Wednesday, January 07, 2009

मौंजीबंधन भाग ५



मुहूर्त होताच बटूंच्या मस्तकावर सर्वांनी अक्षता टाकल्यानंतर पेढे वाटून झाले. ते खाता खाता सगळी मंडळी पांगली. त्या दिवशी थंडीच्या लाटेने अगदी कहर केला होता. सकाळी आठ साडेआठपर्यंत इतके दाट धुके होते की वीस पंचवीस फुटांपलीकडचे कांही दिसत नव्हते. साडेनऊ दहा वाजता जमीनीवरील धुके निवळून गेले होते, पण आभाळात त्याचे दाट थर शिल्लक होते. पहायला गेले तर आकाश निरभ्र होते, एकही ढगाचा आकार असा दिसत नव्हता, पण सूर्याचे बिंब जेमतेम पौर्णिमेच्या चंद्राइतपतच चमकत होते. कासराभर वर आलेल्या सूर्याचे बिंब त्याच्याकडे टक लावून सहजपणे पाहता येत होते. अशा प्रकारचे दृष्य भारतात मी प्रथमच पहात होतो. यापूर्वी मी बर्फाळ प्रदेश पाहिला आहे, हिमवर्षावाचा अनुभवही घेतला आहे, पण त्या वेळेस लोकरीच्या कापडाने नखशिखांत सर्वांग झाकून घेतले असल्यामुळे त्याचे एवढे कष्ट वाटले नाहीत. या वेळी मात्र अंगात हुडहुडी भरवणा-या कडाक्याच्या थंडीने मला अनपेक्षितपणे
गाठले होते. इतर पाहुण्यांचीही हीच अवस्था होती. दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला सारे धुके निवळून लख्ख ऊन पडले. तेंव्हा गारठलेल्या हॉलमध्ये बसण्यापेक्षा बाहेर उबदार वाटू लागले. सगळी रिकामटेकडी मंडळी खुर्च्या घेऊन बाहेर आली आणि समोरच्या उघड्या जागेत भर दुपारी सकाळचे कोवळे ऊन खात असल्याप्रमाणे आरामात गप्पा मारत बसली.

बटूंच्या कानात गायत्री मंत्र सांगितल्यानंतर त्यांना गुरूजींच्या ताब्यात देऊन मुलाचे वडील मोकळे झाले आणि पुढच्या कामाच्या तयारीला लागले. सजावट करणा-या कंत्राटदाराच्या माणसांनी सभागृहाचा ताबा घेतला. पुढील होमहवन वगैरे करण्यासाठी एका बाजूला थोडी जागा सोडून उरलेल्या जागेची साफसफाई आणि सजावट त्यांनी सुरू केली. थोडी महिला मंडळी त्यांना दिलेल्या स्वतंत्र खोलीत जाऊन बसली, थोडी बाहेर आली. हॉलमध्ये उरलेली पुरुषमंडळी देखील खुर्च्या घेऊन बाहेर येऊन उन्हात बसली. कांही लोक गांवात फेरफटका मारायला गेले, कांहींनी रेल्वे स्टेशनात जाऊन गाड्यांच्या चौकशा केल्या. पण त्या पिटुकल्या गांवात रस्त्यावरून फिरायला फारसा वाव नव्हता आणि विंडोशॉपिंग करता येण्यासारख्या मॉल्सची तर कल्पनादेखील करता येण्यासारखी परिस्थिती नव्हती. पेन किंवा टूथ पेस्ट यासारख्या अगदी आवश्यक अशा ज्या गोष्टी येतांना बरोबर आणायचे राहून गेले होते त्या कांही लोकांनी बाजारातून विकत घेतल्या

मुंजीच्या विधीमध्ये नक्की काय चालले होते ते कांही मी पाहिले नाही. पण माझ्या अंदाजाप्रमाणे होम हवन करून विविध देवांची पूजा व प्रार्थना करणे आणि त्या अग्नीदेवाच्या साक्षीने ब्रम्हचर्यव्रताचे पालन करण्याची प्रतिज्ञा करणे वगैरे गोष्टी त्यात असाव्यात. ते सगळे संस्कृत भाषेत असल्यामुळे बटूंना त्याचा अर्थ समजण्याची शक्यता नव्हती आणि ते उमजण्याचे त्यांचे वय नव्हते. सकाळी लवकर उठल्यामुळे रात्रीची झोपही झालेली नव्हती. आळोखे पिळोखे आणि जांभया देत ते सारे विधी संपण्याची वाट पहात होते. पोटात चांगली खडखडून भूकही लागली असावी. परत जाण्याची ज्या लोकांना घाई होती अशा थोड्या लोकांना पहिल्यांदा जेवायला बसवले तेंव्हा छोटा बटू हळूच येऊन त्यातल्या एका पानावर जाऊन बसला आणि त्याने जेवायला सुरुवातही करून दिली.

सर्व पाहुणे मंडळी आणि गांवातले निमंत्रित लोक यांची यथासांग जेवणे झाली. जेवणाचा बेत छानच होता आणि प्रत्येक पदार्थ प्रेमाने भरभरून आग्रह करून वाढणे चालले होते. आजकाल बूफेची संवय झालेली असल्यामुळे असे पंगतीतले जेवण करतांना वेगळ्या मजेचा अनुभव येत होता. सर्वांची जेवणे झाल्यानंतर भिक्षावळीचा कार्यक्रम झाला. व्रतबंध झाल्यानंतर बटूने विद्याध्ययनासाठी गुरूगृही जाऊन रहायचे असे. त्याच्या उदरभरणाचा भार गुरूवर पडू नये म्हणून त्याने पांच घरी जाऊन माधुकरी मागायची आणि मिळेल ते अन्न भक्षण करायचे किंवा मिळालेला शिधा गुरूपत्नीला नेऊन द्यायचा असा संकेत पूर्वीच्या काळी असावा. आपले घर सोडून जातांना बटूने कसल्याही प्रकारची चैनीची वस्तू बरोबर न्यायची नाही. कंबरेला लंगोटी, खाकेत झोळी आणि हातात दंड एवढेच सोबत घेऊन त्याने गुरूगृही जायचे असा दंडक होता. बटु तसा वेष धरून तयार झाले. लंगोटी घालायची लाज वाटते म्हणून पायजम्यासारखे नेसता येणारे कद त्यांनी परिधान केले होते आणि कडाक्याची थंडी असल्यामुळे शाल पांघरणे आवश्यक होते. "ओम् भवती भिक्षांदेही" असे म्हणत त्यांनी पाच घरी भिक्षा मागावयाची असा नियम होता. प्रत्यक्षात त्यांची माता पाच वेगवेगळी वस्त्रे परिधान करून आली आणि तिने पांच वेळा तिथे तयार ठेवलेली भिक्षा बटूंच्या झोळीत घातली. त्यानंतर इतर स्त्रीवर्गाने भिक्षावळ घातली. पूर्वीच्या काळी बटूंच्या पायाचे तीर्थ प्राशन करण्याची पद्धत होती. आता बिसलेरी आणि एक्वागार्डच्या जमान्यात सहसा कोणी ते धाडस करत नाही. जमा झालेली सर्व भिक्षावळ गोळा करून भटजींना दिली.


कार्यालयातला भिक्षावळीचा कार्यक्रम संपल्यावर मिरवणूक निघाली. खरे तर संध्याकाळ झाल्यानंतर ती काढतात, पण वीजकपातीमुळे सगळीकडे पसरणारा काळाकुट्ट अंधार आणि संध्याकाळी रस्त्यात वाढणारी रहदारी यांचा विचार करून थोड्या आधीच वरात काढली गेली. सजवलेल्या घोड्यावर दोन्ही बटू विजयी वीरांच्या ऐटीत स्वार होऊन बसले. पुढे बँडवाले आणि मागे सारा परिवार अशी मिरवणूक गांवातल्या एकमेव हमरस्त्यावरून निघाली. अपेक्षेप्रमाणे घराघरांतून लोक कौतुकाने त्यांच्याकडे पहात होते आणि अभिमानाने हात हलवून बटू त्यांना अभिवादन करत होते. बटूंनी प्रथम एका मंदिरात जाऊन देवदर्शन घेतले आणि ते वाजतगाजत घरासमोर आले. उत्साही मंडळींनी घरासमोर बँडच्या तालावर नाचून घेतले. थोड्या वेळाने वरात कार्यालयात परत गेली. मुंजीचा कार्यक्रम थाटामाटात साजरा केल्याबद्दल सर्वांनी यजमानांचे तोंडभर कौतुक केले आणि हे मंगल कार्य निर्विघ्न पार पाडल्याबद्दल परमेश्वराचे
आभार मानले.

(समाप्त)

No comments: