Thursday, January 08, 2009

पुणेरी सभागृहातील आचारसंहिता


पुण्यातल्या एका लग्नाला गेलो होतो. "लग्न मंगल कार्यालयात होणार आहे" असेच सगळे लोक बोलतांना म्हणत होते. पण त्या जागेचे नांव 'मंगल कार्यालय' असे न ठेवता 'सभागृह' असे ठेवले आहे असे तेथे गेल्यावर कळले. म्हणजे त्यात चाललेले कार्य खरोखरच मंगल आहे की नाही हे कोणी विचारायला नको की एकादे अमंगल कार्य करण्याचा विचार कोणाच्या मनात आला तर त्याला उगाच आडकाठी नको. आंत गेल्यावर मात्र 'वधूपक्ष', 'वरपक्ष' वगैरे पाट्या खोल्यांवर लावलेल्या होत्या. गरज नसेल तेंव्हा ते त्या काढून ठेवत असतील. सभागृहात प्रवेश करतांनाच दरवाजापाशी ठळक अक्षरात एक आचारसंहिता लिहिलेली होती. त्यातील नियम खालीलप्रमाणे होते.
१. संध्याकाळी ५ वाजता कोणत्याही परिस्थितीत सभागृह १०० टक्के रिकामे करून दिलेच पाहिजे. ही गोष्ट सभागृहाचे बुकिंग करतांनाच लक्षात घ्यावी.
(संध्याकाळी ५ वाजता कोणी तेथे आढळल्यास त्याला बाहेर काढले जाईल आणि तेथे असलेले सामान जप्त केले जाईल कां? ज्याने बुकिंग केले असेल त्याला त्या वेळेस या नियमाची जाणीव करून देणे इष्ट आहे, पण बाकीच्या पाहुणे लोकांचे काय? बहुधा त्यांनी आपण होऊन शक्य तो लवकर आपला गाशा गुंडाळावा यासाठी ही जाहीर सूचना दिली असावी किंवा त्यांच्यापैकी कोणाला हे सभागृह भाड्याने घ्यायचे असल्यास त्याने या नियमाची नोंद आधीच घ्यावी म्हणून असेल.)
२. दुपारी ३ वाजतानंतर सीमांतपूजन, वाङ्निश्चय यासारखा कोणताही कार्यक्रम करू नये.
(संपूर्ण समारंभाचे वेळापत्रक तयार करून त्यावर संचालकांची आगाऊ संमती घेणे अधिक श्रेयस्कर!)
३. रात्री १०.३० नंतर गाणी, नाच, भेंड्या वगैरे कसलाही गोंगाट करू नये.
(सर्व पाहुणे मंडळींनी अळीमिळी गुप्पचिळी धरावी किंवा डोक्यावरून पांघरूण घेऊन झोपून जावे!) आम्ही ज्या लग्नाला गेलो होतो तिथे सकाळी उठूनच सभागृहात गेलो होतो त्यामुळे हा नियम आम्हाला लागू नव्हता.
४. सभागृहाच्या आवारात ताशे वाजंत्री किंवा बँड वाजवणे, तसेच फटाके फोडण्यास सक्त मनाई आहे. (लग्नाच्या अक्षता टाकल्यानंतर टाळ्या वाजवायला तरी परवानगी आहे की ज्याने त्याने आपापल्या हातरुमालाला हात पुसावेत?)
आम्ही सकाळी जरा लवकरच पोचल्यामुळे आम्हाला सकाळचा (उपवासाचा)अल्पोपाहार मिळाला. तो घेण्याची सोय वरच्या मजल्यावर केली होती. तिथल्या हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्या ठिकाणी पाळावयाची वेगळी आचारसंहिता वाचली. त्यात लिहिले होते.
१. पंगतीमधील सर्व ताटे, वाट्या इत्यादी मांडून झाल्याशिवाय कोणीही खुर्चीवर बसू नये. (अर्थातच बसलेल्या माणसाच्या मागे येऊन कोणी उभेही राहू नये.)
२. कोणी आधीच येऊन बसल्यास त्याने स्वच्छता करण्याच्या कामात अडथळा आणू नये.
३. एक पंगत उठून गेल्यानंतर दुसरी पंगत बसण्यास १५ मिनिटे कालावधी लागेल.
४. आपण घाई केल्याने वेळ वाचत नाही.
५. सभागृहात जेवणासाठी बसण्याची कपॅसिटी वाढवता येणार नाही.
६. पंगतीत बसतांना कोणीही रिकामे पान सोडून बसू नये.
७. पंगतीमधील सर्व पाने भरल्याखेरीज सर्व्हिस सुरू होणार नाही. (आमच्या सुदैवाने हा नियम नाश्त्याच्या वेळेस लागू नसावा. त्यामुळे पंगत भरल्याशिवाय आम्हाला (सेल्फ) सर्व्हिस मिळाली.


यातली कोठलीच सूचना गैर म्हणता येणार नाही. पण ती लेखी स्वरूपात देण्याची गरज आहे कां ? पुण्याच्या लोकांना एवढा समजूतदारपणा नाही म्हणायचे की त्यांच्यावर कोणाचा विश्वास नाही? शिवाय एखादी गोष्ट लिहून ठेवली तर ती पाळली जातेच असे आहे कां?


लग्नाचा मुहूर्त चांगलाच उशीराचा होता. लग्न लावण्याचा हॉल त्या वेळेस माणसांनी गच्च भरला होता. प्रेशर कुकरची शिट्टी वाजताच त्यातून वाफ बाहेर पडावी तसे मंगलाक्षता पडताच अनेक लोक हॉलमधून बाहेर पडले. त्यातले बरेचसे लोक वरच्या मजल्यावर जेवणासाठी गेले असावेत. रिकाम्या झालेल्या दोन तीन खुर्च्या घेऊन आम्ही त्यांवर बसलो. जेवणाचा हॉल आकाराने खालच्या हॉलच्या एवढाच असल्यामुळे हॉलमधील सर्व लोकांनी पंगतीत बसायचे म्हंटले तर निदान चार आवर्तने झाली असती. पहिली पंगत आधीच भरलेली असणार. ती उठण्याची वाट पहात हॉलच्या बाहेर जिन्यात ताटकळत उभे राहण्याची आमच्यापैकी कोणाची तयारी नव्हती. आमच्या लहानपणी पंगती मांडल्यानंतर कोणीही आपण होऊन तिकडे जात नसे. एकेका माणसाला अदबीने बोलावून नेऊन पानावर बसवले जायचे. त्यातही प्रोटोकॉल कटाक्षाने पाळला जात असे. आता तो प्रघात शिल्लक उरला नसला तरी कोणीतरी "चला" म्हंटल्याशिवाय जागचे हलावेसे वाटत नाही. नाश्त्याच्या वेळेस वाचलेली पंगतीची आचारसंहिता पाहता जेवणासाठी आमचा नंबर लागेपर्यंत सभागृह १०० टक्के रिकामे करण्याची वेळ येईल असे दिसत होते. शिवाय लहान मुलांना हे नियम कसे समजावून सांगायचे हा प्रश्न होता. त्यापेक्षा आपण गुपचुप बाहेर जाऊनच थोडी क्षुधाशांती करून यावी असा विचार मनात आला. तेवढ्यात आम्ही बसलो होतो त्या जागीच हालचाल सुरू झाली. दोन सेवक मोठी घमेली घेऊन आले आणि दोघांनी ताटे वाट्यांच्या चळती आणल्या. ज्यांना पंगतीचा लाभ घेता येत नसेल त्यांच्यासाठी खालीच स्वरुचीभोग घेण्याची व्यवस्था केली जात असावी असे वाटले. चौकशी करता तिथे उपवासाचे पदार्थ मिळणार असल्याचे समजले. "अर्धम् त्यजति पंडितः" या उक्तीप्रमाणे "संपूर्ण उपाशी राहण्यापेक्षा साबूदाण्याची खिचडी खायला काय हरकत आहे?" असा विचार करीत असतांनाच एका मुलाने बातमी आणली की वरच्या मजल्यार बूफे लंच चालू आहे आणि दहा पंधरा मिनिटांनी तिथली गर्दी थोडी कमी झाली की आम्हाला जायला हरकत नाही.


दहा पंधरा मिनिटांनी आम्हीच एकमेकांना "चलता का?" असे विचारत वरचा मजला गाठला. पंगतीच्या आचारसंहितेचे प्रयोजन उरले नव्हते. रांगेत उभे असतांना बूफेसाठी नवी संहिता कशी लिहावी यावर एकमेकात चर्चा केली.
१. सर्वांनी शिस्तीने रांगेत उभे राहून आपला नंबर लागण्याची शांतपणे वाट पहावी. रांगेमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू नये.
२. एका माणसाने एका वेळेस फक्त एकच ताट वाढून घ्यावे. दुस-या कोणासाठी न्यायचे असल्यास त्यासाठी वेगळा नंबर लावावा.
३. एका ताटात एकाच माणसाने जेवावे.
४. आपल्याला जेवढे अन्न खायचे असेल तेवढेच वाढून घ्यावे. अन्न हे पूर्णब्रम्ह आहे. त्याची नासाडी करू नये.
५. सगळे अन्नपदार्थ एकदमच ताटात वाढून घ्यावेत. ताटातला एक पदार्थ संपल्यानंतर दुसरा घ्यायचा असे करू नये.
६. हातात भरलेले ताट धरून रांगेत घुसतांना आपल्या किंवा इतरांच्या कपड्यांना डाग पडण्याचा संभव असतो हे लक्षात घेऊन एकादा पदार्थ दुस-यांदा घेण्यासाठी पुन्हा रांगेत यावे.


समस्त पुणेकर मंडळी या आचारसंहितेचा सम्यक दृष्टीकोनातून सखोल विचार करून लवकरच तिच्या पाट्या रंगवतील अशी आशा आहे.

No comments: