालेल्या कौटुंबिक मेळाव्याच्या निमित्याने मी परिवारातल्या सर्वांची छायाचित्रे गोळा करून ती सर्वांना दाखवली होती. अण्णाकाकांना भेटून घरी परत आल्यानंतर माझ्या लक्षात आले की त्यात त्यांचा फोटो नाही. त्यामुळे माझ्या संग्रहात मोठी उणीव राहिली आहे, मी घरातले बहुतेक सगळे आल्बम उघडून पाहिले, आमच्या विजापूरच्या भेटीच्या वेळी काढलेले दोन तीन फोटोसुध्दा सापडले, पण त्यात नेमका अण्णाकाकांचा चेहराच तेवढा कुठे मिळाला नाही. त्यामुळे विठ्ठलला फोनवरून विनंती केली आणि त्याने मला एक फोटो पाठवून दिला. त्यानंतर त्यांच्याबद्दल चार शब्द लिहावे असे वाटले म्हणून ते लिहिण्याचा हा प्रयत्न केला आहे. त्यांचे आशीर्वाद सतत आमच्या पाठीवर राहोत अशी इच्छा व्यक्त करून आणि परमेश्वर त्यांना दीर्घायुष्य देवो अशी प्रार्थना त्याचेकडे करून हा लेख संपवत आहे.

No comments: