'पुढच्या वर्षी एकदा येऊच नका' य मथळ्याखाली श्री.संजय पेठे यांनी लोकसत्तामधल्या आपल्या 'थर्ड आय' या सदरात एक लेख लिहिला आहे. गणेशोत्सव आणि विसर्जनाची मिरवणूक याला आज जे स्वरूप आले आहे त्याबद्दल खेद आणि सात्विक संताप व्यक्त करून गणरायांनासुध्दा कदाचित पुढच्या वर्षी येऊ नये असे वाटत असेल असे मत त्यांनी या लेखात व्यक्त केले आहे. "या उत्सवात धार्मिकपणा नाही", "या निमित्याने कांही लोक मिरवण्याची हौस भागवून घेतात", "बहुतेक लोक मनाची करमणूक करून घेतात", "यातले कार्यक्रम दर्जेदार नव्हते", "यात पैशाचा अपहार व अपव्यय होतो", "लोकांचा वेळ वाया दवडला जातो" आणि "परदेशी लोक यातून आपल्या देशाची बदनामी करतात" हे मुख्य मुद्दे त्यांनी आपल्या लेखात मांडले आहेत. मागील आठवड्यात मी या ब्लॉगवर लिहिलेल्या दोन लेखात लोकमान्य टिळकांनी सन १८९४ आणि १८९५ मध्ये केसरीत लिहिलेल्या दोन अग्रलेखांबद्दल लिहिले होते. एकशे पंधरा वर्षांपूर्वीसुध्दा नेमके हेच मुद्दे टिळकांच्या विरोधकांनी मांडले होते असे त्यातून दिसते. आज गणेशोत्सवाचे संयोजन करणा-या लोकांना लोकमान्य टिळकांच्या पायाच्या नखाचीसुध्दा सर येणार नाही हे ते स्वतः देखील मान्य करतील. असे असले तरी विरोधकांचे मुद्दे जसेच्या तसेच राहिले असल्याचे पाहून गंमत वाटली. त्यांचे दृष्य स्वरूप बदलले आहे, आवाका शतपटीने वाढला आहे आणि त्यातल्या वाईट प्रकारांचे समर्थन करता येणे शक्यच नाही. गणेशोत्सवावर होत असलेल्या टीकेचा जसा खरपूस समाचार लोकमान्यांनी आपल्या अग्रलेखात घेतला होता तसा आता कोणालाच घेता येणार नाही. याचे मुख्य कारण म्हणजे या उत्सवाच्या निमित्याने लोकसंग्रह करून त्यांना देशभक्तीच्या मार्गाला लावण्याचे लोकमान्यांच्या डोळ्यासमोर असलेले उदात्त उद्दिष्ट आज आपल्यापुढे राहिलेले नाही. तरीसुध्दा लोकमान्यांपासून प्रेरणा घेऊन कांही चांगले उपक्रम कांही ठिकाणी होत आहेत हे संजयनेसुध्दा मान्य केले आहे.
शंभर वर्षातल्या परिस्थितीत एक महत्वाचा फरक दिसतो. "एरवी मद्यपान करून लोळत पडणारे बरेच लोक गणेशोत्सवाचे दहा दिवस व्यसनापासून दूर राहतात" असा एक मोठा फायदा लोकमान्यांनी नमूद केला होता. आज याच्या नेमकी उलट परिस्थिती दिसते. अनेक प्रकारच्या धुंदीत कांही लोक 'वहावत' जातांना पहायला मिळतात. पण सारेच त्या अवस्थेत नसतात. माझ्या आजूबाजूच्या कित्येक गणेशोत्सवांच्या मंडपांत डोकावून पाहिल्यावर, आतापर्यंत झालेले कांही विसर्जन सोहळे प्रत्यक्ष पाहून झाल्यावर आणि आज या क्षणाला गांवोगांवी होत असलेल्या अनंतचतुर्दशीच्या भव्य मिरवणुकांचे थेट प्रक्षेपण पाहतांना ज्या समाजात आज आपण राहतो त्याचेच प्रतिबिंब मला त्या गर्दीत दिसत आले आहे. "त्या समूहात फक्त आपल्यासारखे निवडक लोक तेवढे तांदळाचे दाणे आहोत आणि बाकीचे सरसकट सारे लोक खडे आहेत" असा आव आणणे मला योग्य वाटत नाही. आपल्या भोंवताली असलेला समाज जसा आहे तसा असल्याच्या सत्याचा स्वीकार करून आपल्या परीने आपल्या कार्यक्षेत्रात जेवढे बदल करता येणे शक्य आहे ते करण्याचा प्रयत्न अगदी आपल्या घरापासून करणे हेच माझ्या मते महत्वाचे आहे. सर्व समाजाला नाक मुरडून नाकारण्याने कांही साध्य होणार नाही किंवा कांही गोष्टी व्यक्तीशः आपल्याला आवडल्या नसतील तर त्या चुकीच्याच किंवा हिणकसच असतात असे समजण्याचेही कारण नाही.
संजयने मांडलेले एकूण एक चांगले विचार आणि त्याने केलेल्या सर्व सूचना यांच्याशी मी पूर्णपणे सहमत आहे. हा कदाचित योगायोग असेल किंवा आम्हाला मिळालेल्या समान प्रकारच्या संस्कारांचा भाग असेल. त्या सूचना अंमलात आणल्यास त्यातून समाजाचे भलेच होईल यात व्यक्तीशः मला कांही शंका नाही. फक्त इतक्या बलिष्ठ मांजरांच्या गळ्यात कोण कोण, कशा आणि कधी घंटा बांधणार हाच एक प्रश्न आहे. पण संजय माझ्यापेक्षा वयाने इतका तरुण असला तरी मी मात्र त्याच्या एवढा निराश झालेलो नाही आणि गणपतीबाप्पाला पुढच्या वर्षी येऊच नका असे म्हणणार नाही. या निमित्याने लोक एकमेकांना भेटतात हीच माझ्या दृष्टीने एक महत्वाची गोष्ट आहे. वर्षभरातून थोडे दिवस तरी ते एकत्र उभे राहून देवाच्या पारंपरिक आरत्या म्हणतात, त्यातले कांही शब्द तरी त्यांच्या मनाच्या आंतपर्यंत जाऊन पोचत असतील. माणूस हा मुळातच उत्सवप्रिय असतो आणि कांही ना कांही निमित्य काढून मनातल्या उत्साहाला उधाण आणत असतो आणि ते तो करत राहणारच. त्यात एकमेकांचे अनुकरण होत असते तसेच प्रसारमाध्यमांमधून जे दाखवले जाते त्याचा परिणाम होत असतो. हे लक्षात घेता त्यामुळे इतर अप्रिय गोष्टी होतात म्हणून उत्सवच बंद करावा असे मी म्हणणार नाही आणि लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या अग्रलेखांचा मतितार्थ जर मला समजला असेल तर त्यांनीसुध्दा असे सांगितले नसते असे मला वाटते. या निमित्याने लोक एकत्र येऊन एका प्रकारे वेळ घालवतात ही साधी सुधी गोष्ट नाही. एकदा ते आले म्हणजे त्यांना आपल्याला हवे तसे वळण लावणे हे आपले काम आहे असे त्यांनी लिहिलेल्या अग्रलेखात स्पष्ट केले होते.
2 comments:
आनंद साहेब
ते टिळकांचे अग्रलेख आपल्याकडे आहेत कां? वाचायला आवडतिल.. लेख छान झालाय. आवडला.
जुन्या वर्तमानपत्रांच्या (फार नाही, ५-६ वर्षे जुन्या) कात्रणांच्या स्वरूपात आहेत. ते जसेच्या तसे ब्लॉगवर टाकणे अवघड असल्यामुळे त्यातल्या मजकुराचा गोषवारा मी दिला आहे.
आपल्या पत्राबद्दल आभारी आहे.
Post a Comment