एकोणीसाव्या शतकातल्या पन्नाशीत मी नुकताच शाळेला जायला लागलो होतो त्या काळात क्वचित कधी एक म्हाता-या सोवळ्या बाई आमच्याकडे यायच्या. कंबरेमध्ये काटकोनात वाकलेल्या त्या आजींच्या दोन्ही डोळ्यांमधला मोतीबिंदू भरपूर वाढला होता. त्यामुळे पांढुरकी झालेली त्यांची बुबुळे पाहून मुले त्यांना घाबरत असत. त्या काळात गांवोगांवी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियांची शिबिरे भरत नव्हती. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेसाठी निदान मिरजेच्या वानलेस हॉस्पिटलमध्ये जावे लागत असे, पण तिथे जाण्यासाठी वाहतुकीची चांगली सोय नव्हती. सर्व्हिस मोटर नावाच्या बेभरोशाच्या खटा-यात बसून पन्नास किलोमीटर अंतरावरले कुडची स्टेशन गाठायचे आणि तिथे दिवसातून एक दोनदाच अवेळी येणा-या एमएसएम रेल्वेच्या मीटरगेज गाडीची वाट पहात तिष्ठत बसायचे. ती आल्य़ानंचर कसेबेसे गर्दीतून घुसायचे आणि मिरजेला जायचे. अत्यंत गरजू लोकच नाइलाजाने असले दिव्य करत असत. त्या आजींच्या घरी आणखी कोण कोण होते ते आता मला आठवत नाही, पण त्यांना ऑपरेशनसाठी मिरजेला घेऊन जाण्याची कोणाची तयारी नसावी किंवा त्यांना हा प्रवास झेपणार नाही असे त्यांना वाटत असावे. आपल्या क्षीण झालेल्या दृष्टीसाठी त्या कधी दैवाला दोष लावत किंवा आणखी भलते सलते दृष्टीला पडू नये म्हणून परमेश्वरानेच दिलेली दृष्टी तो काढून घेतो आहे असे त्या विषण्णपणे म्हणत असत. त्यांचे मोतीबिंदू अखेरपर्यंत त्यांच्या डोळ्यांमध्ये राहिले आणि ते डोळे क्षीण होत होत एकदिवस कायमचे मिटून गेले. मोतीबिंदू या गोंडस वाटणा-या नावामागील हे विदारक सत्य मला त्या वृध्देच्या डोळ्यांध्ये पहिल्यांदा दिसले.
एकोणीसशे ऐंशीच्या घरात असतांनाची गोष्ट. त्या काळात माझी आई आमच्याकडे रहात होती. एकदा तिला चष्मा लावूनसुध्दा पोथी वाचतांना बरेच वेळा अडखळतांना पाहिले. पण तिने त्याचा काहीच उलगडा केला नाही. सहज बोलता बोलता खिडकीतून समोर दिसणा-या इमारतीच्या कठड्यावर बसलेल्या पक्ष्याबद्दल विचारले, पण तिला तो पक्षी तर नाहीच, पण बाल्कनी आणि कठडासुध्दा नीट दिसत नव्हता असे तिच्या उत्तरावरून माझ्या लक्षात आले. मग मात्र मी तिला नेत्रतज्ञांकडे घेऊन गेलो. त्यांनी तिचे डोळे तपासले आणि दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू झाला असल्याचे सांगितले. तो परिपक्व झाल्यावर लगेच काढला नाही तर तिची दृष्टी गमावून बसण्याचा धोका असल्याचे सांगितले आणि जास्त वाट न पाहता आताच ऑपरेशन करून घ्यावे असे सुचवले. काहीशा अनिच्छेनेच आई ऑपरेशन करून घ्यायला तयार झाली.
शस्त्रक्रिया करण्यापूर्वी आवश्यक असलेली तिच्या शारीरिक आरोग्याची तपासणी सुरू झाली. माझ्या आईला खूप पूर्वीपासून दम्याचा विकार होता. थोडा निसर्गोपचार, थोडे घरगुती उपाय आणि काही आयुर्वेदिक औषधे यांच्या आधारावर ती दम्यावर नियंत्रण ठेवत असे. अगदीच आणीबाणी आली आणि आवश्यकता पडली तरच ती डॉक्टरांकडे जात असे. पण ही वैद्यकीय तपासणी सुरू झाल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या औषधांचे प्रयोग तिच्यावर सुरू केले आणि त्यांच्या दृष्टीने तो आटोक्यात आणला असे वाटल्यानंतर दंतवैद्याकडे पाठवून दिले. सत्तरी गांठेपर्यंत आईच्या सर्व दाढा निखळून गेल्या होत्या, समोरचे थोडे दात शिल्लक असले तरी त्यांची अवस्था फारशी चांगली नव्हती. त्यांचा चर्वणासाठी उपयोग होत नव्हता. ऑपरेशन करण्याआधी ते दात काढून टाकावे लागतील असे दंतवैद्याने सांगितले. सगळे दात काढल्यानंतर कवळी बसवून व्यवस्थित जेवण करता येईल हा फायदाही दाखवला. नको नको म्हणत निरुपाय म्हणून अखेर आई त्याला तयार झाली. एका दिवशी फक्त एकच दात काढायचा आणि ती जखम बरी झाल्यानंतर दुसरा दात काढायचा असे धोरण असल्यामुळे त्यात बरेच दिवस गेले. मोतीबिंदू झालेल्या रुग्णांची संख्या बरीच असल्यामुळे आणि घाई करण्याची गरज नसल्यामुळे शस्त्रक्रियेसाठी पुढच्या महिन्यातली तारीख मिळाली.
ऑपरेशन चालले असतांना आणि त्यानंतर त्याची जखम बरी होईपर्यंत शिंक, ठसका, खोकला, उलटी, उचकी अशा कोणत्याही क्रियेने धक्का बसू नये याची काळजी घ्यावी लागणार होती. या दृष्टीने आईला तीन दिवस आधीच हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करून घेतले आणि औषधे, वाफारे, इंजेक्शने, थेंब वगैरेंच्या सहाय्याने तिच्या शरीराचे संपूर्ण निर्जंतुकीकरण करण्यात आले. त्याशिवाय तापमान, रक्तदाब, नाडीचे ठोके वगैरेंची मोजणी रोज सकाळ संध्याकाळ केली जात असे. त्यापूर्वी ती कधीच अशा प्रकारच्या इस्पितळात राहिली नव्हती. त्यामुळे तिथल्या वातावरणानेच ती भांबावून गेली होती. ऑपरेशन होऊन वॉर्डमध्ये परत आल्यानंतर डोके स्थिर ठेऊन उताणे पडून राहण्याची आज्ञा झाली. असे आढ्याकडे पहात तास न् तास निश्चलपणे पडून राहणे तिला अशक्यप्राय वाटत असणार. असामान्य सोशिकपणामुळे ती तक्रार करत नव्हती, पण जे काही चालले आहे ते तिच्या मनाविरुध्द असल्याचे तिच्या देहबोलीतून स्पष्ट होत होते.
हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दहा पंधरा दिवस रोज डोळ्यात मलमे आणि थेंब घालणे चालले होते. त्यानंतर तपासणी होऊन ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाल्याचे सांगितले गेले. एक नेहमीच्या वापरासाठी आणि दुसरा वाचन करण्यासाठी असे दोन जाड भिंगांचे चष्मे आणले. त्यांच्या सहाय्याने आता आईला नवी स्पष्ट दृष्टी मिळाली होती. पण थोड्या दिवसांनी तिने आपला मुक्काम मोठ्या भावाकडे हलवला. त्यानंतर या नव्या दृष्टीचा किती उपयोग तिने करून घेतला आणि त्यातून तिला किती आनंद प्राप्त झाला याचा जमाखर्च कांही मला मांडता आला नाही. आमच्या दुर्दैवाने वर्षभरातच ती आम्हाला सोडून गेली. आपल्या मंद होत गेलेल्या दृष्टीबद्दल तिची तक्रार नव्हती आणि त्या अवस्थेत हा वर्षभराचा काळ तिने तिच्या मर्जीनुसार वागून कदाचित जास्त आनंदाने काढला असता असेही वाटायचे. पुढे घडणा-या गोष्टींची आधी कल्पना नसते आणि त्यांची चाहूल कधी लागेल याचाही काहीच नेम नसतो. कदाचित आईला ती लागली असल्यामुळे ती सारखा विरोध करत असेल. आपल्याला नक्की काहीच माहीत न झाल्यामुळे या जरतरला काही अर्थ नसतो एवढेच खरे.
. . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment