एकोणीसशे नव्वदीच्या दशकातला एक प्रसंगः
आमच्या कॉलनीतल्या सरळसोट रस्त्यावरून मी चाललो होतो. रस्त्यात तुरळक रहदारी होती. माझा कॉलेजपासूनचा मित्र कृष्णा कामत समोरून येत असलेला मला दुरूनच दिसला आणि आश्चर्याचा लहानसा धक्का बसला. जन्मजात असलेल्या वैगुण्यामुळे त्याला बालपणीच चष्मा लागला होता आणि त्याचा नंबर वाढत वाढत उणे बारा तेरापर्यंत गेला होता. सोडावॉटरच्या बाटलीच्या तळाशी असते तशा पाच सहा मिलिमिमीटर जाड कांचेच्या भिंगाचा बोजड चष्मा हा त्याच्या चेहे-याचा आवश्यक भाग बनला होता. फारच कमी लोकांनी त्याचा चष्म्याविना चेहेरा पाहिला असेल. पण आज तो चक्क चष्म्याशिवाय अगदी व्यवस्थितपणे रस्त्यावरून चालत येत होता. त्याच्या चालण्यात चाचपडण्याचा किंवा ठेचकाळण्याचा किंचितही भाग दिसत नव्हता. क्षणभर मला ते खरेच वाटले नाही. पण तो माणूस कामतच होता यात जराही शंका नव्हती.
तरुण मुले आणि विशेषतः मुली काँटॅक्ट लेन्स लावून आपले वैगुण्य लपवतात हे मला माहीत होते, पण पन्नाशीकडे झुकण्याच्या वयात कामतला ते करण्याची गरज नव्हती. तसे करण्याची त्य़ाची प्रवृत्तीही नव्हती. शिवाय इतक्या जास्त पॉवरची स्पर्शभिंगे मिळतात की नाहीत याबद्दल मला शंका होती. "होमिओपाथी, आयुर्वेदिक किंवा लेजर तंत्र यांच्या सहाय्याने डोळ्याचा नंबर घालवून देऊ" असा दावा करणा-या जाहिराती मी वाचल्या होत्या, पण त्यावर माझा विश्वास बसला नव्हता की तसे उदाहरण मला प्रत्यक्षात आढळले नव्हते. न जाणो ते कदाचित खरे असेल आणि असा धन्वंतरी या कामताला भेटला असेल असा विचारही एकदा मनात डोकावून गेला.
तोपर्यंत कामत माझ्यापासून चारपाच पावलांच्या अंतरावर येऊन पोचला होता. झपाझप पुढे येऊन त्यानेच माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "अरे, असा काय पाहतो आहेस? मी कामतच आहे."
"पण तुझा चष्मा .... "
"तो गेला, त्याला पार अरबी समुद्रात टाकून दिला." आपल्या शैलीत कामत्याने सांगितले.
"ही जादू कुणी केली?" माझी उत्सुकता वाढत होती
"कुणी नाही. अरे, माझे कॅटॅरॅक्टचे ऑपरेशन झाले ... आणि मला साध्या डोळ्यांनी दिसायला लागले."
माझ्या आश्चर्याला पारावार उरला नाही. बहुतेक लोकांना चाळिशीनंतर चाळशी लागते. मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर तर केवढा जाड भिंगांचा चष्मा लागतो. पण याला आधीपासून असलेली चाळशी चाळिशीमध्ये नाहीशी झाली होती ( वाचण्यासाठी त्यालाही भिंग लागत असणारच) आणि मोतीबिंदू काढल्यानंतरही जाड भिंगांशिवाय याला व्यवस्थित दिसते आहे हा काय प्रकार आहे याचा बोध होत नव्हता. कदाचित त्याच्या पूर्वी असलेल्या चष्म्याचा नंबर उणे बारा अधिक मोतीबिंदूनंतर लागणा-या चष्म्याचे अधिक बारा मिळून शून्य झाले असेल असा गणिती विचार माझ्या मनात आला. अखेर त्यानेच सांगितले, "आता कॅटॅरॅक्ट ऑपरेशन झाल्यानंतर डोळ्यात रिकाम्या झालेल्या जागी कृत्रिम लेन्स बसवून देतात. त्या लेन्समधून छान दिसायला लागते." हा शोध भारतात येऊन पोचला होता, पण मला माहीत नव्हता.
ऑपरेशननंतर नवे भिंग बसवतांना मूळच्या चष्म्याच्या नंबराला त्यात अॅडजस्ट करत असतील हा विचार मात्र मनात तसाच ठाण मांडून बसला होता तो अनेक वर्षे तसाच राहिला.
. . . . . . . (क्रमशः)
No comments:
Post a Comment