Sunday, January 11, 2009

राणीचे शहर लंडन - भाग २


माझ्या पहिल्याच परदेशाच्या वारीमध्ये लंडनला जाण्याचा योग जुळून आल्याने मला कांकणभर जास्तच आनंद झाला. जे लोक त्यापूर्वी लंडनला जाऊन आलेले होते त्यांना निघण्यापूर्वी जाऊन भेटलो. त्यांच्याकडून त्या शहराचा नकाशा, महत्वाच्या प्रेक्षणीय ठिकाणांची नांवे आणि भरपूर सूचना घेतल्या. त्या काळी इंटरनेट नसल्यामुळे अशा गोष्टींची जमवाजमव करण्यासाठी बरीच शोधाशोध आणि मेहनत करावी लागत असे. अशी तयारी करून गेल्यानंतरसुद्धा प्रत्यक्षात हीथ्रो विमानतळावर उतरल्यानंतर आता कुठून सुरुवात करावी आणि त्यासाठी नेमके काय करायला पाहिजे ते समजत नव्हते. त्या वेळेस माझा कोणी मार्गदर्शक माझ्यासोबत नव्हता. अखेर सरकारी मदतकेंद्राचीच मदत घ्यायचे ठरवले.
त्या काउंटरवर बसलेल्या उत्साही तरुणाने मला परम आश्चर्याचा धक्काच दिला. एक दोन मिनिटांत त्याने माझी गरज नेमकी जाणून घेतली, भराभर मला वेगवेगळे नकाशे काढून दिलेच, त्यांवर जागांच्या खुणा सुद्धा करून दिल्या एवढेच नव्हे तर रेल्वे आणि बसची तिकीटे देखील माझ्या हातात ठेवली आणि कसेकसे जायचे ते थोडक्यात समजावून पण सांगितले. या सगळ्या गोष्टी आणि पुरेपूर आत्मविश्वास घेऊन मी विमानतळाच्या तळघरातल्या रेल्वे स्टेशनवर जाऊन पोचलो.
मुंबईहून निघण्यापूर्वी मी लंडनच्या भुयारी रेल्वेची कीर्ती ऐकली होती. आता तिथल्या स्थानिक प्रवासाची सुरुवात त्या गाडीनेच केली होती. पण विमानतळाच्या इमारतीतून बाहेर पडतांनाती अजून जमीनीवरच होती. आसमंतातली हिरवळ सकाळच्या कोवळ्या किरणांनी न्हाऊन ताजी तवानी दिसत होती. अधून मधून घरे, कारखाने, गोदामे वगैरे दिसत होती. कांही काळ जमीनीवरून प्रवास केल्यानंतर जेंव्हा शहरातली दाट वस्ती सुरू झाली तेंव्हा मात्र आमची गाडी भुयारात घुसली.
लंडनची अंडरग्राउंड मेट्रो किंवा तिथल्या बोलीभाषेत 'ट्यूब' ची व्यवस्था ही एक अद्भुत वाटणारी गोष्ट आहे. मुंबईत वर्षानवर्षे राहणारे लोकसुद्धा इथल्या पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे, तिची मेन लाईन , हार्बर लाईन वगैरेमध्ये गफलत करतांना दिसतात. लंडनला तब्बल डशनभर लाइनी आहेत. त्या प्रत्येक लाइनीला एक विशिष्ट रंग दिला आहे आणि त्यांना आपापली नांवे असली तरी त्या त्यांच्या रंगानेच जास्त ओळखल्या जातात. लंडनच्या मध्यवर्ती भागातून यातल्या बहुतेक सगळ्या लाइनी जातात. त्यामुळे अनेक स्टेशनात दोन किंवा तीन लाइनी मिळतात. अनंत जागी त्या एकमेकींना छेद देतात. पण त्यांचे रूळ जमीनीखाली वेगवेगळ्या स्तरांवर असल्यामुळे प्रत्यक्षात त्या एकमेकींना कुठेच मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे सांधे जोडायची किंवा बदलायची गरज नसते. प्रत्येक रंगाच्या लाइनीवरून लोकल गाड्या एकापाठोपाठ धांवत असतात. त्यांना कसलाच अडथळा नसतो.
लंडनमधल्या सर्व लाइनी दाखवणारा एक सुबक व कल्पक रंगीत नकाशा मुक्तपणे सगळीकडे उपलब्ध असतो आणि प्रत्येक स्टेशनात रंगवलेला असतो. त्याची रचना इतकी सुंदर आहे की कोठलाही साक्षर माणूस तो नकाशा पाहून आपल्याला ज्या ठिकाणी जायचे असेल तिथे जाण्याचा सर्वात चांगला मार्ग शोधून काढू शकतो. त्याला मदत करण्यासाठी अनेक यांत्रिक साधने देखील उपलब्ध असतात. स्टेशनात शिरल्याबरोबर कुठली लाईन कुठल्या प्लॅटफॉर्मवर मिळेल आणि ती ट्रेन कुठकुठल्या स्टेशनांना जाईल ही माहिती सुवाच्य अक्षरात आणि सहज दिसावी अशा ठिकाणी मिळते आणि ती पहात पहात प्रवाशाला इच्छित स्थळी पोचता येते. बटन दाबल्यावर तिकीट छापून देणारी यंत्रे मुंबईच्या तिकीटांच्या खिडकीत पाहिली होती. लंडनला ती स्वयंचलित आहेत. त्यात मोठे नाणे टाकले तर उरलेले सुटे पैसे बाहेर येतात. आता बहुतेक लोक इंटरनेट व क्रेडिट कार्डाचाच वापर करत असल्याने पाहिजे ती तिकीटे इंटरनेटवर बुक करून क्रेडिट कार्ड वापरून त्याचा प्रिंटआउट घेता येतो. शहराच्या मध्यभागातले आंतले वर्तुळ किंवा बाह्य वर्तुळ यात सर्वत्र दिवसभर किंवा आठवडाभर चालू शकणारे पास काढायची सोय आहे.
लंडनच्या मेट्रोमध्ये पाहिलेल्या एका गोष्टीचा उल्लेख मला आवर्जून करावासा वाटतो. धडधाकट माणसे तर त्यातून प्रवास करतातच, पण अपंग लोकसुद्धा व्हीलचेअरवर बसून या गाडीत चढू उतरू शकतात. महत्वाच्या स्टेशनांवर त्यांच्यासाठी खास लिफ्ट आहेत. त्यातून ते भूमीगत प्लॅटफॉर्मवर येजा करू शकतात. त्यांच्या अपंगत्वामुळे त्यांच्या हालचालीवर मर्यादा पडत असल्या तरी चाकांच्या खुर्चीत बसून ते रोजच्या जीवनातील जवळजवळ सर्व गोष्टी करू शकतात, अगदी रेल्वेप्रवाससुद्धा!

No comments: