Saturday, September 26, 2009
महालक्ष्मी
सगळ्या लोकांच्या घरात असते त्याप्रमाणे आमच्या घरातल्या देव्हा-यातसुध्दा अन्नपूर्णेची मूर्ती होती, तिला सगळे अंबाबाई म्हणत. दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन होत असे तेंव्हा कमळातल्या लक्ष्मीचे चित्र असलेले नाणे बाहेर काढून घासून पुसून लख्ख करून पूजेसाठी चौरंगावरील तबकात ठेवले जात असे. पाठीमागे गजांतलक्ष्मीचे सुबक चित्र उभे केलेले असे. क्षीरसागरामध्ये शेषशयन करत असलेल्या विष्णूच्या पायाशी लक्ष्मी बसली असल्याचे चित्र पाहिले होते आणि समुद्रमंथनामध्ये निघालेल्या लक्ष्मीकौस्तुभपारिजातक वगैरे चौदा रत्नांच्या यादीत पहिलेच नाव लक्ष्मीचे होते. त्याशिवाय कोणाच्या 'घरात लक्ष्मी पाणी भरते आहे' किंवा कोणाचा जोडा 'लक्ष्मीनारायणासारखा आहे' अशासारख्या वाक्प्रचारात तिचा उल्लेख होत असे. लक्ष्मीची कधी द्विभुज, कधी चतुर्भुज तर कधी अष्टभुज अशी निरनिराळी रूपे पहायला मिळत होती. त्यातल्या महालक्ष्मी या नांवाभोवती एक प्रकारचे गूढ वलय असायचे. नवरात्रातल्या अष्टमीच्या रात्री कोणाच्या तरी घरी महालक्ष्मीची पूजा असायची. तिला घरातला बहुतेक स्त्रीवर्ग आवर्जून जात असे. एरवी कुठल्याही देवळात जातांना त्या देवाच्या पाया पडण्यासाठी लहान मुलांना बरोबर नेत असत, पण महालक्ष्मीच्या या पूजेला जातांना मात्र त्यांना घरीच ठेवून जात. त्या रात्री कोणाकोणाच्या अंगात किती आले, तिने कोणकोणते दृष्टांत आणि चमत्कार दाखवले वगैरेवर त्यानंतर खूप चर्चा रंगत असत. मुलांना त्या चर्चेत सहभाग घ्यायला बंदी असली तरी मोठ्यांचे बोलणे त्यांच्या कानावर पडायचेच. खरे तर ती मोठ्यांचे बोलणे जास्तच लक्षपूर्वक ऐकत असतात. मला हा सगळा प्रकार अगम्य वाटायचा आणि विशेषतः एरवी ज्या महिलांच्या वागणुकीबद्दल फारसे चांगले मत नसायचे त्यांची निवड अंगात येण्यासाठी ही देवी कशाला करेल असा प्रश्न मनात आला तरी तो विचारणे हा अक्षम्य अपराध असे. मोठेपणी विज्ञानाचा मार्ग धरल्यानंतर आणि मनोवैज्ञानिक विश्लेषण वगैरे वाचल्यानंतर असले प्रश्न पडेनासे झाले.
कांही लोकांच्या घरी महालक्ष्मीपूजनाची प्रथा असते. नवरात्रातील अष्टमीच्या संध्याकाळी ते महालक्ष्मीची मूर्ती तयार करतात. त्यासाठी एका लाकडाच्या ढांच्याला कापडाचे हातपाय जोडून त्याला व्यवस्थित लुगडे चोळी नेसवतात. मस्तकाच्या जागी कापडाच्या पट्ट्या घट्ट गुंडाळून त्याचे योग्य आकाराचे गाठोडे तयार केल्यावर त्यावर उकड थापून त्यात नाक डोळे वगैरे कोरून रंगवतात. त्या मूर्तीच्या अंगावर अलंकार घालतात. आजकाल हे करण्याचे कौशल्य लुप्त होत गेल्यामुळे धातूचा तयार मुखवटा बसवू लागले आहेत. महालक्ष्मीच्या त्या मूर्तीची पूजा करून झाल्यानंतर कांही स्त्रिया देवीची गाणी गातात आणि इतरजणी आळीपाळीने घागरी फुंकतात. दोन्ही हातांच्या तळव्यावर एक रिकामी घागर पेलून धरून त्या गाण्याच्या तालावर घागरीत जोरजोराने फू फू करत त्या बेभान होऊन नाचत असतात. त्यांचा आवाज रिकाम्या घागरीत घुमून त्यातून एक धुंद करणारा ध्वनी निर्माण होत असतो. अंगातले सारे बळ एकवटून पुरती दमछाक होईपर्यंत चढाओढीने हा कार्यक्रम चालत राहतो. यावेळी पुरुषांना मात्र त्या ठिकाणी जाण्याला पूर्ण मज्जाव असतो. ही प्रथा कधी आणि कोणत्या उद्देशाने सुरू झाली हे मला न सुटलेले एक कोडे आहे.
हिंदू धर्मातल्या परंपरागत धारणेप्रमाणे एकाच परमेश्वराच्या ब्रह्मा, विष्णू आणि शिव या तीन रूपांकडे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही कामे वाटून दिली आहेत. ती कामे करण्याच्या परमेश्वरी शक्तीच्या तीन मुख्य रूपांना महासरस्वती, महालक्ष्मी आणि महाकाली अशा संज्ञा दिल्या आहेत. या तीन देवी अनुक्रमे ज्ञान, समृध्दी आणि बल यांची प्रतीके आहेत. त्यानुसार सरस्वतीच्या पूजनाने ज्ञानोपासना सुरू केली जाते आणि ज्ञानवर्धन हीच सरस्वतीची उपासना आहे असे समजले जाते. धनधान्यसंपत्ती वगैरे प्राप्त करण्याच्या हेतूने लक्ष्मीची आराधना केली जाते आणि ज्यांना ती भरपूर प्रमाणात मिळते त्याच्यावर लक्ष्मीचा वरदहस्त आहे असे म्हणतात. दुष्टांचे निर्दाळन करण्यासाठी अंगात बळ मिळावे अशी प्रार्थना कालिकामातेकडे केली जाते.
त्यातील महालक्ष्मी देवीचे रूप अत्यंत सुंदर दाखवले जाते. तिच्या शांत सोज्वळ मुद्रेवर नेहमी वत्सलतेचा प्रेमळ भाव असतो. कोणालाही अशी आई मनापासून आवडेल. ती नेहमी प्रसन्न होते, कधीही कृध्द होत नाही. फार तर रुसून एकाद्यापासून दूर जाईल, पण त्याला शासन करत नाही. ही समृध्दीची देवता आहे. धर्माचरण म्हणजे वैराग्य, सर्व सुखांचा त्याग वगैरे जी कल्पना कधी कधी पसरवली जाते ती कशी चुकीची आहे हे यावरूनच स्पष्ट होते. माणसाने अती लोभ धरू नये, मोहाला पडून चुकीची गोष्ट करू नये हे बरोबरच आहे, पण चांगल्या मार्गाने अर्थार्जन किंवा धनसंचय करण्यामुळे माणूस सुखी समाधानी होईल आणि सुखी समाज सुदढ होईल. धर्माचा हाच तर उद्देश आहे. सोनेनाणे तृणवत मानणा-या संतांनीसुध्दा "जोडावे धन उत्तम वेव्हारे" अशीच शिकवण दिली आहे. लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृध्दी, वैभव वगैरे प्राप्त होते या अर्थी त्याला दैवी मान्यता आहे असाच होतो. अशा या देवीच्या अपार वैभवाचे तिच्या एका भक्ताने केलेले वर्णन खालील गीतात दिले आहे.
बसुनि पालखीत, येई मिरवीत, अंबेची स्वारी ।
चालली, जंबुलगिरी मंदिरी ।।
सोन्याची पालखी तियेला, चांदीचे दांडे ।
गाद्या गिरद्या लोड मखमली, जरतारी गोंडे ।
लोडाला टेकून बैसली, अंबा जगदीश्वरी ।।
गर्द भरजरी हिरवा शालू, चोळी बुट्टीदार ।
गोठ पाटल्या तोडे वाकी, नथ लफ्फेदार ।
तियेची, नथ लफ्फेदार ।
रत्नहार कंठात शोभतो, मुकुट मस्तकावरी ।।
वाजंत्र्यांचे ताफे घुमती, सनईचे सुस्वर ।
भक्त नाचती धिंद होऊनी, करिती जयजयकार ।
तियेचा, करिती जयजयकार ।
उदो उदो अंबे उदो उदो उदो उदो .
अंबे तुझिया उदोकारे दुमदुमली नगरी ।।
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment