मुंजीच्या दिवशी मात्र भल्या पहाटे उठून कामाची लगबग सुरू झाली. मुंज्या मुलांना उठवून तयार करण्यात आले. त्यांचे मातापिता, करवल्या वगैरे अतिविशिष्ट मंडळींना सगळ्याच कामात अग्रक्रम देणे आवश्यक असल्यामुळे आम्ही इतरेजन आपला नंबर लागण्याची वाट पहात आराम करीत राहिलो. अखेर जमेल तेंव्हा जमतील तेवढी नित्याची कामे उरकून कपडे चढवून तयार होईपर्यंत मातृभोजनाची तयारी सुरू झाली होती. आम्हीही सावकाशपणे आपला नाश्ता घेऊन चवीने खाल्ला. कढईतून तळून निघालेले गरम गरम बटाटे वडे (त्याला तिकडे 'आलू बोंडा' म्हणतात) थंडगार वातावरणात जास्तच चविष्ट लागत होते. त्यामुळे सगळ्यांनी त्याची दोन तीन आवर्तने केली.
व्रतबंध झाल्यानंतर मुलगा व्रतस्थ होतो. त्यानंतर कोणाचेही उष्टे खाणे त्याला निषिद्ध असते. यामुळे ते नियम लागू होण्यापूर्वीच त्याची आई, बहीण वगैरेंनी त्याला मायेने मांडीवर बसवून घेऊन आपल्या हांताने दोन चार घास भरवून घ्यावेत, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही अशा विचाराने मातृभोजनाचा विधी ठेवला गेला असणार. मुंज्या मुलाला या प्रसंगी धीर यावा यासाठी आठ बटूंना त्याच्यासोबत बसवतात. पण ते बटू आधीच व्रतस्थ झालेले असल्यामुळे त्यांना सुग्रास अन्न चालणार नाही म्हणून मातृभोजनाचा वेगळा मेनू ठरलेला असतो. मध्यप्रदेशातल्या त्या लहान गांवात यासाठी बटू मिळवणेसुद्धा कठीण काम होते. शिवाय कडाक्याच्या थंडीत उठून यायला कोण तयार होणार? खास त्यांना आणण्यासाठी त्यांच्या घरी गाडी पाठवण्याची व्यवस्था करावी लागली. त्यामुळे परगांवाहून आलेल्या कांही पाहुण्यांची थोडी गैरसोय झाली. त्याच्या मागचे कारण माहीत नसल्यामुळे झालेले गैरसमज आणि त्यापोटी झालेले त्यांचे रुसवे फुगवे थोडा वेळ चालले. मुलांना घास भरवण्याच्या बाबतीत यावेळी महिलांना शंभर टक्के आरक्षण मिळते. आजोबा, काका, मामा वगैरेंना कोणी त्यासाठी बोलावले नाही.
मुहूर्त होण्यापूर्वी सर्वात कष्टप्रद अशा कार्यक्रमातून मुंज्या मुलांना जावे लागले. सगळ्या प्रिय गोष्टींचा त्याग करण्याचे प्रतीक म्हणून त्यांना आपला केशसंभार उतरवावा लागला. डोक्यावर तबल्याच्या आकाराचा घेरा ठेऊन बाकी सारे साफ केले गेले. अशा प्रकारची हेअरस्टाईल करणारे कारागीर तिकडे अजून उपलब्ध आहेत याचेच थोडे आश्चर्य वाटण्यासारखे आहे. कदाचित दूरदर्शनवर 'चाणक्य' ही मालिका येऊन गेल्यावर त्यांच्या हस्तकौशल्याची उजळणी झाली असावी. ते कार्य चालले असतांना मुलांचे रडवेले झालेले चेहेरे पाहून त्यांच्याबद्दल अनुकंपा वाटत होती. पण महत्व मिळवण्यासाठी कसले तरी कष्ट उपसावे लागतात एवढा वस्तुपाठ त्यांना मिळाला होता.
मुंज लावण्यासाठी एक वेगळी प्रशस्त जागा सुसज्ज करून ठेवली होती. मुहूर्ताची वेळ होताच सगळी मंडळी तेथे जमली. लग्नामध्ये वधू आणि वर हे अंतरपाटाच्या दोन्ही बाजूला उभे असतात. मुहूर्ताच्या शुभ घटीला त्यांच्यामधला अ़डसर दूर करून त्यांनी एकमेकांना पहिल्यांदा पहावे अशी योजना असते. चांगले सजून धजून तयार असल्यामुळे त्यांचे एकमेकांवर फर्स्ट इम्प्रेशन चांगले पडते. परंपरागत रूढीनुसार त्यांनी त्यापूर्वी एकमेकांना पाहिलेसुद्धा नसायचे. पहाण्याचा कार्यक्रम वडीलधारी मंडळीच करत असत. या गोष्टी माझ्याही जन्मापूर्वीच इतिहासजमा झाल्या होत्या. तरी अंतरपाट धरून तो मुहूर्तावर दूर करण्याचा प्रघात चालूच राहिला आहे. मुंजीच्या वेळेला तर अंतरपाटाच्या एका बाजूला मुंजा मुलगा उभा राहिला होता आणि दुस-या बाजूला प्रत्यक्ष त्याचे वडीलच पाटावर बसले होते. त्या दोघांत अंतरपाट धरून कसला सस्पेन्स निर्माण होतो कुणास ठाऊक? त्याचे प्रयोजन कांही कळले नाही.
दोन चार शब्द लिहिण्याची मला संवय असल्यामुळे मंगलाष्टकाची जबाबदारी माझ्याकडे देण्यात आली होती. त्यासाठी ओढून ताणून यमके जुळवण्यात आदल्या दिवशीचा बराचसा रिकामा वेळ उपयोगाला आला. हिन्दी माध्यमात शिक्षण घेत असलेल्या त्या बटूंना त्यातले काव्यगुण (?) किंवा सदुपदेश समजेल अशी सुतराम शक्यता नव्हती. त्या वेळेला ते समजून घेण्याच्या मनःस्थितीतही कोणी नसते. पण उपचार म्हणून शार्दूलविक्रीडित वृत्तामध्ये कांही ऐकल्याखेरीज कार्यसिद्धी झाल्यासारखे वाटत नाही. उरलेला वेळ भटजींनी "गंगा सिंधू सरस्वतीच यमुना गोदावरी नर्मदा" आणि "रामोराजमणीःसदा विजयते रामम् रमेशम् भजे" वगैरे गात काढला. अखेर "शुभमंगल सावधान " च्या गजरात आणि "तदेव लग्नं सुदिनं तदेव " हा मंत्र म्हंटल्यावर अंतरपाट दूर झाला आणि बटूने आपल्या वडिलांच्या गळ्यात हार घातल्यावर सर्व उपस्थितांनी टाळ्या वाजवल्या आणि बँडवाल्यांना "वाजवा रे वाजवा"चा इशारा देण्यात आला. त्यांनी
केलेला गोंगाट आणि त्या गोंगाटावर मात करून बोलण्याच्या प्रयत्नात असलेले, आतापर्यंत शांतपणे उभे असलेले प्रेक्षक यांच्या आवाजाने सभागृह दुमदमून गेले.
(क्रमशः)
No comments:
Post a Comment