Monday, January 12, 2009

राणीचे शहर लंडन - भाग ३


हीथ्रो एअऱपोर्टहून मी ट्यूबने लंडनच्या मुख्य स्टेशनवर गेलो. बाहेरगांवी जाणा-या गाड्या तिथून सुटतात. माझ्या पुढच्या प्रवासाचे तिकीट काढले आणि माझ्याकडचे सामान तिथल्या लॉकरमध्ये ठेऊन दिले. त्या जागेला तिथे लेफ्ट लगेज असे म्हणतात. त्या काळात टेररिस्टांची भीती नसल्यामुळे सामान ठेवण्याची अशी व्यवस्था होती. आता असेल की नाही ते सांगता येणार नाही. अत्यावश्यक असे सामान खांद्याला
लोंबकळणा-या बॅगेत घेऊन मी पुन्हा ट्यूबने दुसरे एक स्टेशन गाठले. लंडन दर्शन घडवणारी बस तिथून घ्यायची होती.
लंडन शहरातल्या जुन्या व नव्या इमारती, रस्ते, चौक, मैदाने, नदीचे पात्र, किनारा, इत्यादींचे बसल्या जागेवरून सम्यक दर्शन घेत त्या वातावरणात विरघळून जाण्यासाठी तिथल्या ओपन टॉप बसेसची छान सोय आहे. दीड दोन तासाच्या प्रवासात वळसे घेत घेत त्या लंडनच्या मध्यवर्ती भागातून फिरत असतात. त्याचेही लाल, हिरवा, निळा अशा रंगांचे वेगवेगळे मार्ग आहेत. त्यातला प्रत्येक मार्ग हा क्लोज्ड लूप आहे. त्याला कोठे सुरुवात नाही आणि शेवट नाही. एकदा तिकीट काढले की त्या मार्गावरून जाणा-या कोठल्याही बसमध्ये कोठल्याही स्टॉपवर उतरता येते, त्याच किंवा दुस-या स्टॉपवर पुन्हा चढता येते किंवा एका जागेवर बसून राहता येते. याला हॉप ऑन हॉप ऑफ म्हणतात. आपल्याला वाटेल त्या जागी उतरावे, तिथल्या परिसरात हिंडून फिरून घ्यावे, खावे प्यावे, खरेदी करावी आणि पुन्हा त्या थांब्यावर यावे. दर पंधरा वीस मिनिटात मागची बस येतेच. सगळीकडेच उतारू चढत व उतरत असल्यामुळे तिच्यात
जागा मिळते. मात्र हा प्रवास एकाच दिशेने चालत असतो. मागच्या स्टॉपवर पुन्हा जावेसे वाटले तर उलट दिशेने जाणारी बस नसते. पहिल्यांदाच लंडनला गेलेल्या माणसाने हे दर्शन घेतले तर आपल्या आवडीची स्थळे कोणती आणि ती कुठे आहेत याचा अंदाज त्याला येतो आणि नंतर त्या जागी निवांतपणे जायला त्याचा उपयोग होतो. मी नेमके हेच केले.
या बसमध्ये चालत असलेली कॉमेंटरी खूपच मजेदार असते. मला तरी नेहमी निवेदिकाच भेटल्या. आजूबाजूला दिसत असलेल्या दृष्यांची मनोरंजक माहिती त्या अगदी हंसत खेळत देत होत्या. रुक्ष आंकडेवारी न सांगता गंमतीमध्ये ती सांगण्याचे एक उदाहरण अजून लक्षात राहिले आहे. सुप्रसिद्ध बिग बेन घड्याळाबद्दल तिने सांगितले, "या घड्याळाचा लहान कांटा आपल्या बसपेक्षा थोडा मोठा आहे." ट्राफल्गार स्क्वेअर, टॉवर ऑफ लंडन, वेस्टमिन्स्टर, बकिंगहॅम पॅलेस, हाईड पार्क, मार्बल आर्च आदि
हत्वाच्या जागा दाखवता दाखवता त्यांचा इतिहास, त्यांची वैशिष्ट्ये इत्यादी गोष्टी चुरचुरीत शैलीमध्ये ती सांगत असते. अशा प्रकारच्या बसमधून मी अजून मुंबई दर्शन घेतले नाही. त्यामुळे इथे कशा प्रकारचे निवेदन करतात याची मला कल्पना नाही. पण लंडनची निवेदिका इथे आली तर आपल्या अगदी ओळखीचा असा हुतात्मा चौक पाहून सुध्दा आपण धन्य झालो असे ती आपल्याला वाटायला लावेल ! ही कॉमेंटरी आजूबाजूला दृष्टीला पडत असलेल्या जागांबद्दलच असल्यामुळे आपण एका जागी बसमधून खाली उतरलो आणि थोड्या वेळाने मागून येणा-या बसमध्ये बसलो तर निवेदिका बदलली तरी कॉमेंटरीमधील दुवा तुटत नाही.
लंडनला कडक ऊन असे कधी नसतेच. पावसाने कृपा करून विश्रांती घेतली असेल, पुरेसे कपडे अंगावर असतील आणि बोचरा वारा सहन करण्याची तयारी असेल तर नक्की डेकवरच बसावे म्हणजे दोन्ही बाजूंना छान दूरवर पाहता येते. खाली बसणा-या लोकांना फक्त खिडकीबाहेर जेवढे दिसेल तेवढेच दिसते. दोन्ही जागी कॉमेंटरी एकू येतेच. ज्यांना फ्रेंच, जर्मन असल्या युरोपियन भाषेतून कॉमेंटरी ऐकायची असते त्यांना खास हेडफोन दिले जातात, त्यावर टेप केलेली कॉमेंटरी ऐकू येते. आपण वेगवेगळ्या जागा निवांतपणे पाहिलेल्या असल्या तरी या कॉमेंटरीसाठी पुन्हा एकदा या बिग बसने प्रवास करून पहावा असे वाटते.

No comments: