Saturday, January 24, 2009

अल्फारेट्टा - भाग २



इथली बरीच मंडळी हवामान पाहून आपल्या लहान बाळांना बाबागाडीत ठेवून फिरवून आणायला बाहेर पडतात. बाबागाडीला अमेरिकेत 'प्राम' न म्हणता 'स्ट्रोलर' म्हणतात. 'स्ट्रोलर' मधून फिरण्याच्या वयोगटातून प्रगतीपथावर गेलेली मुले रस्त्यातून दुडूदुडू पळत असतात. इथली काळी बदके (गूज पक्षी) रस्ता ही आपलीच मालमत्ता असल्यागत त्यावरून आरामात हिंडत असतात. अर्थातच सारे मोटार चालक धीम्या गतीने सावधगिरीने गाडी चालवतात. त्यांना याची आठवण करून देण्यासाठी रस्त्यावर जागोजागी गतीरोधक बसवलेले आहेत. त्यामुळे संकुलाच्या अंतर्गत रस्त्यावरून पायी चालायला कसलीही अडचण किंवा भय वाटत नाही. पण गेटवर आल्याबरोबर समोर वीस पंचवीस मीटर रुंद रस्त्यावर दोन्ही दिशांनी सुसाट धांवणारी वाहने पाहून नवखा माणूस थोडा बिचकतोच.
अल्फारेट्टा शहराच्या मधून आरपार जाणारा जॉर्जियामधला मुख्य द्रुतगती महामार्ग सोडला तर इतर रामुख रस्त्यांच्या कडेला फूटपाथ बांधलेले आहेत आणि त्यावर तुरळक कां होईना, पण पायी चालणारे इन्वा क्वचित धांवणारे (जॉगिंग करणारे) लोक दिसतात. जवळ जवळ प्रत्येक लहान वा मोठ्या अस्त्यान्च्या जंक्शनवर ट्रॅफिक सिग्नल आहेत. त्यातल्या प्रत्येक कोप-यावर एका छोट्याशा खांबावर आदचा-यांना रस्ता क्रॉस करण्यासाठी मदत करणारी बटने असतात. तसेच त्यासंबंधींच्या सूचना थोडक्यात दिलेल्या असतात. ज्या दिशेने आपल्याला जायचे असते त्या दिशेकडे निर्देश करणारा बाण पाहून त्याखालचे बटन दाबायचे आणि रस्त्यापलीकडच्या दिव्याकडे पहात वाट पहात उभे रहायचे. एरवी या दिव्यावर केशरी रंगातला "थांबा" असे सांगणारा पंजा दिसतो, तो पांढरा झाला की लगेच रस्ता क्रॉस करायला सुरुवात करायची. त्या दिव्याचा रंग पाच सात सेकंदात बदलून पुन्हा केशरी होतो. इतक्या कमी वेळात इथला कोणताही रुंद रस्ता क्रॉस करणे शक्यच नसते, पण काळजी करायचे कारण नाही. त्या दिव्यावर वीस, एकोणीस, अठरा . . . असे कमी होत जाणारे आंकडे दिसायला लागतात. तेवढ्या सेकंदात उरलेला रस्ता क्रॉस करून आपण पलीकडे सहज पोचतो. एकादा अपंग किंवा वृध्द जरी पोचू शकला नाही तरी सिग्नलवर उभी असलेली गाडी स्टार्ट करून त्याच्या अंगावर घालण्याएवढे कोणी दुष्ट नसतात.
इथल्या रहदारीचा आणि त्याच्या नियमांचा अंदाज आल्यानंतर मी निर्धास्तपणे दूरवर पायी फिरत जाऊ लागलो. हायवेवरील एक्झिटला जोडलेल्या मोठ्या रस्त्यांवर एटीअँडटी, एचपी यासारख्या मोठ्या कंपनींची विशाल कार्यालये, हिल्टन, हॉलिडे इन, मॅरियट वगैरेंच्या साखळीतली हॉटेले, वॉल मार्ट, कॉस्टको या सारखी
अस्ताव्यस्त पसरलेली दुकाने आणि इतर अनेक प्रकारची लहानमोठी ऑफीसे, दुकाने, गोदामे वगैरे आहेत.
मॅकडोनाल्ड, बर्गरकिंग वगैरे अमेरिकन पद्धतीची हॉटेले आहेतच, मेक्सिकन, इटालियन, चिनी, जपानी, थाई आणि हो, भारतीय पध्दतीचेसुध्दा खाणेपिणे देणारी भोजनालये आहेत. या सगळ्याच व्यावसायिक संस्थांच्या इमारती आपल्याकडल्या तत्सम इमारतींपेक्षा खूप मोठ्या असतात. त्याशिवाय त्यांच्या क्षेत्रफळाच्या तिप्पट किंवा चौपट जागा त्यांच्या आजूबाजूला कार पार्किंगसाठी राखून ठेवलेली असते. मुंबईच्या ब्रेबोर्न स्टेडियमइतकी जागा फक्त इथल्या वॉल मार्टने व्यापून ठेवलेली आहे. यावरून त्याच्या आकारमानाची कल्पना येईल. या मोठ्या रस्त्यांच्या कडेला रहिवासी वस्ती कांही दिसत नाही. ज्या जागा अजून मोकळ्या आहेत तिथेसुध्दा बहुतेक करून नवी दुकाने आणि ऑफीसेस येणार असे दिसते.
या मुख्य रस्त्यांना येऊन मिळणारे जे लहान रस्ते आहेत, त्यांना पुढे जाऊन आणखी फाटे फुटतात आणि त्यांच्या बाजूला सुंदर एक दोन मजली बंगल्यांच्या रांगा किंवा अनेक फ्लॅट्स असलेल्या दोन किंवा तीन
मजल्यांच्या इमारती आहेत. त्यातही या भागात बंगल्यांची संख्याच जास्त दिसते. कांही ऑफीसांच्या आणि इमारतींना पाच सहा मजले असतील. याहून उंच अशी गगनचुंबी इमारत अद्याप अल्फारेट्टाच्या
परिसरात कोठे बांधलेली दिसत नाही. इकडच्या उंच झाडांना जागोजागी फुटलेल्या फांद्या एकमेकीपासून दूर जातांना दिसतात तशाप्रमाणे इथल्या लहान रस्त्यांना फुटलेले फाटे आणि त्यांच्या उपशाखा विस्तारतच जातात. त्यांना एकमेकांना जोडणारे रस्ते इथे अस्तित्वातच नाहीत. आमच्या संकुलातल्या मुख्य रस्त्यालासुध्दा चार जागी चार फाटे फुटलेले आहेत आणि ते पांचही रस्ते वळत वळत जाऊन वेगवेगळ्या इमारतींपाशी संपतात. अगदी टोकाच्या इमारतीपासून पलीकडल्या कॉलनीतले घर एका हांकेच्या अंतरावर आहे, पण दोन्हींच्या मध्ये उंच कुंपणे आणि घनदाट झाडी असल्यामुळे इकडून तिकडे जायचे झाल्यास सात आठ वळणे असलेला दोन तीन किलोमीटर लांब वळसा घालून आणि तीन चार ट्रॅफिक सिग्नल पार करून जावे लागेल. सरळ रस्त्याने किंवा पायवाटेने जिथे माणूस दहा सेकंदात पोचेल तिथे मोटारीने जायला निदान पांच मिनिटे लागतील. एवढे दूर अंतर चालत जायचा विचारच इथे कोणी करत नाही. अल्फारेट्टाच्या नव्याने बांधल्या गेलेल्या भागात असलेली ही अशा पध्दतीची नगररचना मी तरी यापूर्वी कोठेही पाहिली नव्हती. अॅटलांटा शहराच्या मुख्य भागातदेखील जगातल्या इतर शहरांसारखेच रस्त्यांचे जाळे विणलेले आहे.
अल्फारेट्टाच्या भूभागाचे आकाशातून सर्वेक्षण केले आणि जमीनीचा वापर कशा प्रकारे केला गेला आहे हे पाहिले तर जवळ जवळ ७५ टक्के भागावर जंगलच दिसेल. इकडचा सगळा डोंगराळ भाग असल्यामुळे इथे शेतीभाती किंवा बागबगीचेसुध्दा दिसत नाहीत, नुसतेच ताडमाड वाढलेले वृक्ष आणि कोठे कोठे जमीनीलगत पसरलेली हिरवळ किंवा झुडुपे, वेली वगैरे दिसतात. निदान पांच टक्के भागावर प्रशस्त रस्ते बांधून ठेवले आहेत, दहा टक्के जागांवर कारखाने, कार्यालये, दुकाने आणि त्यांचे पार्किंग लॉट्स असतील आणि उरलेल्या दहा टक्के जमीनीवर घरकुले, बंगले आणि हाउसिंग ब्लॉक्स वगैरे बांधले असतील. त्यातल्याही बहुतेक इमारती एक किंवा दोन मजल्याच्या असल्याकारणाने उंच झाडांच्या आड दडलेल्याच असतात. आता पानगळीमुळे झाडांचे रिकामे सांगाडे झाले आहेत, त्यामुळे रस्त्यावरून आता त्या दिसू लागल्या आहेत. इतकी विरळ वस्ती असलेला पण अद्ययावत सुखसोयी असलेला भाग मुंबईहून आलेल्या माणसाला अजबच वाटणार. या भागाला शहरी भाग म्हणावा की ग्रामीण तेच मला कळत नाही.
. . . . .. . . . . . . .. . . . . . .. . (क्रमशः)

No comments: