मागच्या आठवड्याची सुरुवात दस-याने झाली. त्या दिवशी मराठी लोकांनी शिलंगणाचे सोने लुटले, गुजराथी बांधवांनी रासगरब्याने रंगलेल्या नवरात्रोत्सवाची आणि बंगाली बाबूंनी त्यांच्या सर्वव्यापी दुर्गापूजेची सांगता केली आणि उत्तर भारतीयांनी रावणदहन करून रामलीला संपवली. अशा रीतीने ''दसरा सण मोठा, नाही आनंदा तोटा' अशा दिमाखात तो भारतभर साजरा झाला. त्यानंतर दोनच दिवस सोडून ऑक्टोबर महिना सुरू झाला. त्यातले ओळीने पहिले तीन्ही दिवस वैशिष्ट्यपूर्ण होते.
१ ऑक्टोबरला चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांतीचा साठावा वाढदिवस भव्य संचलनाने दणक्यात साजरा करण्यात आला. लेनिनच्या कम्यूनिस्ट पक्षाने सोव्हिएट युनियनमध्ये सत्ता काबीज करून वीस पंचवीस वर्षात त्या देशाला जगातली एक महासत्ता बनवण्याइतकी घोडदौड केली होती. १९४९ साली माओझेदुंगच्या (पूर्वीचा उच्चार माओत्सेतुंग) नेतृत्वाखाली त्या पक्षाने जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आणि प्रचंड आकाराच्या चीनचा ताबा घेतल्यानंतर या आंतरराष्ट्रीय साम्यवादाचा विस्तार आणखी किती होणार अशी काळजी लोकशाही आणि भांडवलशाहीचा पुरस्कार करणा-या राष्ट्रांना पडली आणि जगातील या दोन गटांमध्ये शीतयुध्द सुरू झाले. दीर्घकाळपर्यंत ते चाललेच होते. कालांतराने सोव्हिएट युनियनलाच उतरती कळा लागून त्याच्या अधिपत्याखाली असलेले पूर्व युरोपातले देश मुक्त झाले आणि खुद्द त्याचीच पंधरा सोळा शकले झाली. चीनमधील साम्यवादी पक्षाने आपली मजबूत पकड धरून ठेवली आहे. इतकेच नव्हे तर त्याची प्रगतीपथावर घोडदौड चालूच आहे. मात्र त्याने आपल्या देशाच्या धोरणात आमूलाग्र बदल केले. शत्रू क्रमांक एक असलेली अमेरिका आता त्याची सर्वात मोठी बाजारपेठ बनली आहे. परदेशी लोकांना कम्युनिस्ट चीनने पूर्वी बाहेरचा रस्ता दाखवला होता, आता कांही मोठ्या शहरात त्यांना ऑफीसे थाटून व्यवसाय करायला परवानगी दिली आहे. माओने सत्तेवर आल्याआल्या देशातल्या सर्व संपत्तीचे सरकारीकरण केले होते, त्यात बदल करून लोकांना खाजगी संपत्ती गोळा करायला मुभा मिळाली आहे. सगळ्याच बाबतीत साधेपणाची जागा भव्यतेचे प्रदर्शन घेऊ लागले आहे. माओच्या काळातला साम्यवाद शिल्लक राहिलेला नाही. बांबूच्या पडद्याआड चिनी जनता कशी रहात आहे हे स्पष्ट दिसत नसले तरी बेजिंग ऑलिंपिकसारख्या महोत्सवातून तिचे जेवढे दर्शन दिसते त्यावरून ती एकंदरीत खुषहाल असावी असेच वाटते. जागतिक पातळीवर चीनचे महत्व वाढत जाणार असेच दिसत आहे. भारतावर चीनने केलेल्या आक्रमणात काबीज केलेली भूमी अजून त्याच्याच ताब्यात आहे. त्या युध्दात जवानांना वीरगती प्राप्त झाली त्याची जखम भरून येण्यासारखी नाही. त्यामुळे चीनच्या यशाबद्दल त्याचे अभिनंदन करावे असे भारतीय मनाला वाटणार नाही. चीनमधील सामान्य नागरिकांना भारताबद्दल काय वाटते ते समजायला मार्ग नाही, पण युरोपअमेरिकेत जेंव्हा चिनी लोक भेटले तेंव्हा त्यांच्या वागणुकीत मला तरी वैरभाव दिसला नाही किंवा त्यांच्याबद्दल वाटलाही नाही.
२ ऑक्टोबरला बापूजींची जयंती येते. महात्मा गांधी, त्यांनी सुरू केलेली अहिंसक चळवळ आणि भारताला मिळालेले स्वातंत्र्य यांबद्दल चाललेली उलटसुलट चर्चा मला समजायला लागल्यापासून मी ऐकत आलो आहे आणि ती अजून संपलेली नाही. त्याबद्दल आणखी कांही लिहिण्यासारखे आहे असे मला वाटत नाही. बापूजींचे जीवन आणि त्यांनी केलेला उपदेश याचे मला जेवढे आकलन झाले त्यावरून पहाता व्यक्ती आणि समाज या दोन्हीची उन्नती व्हावी याबद्दल त्यांना मनापासून तळमळ होती असे मला वाटते. भारताच्या स्वातंत्र्याची चळवळ हा त्याचा एक भाग होता. तो बाजूला ठेवला तरी जगातल्या सर्वच माणसांनी नेहमी सत्याची आस धरावी, निर्भय बनावे, स्वावलंबी व्हावे, दुस-याला पीडा होईल असे कांही करू नये वगैरेसाठी त्यांनी जे अथक प्रयत्न केले, उच्चनीच हा भेदभाव मिटावा यासाठी स्वतःच्या वर्तणुकीतून उदाहरणे घालून दिली, अत्यंत साधी रहाणी ठेवली या सगळ्या गोष्टींपुढे नतमस्तक व्हावेच लागते. शस्त्रसज्ज इंग्रजांचा मुकाबला अहिंसक मार्गाने करून त्यासाठी स्वतःच्या जीवितवित्ताची हानी करून घ्यायला हजारोंनी नागरिक फक्त त्यांच्या सांगण्यामुळे कसे तयार झाले यावरच पुढील अनेक पिढ्या आश्चर्य करत राहतील. आता दरवर्षी २ ऑक्टोबरला सार्वजनिक सुटी देऊन काय साध्य होते ते मात्र मला समजत नाही. पूर्वीच्या काळात त्या निमित्याने जे कांही कार्यक्रम होत असत त्यामुळे समाजाचे प्रबोधन होत असेल, सध्या तरी तसे कांही दिसून येत नाही. ज्या काळात इंग्लंडमधील गिरण्यांमधून कापड आयात होत असे, त्या काळात चरख्यावर सूत कातून ते हातमागावर विणणे हा स्वावलंबनाचा एक मार्ग होता, तसेच त्याचा थोडा परिणाम इंग्लंडमधल्या गिरण्यांवर होत असेल. त्या गिरण्याच कधीच्या बंद पडल्या असून आता भारतातूनच तिकडे मोठ्या प्रमाणावर कपड्याची निर्यात होत आहे. त्यामुळे सूतकताईचे औचित्य शिल्लक राहिलेले नाही. २ ऑक्टोबरला योणारी गांधीजयंती कशा रीतीने साजरी करायची यावर फेरविचार केला पाहिजे.
३ ऑक्टोबरला म्हणजे काल कोजागरी पौर्णिमा होती. आश्विन महिना येईपर्यंत पावसाळा संपलेला असतो, आभाळ स्वच्छ झालेले असते आणि शरदाच्या पिठुर चांदण्यात उघड्यावर जमून गाणीबिणी म्हणायची, गप्पागोष्टी करायच्या आणि आटवलेल्या दुधाचा आस्वाद घ्यायचा अशी रीत होती. अशा कितीतरी कोजागिरीच्या मधुर रात्री माझ्या आठवणीत आहेत. ही पध्दत अजूनही कांही ठिकाणी आहे, पण आमच्या आसपास कुठे असा मेळावा हल्ली होतांना दिसत नाही. आम्ही आपले घरच्या घरी बसूनच केशरी दुधाचे प्राशन करतो. काल रात्री तर आभाळ काळ्या ढगांनी आच्छादलेले होते आणि चक्क पाऊस पडला. चंद्रदर्शन झालेच नाही. चांदण्यातून उतरत एक देवता जमीनीवर येऊन कोजागर्ती (कोण जागे आहे) असे विचारते आणि जे जागृत असतील त्यांच्यावर प्रसन्न होते अशी आख्यायिका आहे. आता एरवीसुध्दा रात्री विजेच्या दिव्यांच्या लखलखाटात चांदणे दिसतही नाही. काल तर ते पडलेच नव्हते.
No comments:
Post a Comment