Wednesday, September 30, 2009

अमेरिकेची लघुसहल - पहिला दिवस - प्रयाण

न्यूयॉर्कहून निघून वॉशिंग्टन डीसी आणि नायगारा धबधबा वगैरे पाहून येण्याची तीन दिवसांची सहल आम्ही ठरवली होती. अमेरिकेतल्या एका यात्रा कंपनीने आयोजित केलेल्या या सहलीची तिकीटे आम्ही इंटरनेटवरून काढली होती. त्यासाठी अॅटलांटाहून नेवार्कला येतांना विमानाचा प्रवास केल्यामुळे सुरक्षा नियमांनुसार परवानगी असलेले सामान हँडबॅगेत आणि उरलेले सूटकेसमध्ये भरून नेले होते. आता तीन दिवस बसमधून फिरायचे असल्यामुळे सामानाची उलथापालथ करावी लागली. बसमधून उतरून पायी फिरतांना लागणा-या खाण्यापिण्याच्या आणि इतर अत्यावश्यक वस्तू खांद्याला टांगून नेण्याच्या झोळीत ठेवल्या, संध्याकाळी मुक्कामाला गेल्यावर लागणा-या गोष्टी आणि जास्तीचे कपडे बसच्या होल्डमध्ये टाकायच्या बॅगेत ठेवले, मळलेले कपडे आणि अनावश्यक वस्तूंचे गाठोडे बांधून बाजूला केले आणि प्रवासात घालायचे कपडे बॅगेवर ठेवले. सकाळी गडबड गोंधळ होऊ नये म्हणून रात्री झोपण्याच्या आधीच ही सारी आवराआवर करूनच गादीवर अंग टाकले.
पहाटे गजर लावून जाग आल्यावर आधी खिडकीतून बाहेर डोकावून पाहिले. आदल्या दिवशी होता तसा पाऊसवारा नव्हता हे पाहून हायसे वाटले. हवामान अनुकूल नसले तरीसुध्दा वेळेवर जाऊन टूरिस्ट बस गाठायची होतीच, पण वरुणदेवाच्या कृपेने सारे कांही शांत होते. त्यामुळे अंगातला उत्साह दुणावला. झटपट सारी कामे आटपून चहाबरोबरच दोन चार बिस्किटे खाऊन निघालो. सोमवारी सकाळी न्यूयॉर्कला ऑफीसला जाणा-या लोकांची गर्दी असणार हे लक्षात घेऊन आणि शक्य तर ती टाळण्यासाठी जरूरीपेक्षा थोडे आधीच घराबाहेर पडलो. बसस्टॉपवर विशेष गर्दी नव्हती, लवकरच बस आली. तिच्यातही पुरेशी जागा होती. यावेळच्या प्रवासात फक्त आम्ही दोघे आणि फडके पतीपत्नी अशी पर्यटक मंडळीच होतो, पण आदले दिवशी न्यूयॉर्कला जाण्याची रंगीत तालीम झाली असल्यामुळे निर्धास्त होतो. तिकीट काढण्यासाठी सुटे पैसै काढून तयार ठेवले होते. तिकीट काढून चांगल्या जागा पकडून बसून घेतले.
वाटेत चढणा-यांची गर्दी थोडी जास्त असल्यामुळे भराभर बस भरत गेली. या रस्त्याने एकदा गेलेलो असल्यामुळे कांही खुणेच्या जागा पाहिल्यावर आठवत होत्या. पहिल्या नजरेतून निसटलेल्या कांही जागा या वेळी लक्ष वेधून घेत होत्या. तासाभरात पोर्ट ऑथॉरिटीचे बस टर्मिनस आले. या वेळी सबवेच्या भानगडीत न पडता टर्मिनसच्या बाहेर पडून सरळ टॅक्सी केली आणि बोवेन स्ट्रीटवरल्या टूरिस्ट कंपनीच्या ऑफीसकडे प्रयाण केले. आम्ही पोचेपर्यंत ते ऑफीस उघडलेही नव्हते. आजूबाजूची बरीच दुकानेसुध्दा बंदच होती, थोडी उघडली होती आणि कांही आमच्यादेखतच उघडत होती. दरवाजापाशीच सामान ठेऊन आजूबाजूचे निरीक्षण करत उभे राहिलो.
हा भाग म्हणजे न्यूयॉर्कचे चायनाटाउन असावे. जिकडे पहावे तिकडे चित्रलिपीतली विचित्र अक्षरे दिसत होती. ती पाहून अक्षरसुध्दा न कळणे या वाक्प्रचाराचा अर्थ समजत होता. त्या चित्रांच्या बाजूला इंग्रजी भाषेतली अक्षरे नसली तर आम्ही चीनमध्ये आलो आहोत असेच वाटले असते. सगळ्या दुकानांवर चिंगमिंग, झाओबाओ, हूचू असलीच नांवे दिसत होती. भारताप्रमाणेच युरोपअमेरिकेतसुद्धा सगळ्या जागी चिनी खाद्यगृहे असतात, भारतात कुठे कुठे चिनी दंतवैद्य दिसतात, पण न्यूयॉर्कच्या या भागात हेअरकटिंग सलूनपासून डिपार्टमेंटल स्टोअरपर्यंत आणि इलेक्ट्रीशियनपासून अॅडव्होकेटपर्यंत सगळ्या प्रकारच्या दुकांनांचे किंवा ऑफीसांचे चिनी नांवांचे फलक होते. रस्त्यावर चालणा-या लोकांत प्रामुख्याने मंगोलवंशीयच दिसत होते.
थोड्या वेळाने एका चिनी माणसाने येऊन दरवाजा उघडला. समोर फक्त एक जिना होता आणि तो चढून गेल्यावर पहिल्या मजल्यावर टूरिस्ट कंपनीचे केबिनवजा ऑफीस होते. दोनतीन मिनिटात त्याचा सहाय्यकही आला. त्याच्या पाठोपाठ आम्ही जिना चढून वर गेलो. आम्ही पर्यटक असल्याचे सांगताच त्याने काँप्यूटरवर आमची नांवे पाहून घेतली आणि केबिनच्या बाहेर पॅसेजमध्ये मांडलेल्या खुर्च्यांवर बसायला सांगितले. आम्ही रेस्टरूमची चौकशी केल्यावर त्याने शेजारचा एक बंद दरवाजा किल्ली लावून उघडून दिला. रस्त्यावरची नको ती माणसे त्याचा दुरुपयोग करायला येतात म्हणून ही खबरदारी घ्यावी लागत असल्याचे त्याने कुलुप उघडता उघडता सांगितले.
आमच्या पाठोपाठ आणखी कांही माणसे चौकशी करायला माडीवर आली, तिथे ठेवलेल्या सातआठ खुर्च्या केंव्हाच भरून गेल्या. कांही तरुणांनी उठून वरिष्ठ नागरिकांना जागा दिल्या. त्यानंतर सारखी माणसे येऊन चौकशी करून जातच होती आणि खाली रस्त्यावर जमलेल्या माणसांचा मोठा गलका ऐकायला येऊ लागला होता. थोड्याच वेळात तीनचार युवक ऑफीसात जाऊन हातात पॅड्स घेऊन बाहेर आले. एटथर्टी, एटफॉर्टी, फिली, डीसी असे कांही तरी पुटपुटणा-या त्यातल्या एकाला मी माझ्याकडचे ई-टिकीट दाखवले, ते पाहून त्याने दुस-याला बोलावले. त्याने आपल्या पॅडवरील चार नांवांवर टिकमार्क करून मला आमचे सीटनंबर्स सांगितले. आम्ही सर्वांनी आपली ओळख दाखवण्यासाठी आपापले पासपोर्ट तयार ठेवले होते, पण त्याची गरज पडलीच नाही. बाकीचे पॅसेंजर कुठे आहेत हे सुध्दा त्या प्राण्याने मला विचारले नाही. खाली जाऊन रस्त्यावरील एका दुकानाच्या समोर जाऊन थांबायला सांगून तो धडाधडा जिना उतरून नाहीसा झाला.
आम्ही हळूहळू खाली उतरलो. रस्त्यावर शंभर दीडशे माणसांची झुम्बड उडालेली होती. ते तीनचार युवक एकेकाची तिकीटे पाहून त्याला कुठकुठल्या दुकानांच्या समोर जाऊन थांबायला सांगत होते. अशा रीतीने तीन चार वेगवेगळे घोळके तयार झाले. कांही लोक तेवढ्यात समोरच्या दुकानात जाऊन तिथे काय मिळते ते पाहून विकत घेत होते. तोंपर्यंत रस्त्यावर ओळीने तीन चार बसगाड्या येऊन उभ्या राहिल्या. प्रत्येक युवकाने आपापला घोळका त्यातल्या एकेका गाडीत नेला. आम्हीही आमच्या ग्रुपबरोबर आमच्या गाडीत जाऊन आपापल्या जागांवर स्थानापन्न झालो. त्या गाड्या साधारणपणे एकाच वेळी सुटून वेगवेगळ्या ठिकाणांना जाणार होत्या हे उघड होते. पण त्या जागी बस स्टेशनसारखे फलाट नव्हते की कसलेही बोर्ड नव्हते आणि कोणती गाडी कुठल्या गावाला जाणार आहे हे दाखवणारे कसलेच चिन्ह नव्हते. पण सगळे प्रवासी आपापल्या गाडीत पोचले असणार. अमेरिकेसारख्या प्रगत देशातले हे रस्त्यावरचे प्रिमिटिव्ह स्टाईलचे मॅनेजमेंट माझ्या चांगले लक्षात राहील.
आमच्या मार्गदर्शकाने बसमध्ये येऊन सगळे प्रवासी आले असल्याची खात्री करून घेतली. आमच्या अपेक्षेप्रमाणेच ही वॉशिंग्टन आणि नायगाराची तीन दिवसांची ट्रिप असल्याचे सांगून त्याबरोबर त्याने एक हलकासा धक्का दिला. इंटरनेटवर वाचलेल्या माहितीनुसार आम्ही पहिल्या दिवशी वॉशिंग्टन डीसीला जाणार होतो. दुस-या दिवशी नायगाराला जाऊन तिस-या दिवशी परतणार होतो. न्यूयॉर्कच्या मानाने वॉशिंग्टनला हवा उबदार राहील आणि अंगातले लोकरीचे कपडे काढून फिरता येईल अशी आमची कल्पना होती. त्यानुसार तिथल्या व्हाईट हाउस सारख्या शुभ्र इमारतींच्या पार्श्वभूमीवर काढलेल्या फोटोत आपल्याला कोणता रंग खुलून दिसेल याचा सखोल विचार करून कांही महिलांनी त्या दृष्टीने आपला वेष परिधान केला होता. त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पाडणारी घोषणा त्या मार्गदर्शकाने केली. हवामानाचे निमित्य सांगून त्यामुळे आपली सहल उलट दिशेने जाणार असून आता तिसरे दिवशी परत येतांना आपण वॉशिंग्टनडीसीला जाणार आहे हे ऐकून अनेकांचा थोडा विरस झाला. पण ही सहल रद्दच झाली नाही याचे समाधान कांही थोडे थोडके नव्हते
. . . . . . . . . . . . . . (क्रमशः)

2 comments:

leena said...

Agadi khar...
पण ही सहल रद्दच झाली नाही याचे समाधान कांही थोडे थोडके नव्हते.
Amhi hi tyach bus ne nigara tour la gelo hoto...
Amhala kahi na khai karan deun thikan radda karat hote..
Ani jithe gheun gele tithe sangayache 30 min parat ya...
Tvadhya welat baghaun sudha hot nahse..:(

Anand Ghare said...

धन्यवाद.
आम्ही खूपच सुदैवी ठरलो. आमच्या यशस्वी सफरीचा वृत्तांत टप्प्याटप्प्याने देणार आहेच.