गेल्या वर्षी याच दिवसात मी मध्यप्रदेशातल्या एका छोट्याशा गांवात एका मुंजीच्या समारंभाला गेलो होतो. असा थाटामाटात साजरा केलेला सोहळा मी यापूर्वी सुमारे बारा तेरा वर्षांपूर्वीच पाहिला होता, तो सुद्धा मध्यप्रदेशातल्याच दुस-या एका लहान गांवात. त्यापूर्वी हा समारंभ मी नक्की कुठे आणि कधी पाहिला होता ते आता आठवतदेखील नाही. आमच्या लहानपणी बहुतेक सगळ्याच मुलांचे मौंजीबंधन त्या काळच्या रिवाजानुसार थाटामाटात होत असे. पण त्याचे महत्व कमी होऊ लागले होते. घरातल्या एकाद्या मुलीचे लग्न होत असले तर त्याबरोबर लहान मुलांच्या मुंजी उरकून घेत असत. त्यामुळे त्यासाठी होणा-या खर्चात बचत होत असे आणि मोठ्या संख्येने लग्नाला आलेल्या पाहुणे मंडळींची उपस्थितीसुद्धा आयती मिळत असे. नंतरच्या काळात कांही लोक मोजक्या आप्तेष्टांना बोलावून घरच्या घरीच हा विधी घडवून आणू लागले किंवा एकाद्या तीर्थक्षेत्री जाऊन मुलांचे उपनयन संस्कार पूर्ण करून येऊ लागले. पुण्यामुंबईसारख्या शहरात सार्वजनिक समारंभात एकाच मुहूर्तावर एकाच जागी पन्नास साठ मुंजी लागायला लागल्या.
माझ्या एका मित्राची यातल्या कोठल्याच प्रकारात वर्णी लागली नव्हती. वयात आल्यानंतर त्याचे मैत्रिणीबरोबर प्रेम जुळले. दोघांच्याही घरचा त्याला विरोध नसल्यामुळे त्यांनी विधीवत विवाह साजरा करायचे ठरवले. पण लग्न लावणारा पुरोहित त्याच्या विवाहसंस्काराचे आधी त्याच्यावर उपनयनसंस्कार झालाच पाहिजे असा आग्रह धरून बसला. अखेरीस लग्नापूर्वी त्याने आपली मुंज करवून घेऊन कांही तासांसाठी ब्रम्हचर्यव्रताचा स्वीकार केला आणि सोडमुंज करवून त्यातून आपली सुटकाही करून घेतली.
उपनयन हा संस्कार प्राचीन कालापासून चालत आला आहे आणि आपल्या संस्कृतीचा एक भाग बनला आहे असे म्हणता येईल. पण त्या काळी असलेल्या परिस्थितीनुसार वेगळ्याच उद्देशाने सुरू केलेल्या प्रथांना मध्यंतरीच्या काळात किती वेगळे रूप आले होते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे. आजकालच्या जगात ती परंपरागत प्रथा मागे पडत चालली आहे. मूळ उद्देश आणि प्रत्यक्ष अनुभव यात प्रचंड तफावत आल्यावर असे होणे हे नैसर्गिक आहे.
प्राचीन काळात आजच्यासारखे चाकोरीबद्ध शालेय शिक्षण नव्हते. ठराविक वेळेत शाळेला जाणे, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तके, अभ्यास, परीक्षा, प्रमाणपत्रे वगैरे कांही नव्हते. आठ वर्षे पूर्ण होईपर्यंत सारी मुले आपल्या बाल्यावस्थेचा मनसोक्त उपभोग घेऊ शकत. हवे तेवढे खेळणे, बागडणे, हुंदडणे, खाणेपिणे, मनात येईल तेंव्हा आईच्या कुशीत शिरणे यातल्या कशालाच कोणाचा प्रतिबंध नव्हता. घरातल्या घरातच कांनावर चार शब्द पडून त्यातून ज्ञानाचे दोन कण मिळाले तर मिळाले, ऐकता ऐकताच कांही पाठांतर झाले तर झाले. त्यात सक्तीचा भाग नसायचा.
त्यानंतर मात्र मुलांचे औपचारिक शिक्षण सुरू होत असे. सखोल ज्ञानार्जन करण्यासाठी मनाची एकाग्रता आवश्यक असते. त्या वेळी इतर मोह पडू नयेत यासाठी मुलाने जाणीवपूर्वक प्रयत्न करणे जरूरीचे होते. त्याला पोषक असे वातावरण त्याच्या भोवती असेल तर ते सोपे जाईल. अशा सगळ्या कारणांसाठी रोजच्या जीवनात बदल घडवून आणणारा एक महत्वाचा टप्पा या अर्थाने या विधीची संकल्पना केली गेली असावी.
. . . . . . . . . . . (क्रमशः)

No comments:
Post a Comment