Thursday, November 04, 2010

दिवाळीतला किल्ला


कल्पकता आणि निर्मितीची आवड या गोष्टी कमी अधिक प्रमाणात सगळ्या माणसांना जन्मजात मिळतात. बहुतेक लहान मुलांमध्ये त्या दिसून येत असतात, पण "इथे पसारा मांडू नकोस, गोंधळ करू नको" असे आदेश देत आणि "लागेल, इन्फेक्शन होईल, आजारी पडशील" अशी भीती दाखवून बरेचसे आईवडील, विशेषतः माता त्या गुणांना दडपून टाकतांना पाहून मला त्यांची कीव करावीशी वाटते. सुदैवाने माझ्या लहानपणी मला असले काही ऐकावे लागले नाही. तसे आमचे कुटुंब अत्यंत बाळबोध होते आणि धार्मिक परंपरा पाळण्याबद्दल कसलीही तडजोड चालत नसे. सकाळी उठण्यापासून रात्री झोपेपर्यंत करण्याच्या कामात एक शिस्त असायची. पण ती करून झाल्यानंतरही भरपूर मोकळा वेळ मिळत असे आणि तो सर्वस्वी आपला असायचा. मुले काय करताहेत यावर घरातल्या मोठ्या माणसांचे लक्ष असले तरी त्यात त्यांची अडकाठी नसायची. त्यात कुठे खरचटले, चटका बसला, बोट कापले, कपडे मळले, अंग घाण झाले असे व्हायचे. तरीही "नसते उपद्व्याप कशाला करायला गेला होतास?" असे विचारून त्यासाठी पाठीत धपाटा घातला जात नसे. असल्या उद्योगातून काही निष्पन्न झाले तर त्याचे कौतुकदेखील होत असे.

दिवाळीमध्ये करायचा किल्ला म्हणजे आमच्या निर्मितीक्षमतेचा परमोच्च बिंदू असे कदाचित म्हणता येईल. त्याची तयारी वर्षभर चालत असे. त्या काळात असल्या हौसेच्या कामाचे शाब्दिक कौतुक होत असले तरी त्यासाठी दिडकीचीसुध्दा आर्थिक मदत मिळत नसे. घरात किंवा आसपास उपलब्ध असलेला कच्चा माल वापरूनच जे काही करायचे ते करावे असा अलिखित नियम होता. रिकाम्या काडेपेट्या, खोके, डबे, बाटल्या, फ्यूज झालेले बल्ब असल्या टाकाऊ वस्तू गोळा करून आम्ही मुले त्यांना अडगळीच्या खोलीत ठेवत असू आणि त्यांचा उपयोग कसा करायचा यावर विचारचक्र सुरू होत असे. दिवाळीच्या आठवडाभर आधी त्या बाहेर काढून किल्ल्याच्या रचनेला प्रत्यक्ष सुरुवात होत असे.

आमचे घर पूर्णपणे दगडमातीचे होते. घरातली जमीन, भिंती, माळवद सारे काही मातीपासून बनवलेले होते. घराबाहेर तर जिकडे तिकडे मातीच माती असायची. त्यामुळे या पहिल्या पंचमहाभूताला बराच मान होता. मला तरी कधीच मातीबद्दल घृणा वाटली नाही. किल्ला तयार करण्यासाठी आधी दगड, माती, विटा वगैरे जमवून त्याचा ढीग रचायचा. दगडविटा जोडून मातीच्या चिखलाने त्यांना लिंपून घेऊन त्यातून हवा तसा आकार निर्माण करायचा. डोंगर, गडकोट, सपाट जमीन, पाण्याचे तळे वगैरे भूभाग तयार झाल्यानंतर त्यावर घरे, बंगले, रस्ते, वाहने, माणसे वगैरेंनी त्याला सजवायचे. दिवाळी सुरू होईपर्यंत जेवढा वेळ मिळेल तितका वेळ हे काम चालत असे. आपल्या संग्रहातली सारी चित्रे व खेळणी त्यावर मांडत असू. या किल्ल्याला स्थळकाळाचे बंधन नसायचे. कमळातल्या लक्ष्मीपासून महात्मा गांधींपर्यंत कोणत्याही देवदेवता व ऐतिहासिक व्यक्ती आणि हत्तीघोड्यापासून (न उडणा-या) विमानापर्यंत कोणतेही वाहन त्यात येत असे. त्यांच्या आकारमानात प्रमाणबध्दता किंवा रचनेत सुसंगती असण्याचा प्रश्नच नव्हता.

शाळेत असेपर्यंत आम्ही दरवर्षी दिवाळीला किल्ला बनवत होतो. त्यानंर ही प्रथा खंडित झाली ती झालीच. माझी मुले लहान असतांना ऑफीसला जाण्यायेण्यातच सारा दिवस संपून जात असल्याने मला वेळच नव्हता आणि कॉस्मोपोलिटन वस्तीत रहात असतांना इतरांकडेही किल्ला बनतांना दिसत नसल्यामुळे मुलांनीही त्याची मागणी केली नाही. आता पन्नास वर्षांनंतर यावर्षी पुन्हा एकदा किल्ला बनवायची संधी मला मिळाली. पुण्याला अजूनही मराठी संस्कृतीचा थोडा स्पर्श असल्यामुळे कुठून तरी माझ्या सात वर्षाच्या नातींना किल्ल्याचा सुगावा लागला आणि आपल्याकडे तो हवा असा हट्ट धरला. आजच्या पध्दतीनुसार किल्ला कुठे (तयार) मिळतो, त्याचे प्रदर्शन लागले असेल वगैरे वेगळ्या वळणाने चर्चा चालली असतांना चिमुरडी ईरा ठामपणे म्हणाली, "असा बाजारातून किल्ला विकत आणला तर त्यात आपलं काय आहे?"
लगेच तिची तळी उचलून धरत मी म्हणालो, "बरोबर बोललीस. आपण मिळून घरी किल्ला तयार करूया."

दिवाळीला जेमतेम दोनतीनच दिवस उरले असल्यामुळे त्या कामाची सुरुवात तत्परतेने करणे आवश्यक होते. सिमेंट काँक्रीटच्या जंगलातल्या फ्लॅटमध्ये दगड, माती, विटा, वाळू असले पदार्थ आणणे म्हणजे अब्रह्मण्यम्. थर्मोकोलपासून पर्यावरणाला असलेल्या धोक्यामुळे तोही नकोच. फक्त कागद, पुठ्ठे वगैरेंपासून जे काही करता येईल तेवढे करायचे ठरवले. लहानपणच्या संवयीनुसार घरातले रिकामे खोके, डबे, बाटल्या वगैरे टाकाऊ वस्तू जमवल्या, चित्रकलेसाठी आणि प्रिंटरसाठी आणलेले कागद घेतले. कात्रीने कापायचे आणि गोंदाने किंवा चिकटपट्टीने त्यांना जोडायचे असे करत किल्ल्याची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार, कमान, राजवाडा वगैरे सगळे भाग बनवून त्याला किल्ल्याचा आकार दिला. स्केचपेन आणि रंगीत खडूने त्यांना रंगवून टाकले. पाहता पाहता किल्ला तयारही झाला.

वयोमानाप्रमाणे अधू होत चालेली दृष्टी, थरथरणारी बोटे आणि त्यात पूर्ण ताळमेळ नसणे वगैरेंमुळे आमच्या किल्ल्याला सुबकपणा आला नसेल. ईशा इरा तर असली कामे पहिल्यांदाच करत होत्या. त्यांच्याकडून कौशल्याची अपेक्षा नव्हती. पण आजकालच्या एका जाहिरातीत येते त्याप्रमाणे "टेढा है, पर मेरा है।" या भावनेने आम्ही सारे या किल्ल्यावर खूप खूष आहोत.

No comments: