Monday, November 24, 2008

शाळेतले शिक्षण (भाग ४)

इंग्रजी आणि संस्कृत हे दोन ऐच्छिक विषय सोडले तर उरलेले सारे विषय सर्वांना समान असत. इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र हे सोशल स्टडीजमध्ये येत; पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र आणि आरोग्यशास्त्र यांना मिळून 'शास्त्र' असे नांव होते आणि अंकगणित, भूमिती व बीजगणित हे गणित या विषयाचे उपविभाग होते. हेच विषय वेगवेगळे किंवा एकत्र करून एसएसएलसीला घ्यायचे थोडेसे स्वातंत्र्य होते. एकत्र किंवा वेगवेगळे घेण्यात त्या विषयाच्या अभ्यासक्रमाची लांबी, रुंदी आणि खोली यांत फरक पडत असेल पण मास्तरांच्या शिकवण्यात तो विशेष जाणवत नसे. अखेर ज्या त्या मुलाची जशी रुची व कुवत असे, तसेच कोणत्या विषयात जास्त मार्क मिळवून टक्केवारी वाढवता येते अथवा कोणता विषय निदान पास होण्यापुरते मार्क मिळवायला सोपा पडेल वगैरे बाबींचा विचार करून जो तो ते ठरवत असे. पण हे सगळे शेवटच्या वर्षी परीक्षेचा फॉर्म भरतांना ठरवता येत असे. तोंपर्यंत सगळ्यांना सगळे कांही शिकण्याची मुभा असायची. दहावीपर्यंत चित्रकला, क्रीडा, व्यायाम वगैरे अवांतर विषय असायचे. ते मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असले तरी परीक्षेच्या कामाचे नव्हते. पुढील काळात चित्रकार, नट किंवा खेळाडू यांना यशाबरोबर उदंड कीर्ती आणि समृध्दी प्राप्त होऊन ते झटपट करोडपती होऊन जातील असे तेंव्हा कोणाच्या स्वप्नातसुध्दा येत नव्हते.

इतिहासाच्या अभ्यासाची सुरुवात पांचवीतच व्हायची. सर्व गतकालाची 'प्राचीन','मध्ययुग' आणि 'अर्वाचीन' कालखंडात विभागणी करून एकेक कालखंड दरवर्षी शिकवला जाई. त्याच क्रमाने त्याची उजळणी आठवी ते दहावीत झाली. पांचवी ते सातवीत असतांना वेगवेगळे राजे, महाराजे, सुलतान आणि बादशहा यांच्या घराण्यांच्या वंशावळी, त्यांचे जन्म, मृत्यू आणि त्यांनी केलेल्या युध्दांच्या सनावली एवढेच महत्वाचे होते. हायस्कूलमध्ये शिकतांना त्याच्या जोडीला त्या काळातले समाजजीवन, सांस्कृतिक क्षेत्रातील प्रगती तसेच उत्खननात सापडलेल्या गोष्टी, बखरी, प्रवासवर्णने वगैरे तपशील भरून पुस्तकांची जाडी चौपट होत असे. कोठल्या तरी राजाच्या किंवा बादशहाच्या कारकीर्दीत त्याने काय केले असा एक प्रश्न हमखास असायचा. त्यावर "त्याने सुंदर इमारती, किल्ले, धरणे, कालवे आणि रस्ते बांधले, रस्त्यांच्या कडेला झाडे लावली, नद्यांच्या किना-यावर घाट बांधले, नदी नसेल तेथे विहिरी खणल्या, गांवोगांवी धर्मशाळा बांधल्या. जनतेवरील कराचा बोजा कमी केला." वगैरे लिहिले तर ते कोणालाही लागू पडत असे. ज्या राजाने यातले कांहीच केले नव्हते त्याने काय केले असा प्रश्न कधी विचारतच नसत.

हा भाग तसा नीरस असला तर इतिहासाला अत्यंत मनोरंजक असा दुसरा पैलू आहे. इतिहासातल्या घटना या घडून गेलेल्या 'गोष्टी'च असल्यामुळे त्यातील विविध प्रसंगांबरोबर कथानके, आख्यायिका वगैरे जोडल्या गेल्या आहेत। अनेक लोकप्रिय नाटके, कादंब-या आणि काव्यांमधून ते प्रसंग छान रंगवले गेले आहेत. त्यामुळे इतिहास हा विषय गोष्टींच्या रूपाने शिकतांना बालवयात तो आकर्षक वाटायचाच. त्यातील मुख्य पात्रांची कांही 'आपली' आणि कांही 'परकी' किंवा 'शत्रूपक्षाची' अशी आपोआपच विभागणी होत असे. मग आपल्या कथानायकाने शत्रूचा 'निःपात' केला, त्याचा 'समूळ नायनाट' केला की त्याच्या शौर्याचा व पराक्रमाचा अभिमान वाटायचा आणि शत्रू मात्र आपल्या लोकांची 'निर्घृण कत्तल' करायचा त्यामुळे त्याच्याबद्दल मनस्वीचीड वाटायची. वेळ पडल्यास आपला नायक शत्रूच्या 'हातावर तुरी देऊन' शिताफीने निसटून जायचा तर पळपुटा शत्रू 'भ्याडासारखा' पळ काढायचा. विजयाची खात्री नसली तर आपला राजा 'मुत्सद्देगिरी' दाखवून तह वगैरे करायचा आणि शत्रूपक्ष 'नामुष्कीने' वाटाघाटी करायला तयार होत असे. आपल्या विजयी वीरांचे शौर्य ऐकून स्फुरण चढायचेच, पण पराभूत झालेले संस्मरणीय वीर अखेरच्या श्वासापर्यंत प्राणपणाने लढून केवळ दुर्दैवाच्या फे-यामुळे अखेरीस 'धारातीर्थी' पडले असे वाटे. दुश्मनाचा विजय 'कपट कारस्थाने', 'दगलबाजी' आणि अखेर दैवाची त्याला साथ मिळाल्यामुळे व्हायचा. पराभूत झालेला शत्रू तर कुचकामाचाच होता. त्याचे नांवसुद्धा जाणून घ्यावे असे वाटत नसे. असे वेगवेगळे रंग त्यात भरल्यामुळे इतिहासात खूपच रंजकता येत असे.

पुस्तकात छापलेल्या गोष्टी बरोबरच असणार याबद्दल साधारणपणे बहुतेकांना खात्री असल्यामुळे त्याबद्दल त्यांना शंका वाटत नसे. पण कांही मुले संध्याकाळी 'बौध्दिक' वगैरे ऐकून येत असत. त्यामुळे त्यांच्या 'आपले' व 'परके' यांच्या याद्या वेगळ्या असत. त्याप्रमाणे कोण चांगले आणि कोण वाईट हे ठरत असे. अकबर आणि शहाजहान यांसारखे बादशहा, महात्मा गांधी व पंडितजींसारखे राष्ट्रीय नेते यांच्या संबंधात पुस्तकात जेथे कांही चांगले लिहिलेले असे त्या पानावर ते पेन्सिलीने फुल्या मारीत. परीक्षेत मात्र चांगले मार्क मिळवण्यासाठी पुस्तकात दिल्याप्रमाणे उत्तर लिहावे की तत्वनिष्ठेपोटी परीक्षेतले मार्क घालवावेत अशी शृंगापत्ती त्यांच्यावर ओढवत असे. स्वतःच्या बुध्दीने विचार करून आपले स्वतंत्र मत बनवण्याएवढी अक्कल त्या वयात नसते. त्यामुळे मनावर ज्या विचारांचा प्रभाव पडेल त्याप्रमाणे कधी कधी इतिहासाचा अर्थ वेगळा लागत असे. कोठल्याच विचारप्रणालीचा संबंध न आलेल्या मुलांना कदाचित इतिहास हा विषय तेवढा महत्वाचा वाटत नसणार.
. . . . . . . . . . (क्रमशः)

No comments: