Tuesday, November 11, 2008

अमेरिकेची नवी वाट - २


अमेरिकेला गेल्यानंतर तिथला एक मांडीवरला माझ्या तावडीत सापडला तेंव्हा तो कसा चालतो ते पाहण्यासाठी त्याच्याशी चाळा करता करता मिसळपावचे संकेतस्थळ हाती लागले. समर्थांच्या एका सुप्रसिद्ध ओवीच्या पहिल्या दोन चरणांवरून प्रेरणा घेऊन "जे जे आपणांसी कळावे, ते ते इतरांसी सांगून मोकळे व्हावे" असा विचार मनात आला आणि गारठलेली बोटे कीबोर्डावर बडवून घेतली. अशा प्रकारे मुंबईहून न्यूयॉर्कला केलेल्या विमानप्रवासाबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या. या लेखावर बरेच प्रतिसाद आले. ही वाट किमान २०-२५ वर्षे तरी जुनी आहे असे कोणी लिहिले होते. कांही लोकांनी प्रवासाला लागणारे कमीत कमी अंतर आणि त्यामुळे होणारी इंधनाची व वेळेची बचत यासारखे मुद्दे मांडून झाल्यावर त्यावर युक्लीडच्या प्रमेयाच्या आधाराने त्यांचे विश्लेषण करून चर्चेचा स्तर बराच उंचावला होता. त्यातील मुद्द्यांचा विचार करून ही पुरवणी जोडायचे ठरवले.

१९९६ साली मी मुंबईहून टोरोंटोला गेलो होतो तेंव्हा आमच्या सरकारी ऑफिसातल्या फॉरेन ट्रॅव्हल सेलने माझे तिकीट लंडनमार्गे काढले होते आणि बिलातले प्रत्येक अक्षर व आकडा डोळ्यात तेल घालून तपासणा-या आमच्या अकाउंट्स खात्याने माझा ट्रॅव्हल क्लेम बिनबोभाटपणे मंजूर केला होता. माझे सामान्यज्ञान जरी कच्चे असले तरी त्या काळात कॅनडाला जाण्याचा दुसरा जवळचा किंवा स्वस्तातला मार्ग असता तर तो या विशेषज्ञांना नक्की ठाऊक असता अशी माझी खात्री आहे.
" सन २००१ साली डेल्टा, कॉन्टिनेंटल आणि युनायटेड या प्रमुख अमेरिकन कंपन्यांनी उत्तर ध्रुवावरून चीनपर्यंत व्यावसायिक उड्डाणे करण्याची नुकतीच सुरुवात केली होती ( त्यानंतर त्यांनी ती सेवा भारतापर्यंत वाढवली असावी.) आणि एअर इंडियाने तर या मार्गावरून पहिले विमान २००७ साली उडवले." अशी माहिती मला शोधयंत्राद्वारे मिळाली. मी स्वतः नवी वाट शोधून काढल्याचा दावा कधीच केला नव्हता पण ही वाट किती जुनी आहे याची कल्पना प्रवास करतांना मला नव्हती, पण त्याने माझ्या अनुभवात विशेष फरक पडला नसता. त्यामुळे माझ्या लेखाला ' अमेरिकेची नवी वाट' असा सुटसुटीत मथळा देण्याऐवजी 'आधीपासून अस्तित्वात असलेली आणि चांगली रुळलेली पण मी यापूर्वीच्या आयुष्यात कधीही न पाहिलेली अमेरिकेची वाट ' असे लांबलचक नांव दिले असते तरी त्याखालचा मजकूर जवळजवळ तसाच राहिला असता .

'विमानप्रवासाचा इतिहास' या विषयावरील चर्चेचा धागा मी सुरू केला असता तर कोणत्या कंपनीने तयार केलेले आणि कोणत्या कंपनीने उडवलेले विमान पहिल्यांदा भारतातून निघून उत्तर ध्रुवावरून अमेरिकेला गेले याच्या इतिहासाची पाळेमुळे खणून काढली असती. पण माझ्या लेखाचा तो उद्देश नव्हता. आपण एकाद्या नवख्या गांवात जातो तेंव्हा रेल्वे स्टेशनातून बाहेर कसे पडायचे ते सुध्दा आपल्याला ठाऊक नसते. बाहेर पडल्यानंतर रस्त्यावरच्या पाट्या वाचत वाचत आणि चौकशा करत आपण योग्य स्थळी पोचतो. या सगळ्या गोष्टी जुन्याच असल्या तरी आपण प्रथमच पहात असतो. त्यामुळे त्याचे वर्णन रंगवून इतरांना सांगतो. बहुतेक सारी प्रवासवर्णने अशाच प्रकारे लिहिली गेली आहेत. मुंबईच्या विमानतळावरून उड्डाण केल्यानंतर न्यूयॉर्कला पोचेतोपर्यंत मी जे पाहिले, अनुभवले ते विस्मरण होण्याच्या आत थोडक्यात लिहून काढले होते.
मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमध्ये कमीत कमी अंतर कसे काढायचे या विषयाकडे वळू. या दोन शहरांच्या बिंदूंना जोडणारी सरळ रेषा काढली तर ती पृथ्वीच्या पोटातून जाते. त्यामुळे आकाशमार्गाने त्यांना जोडणा-या सर्व रेषा वक्रच असणार. परवा वॉशिंग्टन डीसी मध्ये फिरतांना एका वस्तुसंग्रहालयाच्या समोर अनेक मोठमोठे ग्लोब मांडून ठेवलेले पाहिले. थोडे लक्ष देऊन निरीक्षण केल्यावर युक्लिडचा नियम लक्षात आला तसेच मुंबई आणि न्यूयॉर्क या शहरांमधले कमीत कमी अंतर कुठल्या वक्र रेषेनुसार येते तेही कळले. आपली ठेंगणी ठुसकी आणि ढेरपोटी पृथ्वी उत्तर व दक्षिण ध्रुवांपाशी जराशी चपटी आहे आणि विषुववृत्ताजवळ थोडी फुगीर आहे. विषुववृत्ताचा परीघ उत्तर व दक्षिण ध्रुवांमधून जाणा-या पृथ्वीच्या परीघापेक्षा जास्त आहे. त्यामुळे आमच्या विमानाने घेतलेला उत्तर दिशेचा मार्ग अर्थातच जवळचा होता.
त्याशिवाय ध्रुवप्रदेशातले वातावरण स्तब्ध असल्यामुळे हवेचा विरोधसुध्दा थोडा कमी असतो म्हणे.
कोणत्याही वाहनातून जमीनीवरून वाहतूक करण्यासाठी रस्ते किंवा रेल्वेमार्ग बांधावे लागतात. ते अमूक इतक्या वर्षांपूर्वी बांधले गेले असे सांगता येते. हवेतून उडणा-या विमानाला फक्त वातावरण लागते आणि ते पृथ्वीवर जीवसृष्टी निर्माण होण्यापूर्वीपासून अस्तित्वात आहे. मुंबई व न्यूयॉर्क ही शहरे वसण्यापूर्वीच युक्लिडने आपले सिध्दांत सांगितले होते. भूगोलाच्या रचनेचा अभ्यासही पूर्वीपासून होत आला आहे. शंभर वर्षांपूर्वी जेंव्हा राईट बंधूंनी पहिले सुनियंत्रित विमान उडवले होते तेंव्हाच मुंबईपासून न्यूयॉर्कचे कमीत कमी अंतर कोठल्या मार्गाने ठरेल याची माहिती शास्त्रज्ञांना बहुधा उपलब्ध असावी. प्रत्यक्षात कोणत्या मार्गाने विमान न्यायचे हे तांत्रिक प्रगती व राजकीय परिस्थिती या कारणांनी ठरते.
भारतातून उत्तर ध्रुवावरून अमेरिकेकडे विमान नेण्यासाठी वाटेत न थांबता तितके लांबचे अंतर उडत जाण्याची क्षमता असलेले विमान हवे किंवा वाटेत थांबून इंधन भरण्याची सोय असायला हवी. तसेच पूर्वीच्या सोव्हिएट युनियनकडून किंवा नंतरच्या काळात त्यामधून फुटून निघालेल्या राष्ट्रांची परवानगी हवी. त्या भागावरून जातांना तिथे जमीनीवरून विमानांना मार्गदर्शन करणारी सक्षम व सुसज्ज अशी यंत्रणा पाहिजे. आणीबाणीचा प्रसंग उद्भवला तर उत्तर ध्रुवापाशी कोठेही ते विमान खाली उतरवणे अशक्य आहे याची जाणीव ठेवून त्याची तरतूद करायला पाहिजे. अशा अनेक कारणांमुळे वीसाव्या शतकात अशी व्यावसायिक उड्डाणे सुरू झाली नाहीत. हेरगिरी करणारी खास विमाने कधीपासून जगभर सगळीकडे फिरत आली आहेत.

2 comments:

प्रभाकर फडणीस P.K. Phadnis said...

पृथ्वीच केंद्रबिंदु, न्यूयॉर्क व मुंबई या तीन बिंदूतून जाणारे प्लेन पृथ्वीच्या पृष्टभागाला जेथे छेदून जाईल तो सगळ्यात जवळचा मार्ग. मात्र या मार्गाने विमान चालवावयाचे तर होकायंत्राचे बेअरिंग सारखे बदलत रहावे लागेल व त्याचे गणित किचकट असल्यामुळे संगणकाचा वापर करावा लागेल. किंवा दर १० मिनिटानी बेअरिंग बदलावे लागेल व त्याचा तक्ता आधीपासून तयार ठेवावा लागेल म्हणजे विमान बरेचसे हव्या असलेल्या मार्गाने जाईल.

Anand Ghare said...

आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. आपला मुद्दा गणिताच्या नियमानुसार अचूक आहे. मात्र विमानाच्या उड्डाणासाठी 'सर्वात जवळचा' हा एकच निकष न वापरता मी लेखात नमूद केलेल्या कांही इतर गोष्टींचा विचार करतात. तो विचार करतां पूर्वी युरोपमध्ये एक टप्पा घेऊन त्या मार्गाने सारी विमाने अमेरिकेला जात असत. आता मी नुकत्याच पाहिलेल्या नव्या मार्गावरून (उत्तर ध्रुवाच्या जवळून)जाऊ लागली आहेत. संगणकाचा वापर आजही होतोच आहे. त्यातून भविष्यकाळात आणखी दुरुस्ती होईल.