Saturday, January 24, 2009

अल्फारेट्टा (भाग३)


माझ्यातला बारकासा संशोधकाचा जीन मला स्वस्थ बसू देत नव्हता. हिंडता फिरतांना मी अल्फारेट्टाचा सिटी हॉल शोधून काढला. त्याच्या जवळच एक वेलकम सेंटर आहे. तिथे एक ऐंशी पंच्याऐंशी वर्षांच्या
खापरपणजीबाई बसल्या होत्या. मी भारतातून आलो आहे आणि मला अल्फारेट्टासंबंधी माहिती हवी आहे असे सांगताच त्यांनी माझे हंसून स्वागत केले आणि एका भिंतीकडे बोट दाखवून तिथे पहायला सांगितले.
अल्फारेट्टा, अॅटलांटा, जॉर्जिया, त्याच्या शेजारील इतर राज्ये अशा चढत्या भाजणीने अनेक स्थळांविषयीची त-हेत-हेची पत्रके त्या भिंतीवर टांगून ठेवली होती. त्यातली हवी तेवढी पाहून आणि वाटल्यास घेऊन जायला तिने मला सांगितले. भारतातली माणसे फारच हावरट असतात असे तिला वाटू नये म्हणून त्यातली अल्फारेट्टा व अॅटलांटाची माहिती असलेली चार पांच पत्रके वेचून काढून घेतली आणि त्या बाईंचे आभार मानून तिचा निरोप घेतला.
अल्फारेट्टाचा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र वगैरे सगळ्यासंबंधी मला जेवढी उत्सुकता होती त्यापेक्षाही
जास्त माहिती माझ्या पदरात पडली होती. आपल्या भारताला खूप प्राचीन काळापासूनचा इतिहास आहे. आपली संस्कृती अब्जावधी, कदाचित खर्व, निखर्व वगैरे वर्षे प्राचीन आहे असा 'वेदिक' शब्दावर जोर देणा-या लोकांचा गाढ विश्वास आहे. रूढ इतिहासानुसार सुध्दा ती कांही हजार वर्षे जुनी तर आहेच. त्या मानाने अमेरिकेचा इतिहास अलीकडच्या तीन चारशे वर्षांचाच आहे. अल्फारेट्टाची सध्याची वाढ तर फक्त गेल्या वीस पंचवीस वर्षात झालेली आहे. पण या शहराला दीडशे वर्षांचा इतिहास आहे याचा इथल्या मूळ रहिवाशांना मोठा अभिमान आहे. त्याच्या स्थापनेला दीडशे वर्षे झाल्याबद्दल गेले वर्षभर इथे कांही कार्यक्रम होत आहेत. इथल्या कांही इमारतींना सुध्दा शंभर दीडशे वर्षांचा इतिहास आहे. त्या इमारती तितक्या जुन्या नसल्या तरी त्या जागेवर पूर्वी काय होते ते कोणीतरी नमूद करून ठेवलेले आहे.
या शहरातल्या जुन्या भागातल्या मैदानावर पूर्वी एक 'कँप ग्राउंड' होते. आजूबाजूचे शेतकरी आणि व्यापारी वेळीप्रसंगी त्या जागी जमून राहुट्या बांधून त्यात असावेत. ११ डिसेंबर १८५८ रोजी या शहराचे 'अल्फारेट्टा' असे नामकरण करण्यात आले आणि ते 'मिल्टन' कौंटीचे मुख्य ठाणे बनले. ग्रीक भाषेत 'अल्फा' हे पहिले मुळाक्षर आहे आणि 'रेट्टा' याचा अर्थ गांव असा होतो. म्हणजे हे इकडचे 'आदिग्राम' झाले. अमेरिकेतल्या या भागात राहणा-या रेड इंडियन आदिवासींच्या एका लोकगीतांमध्ये 'अल्फाराता' नांवाच्या एका मुलीचा उल्लेख आहे अशी या नांवाची दुसरी उपपत्तीही सांगितली जाते. त्यानंतर झालेल्या भयानक यादवी युध्दात अॅटलांटा हे मोठे शहरसुध्दा बेचिराख होऊन गेले होते तिथे या नव्या लहान गांवाचा काय पाड लागणार होता? इथल्या दुर्दैवी लोकांना लढाईच्या पाठोपाठ प्लेगच्या साथीने पछाडले. त्यातून झालेल्या हलकल्लोळातून सावरून गांवाने पुन्हा हळूहळू प्रगती केली. पण या भागात रेल्वेमार्ग नसल्यामुळे मोठी कारखानदारी वगैरे कांही फारशा जोमाने वाढली नाही. १९३० मध्ये आलेल्या जागतिक मंदीच्या लाटेत मिल्टन कौंटीचे दिवाळे वाजायची पाळी आली होती. त्यावेळी बाजूच्या इतर कांही कौंटीजबरोबर तिलासुध्दा फुलटन कौंटीमध्ये विलीन करण्यात आले. अॅटलांटा हे मोठे शहर या कौंटीत असल्यामुळे अल्फारेट्टाचे महत्व संपले. पण अॅटलांटामध्ये जमा होणा-या संपत्तीतला कांही भाग त्याच्या विकासासाठी कामाला आला आणि त्यातून रस्तेबांधणीसारखी विकासाची कामे करण्यात आली.
इसवी सन १९८१ पर्यंत अल्फारेट्टा हे एक नगण्य असे आडगांव होते. त्यात हजारभर घरे होती आणि तेथील लोकसंख्या फक्त ३००० एवढीच होती. पण जुलै २००७ पर्यंत त्यातील घरांची संख्या वीसपटीने वाढून वीस हजारावर आणि अधिकृत लोकसंख्या ५० हजारावर गेली. ज्या गतीने याची वाढ चालली आहे ती पाहता आता ती साठ हजारांच्या घरात पोचलीसुध्दा असेल. या भागातली घरे, ऑफीसे, कारखाने, दुकाने, हॉटेले, शाळा, कॉलेजे वगैरे धरून दिवसा इथे सव्वा लाखावर माणसे असतात असा अंदाज आहे. ही बाकीची माणसे आजूबाजूच्या गांवातून रोज नोकरी, उद्योग, व्यापार वगैरेसाठी इकडे येतात की त्यातली कांही तात्पुरती इथे येऊन राहतात कोण जाणे. आज अल्फारेट्टा शहराचा विस्तार जवळ जवळ दहा किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रुंद एवढ्या परिसरात पसरला आहे. जितकी मोठमोठी आणि अद्ययावत दुकाने इथे उघडली आहेत ती पाहता हे एक मोठे शहर असावे असेच वाटते. खेडे, नगर, शहर, महानगर वगैरे नांवांची इथे काय व्याख्या आहे ते समजत नाही. कारण अल्फारेट्टा शहराच्या सीमेतच वेगवेगळ्या नांवांची अनेक 'व्हिलेजेस' आहेत. त्यातले 'हेंडरसन' नांवाचे व्हिलेज आमच्या भागातच आहे, पण त्यात नुसते एकाहून एक सुरेख बंगलेच बंगले आहेत. दुकाने, चर्च, शाळा, चावडी, कट्टा, दवाखाना वगैरे कांहीसुध्दा नाही. त्याला 'खेडे' म्हणायचे तरी कसे? कदाचित 'व्हिलेज' हे नांव त्या कॉलनीला दिले असावे. पन्नास हजार वस्तीला इथे 'सिटी' म्हणतात आणि कशालाही 'टाउन'! अॅटलांटा महानगर, इतर कांही 'सिटीज', कांही 'टाउन्स' आणि घनदाट जंगल वगैरे सगळ्यांचा समावेश फुलटन कौंटीमध्ये होतो आणि या सर्वांशिवाय इतर कौंटी मिळून अॅटलांटा मेट्रोपोलिटन रीजन बनते. प्रशासनाच्या वेगवेगळ्या स्तरांच्या सीमा ठरवण्यासाठी हे सारे होत असणार.
संगणक आणि दूरसंचार प्रणालीच्या तंत्रज्ञानाची वाढ झपाट्याने सुरू झाल्यानंतर या भागाला अपूर्व असे महत्व प्राप्त झाले. मुबलक मोकळी जागा, शुध्द हवा व पाण्याची उपलब्धता, मोठा हमरस्ता वगैरेमुळे ह्यूलेट पॅकार्ड, एटीअँडटी यासारख्या अनेक कंपन्यांनी आपला विस्तार करण्यासाठी ही जागा निवडली. त्याबरोबर अनेक तरुण तंत्रज्ञ, कामगार वगैरे जगभरातून इथे आले आहेत. या शहरातील लोकांचे सरासरी वयोमान फक्त तिशीच्या घरात असल्यामुळे इथे उत्साही वातावरण आहे. इथल्या बाजारात हिंडतांना नाना वंशांचे लोक दिसतात, त्यात बरेच भारतीय सुध्दा असतात. रस्त्यातून जातायेतांना समोरून येणारा माणूस कोणत्याही वर्णाचा असला तरी नजरानजर होताच स्मितहास्य करून हॅलो, हाय करूनच पुढे जातो, कोणीही थांबत मात्र नाही. पण तेवढ्यानेही बरे वाटते. एकंदरीत ही जागा आवडण्यासारखी आहे.

No comments: